

बॉलिवूडबरोबरच इतर भाषिक चित्रपटांतही आपल्या मधुर आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई संगीत क्षेत्रातला एक मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जातात!
भारतीय सिने संगीतावर गेले आठ दशकाहून अधिक काळ आपले वर्चस्व गाजविणाऱ्या आशा भोसले काल वयाच्या ९२व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेल्या. बॉलिवूडबरोबरच इतर भाषिक चित्रपटांतही आपल्या मधुर आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई संगीत क्षेत्रातला एक मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जातात!
१९४३ साली ‘माझे बाळ’ या मराठी चित्रपटातील ‘चला चला नव बाळा’ या गाण्याने आपल्या गायकीचा प्रारंभ करणाऱ्या आशाताई हिंदी चित्रपटसृष्टीत शिरल्या त्या १९४८साली. ‘चुनरिया’ चित्रपटातील ‘सावन आया’ हे त्यांचे हिंदी चित्रपटातील पहिले गीत. तो जमाना सुरय्या, शमशाद बेगम यांचा होता. नंतर १९४९साली प्रदर्शित झालेल्या ‘महल’ या चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याने आशाताईंची मोठी बहीण लता मंगेशकर प्रकाशझोतात आल्या. त्यामुळे मग आशाच्या वाट्याला कॅबरे गाणी वा सहनायिकांच्या तोंडी असलेली गाणी येऊ लागली. पण संगीतकार ओ पी नय्यर यांनी हे समीकरण बदलले. आणि ‘नया दौर’पासून आशाताईंची एक नवी इनिंग सुरू झाली.
‘मांग के साथ तुम्हारा’, ‘साथी हाथ बढाना’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ या महंमद रफीबरोबरच्या त्यांच्या गाण्यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. त्यानंतर नय्यर व आशा भोसले हे परवलीचे समीकरण बनले. नय्यरनी त्यांना एक से बढकर एक गाणी दिली. ‘होले होले चलो साजना’(सावन की घटा), ‘जाइये आप कहॉं जाओगे’(मेरे सनम), सारखी नय्यर - आशा भोसले जोडीची गाणी आजसुद्धा तेवढीच लोकप्रिय आहेत. लता मंगेशकरांना न घेता आपले संगीत लोकप्रिय करणारा नय्यर हा बॉलिवुडातला एकमेव संगीतकार. त्यांनी लताची जागा आशाला दिली. आणि आशाने या संधीचे सोने केले. नय्यरमुळे इतर संगीतकारही नंतर आशाताईंना चांगली गाणी देऊ लागले.
त्यानंतर आशाची जोडी जमली ती राहुल देव बर्मन ऊर्फ ‘पंचमशी’. ‘तिसरी मंजिल’ हा या जोडीचा पहिला चित्रपट. यातले ‘आजा आजा मै हूं प्यार तेरा’ हे गाणे तर महा क्लिष्ट. हे गाणे पोटाला धक्का देऊन म्हणावे लागते. पण आशाताईंनी हेही आव्हान पेलले. नंतर पती झालेल्या पंचमशी आशा भोसलेची जोडी चांगलीच जमली. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेल्या ‘अनहोनी’ चित्रपटातील ‘हंगामा हो गया’ या गाण्यानेही असाच लोकप्रियतेचा कळस गाठला होता.
आशाताईंनी आपल्या आठ दशकाच्या कारकिर्दीत १२,०००हून अधिक गाणी गायली आहेत. हा एक जागतिक विक्रम मानला जातो. त्यात मराठी चित्रपटातील गाण्यांचाही समावेश आहे. सात फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन राष्ट्रीय पुरस्कार आशाताईंच्या नावावर आहेत. १९७९सालानंतर आशाताईंनी पुरस्काराकरता आपल्या नावाचा विचार करू नये, असे फिल्मफेअर पुरस्कारवाल्यांना सांगितल्यावर त्यांचे पुरस्कार बंद झाले.
आशाताईंच्या आवाजाची खासियत म्हणजे त्यांची अष्टपैलू नजाकत. म्हणूनच मधुबाला, मीनाकुमारी, आशा पारेख, वहिदा रहमान यांसारख्या सोज्वळ अभिनेत्रींना शोभणारा त्यांचा आवाज हेलन, बिंदू, यांसारख्या कॅबरे नृत्यांगनांनाही शोभू शकला.दोन पती, दोन मुले यांच्या निधनाचे दुःख पचवूनसुद्धा त्या नेहमी हसतच राहिल्या. म्हणूनच देशातील या महान अष्टपैलू गायिकेच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पित करत असताना त्यांनीच गायलेले ते १९६४सालातील वक्त या चित्रपटातील ऑलटाइम हिट गाणे याद येते
आगे भी जाने ना तू,
पीछे भी जाने ना तू,
जो भी है, बस यही इक पल है...
- मिलिंद म्हाडगुत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.