Marathi Language: मराठी, कोकणी म्हणजे गोमंतकीय परंपरा, संस्कृतीचे दोन डोळे; ‘सडेतोड नायक’ मध्ये मान्यवरांनी मांडली मते

Sadetod Nayak About Marathi: राजाश्रय हा सौभाग्याच्या अलंकारासम असल्याचे मत पर्यावरणप्रेमी तसेच साहित्यिक प्रा. राजेंद्र केरकर यांनी मांडले.

Sadetod Nayak About Marathi Official Language Goa

पणजी: गोमंतकीय मराठी आणि कोकणी दोन्ही भाषा बोलतात, या दोन्ही भाषा म्हणजे गोमंतकीय परंपरा, संस्कृतीचे दोन डोळे आहेत. मराठीने लोकाश्रयाच्या माध्यमातून गोमंतकात पिढ्यान् पिढ्या आपले अस्तित्व अबाधित ठेवले असून तिला कोकणीप्रमाणे राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. राजाश्रय हा सौभाग्याच्या अलंकारासम असल्याचे मत पर्यावरणप्रेमी तसेच साहित्यिक प्रा. राजेंद्र केरकर यांनी मांडले.

‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात मराठीप्रेमी डॉ. मधु घोडकीरेकर यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, प्रा. केरकर म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजभाषा संमेलनात जी मराठी संदर्भात भूमिका मांडली, ती राजकीय भूमिका आहे. ती काळानुरूप बदलू शकते, त्यामुळेच मराठीला राजाश्रय मिळाल्यास हा प्रश्‍न संपुष्टात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान डॉ. मधु घोडकीरेकर म्हणाले, आजपर्यंत गोव्यातील भाषांचा तटस्थपणे अभ्यासच करण्यात आलेला नाही. जे काही लिखाण उपलब्ध आहे तो, प्रत्येकाने आपापल्या परीने घेतलेला आढावा आहे. त्यामुळे गोव्याचा भाषिक इतिहास तटस्थपणे मांडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात मराठीचे कार्य सरकारी पैसा न घेताही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर इंग्रजीचे अस्तित्‍व अबाधित आहे, तशीच स्थिती गोव्यात मराठीची आहे. मराठी लोकांच्या मनात आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा न मागता दिला. तसाच गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपल्या तिसऱ्या कार्यकाळात न मागता देतील, अशी आशा डॉ. घोडकीरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

भाषिक चळवळ केवळ साहित्यिकांची नव्हे!

राज्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलने व्हायची, परंतु राज्यात संस्थांची नोंदणी (सोसायटी ॲक्ट) कायदा लागू झाल्यानंतर सर्व काही बिघडले. देवस्थान, जातींच्या संस्था निर्माण झाल्या. लाभाची पदे आणि अनुदान मिळू लागले आणि त्यात सर्वजण गुरफुटले गेले. अनेक शिक्षक भाषिक उपक्रमांमध्ये बोलावूनही येत नाहीत. सानेगुरूजी कथामाला आजही निवृत्त शिक्षक चालवतात. भाषेची चळवळ ही केवळ साहित्यिकांची चळवळ नसून त्यासाठी नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे डॉ. घोडकीरेकर यांनी सांगितले.

मानसिक दुर्बलतेत अडकवले!

आज गोव्यात पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रात आज सामाजिक भान असलेले किंवा गोमंतकीय कमी प्रमाणात दिसतात. पत्रकारितेत कोणी येत नाही. पत्रकार हे काही यंत्राद्वारे निर्माण करता येत नाहीत. ज्यावेळी आम्हाला ही पिढी घडवायला हवी होती, त्यावेळी आम्ही त्यांना जाती, धर्म, पैसा, मानसिक दुर्बलतेत अडकवून ठेवले, त्यांना योग्य दिशा दिली नाही. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात दरी पाहायला मिळत आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु आताची युवा पिढी गोव्याची विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित करेल. गोव्याची अस्मिता, वारसा, परंपरा, तसेच चळवळीची पालखी रस्त्यावर उतरून नव्हे, तर रास्तपणे पुढे नेतील याबाबत मी आशावादी आहे, असे प्रा. केरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com