संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Goa Road Rage: रस्ता मोकळा करण्यासाठी केवळ हॉर्न वाजवला म्हणून थेट गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होतो आणि शिवीगाळ केली जाते, हे कोणत्या सुसंस्कृत समाजात बसणारे वर्तन आहे?
Goa Road Rage
Goa Road RageDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

गोव्याच्या सुसंस्कृत (?) कायदेपालनाला कुडचडेत आमदाराच्या उद्दाम पुत्राने जाहीरपणे आव्हान दिले आहे. कुंभारजुवेचे भाजप आमदार राजेश फळदेसाई यांचे चिरंजीव राहुल फळदेसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भररस्त्यात घातलेला कथित उच्छाद कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारा आहे. एका ज्येष्ठ वकिलाच्या कुटुंबाला रस्त्यात अडवून, त्यांच्या गाडीचा पाठलाग करून आणि हातात लोखंडी सळीसारखे हत्यार घेऊन दहशत माजवण्यापर्यंत या आमदारपुत्राची मजल गेली असल्यास ही अत्यंत शोचनीय बाब आहे.

रस्ता मोकळा करण्यासाठी केवळ हॉर्न वाजवला म्हणून थेट गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होतो आणि शिवीगाळ केली जाते, हे कोणत्या सुसंस्कृत समाजात बसणारे वर्तन आहे? गोव्याच्या रस्त्यांवर सध्या हे ‘रोड रेज’चे प्रकार प्रचंड वाढले आहेत. त्यात पैशांची नशा डोक्यात चढलेले धनिकपुत्र आणि राजकीय छत्रछायेत बिघडलेली मुले आघाडीवर दिसतात. कुडचडे येथील या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने पसरले. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, वाहनांची माहिती आणि उपलब्ध डिजिटल पुरावे तपासून या प्रकरणातील सत्य समोर आणले पाहिजे. गोव्यात रस्त्यावरील दहशतीचा हा काही पहिलाच प्रकार नाही.

Goa Road Rage
Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

मद्यधुंद धनिकपुत्रांनी बेदरकारपणे कार चालवून मिरामार आणि दोनापावला येथील अपघातांत निष्पापांचे जीव घेतले आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील अलीकडील दुर्घटनेत वाहनाला आग लागून तरुणाचा होरपळून मृत्यू झाला; त्यालाही असाच एक मद्यधुंद लाडका कारणीभूत ठरला होता. अशा बेजबाबदार वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची गरज यापूर्वीच अधोरेखित झाली आहे. महागडी गाडी चालविण्याची (आर्थिक) क्षमता असू शकते; मात्र रस्त्यावर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार कुणालाही नाही. कुडचडेतील हा प्रकारही रोड रेजचाच भाग.

कुडचडेतील संपूर्ण प्रकरणात संतापजनक बाब ही की, पीडित व्यक्ती स्वतः एक ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असूनही कुडचडे पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केल्यानंतर ‘एफआयआर’ नोंदवण्याबाबत पोलिसांचे हात थरथरत होते. आरोपी हा सत्ताधारी आमदाराचा मुलगा आहे म्हणूनच कायद्याची चाके एवढी संथ झाली आहेत काय? रस्त्याच्या मधोमध एसयूव्ही उभी करून वाहतूक कोंडी करणे आणि नागरिकांना धमकावणे हे प्रकार उघड्या डोळ्यांनी दिसत असताना खाकी वर्दी कोणाच्या इशाऱ्यावर मूकप्रेक्षक बनली आहे? ‘रोड रेज’चा हा माज वेळीच उतरवला नाही, तर सामान्य माणसाला रस्त्यावरून चालणेही कठीण होईल. माजी आमदार लवू मामलेदार यांचा मृत्यूही ‘रोड रेज’मुळेच झाला होता, हे अनेकांना आजही आठवत असेल.

Goa Road Rage
Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

यापूर्वी कुडचडे येथीलच एका नगरसेवकाच्या मुलाकडून झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणातही जेव्हा जनता संघटितपणे रस्त्यावर उतरली, तेव्हाच पीडित मुलींची भीती कमी झाली आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले, ही पूर्वपीठिका आहे. राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या मोठ्या धेंडांच्या मुलांचा अशा पद्धतीचा उपद्रव आता उंबरठ्यावरच ठेचून काढला पाहिजे. कायदे बनवणाऱ्यांच्याच घरातून जर कायद्याची अंमलबजावणी मोडून काढली जाणार असेल तर सामान्य गोमंतकीयांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून ठेवायची?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com