Tulsi Vivah: सात म्हार्गाची माती हाडा, तियेची होटी भरा! गोव्यातील तुलसीविवाह ‘व्हडली दिवाळी’

Tulsi vivah in goa: तुलसीविवाह या लग्न सोहळ्यामध्ये तुळशी वृंदावनाला स्त्रीशक्तीचे रूप मानून तिचे लग्न श्रीकृष्ण किंवा त्याचाच अवतार असलेल्या श्रीविष्णूशी लावण्याची परंपरा गोमंतकीय लोकमानसात आहे.
Tulsi vivah in goa
Tulsi vivah in goaDainik Gomantak
Published on
Updated on

तुलसीविवाह या लग्न सोहळ्यामध्ये तुळशी वृंदावनाला स्त्रीशक्तीचे रूप मानून तिचे लग्न श्रीकृष्ण किंवा त्याचाच अवतार असलेल्या श्रीविष्णूशी लावण्याची परंपरा गोमंतकीय लोकमानसात आहे.

तुळस या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव ‘ओसिमम सेंक्टम’ असे आहे. त्याचा पानांमध्ये अतिशय तीव्र सुगंध असतो. गोवा, कोकणातील लोकमानसात तुळस जणू त्यांच्या मदतीला येणारी प्रमुख औषधी वनस्पती बनलेली आहे.

पावसाळ्यात सर्दी, ताप यासारख्या अनेक आजारांवर प्रथमोपचार म्हणून अडुळशाच्या पानांबरोबर तुळशीच्या पानांचा समावेश केला जातो. आयुर्वेदात तर त्याला भरपूर महत्त्व लाभलेले आहे.

वाईट शक्तीचा नाश करणारी ही वनस्पती असल्याची भावना भारतीय लोकमानसात दृढ असल्याने त्यांची नाळ या वनस्पतीशी जुळलेली आहे. आपल्या घराशेजारी उत्पन्न होणाऱ्या असंख्य कृमी कीटकांपासून होणारा त्रास रोखण्यासाठी घरासभोवताली व विशेषत: अंगणाच्या कडेला तुळशीची रोपे आजही लावलेली पाहायला मिळतात.

गोव्यात हिंदूंमध्ये तुळशी वृंदावनाशिवाय घर आढळणे कठीण. दररोज पहाटे उठल्यावर तुळशीला पाणी घालून त्याची पूजा करणे व संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावून प्रदक्षिणा घालण्याचा नित्यनेम पाळला जातो.

पूर्वी पाऊस सुरू असताना सर्वात अगोदर ‘सायो’ नामक भातशेतीची कापणी केली जायची. त्यानंतर दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत इतर प्रजातीच्या भाताची कापणी पूर्ण व्हायची.

त्याचप्रमाणे तुलसीविवाहाच्या दरम्यान नाचणी या भरड धान्याच्या शेत मळ्याची कापणी सुरू व्हायची. भाताची मळणी करून धनधान्य आपल्या घरात आल्यावर लोकमनाला मुक्ततेचा आणि समाधानाचा अनुभव येतो. वर्षभरात धनधान्याची भरपूर उपज देणाऱ्या मातीचीच ही जणू पूजा असते.

सात म्हार्गाची माती हाडा, तियेची होटी भरा

गोमंतकातील लोकगीतामधून मातीच्या पूजनाचा प्रत्यय येतो. भारतात धरित्रीची पूजा करण्याची परंपरा फार जुनी आहे. त्याचप्रमाणे तुळशीवृंदावन हे मातीपासून बनवण्याची परंपरा गोव्यात आजही पाहायला मिळते. आपल्या परिसरातील माती गोळा करून, एक रात्र पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी त्याचे तुळशीवृंदावन स्वतः बनवले जाते.

फणस किंवा किंदळाच्या टिकाऊ लाकडापासून बनवलेल्या ‘पेटणे’ नामक अवजारांच्या आघाताने तिला प्रामुख्याने चौकोनी आकार दिला जातो. अनेक गावात या वृंदावनाला स्थानिक भाषेत ‘रेवो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिवळ्या मातीचा रंग चढवला जातो तर काही ठिकाणी गाईगुरांच्या शेणाचा लेपसुद्धा लावला जातो. कातियो, धिल्लो, धालो या उत्सवांसारखाच तुलसीविवाह हासुद्धा निसर्ग आणि स्त्री शक्तीशी नाते सांगणारा उत्सव आहे.

गोव्यात प्रबोधिनी एकादशी हा दिवस ‘व्हडली दिवाळी’ किंवा ‘देव दिवाळी’ म्हणून साजरा केला जातो. तुलसीविवाहासाठी तुळशीवृंदावनात वेगवेगळ्या वृक्ष वनस्पतींच्या फांद्या त्यांच्या फळांफुलांसोबत लावाव्या लागतात.

ऊस, चिंच, आवळा या रानफळे देणाऱ्या वृक्षाच्या फांद्या, दिंडा, ताडमड या झुडूपवर्गीय वनस्पती व त्याचबरोबर आपल्या बागेत लागवड केलेल्या झेंडूच्या फुलांनी बहरलेली फांदी या सारख्या वनस्पतींना दिवाळीत विशेष महत्त्व आहे.

आजच्या दिवशी तुळशीवृंदावनाला वेगळीच शोभा येते. तुळशीच्या कडेवर व तुळशी शेजारी जमिनीवर जणू हाताच्या नखांचे ठसे उमटावेत अशा पद्धतीची रांगोळी काढण्याची विशेष परंपरा गोव्यात आहे. पूर्वीच्या काळी कुठे नदीकाठी आढळणारे पांढरे दगड एकमेकांवर आपटून त्यापासून जी पूड उपलब्ध व्हायची त्याचा उपयोग रांगोळी काढण्यासाठी केला जायचा, तर कुठे भातशेतीपासून मिळवलेल्या तांदळाचे पीठ बनवून त्याचा वापर केला जायचा.

चिंच व आवळा यासारख्या स्थानिक असलेल्या प्रजाती जंगलातील सजीवमात्रांचे संरक्षण आणि भरणपोषण करण्याचे काम करतात. चिंचेचे झाड भरपूर उंच वाढणारे असल्याने त्याचे पर्णआच्छादन भरपूर उंचावर असते.

त्यामुळे त्या झाडावर चढून चिंच लागलेल्या फांद्या शोधून काढणेदेखील कठीणच असते. तुलसीविवाहामध्ये दिंड्याची काठी आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरते. दिंडा ही एक झुडूपवर्गीय वनस्पती जंगल वाटेने जाताना भरपूर प्रमाणात आढळते.

एकाच ठिकाणी सरळ वर वाढणाऱ्या बांबूसारखी त्याची रचना असते. त्याची साल बाहेरून हिरव्या रंगाची असते व आतील भागास श्वेत असतो. या झुडपाची कोवळी असलेली सरळ काठी निवडल्याने त्याच्यावर नक्षीकाम करणे सोपे होते.

काठीच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत काठीलाच गोल गोल फिरवत कोयत्याच्या मदतीने हे नक्षीकाम साकारण्याची पद्धत अतिशय कौशल्यपूर्ण असते. हिरव्या व पांढऱ्या अशा एकमेकांपासून भिन्न दिसणाऱ्या दोन रंगांमुळे त्याच्यावरील कलाकृती प्रभावीपणे नजरेस पडतात.

विशेष म्हणजे या झुडपाला जेव्हा पांढरी नाजूक फुले बहरायला लागतात तेव्हा कित्येक फुलपाखरांना ते हमखास आकर्षित करत असते. पाऊस ओसरल्यानंतर पडलेल्या कोवळ्या उन्हात विविध फुलपाखरे तासन्तास त्याच्यातील मधुरस पिण्यात मग्न असताना दृष्टीस पडतात. ‘लिया इंडिका’ हे त्याचे वैज्ञानिक नाव आहे.

आवळा हा औषधी गुणधर्मांनी युक्त असल्याने त्याला मिठाच्या पाण्यात साठवून वर्षभर आपल्या आवडीनुसार जेवणामध्ये त्याचा आस्वाद घेतला जातो. गोव्याच्या जंगलात पावसाळ्यानंतर भरपूर प्रमाणात लागणाऱ्या आवळ्याचे बारीक तुकडे करून त्याचे लोणचे बनवले जाते.

तुळशीच्या लग्नासाठी आणलेल्या आवळ्यामधील काही आवळे तुटून खाली पडल्यावर, आवळा खाऊन पाणी प्यायल्याने ते पाणी कसे चवदार लागते याचा अनुभव घेण्यासाठी लहान मुले उत्सुक असतात. तुळशीला शोभा आणण्यात ताडमड नावाचे लांब, कणखर व टोक तर शेंगा असलेले झुडुप विशेष महत्त्वाचे ठरते.

‘टाकीळा’ किंवा ‘तायकिळा’ नामक भाजीला या कालखंडात ज्याप्रमाणे शेंगा येतात त्याचप्रमाणे या झुडपालादेखील शेंगा येतात. परंतु या शेंगा एका हाता इतक्या लांब व झुडुप उंच वाढणारे असते. त्याच्या एका एका शेंगांना एक एक झेंडूचे फुल टोचून त्याचा सजवले जाते.

Tulsi vivah in goa
Goa Rain: तुळशीच्या लग्नाला 'पावसाच्या' अक्षता? शेतकरी हवालदिल; ‘व्हडली दिवाळी’वर पावसाचे सावट

त्यामुळे अंगणात विस्तारलेल्या या झुडपामुळे सोनेरी साज लाभतो. अनेक गावांत तुळशीच्याभोवती केळीचे गभे वापरून अतिशय कल्पक असे खांब उभारून त्याच्यावरून आडवे खांब घालून पांढरी शुभ्र सजावट केली जाते. त्याला चारही बाजूंनी आंब्याची हिरवी पाने गुंफल्याने ते अधिकच मनमोहक बनते.

संपूर्ण गोव्यात दिंड्याच्या काठीला नवरा व तुळशीच्या रोपाला त्याची पत्नी, अशा प्रतीकात्मक रूपात लग्न लावले जाते. सत्तरीत काही गावांमध्ये चिंचेला यजमान, आवळ्याला यजमानीण, ताडमाडला ‘धेडो’ अशा प्रतीकात्मक रूपांनी पाहिले जाते. केळीच्या खोडाच्या बाहेरच्या सालीपासून मिळवलेल्या घटकाला स्थानिक भाषेत ‘पोकारे’ असे म्हणतात.

Tulsi vivah in goa
Healthy Tulsi Leaves :मोठी आणि टवटवीत पाने हवीत? मग तुळशीला घाला कापूराचे खत, लगेच फरक पडेल

दोन पोकऱ्याला खालून एक झेंडूचे एक फूल बांधून अशीच दोन बाशिंगे बनवून वधूवरांस बांधून लग्नविधी केला जातो. वृक्ष वनस्पतीतील भरपूर फुले व फळे निर्माण करण्याच्या अद्वितीय शक्तीमुळे लोकमानसाला आकर्षण झाले असावे व त्यामुळेच पाने, फुले व फळे धारण केलेल्या फांद्यांनाच तुळशीत लावण्यात प्राधान्य दिले असावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com