

कोकण आणि घाटमाथ्यावरील ‘सडा’ हा विशिष्ट असा अधिवास संशोधकांचे आणि निसर्ग अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत असतो. सड्यांवर वाढणारी संपन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जीवसृष्टी त्याला कारणीभूत आहे. पावसाळ्यातील जोरदार पाऊस, वेगवान वारा, कमी पोषकद्रव्ये असणारी जमीन आणि उन्हाळ्यात पडणारे कडक ऊन अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीत तग धरून येथील जीवसृष्टी आपला जीवनक्रम पूर्ण करत असल्याने, सड्यांवर वाढणारी जीवसृष्टी वैशिष्ट्यपूर्ण निपजते.
अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती ‘लेपिड्याग्याथिस क्लाव्हाटा’, जी आज धोक्यात असलेल्या वनस्पतींच्या यादीत आहे व ती बऱ्याच तज्ज्ञांचा अभ्यासाचा विषय बनलेली आहे. पश्चिम घाटातील सड्यांवर आढळणाऱ्या या प्रजातीला बोली भाषेत ‘कोच’ म्हणतात.
१८५१ साली एन. ए. डॅल्झेल याने या वनस्पतीचा शोध चोर्ला सड्यांवरून लावला होता. त्यानंतर जवळजवळ १६६ वर्षांनी पुन्हा ही वनस्पती निदर्शनास आली, जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली येथील चौकुळच्या सड्यांवर डॉ. ऋतुजा कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तिचा शोध लागला.
त्यानंतर डॉ ऋतुजा कोलते- प्रभुखानोलकर (रा. बेळगाव, द ग्रीन कॉन्सेप्ट, पुणे सोबत संलग्न) आणि त्यांचे सहकारी राहुल प्रभुखानोलकर (जी.एस.एस. कॉलेज, बेळगाव), प्रभा पिल्ले (केरळ), डॉ. शरद कांबळे (म. वि. प्र. समाज संस्थेचे कॉलेज, त्र्यंबकेश्वर), डॉ. ज्ञानशेखर (एम.सी.सी. कॉलेज, चेन्नई),
डॉ. जनार्थनम (गोवा) यांच्या आठ-नऊ वर्षे सुरू असलेल्या सखोल निरीक्षणानुसार असे लक्षात आले, की ही प्रजाती दरवर्षी फुलत नाही, जशी कारवी आणि बांबूची (मोनोकार्पिक प्लेटेशियल) प्रजाती फुलते.
मोनोकार्पिक प्लेटेशियल प्रवृत्तीच्या प्रजातींचे वैशिष्ट्य म्हणजे एका ठिकाणची सगळी झाडे एकाच वेळेला फुलतात आणि त्यांच्या फळांमधील बी परिपक्व झाली, की सर्व झाडे मरून जातात. बियांपासून नवीन रोपे तयार होऊन पूर्ण वाढ झाल्यावरच परत फुलतात. यामुळेच आपल्याला कार्वीची किंवा बांबूची फुले दरवर्षी दिसत नाहीत. ठरावीक कालावधीने दिसतात.
अभ्यासकांनी असेच निरीक्षण ‘लेपिड्याग्याथिस क्लाव्हाटा’संबंधात नव्याने नोंदवले आहे. त्यांनी हे संशोधन ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’मध्ये प्रकाशित केले आहे. त्यांचे निरीक्षण असे आहे, की, नोव्हेंबर २०१६ मध्ये चौकुळ येथील ‘कोच’ची सर्व झाडे फुलली होती.
त्यानंतर २०१७ च्या पावसामध्ये सर्व झाडे मरून नवीन रोपे तयार झाली आणि सात वर्षांच्या कालावधीनंतर २०२४ नोव्हेंबरमध्ये ती झाडे परत फुलली. अर्थात, या प्रजातीच्या जीवनचक्राबाबत अधिक निष्कर्ष काढण्यासाठी त्यांचा सविस्तर अभ्यास आणि त्यांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणांची आवश्यकता आहे.
लेपिड्याग्याथिस कुळातील बहुतांश प्रजाती प्रदेशनिष्ठ असून त्यांच्यामध्येही असे निरीक्षण आढळण्याची दाट शक्यता आहे. या नव्या संशोधनामुळे कोकण आणि घाटमाथ्यावरील सड्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून गोवा विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या डॉ. ऋतुजा कोलते आणि त्यांचे सहकारी सड्यांवरील प्रदेशनिष्ठ वनस्पती, त्यांची अनुकूलने, पर्यावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम, जनजागृती, त्यांचे लोकसहभागातून संवर्धन इत्यादी विषयांवर काम करत आहेत.
सात वर्षांनंतर फुलणाऱ्या या वनस्पतीसंदर्भात यापूर्वी ज्या पैलूंची माहिती उपलब्ध नव्हती, ती या शोधनिबंधामुळे आणि ऋतुजा कोलते प्रभुखानोलकर आणि त्यांच्या सहकारी वनस्पती शास्त्रज्ञांच्या निरीक्षणामुळे प्राप्त होण्याची संधी लाभली आहे. म्हादई खोऱ्यातल्या चोर्ला घाटात ११६ वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी जी वनस्पती नोंद केली होती, तिच्याबद्दल नव्याने संशोधन होत आहे, ही आनंददायी बाब आहे.
- राजेंद्र पां. केरकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.