Marathi Theatre: नाट्यसंवेदना आणि समाजस्वास्थ्य– एक सर्जनशील संगम

History Of Marathi Experimental Theatre: मराठी नाटकांची परंपरा दीर्घ आहे. जयवंत दळवी ‘नातीगोती’ हे नाटक हल्ली देशव्यापी स्तरावर आविष्कृत व्हायला लागलेय. या नाटकाचा हिंदी अनुवाद अशोक शर्मा यांनी केला आहे.
History Of Marathi Experimental Theatre
Marathi TheatreDainik Gomantak
Published on
Updated on

मुकेश थळी

मराठी नाटकांची परंपरा दीर्घ आहे. जयवंत दळवी ‘नातीगोती’ हे नाटक हल्ली देशव्यापी स्तरावर आविष्कृत व्हायला लागलेय. या नाटकाचा हिंदी अनुवाद अशोक शर्मा यांनी केला आहे. एनएसडी संस्थेत या नाटकाचा गंभीरपणे विचार होण्याचे कारण म्हणजे या नाटकात एका विशेष मुलाला केंद्रस्थानी ठेवून त्याचे भावविश्व व आईवडील नाते यावरील ही संहिता आहे.

नाटकाचे दिग्दर्शन वामन केंद्रे यांनी केले, शेकडो प्रयोग झाले. हिंदी प्रयोग दिल्लीत फैजल अल्काजी यांनी, तर मुंबईत ओम कटारे यांनी केला. कोरोना काळात सात दिवसांच्या ग्वालियर नाट्य समारोहात प्रमोद पत्की यांच्या दिग्दर्शनाखाली या नाटकाचे ऑनलाइन मंचन केले गेले.

History Of Marathi Experimental Theatre
Marathi Language: कायदा आणला म्हणून भाषांचा विकास होतो? भाषिक चळवळ लोकांना जीवनाशी निगडित विषय वाटत नाही

दरम्यान ‘ड्रामा थेरपी’ ही नवी उपचार पद्धत आज भारतातही (India) पोहोचली आहे. एनएसडीची काही स्नातक मुले दिव्यांग मुलांना उत्तेजन देऊन दिग्दर्शन करून पुढे आणतात. ब्रिटन, अमेरिकेत ड्रामा थेरपी संघटना सुरू झाल्या आहेत. एनएसडी संस्थेने ड्रामा थेरपी स्तरावर कार्य करण्यास पाऊल उचलले. या पार्श्वभूमीवर जयवंत दळवी यांनी लिहिलेले ‘नातीगोती’ नाटक महत्त्वाचे ठरले. कारण दिव्यांग मुलांच्या विषयावर देशात नाट्यसंहिता कमीच आहेत.

दिव्यांग कलाकारांची नाट्यचळवळ सुरू आहे. दोन तासांची नाटके विकलांग मुले सादर करतात. दृष्टिबाधित, बोलता-ऐकता येईना अशा दिव्यांग कलाकारांना घेऊन सेवाव्रती, सृजनव्रती दिग्दर्शक काम करत आहेत. या मुलांचे व दिग्दर्शकांचे कौतुक करावे तितके थोडे. विशेष मुलांना या अभिव्यक्तीचा, सादरीकरणाचा बराच फायदा होतो.

रसिकहो, नाटक हा आमच्या चिंतनाचा, विचारभानाचा, आऩंदाचा विषय राहिलाय. म्हार्दोळला माझ्या बालपणात जे नाट्यसंस्कार झाले, मी घडलो तो पाया फारच भक्कम. श्रीमंत. वेलींगचे अरविंद वेलिंगकर, त्यांचे चुलतभाऊ प्रकाश वेलिंगकर हे गायक. दुसरे चुलतभाऊ उल्हास वेलिंगकर हे तबलावादक. या कुटुंबाचे शास्त्रीय संगीताविषयीचे प्रेम अफाट. नाट्य, संगीत, चित्रकला यांचा वारसा घरात. मी माझे वेलींगचे वर्गमित्र संजीव मडकईकर यांना भेटायला संध्याकाळी सायकलने जायचो तेव्हा अरविंद किंवा प्रकाश यांचा गायनाचा सुश्राव्य रियाझ चालू असे. उल्हासरावांचा तबला रियाझ कानावर असा यायचा की मित्राकडे बोलताना कान शेजारच्या घरातील उल्हासच्या तीन ताल वादनाकडे तादात्म्य पावत असे.

History Of Marathi Experimental Theatre
Marathi Language: काय करता येईल ते पाहू! मुख्‍यमंत्र्यांनी मराठी राजभाषा समितीला केले आश्‍‍वस्‍त; मागणीचे निवेदन सादर

उल्हासच्या पत्नी सौ सुषमा या सतारवादक. नृसिंह देवस्थानाच्या मंडपात व इतरत्र जी नाटके सादर केली ती मनमंचावर अजून दिसतात. ‘ययाती आणि देवयानी’, हे नाटक विजयकुमार कामत व नीला वेलिंगकर-कामत यांनी प्रभावीपणे सादर केले. ते नाटक हृदयात घर करून आहे. नीला ही अरविंदची बहीण. त्यांच्या इतर दोन्ही भगिनीही नाटकात भूमिका करत. अरविंद हे स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी. त्यांनी ‘शारदा’ नाटकात काम केले होते ते आठवते. अरविंदरावांचे चिरंजीव सोनिक, संगीत महाविद्यालयात बासरीचे अध्यापन करतात. विजयकुमार कामत हे अग्रणी कलाकार, ज्यांनी स्कूलमध्ये आम्हांला एक एकांकिका दिग्दर्शित केली होती, कला अकादमी स्पर्धेसाठी. विजयकुमारांचे चिरंजीव, गुणी कलाकार वर्धन कामत हे कुटुंबाचा नाट्यवसा पुढे चालवत आहेत.

म्हार्दोळला त्या काळी एकांकिका स्पर्धा व्हायच्या. ‘भिंत’, ‘म्हँ’ व इतर एकांकिका गोव्यात प्रयोगशील नाट्याचे बीज पेरत होत्या. प्रेमानंद गज्वी हे आघाडीचे नाटककार व अष्टपैलू साहित्यिक. ‘घोटभर पाणी’ ही त्यांची एकांकिका गाजली. नंतर ‘किरवंत’, ‘तन माजोरी’ अशी त्यांची अनेक नाटके रंगमंचावर छाप पाडत राहिली. त्यांनी एकदा लिहिले होते- नाटक ही एक स्वतंत्र वाङ्मयकृती आहे, अगदी कविता, कथा, कादंबरीप्रमाणेच. नाटक इतर कलांच्या आश्रयाने जगणारी कला आहे, असे म्हटले जातं आणि वरवर पाहता ते खरेही वाटावे अशी स्थिती आहे.

History Of Marathi Experimental Theatre
Marathi Language: गोव्यात इंग्रजी, फ्रेंच चालते पण 'मराठी'ला दुय्यम वागणूक दिली जाते, याचेच दु:ख

पण खरे तर नाट्यकला ही जगातील सर्व कलांना आपल्या हृदयात स्थान देते. कविता, कथा, कादंबरी या साऱ्या वाङ्मय प्रकारांना नाटक स्वत:त असे काही बेमालूमपणे समाविष्ट करून घेते की नाटकात ‘कथा’ असते, कादंबरीचा आवाका असतो आणि संवाद-लयीतून प्रकटत राहते काव्यात्मकता. हे त्यांनाच शक्य होते ज्यांना सर्वच वाङ्मयप्रकारांची नेमकी जाण असते; पण नाटककाराला प्रकाश, रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, दिग्दर्शन यांचेही ज्ञान असावे लागते.

हल्ली रंजनात्मक म्हणजे विनोदी नाटके लोकांना आवडतात. कारण ती हसवतात. प्रयोगशील नाटके ही नवनवीन प्रयोग घेऊन येतात. इथे रंजनात्मक नाटकांनी विनोदाच्या उपहासाच्या नावाखाली श्लीलतेची मर्यादा पार करून पांचटपणा, बाष्कळपणा आणू नये इतकेच. प्रयोगशील नाटके ही ‘एलीट’ रसिकांसाठी असली तरी जी चौकट सादरीकरणात मांडली जातेय ते कथासूत्र बुद्धिजीवी लोक आकलन करू शकतील ना, ही काळजी घेतली पाहिजे. समजायला कठीण गेले तर शेवटी त्याचा फायदा काय?

नाटकात कलाविष्काराची भावोत्कटता असावी जी आपल्या चित्ताचा दाह शमवणारी असावी. मनाचा नाच संपवणारे व अंतर्मुख करून विचारांना चालना देणारे संवाद नाटकात विणलेले असावेत. भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्मात जीवनाच्या ध्येयाविषयीची संमुखता कायम अधोरेखित केली आहे. निरर्थकता, अस्तित्ववाद, एब्सर्डीजम, एब्सट्रॅक्ट थिएटर अशा ढंगाची विदेशी नाटके मनात सहजी उतरणे, रुतणे भारतीय वातावरणात सोपे नाही.

उलट गिरीश कर्नाड, शंकर घोष व इतरांनी महाभारताची मिथके वापरून आजच्या स्थितीवर भाष्य केले आहे ते नाटक पचायला सोपे जाते. जागतिक रंगप्रवाहाचे भान टिकवण्यासाठी पाश्चात्त्य नाटके असावीच. पण प्रमाणबद्धता सोडून पूर्णपणे त्यांच्याच आहारी, अधीन होऊन जाणे हे नक्कीच उचित नव्हे. वेगळी संस्कृती, वातावरण, संदर्भ यामुळे ती पचायला जड जातात.हेमंत गोविंद जोगळेकर हे मराठी कवी मला आवडतात. ‘तरंगत तरंगत जाऊ घरंगळत’ या त्यांच्या नव्या संग्रहातील ही त्रिपदी नाट्यमंचाच्या सिम्बॉलीझमकडे संबंधित असल्याने फार आवडली. नाटकात काव्य असतेच. पण काव्यातही नाटकाचे प्रतीक कसे येते पाहा -

History Of Marathi Experimental Theatre
Marathi Language: 'मराठी'लाही राजभाषेचा दर्जा द्या! भाषाप्रेमींनी फुंकले रणशिंग; 31 मार्च रोजी होणार 'निर्धार मेळावा'

सगळे संवाद म्हणून झालेत

बसून राहिले म्हातारे म्हातारी

पडदा पडत नाहीये...

गणितात अनंतता ही संकल्पना असते. नाट्यकलेच्या आयामांचा वेध घेताना ही अनंतता दिसते. वर्तुळकेंद्र सगळीकडे दिसतात. परीघ दिसत नाहीत. १२० मिनिटांतील सेकंद व नॅनोसेकंद भारीत करून जिवाचे कान-डोळे करून पाहणाऱ्या प्रेक्षकांची हृदये पेटवण्याची, धुनीसारखी अखंड धग नाटकात असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com