Goa Opinion: मडगाव बगल रस्त्याला अपशकुन करणारे यापुढे तरी आपले प्रयत्न सोडून देतील का?

Western Bypass Road: सर्वांत महत्त्वाचे आहे ते म्हणजे हा रस्ता वाहतुकीस खुला होणे. त्यामुळे बारा किमी लांबीच्या या रस्त्याचीच केवळ नव्हे तर मडगावची साडेसाती एकदाची संपली हे मान्य करावेच लागेल.
Western Bypass Road Goa
Western Bypass Road MargaoX
Published on
Updated on

प्रमोद प्रभुगावकर

मडगावचा पश्चिम बगल रस्ता अखेर पूर्ण झाला व ‘हो’- ‘ना’ करून वाहतुकीसही खुला केला गेला. या रस्त्यामुळे गोव्याच्या व्यापारी राजधानी शहरातील वाहतूक समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. मडगावला तसा पूर्व बगल रस्ता आहे व तो आर्लेम ते रावणफोंड असा अर्धवट स्थितीत आहे त्यामुळे मंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांची मोठी कोंडी मडगावच्या वेशीवर विशेषत: नावेली तसेच रावणफोंड येथे दिसत असे.

पण या नव्या बगल रस्त्यामुळे ती घटणार आहे. पूर्व बगलरस्त्याची आखणी तसेच सुरुवात सत्तरच्या दशकात म्हणजे म. गो. राजवटीत झाली होती व त्यावेळची वाहतूक पाहता ती त्याला अनुरूप होती. आर्लेम ते रावणफोंडपर्यंतचा त्या रस्त्याचा फाटा पूर्णही झाला. त्यानंतर तो रस्ता शांतीनगर- मांडोपमार्गे जालना बांध येथे मुख्य रस्त्याला भिडणार होता. त्यासाठीची आणखीही झाली होती पण भूसंपादन होणे बाकी होते.

१९८०मध्ये गोव्यात सत्तापरिवर्तन झाले व त्याचा सर्वांत मोठा फटका या रस्त्याच्या या भागाला बसला. म्हणजे भूसंपादनाची प्रक्रिया रखडली. एवढेच नव्हे तर राजकीय दडपणामुळे साबांखाने रावणफोंड ते मांडोप जाकनीबांध पर्यंतच्या टप्प्यात बांधकामे उभी राहू दिली. परिणामी हा बगल रस्ता प्रस्ताव सोडून देणे सरकारला भाग पडले. त्यामुळे आर्लेममार्गे येणारी सारी अवजड वाहतूक नावेलीमार्गे जाऊ लागली व त्याचे मोठे परिणाम नावेली चर्च चौकात दिसू लागले. विशेषत: शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी ते जास्त जाणवत होते.

मात्र आता पश्चिम बगल रस्ता वाहतुकीस खुला झाल्याने केवळ नावेली चर्च चौकांतीलच नव्हे तर संपूर्ण मडगाव शहरातील वाहतूक सुसह्य झाली आहे. मात्र या बगल रस्त्याला या ना त्या कारणाने सतत अपशकून करणारे यापुढे तरी आपले हे प्रयत्न सोडून देतील का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

कारण एका बाजूने पूर्ण झालेला हा रस्ता वाहतुकीसाठी त्वरित खुला करावा अशी मागणी होत असतानाच दुसऱ्या बाजूने सर्व बाबतीत पूर्ण झाल्याशिवाय त्याचे उद्घाटन करू नये अशी मागणी ही पुढे आली व त्यासाठी खुद्द स्थानिक आमदारांनी पुढाकार घेतला. पण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सदर रस्ता आणखी वेळ न लावता खुला करण्याची विनंती केली व त्यांनीही ती मान्य करून या रस्त्याचे उद्घाटन केले.

तसे पाहिले तर बारा किमी लांबीच्या या नावेली ते वेर्णा अशा बगलरस्त्यासाठीचे भूसंपादन नव्वदच्या दशकात केले गेले होते. पण प्रत्यक्ष बांधकाम सुरू व्हायला गोव्यात भाजप राजवट यावी लागली. त्याच्या सुरुवातीच्या काळातसुद्धा काम वेग घेऊ शकले नाही ते काही संघटनांनी केलेल्या विरोधामुळे. मात्र २०१४मध्ये गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती दिली गेली व ज्या चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी केली गेली त्यात मडगावचा पश्चिम बगल रस्ताही होता.

त्यामुळे ठरलेल्या वेळेत तो पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. काणकोण बगल रस्ता दोन पुलांसह पूर्ण झाला पण मडगाव बगल रस्ता पूर्ण झाला नाही तो त्याच्या मार्गात पावलोपावली उभे केलेल्या अडथळ्यांमुळे. कुठे मातीच्या भरावा लागतो तर कुठे तळे नष्ट होईल अशी भीती, तर आणखी कुठे उड्डाण पुलाची मागणी त्यामुळे अनेक वर्षे कामच पुढे जाऊ शकले नाही.

Western Bypass Road Goa
Western Bypass: पश्चिम बगल रस्ता ठरतोय त्रासदायक! कचरा फेकण्याचे प्रकार; नावेली, तळावलीवासीय हैराण

काहींनी तर या प्रकरणात न्यायालयाचे व नंतर हरित लवादाचे दरवाजेही ठोठावले. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार रस्त्याच्या मूळ आराखड्यात किरकोळ बदल केले गेले पण संपूर्ण रस्ता स्टिल्टवर म्हणजे खांबावर उभारावा ही मागणी मात्र मान्य झाली नाही. या एकंदर घडामोडीत हे काम पूर्ण व्हायला ठरलेल्यापेक्षा दुप्पट वेळ जसा लागला तसेच त्याचा खर्चही दुपटीहून अधिक झाला याकडे मात्र कोणीच लक्ष दिलेले नाही.

या बगलरस्त्यासाठी सखल भागात घातलेल्या मातीच्या भरावामुळे बाणावली-तळ्याबांद वगैरे भागात पावसाळ्यात पूर येईल अशी भीती सतत व्यक्त केली जाई व माध्यमेच ती निर्माण करत व काही मंडळी त्याचा बाऊ करत. त्या भागात पाणी तुंबत असे पण त्याचे कारण भराव नव्हे तर साळ नदीचे उथळ झालेले पात्र व त्यात न होणारा पाण्याचा निचरा हे होते. त्यावर आवश्यक ते उपाय योजण्यासाठी पावले उचलली गेली तसेच जलस्रोत खात्याने खारेबांध ते वेर्णा दरम्यान साळ नदीपात्र साफ केल्याने ही समस्याही दूर झाल्यात जमा आहे.

Western Bypass Road Goa
Goa Tourism: पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली तर ती नागरिकांसाठी आनंदाची बातमी का असते?

अन्य ज्या समस्या आहेत त्या संबंधितांनी एकत्र बसून सोडविता येण्यासारख्या आहेत. मग त्या गतिरोधक वा सिग्नल किंवा निर्देश फलक लावण्याच्या असोत. सर्वांत महत्त्वाचे आहे ते म्हणजे हा रस्ता वाहतुकीस खुला होणे. त्यामुळे बारा किमी लांबीच्या या रस्त्याचीच केवळ नव्हे तर मडगावची साडेसाती एकदाची संपली हे मान्य करावेच लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com