Goa Culture: गोव्याची मूळ संस्कृती भारतीय की पाश्चिमात्य? नेहरूंनी गोमंतकीयांना दिला होता संस्कृती जतन करण्याचा सल्ला

Indian vs Western culture in Goa: एक काळ असा होता, देशात व परदेशी गोव्याची प्रतिमा ‘पूर्वेकडील रोम‘ अशी होती. खेरीज गोव्याच्या सदाहरित निसर्गाचे, अलग संस्कृतीचेही आकर्षण.
Goa Culture
Goa CultureDainik Gomantak
Published on
Updated on

अनेकांच्या मते साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत धर्मच्छल, धर्मांतर, मंदिरे व सांस्कृतिक विध्वंस . जुलूम-जबरदस्ती अशा कृत्यांद्वारा पोर्तुगिजांनी गोव्याच्या मूळ संस्कृतीत उच्छाद मांडला. परिणामी भारतीय संस्कृतीचा समूळ नायनाट केला असा समज आहे. बहुधा बाहेरून येणारा प्रत्येक सनदी अधिकारी हेच सूत्र पकडून येतो. घटक राज्य होण्याआधी तर येथे अशाच लोकांची चलती होती. खेरीज ‘सेक्युलरिझम’चे भूतही मानगुटीवर असायचे. आपल्याकडे प्रदूषित प्रकृती, वृत्ती-प्रवृत्तीचे, ‘नेहमीचे यशस्वी‘ उदंड सांस्कृतिक पर्यावरणाच्या असंतुलनाचे रोपटे फोफावले ते येथेच.

वस्तुतः विद्यमान भौगोलिक सीमा असलेला गोवा इ. स. १७८८मध्ये पोर्तुगिजांच्या ताब्यात आला. यात पेडणे, सत्तरी, काणकोण, फोंडा हे चार तालुके. सोळाव्या शतकात त्यांचा अंमल फक्त तिसवाडी, बार्देश, सासष्टी एवढ्याच भागावर होता. म्हणून जुन्या व नव्या काबिजादी असा भेद झाला. अनेक संस्कृती अभ्यासकांना हे सत्य माहिती नसते(?) की सोयीस्करपणे किंवा राजनैतिक धोरण म्हणून ते बाजूला ठेवले जात असावे. प्रदूषणाचे एक मोठे मूळ येथे रुतलेले आहे.

एक काळ असा होता, देशात व परदेशी गोव्याची प्रतिमा ‘पूर्वेकडील रोम‘ अशी होती. खेरीज गोव्याच्या सदाहरित निसर्गाचे, अलग संस्कृतीचेही आकर्षण. त्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांसह भारतातील व बाहेरून येणारे अनेक अतिमहनीय पाहुणे गोव्याला आवर्जून भेट देत. अशा प्रत्येक व्हीआयपीच्या स्वागतानिमित्त त्यांना गोवा सरकारतर्फे शाही जेवण दिले जात होते. या खानपानावेळी ‘कल्चरल प्रोग्राम’ ही सतत पाळली जाणारी प्रथा कसोशीने पाळली जात होती. जे सांस्कृतिक कार्यक्रम आवर्जून सादर होत त्यात, देखणी, ‘कुर्रिदीन्य’ हा पोर्तुगीज डान्स, ‘फादो’ हे पोर्तुगाली गायन, मांडो-धुलपद एवढे प्रकार अत्यावश्यक असत.

Goa Culture
Green Lungs Goa: राज्यातील शहरांना प्राणवायूचे 'बूस्ट', 'ग्रीन लंग्‍स' उपक्रमाला राज्यातील पालिकांचा पाठिंबा; वनमंत्री राणे यांची माहिती

यात एखादी फुगडी, कधी ‘फिशर फोक डान्स’ वा गावडा-कुणबी नृत्य अशा काहीतरी नावाखालील गावठी ढंगाची नृत्यरचना सादर व्हायची. आसपास अशी दोन पथके असत, त्यांनाच आलटून-पालटून वा ज्या पथकातील मुली देखण्या, स्वच्छंदी असत, त्यांनाच ही कंत्राटे मिळायची. काही वर्षे हा प्रयोग सुखेनैव चालू होता. यामुळे सांस्कृतिक पर्यावरणीय असंतुलनाचे पडसाद सामाजिक व राजनैतिक स्तरावर आजही उमटत असल्याचे सतत जाणवते.

गोवा मुक्तीनंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोव्याला भेट दिली त्यावेळी त्यांना दाखविण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रम वरील प्रकारांचा होता. मुळात काही अंशी तरी पाश्चिमात्य प्रभाव असलेल्या पंतप्रधानांनी ‘तुमच्या वेगळ्या संस्कृतीचे जतन करा‘ असा संदेश व सल्ला गोमंतकीयांना दिला. किरकोळ मतभेद असले तरी संतुलन बिघडण्याचे मूळ येथे असल्याचे समाजशास्त्रज्ञ, राजनीती विश्लेषक विचारवंतांचे म्हणणे आहे.

याच स्वरूपाची सविस्तर सांगावी अशी ही चित्तरकथा : दूरदर्शनच्या पणजी केंद्राचे, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन उद्यावर येऊन ठेपले होते. यावेळी वरीलसह संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रसारण- बाहेर मोबाइल व्हॅन उभी होती- होणार असल्याचे नमूद करणाऱ्या निमंत्रण पत्रिका वितरित झालेल्या. त्या काळी मुख्यमंत्रिपदी माननीय प्रतापसिंग राणे होते. उद्घाटनाच्या आदल्या सायंकाळी पाचच्या सुमारान फोन, ‘त्वरित भेटा‘! राजनैतिक परिभाषरत सीएम्नी सांगितले, ‘उद्याच्या टीव्ही उद्घाटनात फक्त दक्षिण गोव्याचेच प्रकार ठेवलेत.

कार्यक्रमाचे सीधा प्रसारण. चोवीस तासही नाहीत. परंतु उत्तर गोव्यातील काही प्रकार उद्या सादर करणे शक्य आहे का?‘ ‘नथिंग इज इम्पॉसिबल सर‘, माझे तत्काळ उत्तर. ‘काय करूयां सांगा? तो त्या दिवशी पाहिलेला तोणयां खेळ छान होता.‘ तो नेत्रावळीचा. नेरूलची फुगडी. पेडण्याचे दसरा-ढोलवादन. डिचोलीची घोडेमोडणी ( चूकभूल क्षम्य) नृत्य-वादन प्रकार निश्चित झाले. आपले अधिकार वापरून सिएमनी संबंधितांना कळवूनही टाकले. त्या काळची डळमळीत संपर्क यंत्रणा. पण रात्रीपर्यंत तीन पथके निश्चित झाली. मोठा प्रश्न होता. संपर्क साधनांचा अभाव.

Goa Culture
Goa Forest: गोव्यातील निम्म्या वनक्षेत्राला वणव्याचा धोका, केंद्रीय संशोधन संस्थेच्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

अंतर सांगे, बाडे असे सुमारे शंभर कि.मी. गाडी जायची. पुढे दीडेक कि.मी. पाणी भरल्या शेताच्या अरुंद बांधावरून कसरती करत, तोल सांभाळून पायी प्रवास करायचा. हा आदिवासी भाग. सकाळी सूर्योदयावेळी जेवण करून कामाला घराबाहेर पडणारा. त्या आधी त्यांना गाठणे आवश्यक होते. दिवस उजाडताना कसाबसा बांदावाडा गाठला. परत येताना त्यांना वाहतुकीसाठी सांग्यावरून पिक-अप पाठविण्याची व्यवस्था केली.

दुपारी तीनच्या सुमारास राणेसाहेबांचा चिंताकुल स्वरात फोन. ‘कोणकोणती पथके, प्रकार मिळाले? ते वेळेवर पोचतील ना?’ उत्तर होते, ‘काल आपण ठरविलेल्या पथकातील सर्व कलाकार पोहोचून तालमींना सुरुवातही झालीय‘. यात अनेकांचा अनपेक्षित, आकस्मिक मुखभंग झाला. मागाहून दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुकाने सांगितले, ‘तुमच्या ग्रामीण कलाकारांचे उत्तम सहकार्य लाभले. त्यामुळे, हे थेट प्रक्षेपण उत्कृष्ट झाले. एज्युकेटेड शहरी लोकांनी अत्यंत बेशिस्त वर्तन केल्याने आम्हांला खूप त्रास झाला‘.

जुन्या काळी प्रजासत्ताक दिन संचलनात त्या त्या राज्याची संस्कृती प्रदर्शित करणारी नृत्य-पथके राजपथावर संचलनाचा भाग म्हणून भाग घ्यायची. म्हणजे, याआधी नेहमीचे यशस्वी शहरी कलाकार घेऊन कोणते तरी पश्चिमी नृत्यप्रकार केले जायचे. शशिकलाताई मुख्यमंत्री झाल्यावर ही जबाबदारी कला अकादमीकडे आली आणि यात डिचोलीची घोडेमोडणी, नेरुलची फुगडी - हो, त्याकाळी नेरूल गाव पूर्णतया गावठी होता - भरीप कुळे येथील धनगराचा होरबाला आदी प्रकार प्रजासत्ताक दिनात सहभागी झाले.

अशा वेळी अनेकांकडून एकच प्रश्न होता, ‘हे गोव्यात आहे?‘ त्यासोबत ‘म्हणजे गोव्यात हिंदूही आहेत?’ हा प्रश्न याआधी झाल्या कार्यक्रम-प्रकारांवरून येत होता. चित्ररथांवर तर अनेक वर्षे फक्त कार्निवाल, पश्चिमी संस्कृती हेच दाखविले जायचे. गोव्याचे सांस्कृतिक नुकसान, चुकीची, अवास्तव प्रतिमा गोव्याबाहेर जात होेती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com