
अॅड. सूरज मळीक
गोव्याच्या एका टोकाला सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला काले हा एक निसर्गसंपन्न गाव आहे. डोंगरमाथ्यावर उगम पावणाऱ्या म्हादई नदीच्या ‘काले’ या उपनदीमुळे या गावाला हे नाव पडले असावे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांत दुरून काळ्या रंगाचे शिलाखंड या गावात प्रवेश करणाऱ्यांच्या नजरेत भरतात. जल, जंगल, जमीन आणि जैवसंपदा यांच्या सांनिध्यात जीवन जगणाऱ्या इथल्या कष्टकरी लोकमानसाने निसर्गाच्या कणाकणात दिव्यत्वाचा साक्षात्कार अनुभवलेला आहे. त्याची प्रचिती त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवातून दृष्टीस पडते.
काले ग्रामपंचायत क्षेत्रात येणारा वाघ्रेगाळ हा परिसर धारबांदोडा आणि सांगे तालुक्याच्या सीमेवर वसलेला आहे. भगवान महावीर अभयारण्याशी संलग्न असलेल्या या गावात जंगली श्वापदांबद्दलची आत्मीयता त्यांच्या विधी-परंपरेतून दिसून येते. जंगलाच्या साखळीतील शिखरावर असलेला प्राणी म्हणजे पट्टेरी वाघ. सह्याद्रीच्या कुशीत सुंदर जीवन व्यतित करीत इथल्या लोकमानसाने वाघालाच देवत्व प्रदान केले. वाघाच्या पाषाणी मूर्तीला वाघ्रोदेव म्हणून पुजण्याची परंपरा पूर्वापार चालू आहे.
गोव्यात ‘वाघाहन्न’, ‘वाघबीळ’, ‘वाघाहोवरी’, ‘वाघ्रपान’, ‘वाघ्रेगाळ’ अशी नावे असलेली गावे तेथे कधीकाळी राहत असलेल्या वाघाचे अस्तित्व अधोरेखित करतात. केवळ वाघ असल्याचीच ती खूण नसून, त्या परिसरात पूर्वी घनदाट जंगल क्षेत्र असल्याची ती जाणीव आहे. पट्टेरी वाघ हे गोव्यातल्या जंगलांचे नैसर्गिक वैभव आहे. त्याच्या विलक्षण शौर्य, कार्य, शक्ती व रंगरूपामुळे तो इथल्या लोकमानसासाठी आकर्षण ठरला. वाघ्रेगाळीतील कष्टकरी आदिवासी जनसमुदायाने शेतीव्यवसाय व गुराढोरांचे पालनपोषण करून आपले जीवन समृद्ध केले.
सोळाव्या शतकात जेव्हा पोर्तुगिजांनी तिसवाडी तालुक्यातील देवळांना उद्ध्वस्त करून ख्रिस्तीकरण करण्याचे षड्यंत्र आरंभले तेव्हा दीपवती बेटावरचा समाज आपल्या कुलदैवतांना घेऊन कधी जलमार्गातून तर कधी काट्याकुट्यातून मार्गक्रमण करत कालेच्या परिसरात येऊन स्थायिक झाला. लोहखनिज उत्खनन सुरू होण्यापूर्वी वाघ्रेगाळ येथे पेयजल आणि सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाण्याचे स्रोत होते. पाण्याचे हे स्रोत व येथील जमीन सुपीक असल्याने इथल्या कष्टकऱ्याने आपल्या शेतीबागायतीची उभारणी केली.
डोंगर उतारावरती वरच्या भागात पायकामळ या कातळ सड्यावर कुमेरी शेतीची परंपरा जुन्या काळी सांभाळली होती. पाईक देवाच्या या परिसरात नाचणी, पाखड या सारख्या धान्याचे पूर्वी भरपूर उत्पन्न घेतले जात असे. आजही लागवडीखाली असलेला पारंपरिक वायंगणी शेतीचा व्यवसाय येथे पाहायला मिळतो. तर काही कुटुंबांनी गायी, म्हशी पाळून त्यांपासून मिळणाऱ्या दुधाची विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवला.
सातेरी, जल्मी आणि पाईक अशा देवदेवतांनी त्यांच्या जगण्याला आधार दिला आहे. तरी या कष्टकऱ्याने गुरांना जंगली श्वापदांनी म्हणजेच पट्टेरी वाघाने इजा पोहोचवू नये म्हणून वाघाला पुजण्याची प्रथा सुरू केली. गोव्यातील पेडणे ते काणकोणपर्यंत अनेक गावांमध्ये वाघ्रोदेवाच्या मूर्तीचे पूजन केले जात असले तरी वाघ्रेगाळ येथील वाघाच्या मूर्तीचे पुरातत्त्वीय अभ्यासकांना विशेष आकर्षण आहे.
कारण हा नर वाघ चारही पायांवर ताठ उभा असून त्याच्या पुढच्या पायांच्या मधोमध एका डुकराची छोटेखानी मूर्ती आहे. हा डुक्कर आपले पुढचे पाय वाकवून बसलेला आहे. वाघाच्या गळ्यात माळा घातलेली आहे. एक आश्चर्यजनक बाब म्हणजे या वाघाच्या बाजूलाच एका सिंहाची छोटेखानी मूर्तीही आहे. हा सिंह बसलेल्या स्थितीत आहे.
कधीकाळी शिगावच्या एका मुलीचे लग्न काले गावातल्या तरुणाशी झाले. लग्नानंतर काही कालावधीनंतर विवाहित मुलीचे वडील जावयाच्या घरी खबरबात घेण्यासाठी पोहोचले. थकूनभागून आल्यानंतर आपल्या मुलीच्या हातचे घोटभर पाणी मिळेल अशी त्यांना आशा होती. पण घरात तर मुलगी नव्हती. हे पाहून ते हबकले.
काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर डोईवर आणि कडेवर पाण्याची घागर घेऊन आलेली मुलगी त्यांच्या दृष्टीस पडली. लग्नानंतर आपली मुलगी सुखासमाधानाने असणार ही त्यांची आशा फोल ठरली. दर दिवशी पिण्याचे पाणी आणण्यासाठी तिला बरीच पायपीट करावी लागते, याचे त्यांना वाईट वाटले. एक दिवस विश्रांती घेऊन ते पुन्हा स्वगृही परतले. कडेवर आणि डोईवर भरलेल्या पाण्याचे घट धारण केलेली आपली विवाहित मुलगी पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागली. तिचा थकलेला चेहरा पाहून ते खूपच अस्वस्थ झाले.
त्यांनी शिगावला आल्याबरोबरच सातेरी देवीचे देऊळ गाठले आणि ग्रामदेवीसमोर आपल्या विवाहित मुलीच्या वेदनेचा पाढा वाचला आणि देवीकडे तिच्या पेयजालाची व्यवस्था करण्याची मन:पूर्वक प्रार्थना केली. देवीने त्यांना दूधसागर नदीच्या काठावर गुंफेत असलेल्या वाघ्रो देवाकडे जाण्याचा संकेत दिला. त्या बरोबरच म्हणे मोठ्ठा चमत्कार घडला. पावसाचे दिवस नसतानाही आकाशात विजेचा कडकडाट आणि गडगडाट झाला.
नदी पात्रावरच्या शिलाखंडाला भेग पडली आणि दूधसागरचे पाणी तेथून काले येथे प्रकट झाले. काले आणि शिगाव या दोन्ही गावांतील ग्रामस्थ ही गोष्ट आवर्जून सांगतात. गोष्टीच्या कथनाप्रमाणे आजही एका प्रचंड मोठ्या जांभ्या दगडाला पोखरून बनवलेले घर आपल्या नजरेस पडते. या घरापासून जवळच बारमाही पाणी देणारे तळेदेखील आहे. छप्पर नसलेल्या या घराला चार भिंती असून आतमध्ये त्याच दगडाला कोरून बांधलेली चूल आहे. चुलीच्या पुढची जागा अजून खोल केलेली आहे. ते स्नानगृह असल्याचे इथले ग्रामस्थ सांगतात.
अशा कथा व पूर्वापार राखून ठेवलेली निसर्ग संचिते कधीकाळी इथे वास्तव करीत असलेल्या आदिमानवाच्या पाऊलखुणा जपतात.शिशिर ऋतूमधील या गावातील जंगलाची खासियत औरच असते. जशी दारात भरभरून अबोली फुलावी तशी जांभळ्या रंगाची रानअबोली संपूर्ण कातळ सड्याला जांभळ्या रंगात रंगवते. हे प्रसन्न रूप तनामनाला मोहून टाकणारे आहे.
इथल्या लोकमानसाने शेकडो वर्षांपासून इथल्या वृक्षवेली, पशुपक्षी, कृमी, कीटक यांना संरक्षण देत इथले देववृक्ष, झरे सांभाळून ठेवलेले आहेत. त्यामुळेच पावसाळ्यात, जून-जुलै महिन्यात या भागातील झरीवर प्रवेश केला तर मलाबार कॅपर क्रिपर या दुर्मीळ फुलांचे दर्शन होते. वेलवर्गीय कुळातली ही पांढरी शुभ्रफुले विविध फुलपाखरे, भुंगे, मुंग्या, मधमाश्या यांना आकर्षित करत असतात. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर विहरत जाणाऱ्या सरड्यासाठी हा नैसर्गिक अधिवास आहे.
भारताच्या सिंधू संस्कृतीतल्या लोकधर्मात वाघाला अनन्यसाधारण महत्त्व होते. पाकिस्तानमधल्या हडप्पा या भागात उत्खननात आढळलेल्या पशुपतीनाथ या शिक्क्यावरून हे स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालमधल्या खारफुटीच्या सुंदरबन जंगलात पट्टेरी वाघांचे वास्तव्य आहे. त्या जंगलात वास करणारी ‘बन बीबी’ वाघावर स्वार होऊन जंगल आणि जंगली श्वापदांचे रक्षण करते अशी लोकश्रद्धा तेथील हिंदू आणि मुस्लीम लोकमानसात रूढ आहे.
गोवा - कर्नाटक सीमेवर असलेल्या लोंढा या गावात आदिवासी जमात वाघाच्या पाषाणी मूर्तीचे पूजन करतात. त्या ठिकाणी तीन वर्षांतून एकदा गोंधळ या लोकनृत्याचे सादरीकरण केले जाते. ‘वाघया’ हे वारली या आदिवासी समाजाचे ग्रामदैवत असून त्याची मूर्ती लाकडावर किंवा दगडात कोरलेली पाहायला मिळते. गुजरातमध्ये वाघाविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी रांगोळीद्वारे वाघाची सुंदर चित्रे काढली जातात.
कलनाथ हे काले या गावचे ग्रामदैवत असून हे शिवाचे रूप आहे. त्या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाचे पूजन मोठ्या श्रद्धेने केले जाते. भगवान शिव हे जंगलनिवासी जाती जमातींचे श्रद्धास्थान असून महाशिवरात्रीच्या पर्वदिनी त्याचे पूजन केले जाते. काले गावात सावंत देसाई यांचे आगमन इन्क्विझिशनच्या कालखंडात नार्वे गावातून झाल्याने त्यांच्यात नार्वे गावात दिवसा भेट दिली तर रात्रीचा मुक्काम करू नये अशी लोकश्रद्धा रूढ आहे. गजलक्ष्मीच्या स्वरूपातील केळबाई देवी हे आपले कुलदैवत असल्याचे सावंत देसाई पूर्वापार मानतात. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध असा काले गाव आज परिवर्तनाच्या वाटेवर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.