

सर्वेश बोरकर
गोव्यातील कदंब हा भारतीय उपखंडातील एक प्रसिद्ध राजवंश ज्यांनी १० व्या ते १४ व्या शतकापर्यंत गोव्यावर राज्य केले. त्यांनी शिलाहारांचे प्रदेश ताब्यात घेतले आणि प्रथम चांदोर किंवा चंद्रपूर येथून त्यांच्यावर राज्य केले, नंतर आजचं गोवा वेल्हा किंवा गोपकपट्टणला त्यांची राजधानी बनवली.चालुक्यांचा एक सामंत म्हणून, चालुक्य राजा तैलप दुसरा याने कदंब षष्ठदेव यांना गोव्याचे महामंडलेश्वर म्हणून नियुक्त केलं. सावईवेरे शिलालेखानुसार, कदंब हे चालुक्यांचे सहयोगी होते, ज्यांना त्यांनी राष्ट्रकुटांचा पराभव करण्यास मदत केली. नंतर षष्ठदेवांनी शिलाहारांकडून चंद्रपूर शहर जिंकले आणि इ .स ९६० मध्ये गोव्याचे कदंब राजवंश स्थापन केले.
राजा षष्ठदेवाने गोवा, गोपकपट्टण बंदर व कपर्दिकाद्वीप जिंकले व दक्षिण कोकणचा मोठा भाग आपल्या राज्यात जोडला, ज्यामुळे गोपकपट्टण त्याची उप-राजधानी बनली. पुढचा राजा जयकेशी पहिला याने गोव्याच्या राज्याचा आणखी विस्तार केला. जैन संस्कृत ग्रंथ, द्वैयाश्रय, त्याच्या राजधानीच्या विस्ताराचा उल्लेख करतो आणि गोपकपट्टण बंदराचे झांझिबार, बंगाल, गुजरात आणि श्रीलंकेशी व्यापारी संपर्क होते, असे नमूद करतो.
गोपकपट्टण हे एक आनंददायी व्यावसायिक शहर होते, जे जुन्या गोव्याशी राजबिडने जोडलेले होते आणि ३०० वर्षांहून अधिक काळ व्यापारी केंद्र होते. इ.स १३२० च्या दशकात खिलजी सेनापती मलिक काफूरने ते लुटले. कदंब चांदोरला परत गेले, परंतु मुहम्मद बिन तुघलकने चांदोरवर विजय मिळवला तेव्हा ते गोपकपट्टणला परतले .
ताम्रपटांवरचे शिलालेख हे तांब्याच्या ताम्रपटावर कोरलेले कायदेशीर दस्तावेज. ही ताम्रपटावर कोरण्याची प्रथा भारतीय उपखंडात व्यापक आणि दीर्घकाळ चालत आली आहे, ताम्रपटवर कोरलेले कायदेशीर दस्तावेज देणगीच्या कृतीची नोंदणी आणि नोंद करत असत म्हणजेच अनुदान किंवा देणगी, सामान्यतः जमीन किंवा सवलतीचे राज्यांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेली जमिनी मालकी आणि कर आकारणी बद्दल नोकरशाही माहिती देत.
तांब्याच्या पाट्या अनिश्चित काळासाठी अबाधित राहू शकतात लोहाप्रमाणे गंजत नाहीत वा खराब होत नाहीत, उलट ताम्रपट एक संरक्षक थर विकसित करतो. असाच एक ताम्रपट एच.व्ही. नाईक, न्यायालयाचे लिपिक, दिवाणी न्यायाधीश न्यायालय, कारवार यांच्या ताब्यात होता.नाईक यांचे कुटुंबीय कारवार मुख्यालयापासून चार मैलांवरील सदाशिवगड येथे आहे आणि या ताम्रपटाच्या पाट्या तेथे वारसा म्हणून पडून होत्या.
या ताम्रपटाला गोलाकार कड्यात एकत्र धरलेल्या तीन तांब्याच्या पाट्या होत्या. पहिल्या आणि तिसऱ्या पाटीच्या आतील बाजूस आणि दुसऱ्याच्या दोन्ही बाजूंना कोरलेले लेखन आढळते होते. शिलालेखाच्या पृष्ठभागावर उलटलेला एक खंजीर व सिंहाच्या आकृत्या होत्या.
वरच्या बाजूला स्वस्तिक व सूर्याच्या आकृत्या दिसतात, तसेच आख्यायिका श्री-विष्णुदास ः आणि नंतर चंद्रकोर आहे. त्यावरचे लेखन बाराव्या शतकातील नागरी आहेत, लेखनाची सुरुवात शिवाला आवाहन करून होते. कदंब कुटुंबातल्या राज घराण्याची उत्पत्ती नेहमीच्या पद्धतीने सांगितल्यानंतर, पौराणिक नायक त्रिलोचन कदंबाकडून, गोव्यातील कदंबांची संक्षिप्त वंशावळी दिली आहे.
चालुक्य राजकन्या मैलाला महादेवी यांच्या जयकेशिन दुसरा याचे पुत्र शिवचित्त परमाडी व त्याचा धाकटा भाऊ विजयार्क वा विजयादित्य दुसरा यांच्याशी वंशावळ थांबते. सदाशिवगड ताम्रपटांवरील शिलालेख विजयादित्या दुसरा सत्ताधारी गोव्याचा कदंब राजा म्हणून दर्शवतो. देवी आर्य भगवतीला राजाने दिलेली जमीन भेट म्हणून नोंदवणे हा या ताम्रपटांचा उद्देश असावा. त्याच्या कुटुंबाच्या वर्णनावरून आणि संदर्भावरून असे दिसते, की या भेटीचा लाभार्थी गोविंद नावाचा भारद्वाज गोत्रातील ब्राह्मण होता,जो विज्ञान व खगोलशास्त्र अभ्यासात पारंगत होता. देणगीच्या कुटुंबाचे चार पिढ्यांचे वर्णन या ताम्रपटांत आहे.
या कुटुंबीयांना भेट म्हणून मालमत्ता मारुवटुगाडालूच्या समाविष्ट असलेल्या अरुविगे गावच्या हद्दीत वसलेली होती. या ताम्रपटावर कोरलेली तारीख अशी पुढील शब्दांत आहे ‘षक ११०२, कार्तिक शु. १२, रविवार व शक वर्ष चालू १४ ऑक्टोंबर ११७९’ या तारखेशी संबंधित आहे. ताम्रपटाचे महत्त्व त्याच्या अद्वितीय असण्यात आहे. शिवचित्त परमाडी व विजयादित्य दुसरा या दोन भावांच्या संयुक्त कारभाराबद्दलचे शिलालेख तसेच त्या दोघांपैकी फक्त ज्येष्ठ शिवचित्त परमाडी पूर्वीच्या राजवटीचा उल्लेख करणारे अनेक शिलालेख सापडले आहेत. विजयादित्याचा (दुसरा) स्वतंत्र शासक म्हणून उल्लेख करणारा कोणताही शिलालेख आजपर्यंत समोर आलेला नाही.
मारुवटुगाडालू हा मारु, वटु व गाडालू या शब्दांनी बनलेला कन्नड शब्द आहे. त्याचा अर्थ ‘समुद्रालगतचा किनारी प्रदेश.’ असा होतो आरुविगे हे सध्याच्या काळातील आरेगे या गावासारखेच नाव आहे कारवारच्या आग्नेयेला ४ मैलांवर, अंकोला रस्त्यावर आरेगे गावात आर्यदुर्गा देवतेला समर्पित एक मंदिर आहे. ही देवता कदाचित अग्रलेखातील देवी आर्य भगवतीचे प्रतिनिधित्व करते.
आर्यदुर्गा देवीची पूजा अंजदीप बेटावरच्या (वा अंगेदिवा बेटावर) मंदिरात केली जात होती, असे मानले जाते. १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी बेटावर हल्ला करून मंदिर उद्ध्वस्त केले तेव्हा मूर्ती बिंजे या गावात हलवण्यात आली. नंतर, १८ व्या शतकात टिपू सुलतानच्या कारकिर्दीत, मूर्ती पुन्हा अंकोल्यातील सध्याच्या ठिकाणी हलवली. अंजदीपवरील मूळ मंदिराबद्दल, तेथील एका प्राचीन मंदिराच्या अवशेषांचे संदर्भ आहेत, परंतु आता तिथे भेट देता येते नाही. कारण हे बेट नौदलाकडे सोपवले आहे, जे आयएनएस कदंब नौदल तळाचे (सीबर्ड) कारवार येथील मुख्यालय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.