खाऱ्या पाण्याची हिरवी ढाल: खारफुटी वने – समुद्राच्या लाटा आणि दलदलीवर मात करणारी सदाहरित झुडपे!

Goa mangroves: नोव्हेंबर महिना सुरू होताच गोव्यात थंड हवेची चाहूल लागते. ही चाहूल लागल्याबरोबर हंगामी हिवाळी पाहुणे गोव्यात यायला सुरुवात होते.
Goa mangroves:
Goa mangroves:Dainik Gomantak
Published on
Updated on

नोव्हेंबर महिना सुरू होताच गोव्यात थंड हवेची चाहूल लागते. ही चाहूल लागल्याबरोबर हंगामी हिवाळी पाहुणे गोव्यात यायला सुरुवात होते. काही पक्षी खूप लांब अंतरावरून येतात. गोव्यात पक्षी पाहण्यासाठी एक छान जागा म्हणजे सलीम अली पक्षी अभयारण्य. चोडण येथे मांडवी नदीच्या दुसऱ्या तीरावर असलेले. गेली अनेक वर्षे आम्ही हिवाळ्यात येथे पक्षी पाहायला जातो. येथील खारफुटीचे वनही खूप सुंदर आहे. नागमोडी वळणे घेणारी मांडवी नदी आणि तिच्या दोन्ही बाजूंनी असलेली कांदळवने. होडीतून या पाण्यात विहार करताना इतकी सुंदर दिसतात!

ही कांदळवने म्हणजे उष्ण आणि उपोष्ण कटिबंधातील समुद्रकिनाऱ्यावर सागरी लाटांचा प्रभाव असणाऱ्या दलदलयुक्त मुहाना प्रदेशात आणि नद्यांच्या मुखप्रदेशात आढळणारे सदाहरित लहान वृक्ष किंवा झुडपे. खाऱ्या पाण्यात साधारण भरती-ओहोटीच्या पाण्याच्या पट्ट्यात ही वने आढळतात. यांची उत्क्रांती ११.४ कोटी वर्षांपूर्वी इंडो-मलाया प्रदेशात झाली असे तज्ज्ञ मानतात.

खारफुटींच्या काही प्रजातीत झाडावर लटकत असतानाच बीजांना अंकुर फुटतात. हे अंकुर बरेच लांब वाढतात. काही काळ ते झाडावर लोंबत राहतात आणि नंतर खाली पाण्यात पडतात. पाण्यावर तरंगत ते दूरवर वाहत जातात. खाऱ्या व मऊ चिखलात रुतून त्यांच्यापासून नवीन ठिकाणी नवीन झाडांची निर्मिती होते. या त्यांच्या अद्वितीय पुनरोत्पादन प्रक्रियेमुळे त्यांचा दूरवर प्रसार होतो. इंडो-मलाया प्रदेशातून उष्ण आणि उपोष्ण कटिबंधातील अनेक ठिकाणी यांचा प्रसार झाला.

पण आजही भारत आणि बांगलादेश यांच्या सीमांवर असलेले सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे कांदळवन मानले जाते. चोडण येथील खारफुटीचे वन सुंदर आहे, समृद्ध आहे. नदीमुखालगत असल्यामुळे समुद्राचे खारे पाणी व क्षारे तसेच दलदल आणि समुद्राची भरती-ओहोटी यांचा या खारफुटींना सामना करावा लागतो.

वेगवेगळ्या प्रजाती हा सामना वेगवेगळ्या पद्धतीने करतात. खारफुटीमधील अनेक वनस्पतींमध्ये जाड व मांसल पाने, टेकूप्रमाणे आधार देणारी मुळे आणि जमिनीतून बरीच वर वाढणारी काही श्वसनमुळे ही वैशिष्ट्ये आढळतात. दलदलीच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या मुळांना प्राणवायू कमी मिळतो. काही प्रजातीत ही मुळे प्राणवायू मिळवण्यासाठी जमिनीच्या वर येतात. या श्वसनमुळांना ‘न्युमेटोफोर’ असे म्हणतात.

पाणथळीत वाढणाऱ्या झाडांना भक्कम आधार देण्यासाठी काही मुळे खोडापासून बाहेर येतात आणि पुन्हा जमिनीकडे वळून मातीत जातात, जमिनीत घट्ट रुतून जातात. या आधार मुळांना ‘स्टील्ट रूट’ म्हणतात. गुडघ्यासारखा आकार असलेल्या मुळांना ‘नी (knee) रूट्स’ म्हटले जाते. कांदळवनातील झाडांची मुळे उथळ पण दूरवर पसरलेली असतात. या मुळांचे एक जाळे तयार होते. हे जाळे एक रक्षक म्हणून काम तर करतेच.

शिवाय या जाळ्यात समुद्राच्या पाण्याबरोबर येणारा पालापाचोळा अडकून जातो आणि त्यापासून तयार होणारे सेंद्रिय पदार्थ या पाणथळीत येणाऱ्या समुद्री जीवांसाठी अन्न बनून जातात. प्रजोत्पादनासाठीही अनेक सागरी जलचर येथे येतात. या वृक्षांची मुळे व फांद्या यांच्या जाळीदार अडथळ्यामुळे सागराकडून वाहत आलेला गाळ व लाकडे अडविली जातात.

Goa mangroves:
Goa Nightclub Fire:नाईट क्लबचा सहमालक अजय गुप्ताला यापूर्वीच दणका, करचुकवेगिरीमुळे मांद्रे पंचायतीने नोव्हेंबरमध्ये बजावली होती नोटीस

त्यामुळे तेथे घट्ट जमीनयुक्त नैसर्गिक बांध निर्माण होतात. खारफुटीची जंगले चक्रीवादळे आणि पुरांपासून मानवी जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करतात. खारफुटीचे किनारी प्रदेशातील आश्रयस्थान म्हणून महत्त्व अनेक वेळा सिद्ध झाले आहे. खारफुटीसारख्या परिसंस्था किनारी भागाचे संरक्षण करण्यासाठी बहुमूल्य काम करतात. एरवी किनारी संरक्षण आणि पाण्याचे नियमन यासाठी आर्थिक खर्च हा भारतासाठी एक प्रतिबंधात्मक घटक असू शकतो.

खारफुटीची वने असलेल्या बहुतेक सर्व किनाऱ्यांना धूप, पूर आणि सागरी लाटांपासून संरक्षण मिळते, स्थिरता लाभते. खारफुटी ही वाढत्या समुद्रसपाटीच्या संभाव्य परिणामांना कमी करण्यासाठी संभाव्य यंत्रणा असू शकते. खारफुटीच्या दाट झाडीमुळे समुद्र व जमीन तसेच खाडी, किनारा व त्यावरील प्रदेश यांत एक हिरवी भिंत निर्माण होते. त्यामुळे किनाऱ्याजवळच्या जमिनीची पाण्यापासून होणारी धूप थांबते.

भूसंरक्षणाच्या दृष्टीने ही झाडे अतिशय महत्त्वाची आहेत. त्यांच्यामुळे इतर वनस्पती व जीवसृष्टीचे संरक्षण होते. जलचर प्राण्यांना संरक्षण मिळते. मासे, खेकडे, कोळंबी वगैरे प्राणी येथे अंडी घालतात. पिल्ले मोठी झाली, की समुद्राकडे जातात. कांदळवने अन्नपूर्णेची थाळी आहेत. येथे मासे चांगले वाढतात.

खारफुटी जमिनीच्या वरच्या थराची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत करतात. ते जमिनीवर पसरणारी क्षारता रोखतात आणि त्यामुळे शेतीचे संरक्षण करतात. खारफुटी मोठ्या संख्येने प्राण्यांसाठी प्रमुख प्रजनन आणि संगोपन केंद्र म्हणून कार्य करतात.

अनेक सजीव यांच्या संरक्षणाखाली जगतात आणि वाढतात. खारफुटीच्या गळून पडलेल्या पानांवर व फळांवर अवलंबून असलेल्या जीवांवर उपजीविका करतात. ते सेंद्रिय पदार्थ, पोषक तत्त्वे आणि प्रदूषकांचा साठा करतात, त्यांचे पुनर्चक्रण करतात. ही वने विविध प्रकारच्या वनस्पतींना आधार देतात.

प्राणवायूची निर्मिती, पाण्याचे शुद्धीकरण, भूजल पुनर्भरण, हवामान नियमन, कार्बन संचयन इत्यादींसारख्या इतर अनेक पर्यावरणीय कार्यांमध्येही योगदान देतात. ते किनारी भागात राहणाऱ्या समुदायांना उपजीविका प्राप्त करून देतात आणि स्थानिक लोकांसाठी अधिवास म्हणून काम करतात. खारफुटीचे लाकूड अनेक कारणांसाठी वापरले जाते. इतरही अनेक नैसर्गिक उत्पादने खारफुटीपासून मिळतात.

Goa mangroves:
Goa Fire Incidents: एकाच दिवशी सहा ठिकाणी आग, गवत पेटण्याचे प्रमाण वाढले; आगरवाड्यात अनर्थ टळला

मात्र आजकाल खारफुटीच्या झाडांना अनेक धोके संभावतात. सरपण, चारा, लाकडासाठी वृक्षतोड हे खारफुटीत घट होण्यामागचे मुख्य कारण आहे. कांदळवनात अतिक्रमण आणि त्यांचे रूपांतरण यामुळेही ही घट दिसून येते. शेती, मत्स्यउत्पादन, मानवी वसाहती यासाठी या वनांचे रूपांतरण करण्यात येते. खारफुटीची वने प्रवाळानंतर जगातील दुसऱ्या सर्वाधिक उत्पादक परिसंस्था आहेत. पृथ्वी आणि मानवी कल्याणासाठी त्यांचे महत्त्व बहुमूल्य आहे. या परिसंस्थांचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.

- डॉ. संगीता साेनक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com