Jarwa Tribe: पन्नास हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून स्थलांतरित झालेले, जसे जन्मले अजूनही तसेच राहणारे "जारवा''

Baratang Island: आमच्या यात्रेचा तिसऱ्या दिवशी आम्ही सुभाषचंद्र बोस बेटावर जाऊन आलो. बाराटांग बेटावर जाण्यासाठी आम्हांला पहाटे साडेतीन वाजता निघायचे होते म्हणून आम्ही दोन वाजताचा गजर लावूनच झोपी गेलो.
Baratang Island, Jarwa Tribe
Jarwa TribeDainik Gomantak
Published on
Updated on

Journey To Baratang Island And Jarwa Tribes Experience

सौ. शुभदा दीपक मराठे

आमच्या यात्रेचा तिसऱ्या दिवशी आम्ही सुभाषचंद्र बोस बेटावर जाऊन आलो. बाराटांग बेटावर जाण्यासाठी आम्हांला पहाटे साडेतीन वाजता निघायचे होते म्हणून आम्ही दोन वाजताचा गजर लावूनच झोपी गेलो. बाराटांग बेटावर जायची उत्सुकता इतकी होती की रात्री गजर व्हायच्या आधीच जागी झाले. बरोबर साडेतीनला तयार होऊन आम्ही सगळे बाराटांग बेटावर जाण्यास निघालो. आमच्या बरोबरच्या एक दोन जणांना मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे आमच्याबरोबर येता आले नाही याचे वाईट वाटले.

बाराटांग हे बेट विजयपुरमपासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे. पैकी ५० ते ५५ किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे जंगलातून जातो. या जंगलात ‘जारवा’ नावाचे आदिवासी राहतात. इथल्या वेगवेगळ्या बेटांवर ‘जारवा’, ‘औगे’, ‘सेंटीनलीज’ नावाचे आदिवासी राहतात. बाराटांग बेटावर जाण्यासाठी या जंगलाच्यामधून सरकारने पक्का रस्ता तयार केल्यामुळे ‘जारवा’ आदिवासी खूपच चिडलेले आहेत. त्यामुळे ते हल्ला करतील की काय याची भीती येथील लोकांना वाटते. म्हणून या जंगलातून जाताना वाटेत गाड्या कुठेही न थांबता थेट जिरकटांगला येऊन थांबतात.

Baratang Island, Jarwa Tribe
Goa Opinion: तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा ‘डोस’ अंदाधुंद व्यवस्थेला आत्मभान देणारा ठरावा; भाष्य

पहाटेची वेळ असल्यामुळे खिडक्यांच्या काचा बंद होत्या आणि त्यातून जारवा कुठे दिसतात का पाहण्यासाठी आम्ही नजर लावून बसलो होतो. खरे तर ही पहाटेची वेळ, हवेतील सुखद गारवा, दोन्ही बाजूची हिरवीगार वनश्री पाहता पाहता डोळ्यावर झोपेची डुलकी येत होती. पण ती येऊ न देण्याचा मी अटोकाट प्रयत्न करीत होते. माझ्यासारख्या इतरही काहीजणी ‘जारवा’ दिसतात का पाहण्यासाठी उत्सुक होत्या. बराच वेळ जंगलातून गाडी जात होती तरी ‘जारवा’ काही दिसत नव्हते. कधी दिसतील, कधी दिसतील या उत्कंठेत असताना डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला एक जारवा दांपत्य दिसले आणि आम्ही एकदम ओरडलो, ‘जारवा! जारवा!!’ पण ड्रायव्हर मात्र गाडीचा वेग कमी न करता जोरात नेत होता. तेवढ्याही क्षणांच्या अवधीत ‘जारवां’ना पाहून आम्ही विस्मयचकित झालो.

अजून थोड्या अंतरावर पोहोचल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला चार-पाच ‘जारवा’ दिसले. काही ‘जारवा’ पूर्णपणे नग्न होते तर काहींनी कमरेला काहीतरी बांधले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या, तोंडावर पांढरी माती कल्पकतेने फासली होती डोक्याला पानाफुलांच्या माळा बांधल्या होत्या. त्यांचा रंग तर इतका पक्का होता या रंगाला जाड हिरवट किनार अस्पष्ट अशी निसर्गाशी नाते जोडताना दिसत होती.

Baratang Island, Jarwa Tribe
Goa Opinion: क्रोध म्हणजे हातावर घेतलेला निखारा! लवू मामलेदार मृत्यू आणि ‘रोडरेज’वरुन काय धडा घ्यावा?

सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी हे ‘जारवा’ आदिवासी आफ्रिकेतून (Africa) येथवर आले. तेव्हापासून त्यांची संख्या कमी कमी होत आता फक्त तीनशेच्या आसपास ‘जारवा’ येथे आहेत. आता मात्र या आदिवासी जमातींना संरक्षण देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अलीकडेच त्यांना रेशन वगैरे पुरविण्यात येते असे सांगण्यात आले.

कंटेनगंज, पोटाटांग वगैरे ठिकाणे मागे टाकत जिरकटांग येथे आमची गाडी साडेपाचला पोहोचली. इतक्या पहाटे तिथे छोट्याशा टपरींवर इडली चटणी, इडली सांबार-चटणी, चहा इत्यादी खाद्यपदार्थ तयार होते. आम्ही इडली सांबार व गरमागरम चहा घेतला. इथे आजूबाजूला गोव्यासारखी माड पोफळीची कुळागरे होती. पहाटेचा थंड वारा सुटला होता आणि खूप छान वाटत होते. जवळच रस्त्याच्या थोडे बाजूला पार्वती आणि गणपतीचे मंदिरही होते. आम्ही मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. आमच्यासारख्या बऱ्याच गाड्या आता इथे येऊन लागल्या होत्या. साडेसहा वाजता बाराटांगला जाण्यासाठी गाड्या इथून सोडल्या जाणार होत्या.

साडेसहा वाजता फेरीबोटीच्या धक्क्यावर जाण्यासाठी गाड्या सोडण्यात आल्या. साधारण अर्ध्या तासाच्या अंतरात आम्ही फेरी धक्क्यावर पोहोचलो तिथून मोठ्या बोटीने बाराटांग बेटावर जाण्यासाठी आमची समुद्र सफर सुरू झाली. दर्याच्या मोठमोठ्या लाटा बोटीवर आदळत होत्या त्यातून पाण्याचे फवारे उडत होते. आम्ही बोटीच्या वरच्या डेकवर उभे राहून चौफेर पाहत ते अविस्मरणीय दृश्य डोळ्यात साठवून घेत होतो. हा प्रवास असाच चालू राहावा असे सारखे वाटत होते तरीसुद्धा बोट पलीकडच्या धक्क्याला लागलीच.

Baratang Island, Jarwa Tribe
Goa Opinion: पूर्वी बांबोळीमार्गे पणजीला जाताना हिरवेगार डोंगर दिसायचे आणि आता? 'सिमेंटचे जंगल करू नका' हा सल्ला नव्हे इशारा

एव्हाना चांगलेच उजाडले होते. तिथे फार वेळ न थांबता आम्ही एका छोट्या मोटारबोटीने निसर्गनिर्मित गुहा पाहायला निघालो. बोटीत सर्वांना ‘लाइफ जॅकेट’ घालायला दिली होती. समुद्राच्या कडेला मेनग्रोव्हचे जंगल होते. आकाशात काळे ढगही जमले होते मध्येच एक पावसाची सरही येऊन गेली. दूरवर समुद्र पक्षीही दिसत होते. अधूनमधून लांबवर खडकाळ भागही दिसत होता कदाचित छोटे बेट असावे. आमची बोट मात्र लाटांवर हेलकावे खात जोरात निघाली होती. एका बाजूला मेनग्रोव्हचे जंगल तर दुसऱ्या बाजूला अथांग दर्या. खूपच मजा वाटत होती. सुमारे अर्ध्या तासानंतर आमची बोट जंगलाच्या आत चिंचोळ्या पाण्याच्या प्रवाहातून चालली होती. बाजूला चिखल दिसत होता बोट जसजशी पुढे जात होती तसा एक लाकडी पूल खूप लांबपर्यंत दिसत होता.

इथल्या झाडांची मुळे पाण्याखाली जाऊन नंतर परत पाण्यावर येऊन पसरली होती. बोट जंगलाच्या आत दोन-तीन वळणे घेत एका ठिकाणी थांबली तिथून एक एक करून आम्ही त्या लाकडी पुलावर चढून पुढे निघालो. थोड्या वेळाने जंगलाच्या आतून रस्ता कम पायवाटेवरून गुहा पाहायला निघालो. वाटेत जमिनीवर झाडांची मुळे पसरली होती त्यामुळे सारखे पाय अडखळत होते .लक्ष देऊन चालावे लागत होते. इथे सगळ्या प्रकारची झाडे दिसत होती विशेषता भिल्ल माडाच्या पानासारखी पण जास्त उंच नसलेली झाडे सर्वत्र दिसत होती. सुमारे दोन किलो मीटर चालल्यावर वाटेत लिंबू सरबत घेतले. जंगलाच्या इतक्या आत पेयजलाचे गाडे पाहून आश्चर्य वाटले खरे, पण ही पर्यटकांसाठी (Tourists) केलेली व्यवस्था होती. पर्यटनाचा असा विचार गोव्यात होणे गरजेचे आहे. अजून थोडे पुढे गेल्यावर आम्ही गुहेपाशी पोहोचलो.

Baratang Island, Jarwa Tribe
Goa Opinion: 'शवप्रदर्शनात जसा गोवा सरकारचा सहभाग असतो तसा अन्य फेस्तात नसतो'; विरोध ही गोव्याची खासियत

ही गुहा चुनखडीपासून बनलेल्या खडकांची आहे. आतमध्ये जाताना खूप सुंदर चित्रे तयार झालेली दिसत होती. सगळे निसर्गनिर्मित आहे यावर क्षणभर विश्वासच बसत नव्हता. अशी सुंदर कलाकृती डोळे विस्फारून पाहताना विधात्याच्या अजब निर्मितीचा थांगही लागत नव्हता आणि आनंदही मनात मावत नव्हता. गाइड आम्हांला माहिती देत पुढे चालला होता. सिलिकॉन वाळूपासून बनलेल्या कलाकृती, चुनखडीचा थर सगळे पाहताना एका वेगळ्या दुनियेत आल्याचा भास होतो. शेवटी एका ठिकाणी वर एक झरोका दिसला गुहेत झाडांच्या मुळातून पाणी झिरपताना दिसत होते. काही कलाकृती हात लावल्याने खराब झालेल्या दिसत होत्या. त्या दाखवून गाइड आम्हांला, ‘कुठेही हात लावू नका’, असे सांगत होते. अशा या निसर्गनिर्मित अप्रतिम गुहा पाहून परत येताना आम्ही रेंगाळत चाललो होतो. एक ते दीड किलोमीटरपर्यंत लाकडी पुलावरून आम्ही चालत होतो. आमच्याकडे पावसाळ्यात ओढा पार करण्यासाठी घातलेल्या लाकडी आड्यांची आठवण झाली.

Baratang Island, Jarwa Tribe
Goa Opinion Poll Day: ''जॅक सिक्‍वेरांनाच ओपिनियन पोलचं बाप म्‍हणणं हा इतर नेत्‍यांवर मोठा अन्‍याय...''; कोकणी नेते उदय भेंब्रे स्पष्टच बोलले

परत मोटारबोटीशी आलो तेव्हा पाऊस पडत होता. आम्ही बोटीत चढलो. वरून पावसाचे पाणी, खाली दर्याचे पाणी आणि मध्ये बोटीत आम्ही. परत बाराटांग बेटावर आलो तेव्हा बारा वाजून गेले होते. पहाटे लवकर उठल्याने आणि दुपारी गरमागरम जेवण पोटात गेल्यामुळे डोळ्यावर झापड आली. तासभराने पाऊसही थांबला होता आकाश निरभ्र झाले होते आम्ही बोटीने जिरकटांगच्या धक्क्यावर येऊन परतीच्या मार्गाला लागलो. जंगल वाटेने येताना आता मात्र चार पाच सहाच्या संख्येने एकत्र जमलेले ‘जारवा’ पाहायला मिळाले. एका ठिकाणी तर छोटी छोटी मुले पाहायला मिळाली. जसे जन्मले, तसेच राहणारे ‘जारवा’ आमच्यासाठी कुतूहलाचा विषय आहेत. ते निसर्ग सांभाळतात. विकासाच्या परिटघडीची वस्त्रे नेसणारे आम्ही शहरी लोक निसर्गाच्या संवर्धनाला काडीचीही किंमत देत नाही. त्यांचा वर्ण, त्यांची वस्त्रहीनता आम्हांला विचित्र वाटते, खटकते. निसर्गाला हवे तसे ओरबाडून सुखवस्तू जगणारे आपण, कपड्यांच्या आत त्यांच्याहूनही जास्त नागवे असतो आणि हे आम्हांला खटकतही नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com