

राजू नायक
‘त्या’ जुनाट पडक्या इमारतीतून ती बालिका बाहेर पडली, तेव्हा तिच्या शरीरातून रक्त ठिपकत होते, म्हणून लोकांना गुन्ह्याचा पत्ता लागला. त्या घटनेने आमच्या डोळ्यांपुढे एक भयंकर चित्र उभे केले. हिरोशिमावर बॉम्ब पडला तेव्हा एक मुलगी - जिचे कपडे संपूर्ण जळून गेले - ती किंचाळत, रडत नग्नावस्थेत रस्त्यावरून धावत चालली आहे...एक उद्ध्वस्त जीवन!
रवींद्र केळेकरांचा एक जुना लेख मी चाळत होतो. त्यांनी गावागावात पोलिस चौक्या उघडण्याच्या प्रवृत्तीविरोधात राग व्यक्त केला होता...ते म्हणतात, एकेकाळी गोवा किती शांत होता...लोक दारं उघडी ठेवून बिनधास्त जीवन कंठीत होते. मी ही गोष्ट कित्येकांकडून ऐकली आहे. माझ्याच लहानपणीची गोष्ट. घरातील मंडळी मागील दारात काम करीत असायची. मुख्य दार सताड उघडं.
आमचा गोवा मुक्तीच्या ६५ वर्षात किती बदलला! आता गोवेकर मुलांना सार्वजनिक ठिकाणी खेळायलाही पाठवत नाहीत. बागेत जाणे लोकांनी सोडून दिले आहे. एकेकाळी - आमच्या लहानपणी आम्ही तिसरीत, चौथीत असता एकटे चालत शाळेत जात असू. आज पणजीत पालकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. गोवा किती बदलला! म्हणजे आमचा तो गोवा ‘संपला’ काय? मी अनेकदा मूळ गोवेकर बोलताना ऐकतो, आता गोवा आमचा राहिला नाही! आमचा गोवा मेला!
बलात्कार, स्थलांतरितांचे लोंढे, वाढता हिंसाचार, तिरस्कार, चोऱ्या, दरोडे, हा असला कसला गोवा आम्ही निर्माण केला? माझ्या दूरचित्रवाणीच्या चर्चेत हा विषय चर्चेला आला तेव्हा तज्ज्ञ म्हणाले, गोव्याची लोकसंख्या जर १७ लाख असेल तर त्यातील स्थलांतरितांची संख्या ६० टक्के आहे! आम्ही असे म्हणतो तेव्हा स्थलांतरितांबाबतचा तिरस्कार आणखी वाढणार आहे. कारण स्थलांतरित वाढणार तसे स्थानिक लोक हतबल होणार आहेत. सासष्टीत तर बोलतात, सारेच आमच्या हातातून गेले, राजकारणही गेले! खरे आहे! धोका वाढलाय. सुरक्षितता धोक्यात आली आहे. चिंता होणारच. पर्यटनाचे नंदनवन म्हणून प्रतिष्ठा धोक्यात येतेय हे खरे आहेच, शिवाय आमची सुरक्षा, समाज, माणुसकी? प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे तो टाळू शकत नाहीत.
गेल्या आठवड्यात बालिकांविरोधात नोंदविलेले अत्याचार, शोषणाचे प्रकार. समाजमन हेलावून गेले. एका बालिकेवर म्हापसा येथे बलात्कार झाला व तिसऱ्या दिवशी काणकोणमध्ये तशीच धक्कादायक घटना घडली. त्यानंतर तिसवाडीतील एका शाळेत असाच प्रकार. म्हापसाप्रकरणी कर्नाटकातील एका इसमाला अटक झाली, काणकोणात एका बिहारी मजुराला. दोघेही भायले आहेत, हे सत्य असले तरी, या घटनांची तीव्रता ते केवळ स्थलांतरित आहेत म्हणून कमी करता येणार नाही. तरी तशीच काहीशी चर्चा राज्यात सुरू आहे. स्थलांतरितांना दोष दिला जातोय. कारण त्यानंतर एका मंत्र्याने म्हटलेच की, ९० टक्के गुन्हे बाहेरच्यांनी घडविलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही गोवा विधानसभेत वाढत्या गुन्ह्यांसाठी स्थलांतरितांना दोष दिला होता. समाजही तसाच विचार करतो. या विषयाची सखोल तपासणी केली पाहिजे.
काही स्थलांतरित गुन्ह्यांमध्ये गुंतले आहेत म्हणणे वेगळे आणि सरसकट स्थलांतरितांवर ते गुन्हेगार असल्याचा ठपका ठेवणे वेगळे! त्यामुळे सरसकट एका वर्गाला आपण संशयितांच्या वर्गात उभे करतो. वास्तविक उपलब्ध पोलिस नोंदीवरून सध्याची गुन्हेगारी आकडेवारी आपण सहज तपासू शकतो. गोवा कोणाचा, हा प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा केवळ आडनावे तपासून आपण त्यावरून मालकी ठरवू शकत नाही. कारण पोर्तुगीजांनाही बार्देश बसवायचा होता. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातून लोकांना स्थलांतरित होता यावेत म्हणून राज्याचे दरवाजे उघडले होते. आधुनिक स्थलांतर १०० वर्षांपासून सुरू आहे.
त्यानंतर राज्यात बांधकाम उद्योग सुरू झाला - २५ वर्षांपूर्वी पुन्हा मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग आला. त्यांचीही आता दोन पिढ्यांची वस्ती आहे. पर्यटनाला ऊत येताच जी हॉटेले व सेवा निर्माण झाल्या त्याने आणखी लाख लोक राज्यात आणले. खाणींना बरकत आली, तेव्हा ट्रक चालवायला लोक आले, आता टॅक्सीही बाहेरचे लोक चालवतात. आमच्या अर्थव्यवस्थेला पेलून धरण्यासाठी हे लोक हवेच आहेत. सध्या घरकामांसाठी आपण नेपाळींना कामाला ठेवत नाहीत का? वृद्धांचे वय वाढते आहे, तसे त्यांची देखभाल करण्यासाठी लोकांची आवश्यकता असते.
हा सर्व स्थलांतरित वर्ग गोवेकरांसारखाच कसा असेल? त्यांची प्रवृत्ती निश्चितच वेगळी आहे. गुन्हेगाराला जरूर त्याने केलेल्या अपराधासाठी जबाबदार धरले पाहिजे, परंतु त्याच्या गुन्ह्यांसाठी त्याचा अख्खा समाज दोषी कसा होऊ शकेल? आणखी एक विचार आहे ः कोणीही माणूस कुठे जन्मला यावरून त्याची आम्ही वर्गवारी करू लागलो तर राज्य सुरक्षित ठरू शकणार नाही. उलट आणखी कप्पे निर्माण होतील. याचा अर्थ असा नाही की वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष केले जावे! गेल्या विधानसभा अधिवेशनात सादर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार बलात्काराची प्रकरणे २०२१ मध्ये ७१ नोंदविण्यात आली होती, २०२५ मध्ये त्यांची संख्या १०३ बनली. त्यात ४३ टक्के वाढ झाली. बालकांवरील अत्याचार, अपहरणे, सायबर गुन्हे, आर्थिक फसवणुकीचे प्रकार व संघटित गुन्हेगारीत वारेमाप वाढ झाली आहे.
सरकारने काही म्हणो, म्हणो की संबंध बिघडताच बलात्काराचे आरोप केले जातात, शिवाय आता अशी प्रकरणे लपवून ठेवली जात नाहीत (आधी वाच्यता व्हायची नाही) असे असले तरी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कसून तपास व त्वरित न्याय - वेगाने कडक शिक्षा याला पर्याय नाहीच! गुन्हेगारी का वाढते? कारण गुन्हेगारांना भीती वाटत नाही. राज्यात गुन्हेगार आश्रय घेतात, दरोडे घालतात, पळून जातात. गुन्हे घडू नयेत यासाठी जी तातडीची खबरदारी, कठोर पावले उचलायला हवीत, तसे घडतच नाही. पोलिस यंत्रणा, कायदा आणि सुव्यवस्था याबाबत यथातथाच स्थिती आहे. हाच खरा अस्वस्थतेचा विषय आहे.
म्हापशात दरोडा पडतो, चोरटे घरचेच वाहन घेऊन पळतात, सीमा ओलांडतात, परंतु पोलिस ढिम्म हलत नाहीत. काही महिन्यांनी पुन्हा त्याच शहरात दरोडा पडतो. पोलिस तपास यंत्रणेचा सुस्तावलेपणा, निर्विकारपणा हा खरा गंभीर विषय आहे. आपला नागरी समाजही आता या गोष्टींना निर्ढावू लागला आहे. गुन्हे घडताच समाजमन उचंबळीत होते. पोलिस ठाण्यात लोक जातात. माध्यमे आक्रंदतात, परंतु आणखी नवा विषय घडतो. लोक विसरतात. मी माझ्या लेखात म्हटले होते, म्हापशात जेव्हा गुन्हेगार त्या अभागी मुलीला ओढत नेत होता, तेव्हा लोकांनी, मोटरसायकल पायलटांनी त्याला कसे हटकले नाही? ही त्यांची संवेदनशीलता?
म्हापसा व बहुतेक शहरांमध्ये बेवारशी इमारती आहेत. निर्जन जागे आहेत. तेथे असे प्रकार सतत घडतात. जुगार, दारू, अनेक अनैतिक प्रकार सतत चालू आहेत. नागरिक त्याबाबत तक्रारी करतात तेव्हा कोणी त्यांचा पाठपुरावा करतो का? सबिना मार्टिन्स सांगत होत्या, ‘पोस्को’खाली त्या एक प्रकरण १२ वर्षे लढताहेत! आपण गुन्हेगारांना काय संदेश देत असतो? बलात्कारातील कित्येक आरोपी सुटून जातात. या प्रश्नांची उत्तरे स्थलांतरितांना दोष देऊन सापडणार नाहीत! अधिकृत आकडेवारी तर वेगळेच सांगते! २०२२ व २०२४ या काळात विदेशी नागरिकांचा सहभाग असलेली २५१ प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यात हिंसक हल्ला, बलात्कार, अमली पदार्थापासून चोऱ्यामाऱ्यांचेही गुन्हे होते.
गुन्ह्यांना जन्माचे ठिकाण कारण नसते! त्यांना जबाबदार असते व्यक्ती! गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीचेही तसेच. ती कोणीही असू शकते. त्यामुळे तिच्या आयुष्यावर कायमचा ओरखडा उमटतो! कुटुंबे उद्ध्वस्त होतात. रात्री घरी परतताना जर मुलीला आपल्या जीवाची भीती वाटू लागली तर ते सार्वजनिक विश्वासाचे अपयश आहे! हल्लीच प्रकाशित एका आकडेवारीनुसार २०२१ व २०२५ या काळात अबलांशी संबंधित ९२२ गुन्हे नोंदविण्यात आले, त्यात पाच ते ७० वयोगटातील महिलांचा समावेश होता, ज्या बलात्कारापासून शारीरिक, लैंगिक शोषणाच्या बळी होत्या! विषय जरूर गंभीर आहे.
या गुन्ह्यांसाठी पोलिसी कारवाई हे एकमेव उत्तर नाही. गोव्याला सुरक्षित सार्वजनिक ठिकाणे निर्माण करता आली पाहिजेत. गरीब, कमकुवत वर्गातील बालकांना संरक्षण हवे आहे. कोविड काळात अशी केंद्रे निर्माण करण्यात आली होती. तपास वेगाने व्यावसायिक पद्धतीने केला जावा. तपासात निष्णात अधिकाऱ्यांचे पथक तयार व्हावे. मजूर, स्थलांतरितांची नोंदणी व्हावी. म्हणजे त्यांची निगराणी करता यावी. २०२५मध्ये १.२२ लाख भाडेकरूंची पडताळणी करण्यात आली होती. ती आणखी सूक्ष्म पद्धतीने करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, परंतु ही पडताळणी त्या वर्गाला संशयितांच्या वर्गवारीत आणण्यासाठी नको. लोकांचा विश्वास तोडता कामा नये.
गोवा हे केवळ उपजीविकेचे ठिकाण म्हणून नव्हे तर आपल्या अर्थव्यवस्थेला मानवीय ‘टच’ मिळावा. येथे येणाऱ्यांना, त्यांच्या मुलांना सुरक्षित वाटले पाहिजे. हा विश्वास काहीसा कमकुवत बनला आहे. गुन्हे घडल्यानंतरच पोलिस कारवाई करतात हा समज या विश्वासाला तडा देतो. ‘भायले’ मग अस्वस्थ होतात. ते राजकारण्यांच्या आश्रयाला जातात. एकगठ्ठा मते बनतात. गोव्याची लोकशाहीही भ्रष्ट बनते!
निष्कर्ष काय, गोवा ‘मेला’ आहे काय?
आपण चिंता करण्यासारखी ही बाब गंभीर आहे काय?
हिंसा घडूनही आम्ही जर कोडगे बनलो, हिंसा सर्वसाधारण बनते, उत्तरदायित्व जेव्हा राजकीय तमाशा बनते, गुन्ह्यांना केवळ आकडेवारीचे स्वरूप लाभते, आता काही बदलणारच नाही, असे नागरिक मानून चालू लागतो, तेव्हा ‘गोवा’ मरणार आहे...
ही परिस्थिती आम्ही बदलू शकतो.
आम्ही सुरक्षा निर्माण करू. समाजाला विधायक विचार शिकवू. आम्ही प्रत्येक काळ स्वतंत्रपणे न्याहाळू. सुरक्षित ठिकाणे निर्माण करू. सरकारला सतत जागवत राहू. म्हापशातील घटनेत लोक जर जागृतीने वागले असते तर ती हिंसा घडलीच नसती. प्रौढ नागरिक त्या अभागी मुलीला सहज वाचवू शकले असते. ही जबाबदारी समाजात निर्माण व्हावी लागेल. आता तरी तिला जलद न्याय मिळावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.