Goa Water Shortage: गोव्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट? 108 वर्षांतील सर्वांत कमी पाऊस; राज्यपालांचा इशारा

Goa Water Crisis: यंदा गोव्यात मागील १०८ वर्षांतील सर्वांत कमी मान्सून पावसाची नोंद झाली आहे.
Goa Water Crisis
Goa Water ShortageDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: यंदा देशात मान्सूनच्या पावसात १३ टक्के, तर गोव्यात तब्बल ३१ टक्क्यांची तूट नोंदवली गेल्याने आगामी काळात राज्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी आज दिला.

यंदा गोव्यात मागील १०८ वर्षांतील सर्वांत कमी मान्सून पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी केवळ मान्सूनवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. जलसंधारण आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Goa Water Crisis
Goa Politics: फातोर्ड्यात साकव दुरुस्तीवरून राजकीय संघर्ष; दामू नाईक यांच्या सांगण्यावरून काम बंद पाडल्याचा विजय सरदेसाईंचा आरोप

दोनापावल येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले, पाण्याचे संकट निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आतापासूनच जलसुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. राज्यात कोणत्याही नवीन बांधकाम प्रकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी त्या प्रकल्पामुळे संबंधित भागातील जलसुरक्षेवर काय परिणाम होईल, याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. उद्योग, पर्यटन, रस्ते आणि गृहप्रकल्पांसाठी जलसंवर्धनाच्या उपाययोजना बंधनकारक केल्या पाहिजेत.

तळी आणि अन्य पाणथळ जागांवरील अतिक्रमणे तसेच प्रदूषण रोखणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाचे पाणी साठवण्याबाबत जनजागृती करून त्यासाठी असलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे आणि वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे, यासाठी एकात्मिक धोरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोव्याचे डोंगर, जंगले आणि नैसर्गिक झरे हे राज्याच्या जलस्रोतांचा मुख्य आधार आहेत. विशेषतः जांभ्या खडकांमधून पाझरणारे पाणी भूजल पातळी वाढविण्यास मदत करते. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांचा वारसा जपण्याबरोबरच त्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले बागकाम, वाहनांची धुलाई आणि स्वच्छतागृहांतील फ्लशिंगसाठी पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे.

Goa Water Crisis
Goa Politics: दयानंद मांद्रेकरांचा महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा; भाजपमधील अस्वस्थतेमुळे 2027 च्या निवडणुकीआधी राजकीय चर्चांना उधाण

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने जलसंवर्धनाच्या नव्या पद्धती विकसित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. जलव्यवस्थापन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात योगदान दिले पाहिजे. आगामी उन्हाळ्यात राज्यातील कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, अशी जलसुरक्षित व्यवस्था निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

धुक्यातून पाणी मिळवण्याचा प्रयोग

गोवा विद्यापीठ आणि एनआयआयटी यांच्या समन्वयाने राज्यात ‘फॉग नेट प्रोजेक्ट’ राबविण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे हवेतील बाष्पाचे सूक्ष्म थेंब विशेष जाळ्यांच्या साहाय्याने गोळा करून त्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जलसंकटावर मात करण्यासाठी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त ठरू शकतो, असेही राज्यपालांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.