अग्रलेख: ‘गोंयकार’पण हरवत चालले आहे याची खंत कुणालाही नाही

Goa Opinion: पर्यावरण, शिक्षण, खाण, पर्यटन, सरकारी धोरणे, राजकारण या व अनेक विषयांपैकी कुठलाही विषया ज्या-ज्या वेळेस लोकांच्या हिताआड आला, त्या-त्या वेळेस त्याचा समाचार आम्ही घेतला. यापुढेही घेतच राहू.
Goa Tourism
Goa Tourism Canva
Published on
Updated on

पणजी: गेल्या वर्षाचे संचित घेऊन नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसात पाऊल ठेवायचे म्हटले तर गाठीस काय काय असेल, याचा विचारही नकोसा झाला आहे. सरलेले वर्षाचा नारळ किसून ताटात पाहावे तर खोबऱ्यापेक्षा करवंटीशीच सलगी अधिक झाली हे विळीही सांगते.

काही विषयांची वळी कितीही किसली तरी त्यातून आवाजाशिवाय काहीच निघत नाही. प्रमाणाबाहेर वाढते पर्यटन, गुन्हेगारी, अमलीपदार्थांचा वावर सगळेच खवखवत राहते. तरीही आम्ही कुणाचाही, कसलाही मुलाहिजा न बाळगता तर्ककठोर होत प्रत्येक विषय इथे मांडला आहे.

पर्यावरण, शिक्षण, खाण, पर्यटन, सरकारी धोरणे, राजकारण या व अनेक विषयांपैकी कुठलाही विषय ज्या-ज्या वेळेस लोकांच्या हिताआड आला, त्या-त्या वेळेस त्याचा समाचार आम्ही घेतला. यापुढेही घेतच राहू. यातून अनेक संबंधित दुखावले जातात, मार्गात अडथळे आणत राहतात.

पण, त्याची पर्वा आम्ही कधी केली नाही. यापुढेही कधी करणार नाही. गोमंतकीयांची खदखद, असंतोष तेवढ्याच तीव्रतेने योग्य शब्दांत मांडणे हा आमचा धर्म आहे. त्याचा परिणाम होतो की, नाही हा भाग वेगळा; पण परिवर्तनाचा वचक मात्र राहतो एवढे निश्चित.

त्यातून काही चुकीच्या योजना, आराखडे मागे घेतले जातात. लोकांचा रेटा वाढतो, जनजागृती होते व लोक बोलके होतात, हेही खरेच आहे. याची प्रचिती हल्लीच्या ग्रामसभांमधून येते. लोक ग्रामहिताबद्दल जागृत होऊनच थांबत नाहीत तर प्रश्न विचारतात, प्रसंगी रस्त्यावर उतरून विरोधही करतात. लेखणीतून बदल घडतो यावर आमचा ठाम विश्वास आहे!

Goa Tourism
Goa Opinion: गोव्यात सुशासनासाठी तीन गोष्टींची गरज; राज्य निवडणूक आयुक्त नेमके काय म्हणाले, वाचा

नेहमी नकारात्मकतेचा दोष वाचक वर्तमानपत्रांवर मारून मोकळे होतात, पण सकारात्मक काही घडायास तर हवे! पायाभूत सुविधा, रस्ते, दळणवळण, काही आरोग्यसुधारणा या बाबी वगळता भरमसाट पर्यटन, बेसुमार जंगलतोड, आटत चाललेले पाण्याचे स्रोत, लुबाडलेले खनिजाचे स्रोत याला ‘विकासा’च्या सदरात टाकणे कठीण जाते.

विकासाने शाश्वततेची कास सोडून गाठलेली उंची, त्याचा अर्थच बदलून टाकणारी आहे. दिल्लीश्वरांपुढे घातलेली लोटांगणे अशीच सुरू राहिल्यास ‘गोंयकारां’ना पाय ठेवायला भूमी शिल्लक राहणार नाही. भू-माफियांना मिळणारे संरक्षण ही अशीच चिंतेची बाब आहे. पोलिसच गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सोबत घेऊन पलायन करतात, हे सडलेल्या व्यवस्थेचे प्रातिनिधिक उदाहरण आहे.

वाढते अपघात, मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवणे अद्याप थांबले नाही. अशा लोकांवर व्यवस्थेचा वचक राहण्यासाठी जे करणे आवश्यक होते, ते वेळेत होत नाही म्हणूनच कायद्याचा धाक उरला नाही. बाणस्तारीचे प्रकरण हे त्याचे मार्मिक उदाहरण आहे. पोलिस यंत्रणेपासून न्यायव्यवस्थेपर्यंत वेळेत कार्यवाही होतच नाही. वेळेत तपास, खटला दाखल होणे, निर्णय होणे व त्यानुसार शिक्षा होणे दुरापास्त झाले आहे. जिथे पोलिसच गुन्हागारांना सामील होतात तिथे त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवण्याची अपेक्षा बाळगणे हास्यास्पदच नव्हे तर मूर्खपणाचे ठरते.

Goa Tourism
Goa Opinion: मडगाव बगल रस्त्याला अपशकुन करणारे यापुढे तरी आपले प्रयत्न सोडून देतील का?

वर्षभर असाच अनागोंदी कारभार सुरू राहिला. या सगळ्यात गोव्याचे अस्तित्व असलेले ‘गोंयकार’पण हरवत चालले आहे, याची खंत कुणालाही नाही याचे वैषम्य वाटते. वाईट चुकीचे उगाळत बसणे हा हेतू नाही. उलट ते चुकीचे टाळून गोव्याचे अस्तित्व राखण्यासाठी कार्यप्रवण होणे अपेक्षित आहे. दोषारोप करून काहीही साध्य होत नाही. चूक कुठे घडली, कशासाठी घडली हे समजले तर ती पुन्हा घडू नये यासाठी विचार करता येतो.

पुढील काळात चुकांची पुनरावृत्ती होत नाही. किमान होण्याचा संभव तरी कमी होतो. या वर्षाच्या घटनांची मोजदाद करायला बसावे तर तसे चांगले, सकारात्मक सांगावे असे काही हाती लागतच नाही. सगळीकडे अंधारच दिसतो. पण त्याच वेळेस जागृतीची, प्रबोधनाची व परिवर्तन घडवेल अशी एक ज्योत पेटवणे आमचे कर्तव्य ठरते. आम्ही तेच करत आहोत व करत राहू. ही मोजदाद कितीही केली तरी मोजकेच हाती लागले. पुढल्या वर्षी तरी सांगण्यासारखे खूप काही असेल या आशेने हा पहिला दिवस साजरा करणे म्हणूनच गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com