
पणजी: आदिम काळापासून मानव निसर्गातल्या दिव्यत्वाने भारावला होता. त्यामुळे वृक्षवेलींना गदागदा हलवणारा वारा, खळखळत वाहणारे पाणी, आकाशात चमकणारी वीज त्याला अगम्य वाटले. या शक्तीतून त्याला कालांतराने देवत्वाची प्रचिती आली. भारतीय लोकमानसाने निसर्गातल्या शक्तीला कल्याणकारी शिव मानला. त्याची अवकृपा झाल्यावर त्याने रौद्र तांडव अनुभवलेले आहे. त्यामुळे भारतभर ही शक्ती विविध नावांनी वंदनीय ठरली. गोव्यातल्या भाटी, बोंडला, वडावल, सुर्ल (डिचोली) आदी ठिकाणचा सिद्धा आज सिद्धेश्वर म्हणून पुजला जातो.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गोळावली गावातल्या - एके काळी घनदाट जंगल असलेल्या - डोंगरकपारीतल्या नैसर्गिक गुंफेत आणि परिसरातल्या कातळांवरून कोसळणाऱ्या प्रपातामुळे खूप वर्षांपासून सिद्धाच्या वास्तव्याचा प्रत्यय लोकांना आला. त्यामुळे बऱ्याचदा अडीअडीचणीच्या वेळी ‘पाव रे सिद्धा’ अशी हाळी देण्याची लोकपरंपरा निर्माण झाली.
रानावनात असताना आपले आणि कुटुंबातल्या सदस्यांचे आणि गुराढोरांचे रक्षण सिद्धाच करतो, अशी पूर्वापार भावना गोळावली येथील लोकमानसात निर्माण झाली. आणीबाणीच्या प्रसंगी सिद्धा आपले रक्षण करतो, जगण्याला आधार देतो अशी लोकभावना त्यामुळे प्रस्थापित झालेली आहे. त्यामुळे वर्षातल्या विशेष मानलेल्या दोन संक्रांतींवेळी गुंफेच्या ठिकाणी सिद्धाप्रित्यर्थ ‘भुगूत’ विधी केला जातो.
सिद्धाच्या गुंफेच्या परिसरात वाघबीळ आहे. तेथे पट्टेरी वाघ वास्तव्यास असतो आणि त्याचे रक्षण करणे हे गोळावली गावातल्या कष्टकऱ्यांनी आपले कर्तव्य मानलेले आहे. येथील वाघ सिद्धाचे सांस्कृतिक आणि धार्मिक संचित आहे असे मानून वाघांचे पिढ्यान्पिढ्या रक्षण केलेले आहे.
आज वाढता स्वार्थ आणि आसुरी ऐहिक लालसेपायी आम्ही जंगले, जंगली श्वापदे यांच्या जिवावर उठलो आहोत. गोळावलीच्या या जंगलात चार वाघांच्या करुण मृत्यूचे षड्यंत्र सफल झाले. परंतु सिद्धाने व्याघ्रहत्येचा प्रकार भुगूत विधीप्रसंगी जणू काही उघडकीस आणून, या प्रकरणात गुंतलेल्यांची झोपमोड केल्याची धारणा झाल्याने, या परिसरात एकच खळबळ उडाली होती.
गोव्यात पेडणे ते काणकोणपर्यंत गोसावी समाज पसरला होता. ‘नाथजोगी’ किंवा ‘कानफाटे’ अशी नावांनीही परिचित असलेले हे गोसावी डोंगरमाथ्यावर किंवा माळरानावरच्या एखाद्या गुंफेत अदृश्यपणे वावरणाऱ्या सिद्धाच्या पूजनात गुंतलेले असायचे.
गोवाभर सिद्धाच्या नैसर्गिक गुंफा आहेत. कधीकाळी मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ यांनी भारतीय उपखंडात जो नाथ संप्रदायाचा वारसा रुजवला होता, त्यातूनच बहुधा सिद्धा किंवा सिद्धनाथाच्या नावाने आजही परंपरा काही गावांत प्रचलित आहेत. डिचोलीतल्या लांटबार्सेत वडावल याठिकाणी ‘सिद्धाची राय’ ही देवराई आहे. पूर्वी माडत, किंदळ.. आदी जंगली वृक्षवेलींनी ती जागा समृद्ध होती. भर दुपारच्या वेळेला इथे सूर्यकिरणे अपवादाने जमिनीवर पडायची.
त्यामुळे वर्षातून काही मोजक्याच सणांच्या-उत्सवांच्या प्रसंगी इथे भाविक भेट द्यायचे. या देवराईत गोवा-कोकणातले महाकाय असे वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग प्रतिष्ठापित केलेले आहे. त्याचठिकाणी आणखी एक छोटेखानी शिवलिंग प्रतिष्ठापित केलेले पाहायला मिळते.
वडावल येथील सिद्धनाथाच्या देवराईसमोर महाराष्ट्रातल्या दोडामार्ग तालुक्यातल्या कसई गावात असलेल्या डोंगरावरती शिवलिंग असून, ते स्थल कसईनाथ म्हणून परिचित आहे. प्रचलित लोकश्रद्धेनुसार आणि ‘नवनाथ कथासार’ ग्रंथानुसार वडावल येथील सिद्धनाथाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्यक्ष मत्स्येंद्रनाथ आले होते आणि तेथे त्यांचा परिचय चौसष्ट योगिनींना न झाल्याने त्यांच्यात युद्ध झाले. त्यावेळी देवी कालिका सिद्धाच्या राईत प्रकट होऊन, हे युद्ध शमवले, असे मानले जाते.
गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात सिद्धाची स्थळे आहेत. कर्नाटकातल्या रामनगर परिसरातल्या सिद्धाचा डोंगर, महाशिवरात्रीच्या पर्वदिनी भाविकांनी गजबजतो. पूर्वीच्या काळी गोव्यातले गोसावी सीमावर्ती भागातही संचार करायचे, ते ‘पाव रे सिद्धा’ अशी हाळी देऊन आणि वारकरी संप्रदायातल्या संताचे गुणगान करणारी पारंपरिक गोसावी लोकगीतांचे डमरूच्या नादावरती गायन करून.
सांग्यातल्या नेत्रावळी अभयारण्यात भाटी गावात सिद्धाचा डोंगर आहे. तेथील नैसर्गिक गुंफेत सिद्धाचे वास्तव्य असल्याची लोकश्रद्धा रूढ आहे. त्याला भेटण्यासाठी गोसावी गावातल्या भाविकांसह वर्षातून दोनवेळा संक्रांतीच्या पर्वाला सिद्धाच्या गुंफेत जायचे आणि ‘भुगूत’ नावाचा विधी करून परत यायचे.
आज येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. सांगे, केपे, काणकोण, धारबांदोडा येथून भाविक मोठ्या प्रमाणात या स्थळी भेट देतात. डोंगरमाथ्यावरती साळावली धरणाच्या जलाशयाच्या विरुद्ध दिशेलाही नैसर्गिक गुंफा आहे व तेथे पट्टेरीवाघाचे अस्तित्व असल्याचे मानले जाते. हा पट्टेरीवाघ म्हणजे सिद्धाचे प्रतीक मानलेले आहे आणि त्यामुळे त्याला कोणत्याच प्रकारे इजा वा त्रास दिला जात नाही.
फोंड्याजवळ असलेल्या बोंडला अभयारण्यातही सिद्धाचे पारंपरिक स्थळ आहे. येथेही गोसावी आणि स्थानिक गावकरी वर्षातून दोन वेळा ‘भुगूत विधी’ करण्यासाठी भेट द्यायचे. गोव्यात बऱ्याच गावात सिद्धाचे डोंगर, सिद्धाची होवरी, त्याचप्रमाणे ‘सिद्धनाथ’, ‘आदिनाथ’ आदी नावांनी परिचित असलेली जी श्रद्धास्थाने आहेत, त्यांचा गोसावी समाजाशी सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध आहे.
महाराष्ट्रात भटक्या जमातींपैकी भराडीत ‘नाथपंथी डवरी गोसावी’ ही एक उपजमात असून, ते पूर्वी घरोघरी भेट दिल्यावर डमरू म्हणजे ‘डौर’ हे चर्मवाद्य वाजवत असल्याने त्यांना ‘डवरी गोसावी’ म्हटले जाते. प्राचीनकाळी एकसंध असलेल्या नाथसंप्रदायाचे गुरूनुसार, प्रांतानुसार गट निर्माण झाले व त्यातून विविध जातीजमाती प्रचलित झाल्या आहेत.
महाराष्ट्रातल्या मढी येथील गोरक्षनाथाला भजणारे नाथजोगी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनारी येथील भैरवनाथाला भजणारे नाथपंथी डवरी गोसावी म्हणून ओळखले जातात. एकतारी, डमरू आणि झांज या वाद्यांचा उपयोग करून गोव्यातले गोसावी आपल्या लोकगीतांतून महाराष्ट्रातल्या डवरी गोसावी जे सारंगी, डमरू अशा वाद्यावरती श्रावणबाळ, सती चांगुणा, राजा हरिश्चंद्र आदींच्या कथा हृदयाचा ठाव घेणाऱ्या मर्मभेदक, जिवाला चटका लावणाऱ्या शैलीतून सांगायचे.
हास्य, कारुण्य, भक्तिरसाचा कल्पकतेने उपयोग करून सादर केले जाणारे हे गायन भाविकांना मनोरंजन आणि प्रबोधनाची आजच्यासारखी साधने नसलेल्या कालखंडात विशेष आवडायची. धोतर नेसलेले, काखेत झोळी, कपाळावर विभूती, कानात मुद्रा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हाती त्रिशूळ पायात खडावा आणि दुसऱ्या हातात भोपळ्यापासून तयार केलेल्या एका विशिष्ट भांड्यात पूजेचे साहित्य घेऊन हे गोसावी गावोगावी वर्षातल्या पर्वदिनी भेट द्यायचे. लोकमानसही त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात सिद्ध असायचा. त्यांची ‘पाव रे सिद्धा’ ही हाळी त्यांच्या आगमनाची वर्दी द्यायची.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.