

मधू य. ना. गावकर
पश्चिम घाटाच्या डोंगरदऱ्यांत पायपीट करताना कारवी वनस्पती काही नवीन नाही. ती पायवाटाच्या दोन्ही बाजूंनी दाट जाळी निर्माण करून भर उन्हात शीतल सावलीचा थंडावा देत मुरमूड मातीत आपला तोल सांभाळत उभी राहिलेली पाहावयास मिळते. डोंगर उतार तुडवताना म्हाताऱ्याला काठीप्रमाणे तिच्या फांद्या हातात पकडून सांभाळत, प्रवास करण्यास मदत करणारी आपली कारवी स्वतः जळत दुसऱ्यांना जीवन देते.
संपूर्ण पश्चिमघाटाच्या दऱ्याखोऱ्यातील उंचसखल भागात वेगवेगळ्या रूपात ती आठ दहा वर्षांनी फुलून हिरव्या जंगलात निळा कृष्णसावळा रंग भरून अनेक प्राण्यांचे लक्ष केंद्रित करते. स्वार्थी मानव तिचे सौंदर्य पाहण्यास पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे तिच्या मुळावर तुटून पडल्यास कारवी वनस्पती नष्ट होण्याचा धोका असतो. हे शिकलेल्या माणसाला कोण सांगणार?
कारवी वनस्पतीला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. तामिळनाडू आणि केरळ राज्याच्या सीमेवर पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागाला मुरुगन देवाचे आदिस्थान मानतात. कोडाईकनालपासून तीन चार किलोमीटरावर ते आहे.
पश्चिम घाटाचा तो उंच डोंगरभाग. त्याचे नाव कुरंजी. त्या डोंगरात मुथुवा समाजातील आदिवासी लोक राहतात. ते मुरुगन देवाची पूजा करतात. पूर्वी त्या समाजाच्या मुखीयाची मुलगी वल्ली ही देव मुरुगनाच्या प्रेमात पडली. तिने मनात पण केला की, लग्न करीन तर मुरुगन देवाशीच. म्हणून ती देवाचा धावा करू लागली.
असे प्रकार पुराणात वाचावयास मिळतात. हिमालयाची कन्या पार्वती व शंकर, महाराष्ट्रात जेजुरीचा खंडेराया व बानू तसाच प्रकार वल्ली व मुरूगन म्हणजे कार्तिकेय स्वामी यांचा आहे. वल्लीच्या पणाची गोष्ट देव मुरूगनाच्या कानावर पडली आणि तो म्हाताऱ्याचे रूप धारण करून वल्लीला भेटायला आला.
म्हाताऱ्याने तिला लग्नांची मागणी घातली. वल्लीने त्याला नकार दिला. ती म्हणाली लग्न करेन तर मुरुगन देवाशीच, हा माझा पण आहे. हे ऐकून मुरुगन आपल्या गणपती भावाकडे जाऊन त्याच्याकडे मदत मागितली. कारण मुरुगन- कार्तिकेय स्वामी हा ब्रह्मचारी.
मग गणपती हत्तीचे रूप घेऊन वल्लीकडे गेला. त्या अक्राळ विक्राळ हत्तीचा देह पाहून वल्ली घाबरली आणि म्हाताऱ्याकडे मदतीची याचना करीत त्याला लग्नास होकार दिला. त्याच क्षणी म्हाताऱ्याने आपले खरे रूप प्रकट करून हातात भाला घेऊन मोरावर बसलेल्या कार्तिकेय देवाने वल्लीला दर्शन दिले आणि वल्लीच्या भक्तीपायी लग्न केले.
लग्नात वल्लीने निळ्या कारवीचे हार गुंफून ते एकमेकांच्या गळ्यात घातले, अशी आख्यायिका आहे. म्हणून तामिळनाडू आणि केरळचे लोक कुरंज पर्वताला देव मानतात. दर आठ, दहा, बारा वर्षांनी किंवा हवामान बदलाने फुलणारी कारवी त्या कुरंज नावे निलगिरी पर्वतावर मोठ्या प्रमाणात फुलते.
तापी ते नगरकोयलपर्यंत पसरलेल्या पश्चिम घाटात दरवर्षी कारवीचा बहर फुलतोच. तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ किंवा तामिळनाडू राज्यातील भागात असो, तो श्रावण भाद्रपदात पाहावयास मिळतो. या वनस्पतीवर अभ्यास करण्यास वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञांच्या तुकड्या जातात.
या भागातील मुयुवा आणि तोडी आदिवासी समाज कुरंज / निलगिरी पर्वतावर फुललेली कारवीची फुले भक्तिभावाने देवास अर्पण करतात. ते दर आठ-दहा वर्षांनी फुललेल्या बहाराला एक वर्ष मानून आपले वय मोजतात.
इतका भक्तिभाव आणि श्रद्धा, विश्वास मुरुगन देवावर असतो. त्यांची नाळ पर्यावरण, लोकसंस्कृती, लोककला, धर्म, सण, विधी त्या निसर्ग कारवी वनस्पतीशी जोडली आहे. ते मनापासून कारवीचे संवर्धन करतात. कारवीचे अनेक प्रकार आहेत. अडुळसा, गोटला, कोरांटी, अबोली या वनस्पती कारवी गटातील आहेत.
कारवी वनस्पतीच्या शेकडो प्रजाती जगभरात पसरल्या आहेत. संपूर्ण भारतात तिच्या कैक जाती आहेत. पश्चिम घाटाच्या दऱ्याखोऱ्यांत पायपीट करताना ती काही नवीन नाही, पायवाटांच्या दोन्ही बाजूंनी गच्च उगवलेली हिरवी कारवी, प्रदेशनिष्ठ पाहावयास मिळते.
हिमालयाच्या पायथ्याशी पूर्व पश्चिम रांगा, सह्याद्री, आरावली, विंध्यपर्वत रांगांत ती व्यापली आहे. निलगिरी पर्वतात उगम पावलेल्या कुंथी नदीवरून या वनस्पतीला कारवी नाव दिले. तसेच जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ तिच्या फुलांना कारवी नाव दिले. फुलांचा आकार शंखासारखा आहे, भारतातील कारवीची प्रजाती मलेशियन जनकुय रेषेतील आणि काही आफ्रिका खंडीय रेषेतील जनुकीय आहे.
कारवी वनस्पती महाभूखंडातून भारतात आली असावी असे शास्त्रज्ञ मानतात. तिचा जीवनक्रम एकदम फुलोरा फुलवून आपले बियाणे सर्वत्र पसरून एकदम नष्ट होते. फुलोऱ्यात ती लाखोंच्या संख्येने फळातून बियाणे देते. पुनर्जन्मासाठी ती स्वतःला संपवून घेते. निसर्गात पुन्हा फुलताच तिच्यावर अवलंबून असणारे सारे कृमी कीटक, मुंग्या, मधमाश्या वाळवी, गवे, मेरू, हरणे, भेकरे, शेळ्या, मेंढऱ्या कारवीच्या देहावर ताव मारतात.
गळलेली पाने खाऊन वाळवी उच्च प्रतीचे नैसर्गिक खत तयार करतात. मधमाश्यांचे आणि फुलपाखरांचे हजारो समुदाय मध लुटण्यास दंग असतात. शाकाहारी वन्यप्राणी तिची कोवळी पालवी खातात. अस्वल तिच्या मुळातील वाळवी खाऊन फस्त करते.
सरपटणारे प्राणी थंडाव्यासाठी बस्तान मांडतात. एकूण कारवी बहराने त्या परिसरात निसर्गाचा कुंभमेळा भरलेला माणसांना पाहावयास मिळतो. तिच्या बिया आकाशात उडणाऱ्या पतंगाप्रमाणे हलक्या असतात. वाऱ्याच्या झोतात त्या दूरवर पसरतात. उन्हात तापलेल्या बियांवर मान्सून पाऊस पडला म्हणजे त्यातून व्ही आकाराचे रोपटे तयार होते.
जंगलातील शांत वातावरणात फुलताना फटाके फुटल्याप्रमाणे आवाज देते. जंगलात प्रवास करताना तिची बी मिळाली तर चिमटीने दाबल्यास ती दुभंगते आणि आतील गर स्प्रिंगप्रमाणे उडी घेत बाहेर पडतो.
वारा आणि पावसाच्या पाण्याने तिचा पसरण्याचा प्रवास सुरू होतो. ती दाटीने हिरव्या स्वरूपात उगवून आपले जंगल तयार करते. जंगलाला जैविक समृद्धता दाखवणाऱ्या कारवीच्या पानावर अनेक फुलपाखरांच्या प्रजाती आपली अंडी घालतात. कारवी उतारावरून वाहणाऱ्या ओहोळांच्या काठावर आपली मुळे मातीत रुतवून जमिनीची धूप थांबवते.
आदिवासी लोक वाळलेल्या झुडपांच्या काठ्या आणून घरांना अगर शेळ्या मेंढराच्या गोठ्याला भिंती उभारण्यास वापर करतात. कारण त्या काठ्यांच्या भिंतीतून कोणताच प्राणी आत येऊ शकत नाही.
फुलांचा मध औषधासाठी वापरतात. मधात तुरटपणा जास्त असतो. मध गुणकारी असल्याने त्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारवीचे जंगल आपल्यातील वेगळेपण दाखवते. तिच्यासोबतीत इतर वनस्पतीला ती वाढू देत नाही. म्हणजे त्या वनस्पतीत वेगळेपणाची जाण कळते.
विकासाच्या नावाने आज प्राणवायूचे कारखाने असलेले डोंगर खणून त्यातून बॉक्साइड जांभा दगड, पाषाण, आयर्न, मँगनीज मिळविण्यासाठी धनिकांचे प्रयत्न चालेले आहेत. त्यातून अभयारण्ये सुटलेली नाहीत. जंगलाची राखण करणारा पट्टेरी वाघ आपल्या घरासाठी आज माणसाकडे दयेची याचना करतो.
म्हादईचे पाण अडवून ते कर्नाटकात वळवण्याचा प्रयत्न होत असल्याने आपल्या म्हादई अभयारण्यातील कारवी जंगल, इतर पुष्पवेली, वनस्पती, वृक्ष आणि त्यातील वन्यप्राणी सुरक्षित राहणार की नाही हे येणारा काळच ठरवेल. केरळात वायनाड झाले तसे गोव्यात न घडो. आज सुशिक्षित समजणारा माणूस वन्यप्राण्यांचे जंगल आपले म्हणू लागला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.