अटलजींच्या कविता, नाना पाटेकरांच्या आठवणी अन् 'घटश्राद्ध'; इफ्फीतील स्मृतिचित्रांचा अनोखा प्रवास

IFFI 2026 Film Memorie: चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम आहे. संवाद ऐवजी सिम्बॉल किंवा प्रतीक अनेकवेळा खूप प्रभावी असते.
IFFI 2026 Film Memorie
Nana PatekarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मधुसूदन जोशी

चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम आहे. संवाद ऐवजी सिम्बॉल किंवा प्रतीक अनेकवेळा खूप प्रभावी असते. नुसत्या छोट्या होत जाणाऱ्या कॅमेरा फ्रेममध्ये खूप काही अर्थ दडलेला असतो. अशाच एक कृष्ण धवल जमान्यातील चित्रपटात एक छोटा मुलगा प्रतीकात्मक म्हणून आरशावर दगड मारून जुने चित्र ध्वस्त करतो. चित्रपटाचे नाव लक्षात नसले तरी अशी चित्रे दीर्घ स्मृतीचा भाग बनतात.

सिनेजगत हे जीवनाच्या विविध अंगाला स्पर्श करणारं असतं. ह्या ग्लॅमर दुनियेत चलती नाणी खूप असली तरी स्मृतिचित्रांच्या आधारे जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम चित्रपट जगतात होत असतं. छोट्या पडद्यावर पौराणिक, ऐतिहासिक घटनांवर आधारित मालिकांचा वर्षाव होत असतो. इतिहास घडवणाऱ्या काही व्यक्तीवर चित्रपट विविध अँगलने येत असतात. यंदाच्या इफ्फीत माजी पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर जेमतेम सोळा मिनिटांचा लघुपट दाखवला होता. वाजपेयींचा जीवन प्रवास केवळ सोळा मिनिटांत कसा काय दाखवता येईल असा प्रश्न कुणालाही पडेल.

IFFI 2026 Film Memorie
Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

पंरतु हा लघुपट मुळात त्यांच्या उत्तुंग राजकीय प्रवासाची कहाणी सांगण्यासाठी नव्हता. अटलजी हे साहित्यिक होते. ‘पांचजन्य’ ह्या नियतकालिकाचे ते संस्थपाक संपादक होते. त्याच पांचजन्यने कवीच्या रूपातील अटलजी ह्या लघुपटात दाखवले आहेत. १९३९ साली अटलजी यांचा प्रवेश राष्ट्रीय स्वयंसेवक मध्ये झाला. त्याच संघनिष्ठेतूनच त्यांच्या हृदयातून कविता पाझरत राहिल्या. ते आपल्या एका कवितेत म्हणतात, ‘मुझे इतनी उंचाई कभी मत देना, गैरों को गले न लगा सकू इतनी रूखाई कभी मत देना।’ मोठ्या पडद्यावर एका लघुपटाद्वारे कवितांच्या माध्यमातून देशाच्या माजी पंतप्रधानाच्या जागवलेल्या स्मृती ही यंदाच्या इफ्फीमधील अनोखी पेशकश होती.

विश्वनाथ दिनकरराव तथा नाना पाटेकर हे हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेले अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि समाजसेवक होते. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी मुरुड-जंजिरा (जि. रायगड, महाराष्ट्र) येथे झाला आणि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांचे हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. नाना पाटेकर यांना यंदाच्या इफ्फीत त्यांच्या एका चित्रपटाद्वारे श्रद्धांजली वाहणार असे कळल्यावर डोळ्यांसमोर त्यांची हसरी छबी उभी राहिली. दीड महिन्यापूर्वी गोव्यात निधन झालेल्या सिनेसृष्टी गाजवणाऱ्या कै. नाना यांच्या स्मृती यंदाच्या सत्तावनव्या ‘इफ्फी’ मध्ये जागवणे यथोचित होतं. चित्रपटाच्या सुरवातीला आशुतोष गोवारीकर यांनी कै. नानांच्या आठवणी जागवल्या.

घटश्राद्ध चित्रपट पाहताना प्रेक्षक केवळ भूतकाळात जात नाही. त्या मागोव्यात आठवणींच्या प्रत्येक थांब्यावर भूतकाळाचे ओझे ठेवून विचार करू लागतो. कै. नाना पाटेकर यांच्याबरोबर कै. यू. आर.अनंतमूर्ती यांची आठवण ह्या चित्रपटामुळे पुन्हा झाली. अनंतमूर्ती यांची संस्कार कादंबरी व त्यावरील चित्रपट गाजला होता. संस्कार कादंबरीतील प्राणेशाचार्य, नारायणप्पा, चंद्री व ब्रम्ह वृंद यांची बराच काळ मनाला भुरळ पडते ती काही विशिष्ट कारणांमुळे. संस्कारनंतर ‘घटश्राद्ध’ चित्रपट आला. पण ह्या चित्रपटाने तसे वादळ निर्माण केले नाही. कारण १९७७ साली भारतात मोठे राजकीय बदल घडले होते.

एका अभागी बालविधवेच्या पोटी अनैतिक संबधातून गर्भधारणा होते. ही बालविधवा धर्मरक्षक पंडिताची असेल तर बाप म्हणून तो आपल्या मुलींबाबत काय भूमिका घेतो, असा प्रश्न त्या चित्रपटात दाखवला आहे. पोटच्या मुलीच्या हातून असे पाप वा अधार्मिक कृत्य घडल्यास बाप काय प्रायश्चित्त घेईल? तर तो आपल्या जिवंत मुलीचे श्राद्ध वाढील. ‘घट’ म्हणजे मातीचा माठ (पाण्याचे भांडे) आणि ‘श्राद्ध’ म्हणजे अंत्यविधी वा पितृकर्म. या विधीत, संबंध तोडण्याचे प्रतीक म्हणून पाण्याचा माठ फोडला जातो. परंतु तोच विधी सामाजिक बहिष्कारासाठीही करण्यात येतो.

दीक्षा चित्रपटात कोगाच्या मुखातून ब्राह्मणी संस्कृतीवर आसूड ओढले आहेत. त्यातून प्रेक्षकांत हास्याची लकेर उसळते. क्वचित टाळ्याही पडतात. कै वाजपेयींच्या भाषणात किंवा काव्य वाचनात पॉज असत. त्या पॉज दरम्यान किंवा मौनातही एक सामर्थ्य असायचं. शब्दजंजाळापेक्षा एखादे चित्र वा प्रतीक प्रभावी ठरते. कोगाचे मार्मिक शब्द प्रहारातील चित्रपटगृहाबाहेर पडताना किती लक्षात राहतील हा एक प्रश्न आहे.

IFFI 2026 Film Memorie
Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

गिरीश कासारवल्ली यांचा १९७७ सालातील कृष्ण धवल चित्रपट युट्युबवर आहे. त्यात चित्रपटाच्या शेवटी विशाल वृक्षाच्या मुळाशी रडणारी अभागी यमुना व तिच्यापासून पासून विलग केला जाणारा अजाण बालक आहे. कॅमेऱ्यात ती फ्रेम अखेरीस छोटी छोटी होत जाते. नन्हीला त्या छोट्या होत जाणाऱ्या वटवृक्षापासून त्याचा बाप दूर नेतो. वटवृक्ष वा आधारवड फ्रेममध्ये छोटा छोटा होत जातो. संवादाऐवजी प्रतीक किती प्रभावी असतं ते त्यातून जाणवतं. प्रत्येकाच्या स्मृतीची अशी छोटी चित्रे असतात. म्हणूनच इफ्फीमधील चित्रपटातून स्मृतिचित्रांना उजाळा मिळतो, हे नक्कीच!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.