लिहित्या युवकांकडे लक्ष देण्यासाठी कुमार साहित्य संमेलनाचा घाट, साहित्यिक गावस यांचे प्रतिपादन

Chandrakant Gawas: लिहित्या असलेल्या युवकांकडे लक्ष द्यावे या दृष्टीनेच गोमंतक मराठी अकादमीने अलीकडे कुमार साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा घाट घातलेला आहे.
Chandrakant Gawas, Kumar Sahitya Sammelana
Chandrakant Gawas, Kumar Sahitya SammelanaDainik Gomantak
Published on
Updated on

मी गोमंतक मराठी अकादमी बऱ्याच पूर्वीच्या काळात तरुण मुलांवर मराठीचे संस्कार व्हावे म्हणून खूप कार्यशाळा/शिबिरे आयोजित करत असे आणि त्यातूनच मी म्हणेन की माझ्या पिढीतील मराठी साहित्यिक तयार होत गेले होते.‌ मी, नारायण महाले, दया पाडलोस्कर तसेच इतर बरेच जण गोमंतक मराठी अकादमी आयोजित करत असलेल्या अनेक उपक्रमातून लेखक म्हणून घडलो आहोत.‌ मात्र मधला एक कालखंड असा गेला की त्या काळात तेव्हाच्या तरुण पिढीकडे लक्ष दिले गेले नाही.‌ 

लिहित्या असलेल्या युवकांकडे लक्ष द्यावे या दृष्टीनेच गोमंतक मराठी अकादमीने अलीकडे कुमार साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा घाट घातलेला आहे. साहित्याच्या प्रवाहात तरुण पिढीला जोडून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्हीच त्यांच्याकडे जाणे गरजेचे आहे.‌ उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्याच शिक्षण संस्थेच्या इमारतीत कार्यक्रम आयोजित करून हे होऊ शकते. सध्या ही काळाची गरज आहे.

या उपक्रमात कथा, कविता आणि ललित लेखन ही साहित्याचे तीन मुख्य अंगे विद्यार्थ्यांनी हाताळावी असाच आमचा प्रयत्न राहिला आहे. साहित्याचे पायाभूत भान त्यांना त्यातून येऊ शकते. विद्यार्थी आपली कविता, कथा किंवा ललित लेख वाचत असत आणि त्यानंतर उपस्थितांकडून त्यावर चर्चा केली जात असे. त्यांच्या लेखनातील क्षमतेची पडताळणी त्यातून होत असे व त्यांना मार्गदर्शनही केले जात असे. त्यांच्या साहित्यावर गंभीर विचार व्हावा हाच त्यामागचा हेतू होता. 

Chandrakant Gawas, Kumar Sahitya Sammelana
Marathi Official Language: मराठी राजभाषेसाठी केंद्राने राज्‍याला सूचित करावे! साहित्‍य संमेलनात ठरावाद्वारे मागणी

हा उपक्रम विद्यार्थी केंद्रित असाच आहे. फक्त लिहिणारे युवकच नव्हे तर इतर युवकांनीही या कार्यक्रमात उपस्थिती लावावी अशी आमची अपेक्षा आहे. ती यासाठी की आज साहित्याचे वाचन हा एक संस्कार आहे हे त्यांच्या मनावर बिंबले पाहिजे. आज अशा संस्कारापासून आपली युवा पिढी दूर जाताना दिसते आहे. मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या युवा पिढीवर साहित्याचे संस्कार व्हावेत आणि साहित्यातील मूल्यांचे भान त्यांना यावे यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमधून साहित्यिक तर निर्माण झालेच पाहिजे परंतु त्याशिवाय साहित्याचा आस्वाद घेणारे वाचकही निर्माण व्हायला हवेत. 

Chandrakant Gawas, Kumar Sahitya Sammelana
Marathi Language: मराठी, कोकणी म्हणजे गोमंतकीय परंपरा, संस्कृतीचे दोन डोळे; ‘सडेतोड नायक’ मध्ये मान्यवरांनी मांडली मते

युवकांमध्ये प्रतिभेचा अंश आहेच मात्र तो विकसित होण्यासाठी या उपक्रमांची आखणी केली गेली आहे.‌ अशा प्रकारचे तीन कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये आयोजित केले होते.‌ आणि त्यांना मिळणारा युवकांचा प्रतिसाद प्रत्येकवेळी वाढतच गेला आहे. आज स्थिती अशीही आहे की जे लोक साहित्य लिहितात ते स्वतः इतरांचे साहित्य वाचतात असे मात्र नाही. लिहिणाऱ्याने हे लक्षात घेतले पाहिजे की जितके जास्त त्याचे वाचन असेल तितकीच अधिक सखोलता त्याच्या लेखनात येऊ शकते. 

चंद्रकांत गावस,

साहित्यिक, संयोजक कुमार साहित्य संमेलन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com