

गोव्यातील धर्म व देवळे, हिंदू अस्तित्व या विषयावर बरेच छापून आले आहे. त्यावर अजूनही पुस्तके निघतात. डॉ. अविनाश कामत धाकणकर यांचे महालक्ष्मी संस्थानावरचे पुस्तक काल बांदिवडे येथे प्रकाशित झाले आहे.
ते त्यांनी सारस्वत इतिहास व ग्रामसंस्थांची उभारणी या दृष्टिकोनातून, विशेषतः सारस्वत अभिमानातून लिहिले आहे, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही, परंतु देवस्थानाची झालेली उभारणी व त्यात इतर समाजांनी दिलेले सढळ योगदान यावर विस्ताराने लिहिले आहे. त्यामुळे धाकणकर यांचे हे पुस्तक इतरांहून वेगळे ठरते. त्याची दखल घेणे आवश्यक बनते.
मी यापूर्वीही प्रा. पराग पोरोब व क्झांडर हॅन यांच्या पुस्तकांवर विस्ताराने लिहिले आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय दृष्टिकोनातून ग्रामसंस्था, देवळे व धर्म यांचा सखोल धांडोळा घेतला. त्यातून देवळांचा वाढलेला प्रभाव, विशिष्ट समाजांनी त्यांच्यावर केलेला कब्जा व त्यातून निर्माण केलेले स्वतःचे अस्तित्व, वाढवलेली ताकद, परिणामी इतर समाजांचे खच्चीकरण यावर नव्याने उजेड पडला.
वसाहतपूर्व काळातही ही देवळे व धर्मस्थाने जरूर अस्तित्वात होती, परंतु कालांतराने त्यांचे स्वरूप व राजकीय महत्त्व वाढले, त्यामुळे त्यांच्यावर कब्जा करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू झाला. जुन्या परंपरा व उपासना पद्धती हटवून तेथे ब्राह्मणी उपासना पद्धती लादण्यात आली.
देवदेवतांचे स्वरूपही पालटले. वसाहतवादी सत्तेच्या आश्रयाखाली नवीन परंपरा तयार करण्यात येऊन नव्या सांस्कृतिक मूल्य व्यवस्थेतून उच्चवर्णीयांनी स्वतःची सत्ता व नवीन ओळख प्रस्थापित केली. युरोपीय सत्ता येथे बळकट होत असताना त्यांना आधारभूत ठरलेल्या सामाजिक गटांनी देवळे व ग्रामसंस्थांच्या प्रभुत्वातून स्वतःची ताकद आणखी बळकट केली.
देवळे व येथील जातीय, सामाजिक स्थानांसंंदर्भात येथे जे पुरावे पुढे केले जातात, ते बहुतांशी ‘सह्याद्रीखंड’ व ‘कोकणाख्यान’सारख्या पुराणांमधून. हे दोन्ही ग्रंथ प्राचीन असून तेच येथील सामाजिक व ऐतिहासिक दस्तऐवज असल्याचे नेहमी सांगण्यात येते. त्याला प्रा. पोरोब यांनी नेहमी आक्षेप घेतला आहे.
स्कंदपुराणाचा एक भाग असलेल्या ‘कोकणाख्याना’त गोव्याचे निर्माण परशुरामाने बाण मारून केल्याचा उल्लेख होतो, जो अनेकांनी सतत आपल्या पुस्तकात व इतिहास लेखनात कथन केला आहे. सारस्वतांना त्यांनीच उत्तर भारतातून येथे आणून वसविले.
डॉ. धाकणकरही त्याचाच उल्लेख करतात. परशुरामांनी सारस्वतांपैकी स्मार्तांना सर्वप्रथम येथे आणून वेदपूजेत गुंतविले व त्यांनी शेती व खाजनांचे निर्माण यासाठी वैष्णवांना येथे पाचारण केले व हे वैष्णव सर्वप्रथम मडकई येथे आलेले असावेत. कारण तेथेच ‘कामत’ आडनावाची कुटुंबे वसलेली आहेत, असे धाकणकर सांगतात.
‘कामत’ हे आडनाव शेतीशी संबंधित म्हणून ‘शेतकामती’, परंतु पोरोब यांच्या मते सह्याद्रीखंडात सारस्वतांबद्दल गौरवोद्गार आहेत, तसे ते कोकणातील ब्राह्मणांबद्दल नाहीत. अनेकांनी हे ब्राह्मण कोण, यावर लिहिले आहे. त्यावर वादही खूप झाले आहेत.
प्रा. पोरोब यांच्या मते, १४व्या शतकात लिखापढीमध्ये सारस्वतांनी नैपुण्य प्राप्त केले होते व विजयनगरच्या साम्राज्य काळात - ज्यांच्या ताब्यात ज्यावेळी गोव्यातील बहुतांश भाग होता- ते व्यापारउदिमातही मोठी कामगिरी बजावू लागले होते.
१५१०मध्ये पोर्तुगिजांनी येथे सत्ता प्रस्थापित केली तेव्हा व्यापारी म्हणून सारस्वतांनी एकूणच अर्थकारण, महसुली शेती, जमीन अधिकार व वित्त यावर प्राबल्य निर्माण केले. त्यामुळे बाटाबाटीच्या काळात महालक्ष्मी देवीचे कोलव्यातून बांदिवडे येथे स्थलांतर झाले तेव्हा तेथे अगदीच छोटे देऊळ उभारणे शक्य झाले, परंतु विजयनगर साम्राज्याचे एक मोठे अधिकारी माधव मंत्री यांनी देवळासाठी अर्थसाह्य दिले, स्थानिक ग्रामसंस्थेनेही पूजाअर्चेची व्यवस्था केली.
आता येथे प्रा. पोरोब यांच्या आकलनाचा उल्लेख करणे भाग आहे. मध्ययुगात सारस्वतांचे स्थलांतर सुरू झाले तेव्हा सारस्वतांच्या ‘ब्राह्मण्या’ला संपूर्ण प्रशस्ती लाभली नव्हती. मत्स्यभक्षण व व्यापारातील सहभागामुळे त्यांना कमी दर्जाचे ब्राह्मण समजण्यात येई.
त्यावर उतारा म्हणून मग सारस्वतांमधील पुढारी ‘सह्याद्रीखंड’ घेऊन पुढे आले व आपल्या दर्जा व ओळखीसाठी हा राजकीय संदर्भ मदतरूप ठरला. काही टीकाकारांच्या मते, प्रा. पोरोबही त्याचा उल्लेख करतात की ख्रिस्ती संशोधक - गर्सन डिकुन्हा यांनी ‘सह्याद्रीखंडा’ची ही सुधारित प्रत तयार करून सारस्वतांची उच्चश्रेणी प्रस्थापित केली. त्यातूनच त्यांचा येथील देवतांवरचा अधिकार व देवळे ताब्यात ठेवण्याचा मार्ग सोपा झाला.
‘सह्याद्रीखंड’चा पुरेसा अभ्यास झालेला नसला तरी हे पुराण कसे अवतीर्ण झाले, त्याचा मूलाधार काय, त्यात काही प्रकरणे मुद्दाम घुसवण्यात आली होती का, यासंदर्भात टीकाकार वेगवेगळे दावे करतात.
वास्तविक गोव्यातील देवळे, त्यांचे अस्तित्व, सारस्वत व इतर कनिष्ठ जाती, शिवाय त्यावेळच्या ग्रामसंस्थांचा परस्परसंबंध यावर भरपूर अभ्यास व संशोधन करण्यास वाव आहे. मूळ सह्याद्रीखंड हे पुराण एक हजार वर्ष जुने व ते १३व्या शतकालीन असल्याचे मानले जाते, परंतु त्यात सतत भर घालण्यात आली.
त्याची एक कथित प्रामाणिक प्रत १८७७ मध्ये जुझे गर्सन डिकुन्हा यांनी पुढे आणली. गर्सन हे मुंबईचे रहिवासी स्वतः ख्रिस्ती ‘बामण’ होते. त्यावेळी उपलब्ध असलेल्या विविध १४ हस्तलिखितांमधून त्यांनी या सुधारित पुराणाची प्रत बनविली, असे सांगण्यात येते.
गोव्यातील सारस्वत ब्राह्मणांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी गोव्यातील देवदेवतांचे माहात्म्य लिहिले. त्यातून सारस्वतांचे देवळांवरील प्रभुत्व अधिक दृढ झाले. आपल्या पूर्वजांचे महत्त्व व स्थान बळकट करण्यासाठी गर्सन डिकुन्हा यांनी हा खटाटोप केला असल्याचे काही टीकाकार म्हणतात. पुढे गजाननशास्त्री गायतोंडे यांनी गर्सन यांच्या साहित्याचा मराठीत अनुवाद केला. त्यात गर्सन डिकुन्हा यांची ‘आडनजर’ झालेल्या इतर काही हस्तलिखितांनाही त्यांनी सामावून घेतले.
सारस्वतांकडे देवळांचे आधिपत्य कसे आले यावर लिहिणाऱ्या प्रा. पोरोब यांनी गर्सन यांचे काम व देवतांच्या अस्तित्वासंदर्भात सारस्वतांच्या पुराणांमध्ये पुन्हा पुन्हा का सांगावे लागते, यावर भाष्य केले आहे. महात्म्यांमध्ये प्रमुख देवता असलेल्या शांतादुर्गा, मंगेश, महालसा, चंद्रेश्वर, कामाक्षी व सप्तकोटेश्वर यांच्यावर विस्ताराने लिहिले आहे व त्या देवता सारस्वतांनी आपल्याबरोबर उत्तर भारतातून आणल्या होत्या हे प्रतिपादिले आहे. स्थानिक देवतांना आपल्यात सामावून घेताना त्यांना एक दंतकथा रचणे प्राप्त झाले - जी पुढे स्थानिक परंपरेचा भाग झाली.
आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ प्रा. पोरोब शांतादुर्गेचे उदाहरण देतात. त्या काळात शांतादुर्गा देवीचा कोणताही गाजावाजा दिसत नाही. डिकुन्हांच्या पुराणातही शांतादुर्गेचा खूप कमी उल्लेख येतो, परंतु गायतोंडेंच्या संपादकीय रचनेत मात्र ‘शांतादुर्गा प्रादुर्भाव’ म्हणून प्रकरण आहे.
याचा अर्थ पोर्तुगिजांनी जी देवळे मोडली, त्यात शांतादुर्गेचे देऊळ पाडले असा उल्लेख सापडत नाही. पोर्तुगिजांच्या दप्तरात ज्या नोंदी सापडल्या, त्यात जी देवीची देवळे पाडली त्यात केवळ सातेरीदेवीची ६६ देवळे असल्याचा संदर्भ असून गोव्यात खूप आधीपासून या देवीचे माहात्म्य असावे असे दिसून येते.
याचा अर्थ सातेरीमायची अत्यंत श्रद्धेने पूजाअर्चा येथे होत होती, परंतु पुढे तिलाच शांतादुर्गा बनवून तिचे ब्राह्मणी परंपरेत रूपांतर करण्यात आले व पुराणातील एक महत्त्वपूर्ण देवता म्हणून तिचे उदात्तीकरण झाले. सह्याद्रीखंडात देवता वारुळात विलीन होते असा एक उल्लेख आहे. पुढे या देवतेचे महत्त्व सांगणारी अनेक गीते रचण्यात आली व कालमर्दिनी अशी ही देवी गोव्यात येऊन शांत होते व ती शांतादुर्गा बनते अशी आख्यायिका तयार करण्यात आली. पुराणात या देवतेचे अस्तित्व होते, असे सांगून सारस्वतांनी पुढे तिला आपली कुलदेवता बनविली.
ही दंतकथा पुढे ‘कोकणाख्यान’मध्ये अधिक विस्तारित स्वरूपात सांगण्यात आली. पद्य स्वरूपातील ही रचना १७२१मध्ये एका सारस्वताने लिहिली. त्यात जरी सातेरी देवीची उपासना गोव्यात अनेक ठिकाणी होते, असे नमूद केले असले तरी सारस्वतांच्या केळशी गावातील उल्लेख मात्र शांतादुर्गा असा केलेला आहे.
१९व्या शतकात आंतोनियो आल्मेदा आझावेदो यांनी कोमुनिदादीचा इतिहास लिहिला आहे, त्यात अंतर्गत भागात सातेरी देवी बहुसंख्यांमध्ये भक्तिभावाने पुजली जाते, ती वारुळाच्या स्वरूपात असते, असा उल्लेख आहे. सह्याद्रीखंडातही अशा अनेक देवतांचा उल्लेख करण्यात आलाय, ज्यांची महती गाताना मात्र पौराणिक स्वरूप व दिव्यत्वाची थोरवी सांगितली आहे, परंतु ब्राह्मणी परंपरेत बसवताना त्यात जरूर काही त्रुटीही राहिल्या.
विशेषतः मंगेश देवाचे उदाहरण घेता येईल. स्थानिक परंपरेतून आलेल्या या देवाची विविध रूपे आहेत, त्याला महादेवाचा अवतार मानण्यात आले. एका दंतकथेत तो देवशर्माच्या स्वरूपात येतो, ज्याने गोव्यात आलेल्या सारस्वतांच्या दुसऱ्या जत्थ्याचे नेतृत्व केले होते.
एका कथेत या देवशर्माला मंगेशाचे लिंग सापडले असा उल्लेख आहे, तर काही कथा मुळकेश्वर या स्थानिक गावडा समाजातील मुलाला लिंगाचे पहिले दर्शन घडले होते, असे सांगतात. एक कथा शिवाने गोव्यात आश्रय घेतला असल्याचे सांगते, तर काही जण सारस्वतांनी तो देव उत्तर भारतातून आणला, असा दावा केला आहे.
स्थानिक उपासना पद्धती कशा होत्या, उत्तरोत्तर त्यात कसे बदल घडत गेले. आता वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यांचा अभ्यास चालू आहे. संशोधक प्रा. रोहित फळदेसाई हेही मान्य करतात की देवदेवता, देवस्थाने यांची स्थाने बदलली, त्यांच्यावर नवे प्रभाव घडले. इतर समाजांनीही देवालयांना योगदान दिले आहे, परंतु १९व्या शतकात पोर्तुगिजांनी नवीन कायदा आणून देवालयांना कायद्याच्या चौकटीत आणले तेव्हा ‘सेवेकऱ्यांना’ पगारी नोकर बनविण्यात आले व कनिष्ठ समाजांचा सहभाग हटवण्यात आला. त्यावेळच्या सर्व उच्च समाजांनी हेच केले.
महालक्ष्मीची मूर्ती कोलव्याहून बांदिवडेला आणण्यात आली. ती मूळ मूर्ती अजून महालक्ष्मीच्या गर्भकुडीत आहे. १५व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात देवराय दुसरे यांच्या कारकिर्दीत नंदन गोसावी हे प्रशासक होते.
त्यांनी या देवळासाठी जमीन दान केली व पूजाअर्चा यासाठी निधीची तरतूद केली. डॉ. धाकणकर म्हणतात की, १९१३ पूर्वी महालक्ष्मी देवळाचे स्वरूप कसे होते हे सापडत नाही, ते छोटेखानी असावे, परंतु तेथे असलेल्या एका शिलालेखात देवळाची दुरुस्ती व पुनर्निर्माण १९१३मध्ये सुरू झाले व ते १९१६मध्ये पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे.
डॉ. धाकणकरांनी उदार मनाने कबूल केल्याप्रमाणे श्रीमती नाबुबाई विश्वनाथ काटकर यांच्या निधीतून हे काम करण्यात आले. श्रीमती नाबुबाईंचे पती मुंबईचे एक पारशी धनिक शापूरजी साराबजी इंजिनिअर यांनी १९१६मध्ये या मंदिराचे दोन्ही घुमट व इतर कामे करून दिली.
काटकर या मूळच्या बांदिवडे येथील मंदिराच्या सेवेकरी होत्या. शिलालेखाचा उल्लेख करून इतिहास संशोधक विनायक नारायण शेणवी धुमे यांनीही आपल्या पुस्तकात ही बाब नमूद केली आहे.
वास्तविक केवळ महालक्ष्मी देवळाबाबत हे घडलेले नाही. गोमंतक मराठा समाजातील स्त्रियांनी राज्यातील देवालयांसाठी अमूल्य देणग्या दिल्या आहेत. काही टीकाकार तर असे मानतात की आज कित्येक देवस्थानांमध्ये मूर्तींना जे मौल्यवान हिरे, जडजवाहीर परिधान करतात, ते याच समाजातील स्त्रियांनी देणगीच्या स्वरूपात उदारहस्ते दिले. या समाजातील स्त्रिया मुंबईत गेल्या, त्यांनी खूप नाव कमावले व आपल्याला मिळालेल्या संपत्तीतील महत्त्वाचा हिस्सा त्यांनी आपले पूर्वज ‘सेवेकरी’ असणाऱ्या देवस्थानांना दिल्या.
प्रा. फळगावकर यांनी नानोडा येथील शांतादुर्गा देवीचा उल्लेख केला. हे देवस्थान मूळचे कळंगुट येथील. त्या देवळाच्या उभारणीत याच समाजातील बात्याबाय कळंगुटकरीण यांचे योगदान मोठे आहे. तिची आई एका पोर्तुगीज सैनिकाबरोबर लग्न झाली होती. उतारवयात ती गोव्यात परतली व ती देवीची परमभक्त बनली, तिची मुलगी बात्याबाय हिने देऊळ स्वतःच्या खर्चाने उभारून दिले.
दुर्दैवाने देवळे नवीन कायद्याखाली आली. नव्या दंतकथा रचण्यात आल्या. लिखापढी जाणणाऱ्या उच्च समाजाने त्यांच्यावर हक्क सांगितला. आपली ओळख त्यातून घडवली. या राजकीय अस्तित्वाच्या लढाईत इतरांचे अधिकार नाकारले तर गेलेच, परंतु हे समाजही भरडले गेले. अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. प्रबळ गट सामाजिक, धार्मिक स्थाने ताब्यात घेतात व त्यातून त्यांचे राजकारण चालते. ही प्रक्रिया निरंतर आहे, असे मानले तरी इतिहास मात्र तटस्थ असावा व पुढच्या पिढीला किमान सत्य समजले पाहिजे हा हेतू असावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.