पर्यटनाच्या नावाखाली गोव्याची संस्कृती धोक्यात? अमली पदार्थांचे जाळे आणि वाढत्या गुन्हेगारीवर जनतेचा संताप

Goa Regional Political Alternative: गोवा हा फक्त पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश नाही, तर स्वतःची वेगळी संस्कृती, भाषा, परंपरा, सामाजिक सलोखा आणि स्वाभिमान जपणारी भूमी आहे.
Goa culture under threat due to tourism
Goa culture under threat due to tourismDainiak Gomantak
Published on
Updated on

विनेश प्रभुदेसाई

गोव्याच्या तरुणांनी, बुद्धिजीवींनी, शेतकऱ्यांनी, कामगारांनी आणि सामान्य नागरिकांनी आता विचार करणे आवश्यक आहे की पुढील पिढीसाठी आपण कोणता गोवा निर्माण करणार आहोत, बाहेरून नियंत्रित होणारा गोवा की स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा स्वाभिमानी, सुरक्षित आणि सुसंस्कृत गोवा?

गोवा हा फक्त पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश नाही, तर स्वतःची वेगळी संस्कृती, भाषा, परंपरा, सामाजिक सलोखा आणि स्वाभिमान जपणारी भूमी आहे. पण गेल्या काही वर्षांत गोव्याच्या राजकारणात एक मोठा बदल दिसून येत आहे - निर्णय गोव्यात कमी आणि दिल्लीच्या राजकारणानुसार जास्त घेतले जात आहेत. स्थानिक प्रश्नांपेक्षा पक्षनिष्ठा, हायकमांड संस्कृती आणि सत्तेचे गणित यांना अधिक महत्त्व दिले जात आहे. अशा परिस्थितीत गोव्याला आता एका मजबूत, प्रामाणिक आणि खऱ्या अर्थाने गोव्याच्या हितासाठी लढणाऱ्या प्रादेशिक पर्यायाची गरज निर्माण झाली आहे.

Goa culture under threat due to tourism
प्रादेशिक ‘गड’ खालसा ! -संपादकीय

दक्षिण भारतातील अनेक राज्यांकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते - तेथील जनतेने आपल्या राज्याच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या प्रादेशिक पक्षांवर विश्वास ठेवला. विशेषतः तामीळनाडूमध्ये राष्ट्रीय पक्षांना पूर्ण वर्चस्व मिळू दिले गेले नाही. तेथील जनतेने आमचे राज्य, आमचे निर्णय ही भूमिका कायम ठेवली. त्यामुळे तेथील राजकारण प्रामुख्याने स्थानिक विकास, शिक्षण, उद्योग, रोजगार, भाषा आणि सामाजिक न्याय याभोवती फिरत राहिले.

आज तामीळनाडू हे भारतातील औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्यांपैकी एक मानले जाते. तेथील जनतेने धर्माच्या नावावर समाजात फूट पाडणाऱ्या राजकारणाला फारसे स्थान दिले नाही. त्याऐवजी रस्ते, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगार आणि स्थानिक स्वाभिमान या मुद्द्यांवर भर दिला. त्याचा फायदा सामान्य नागरिकांना झाला. गोव्यात मात्र परिस्थिती वेगळी दिसते. येथे अनेकदा निवडणुका स्थानिक प्रश्नांवर नव्हे तर राष्ट्रीय मुद्द्यांवर लढवल्या जातात.

गोव्याच्या जमीन प्रश्नांपासून बेरोजगारी, खाण व्यवसाय, किनारपट्टीवरील अतिक्रमणे, वाढते बाहेरील हस्तक्षेप, पर्यावरणीय हानी, स्थानिक युवकांचे भविष्य, भाषा आणि संस्कृतीचे जतन या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारे नेतृत्व कमी दिसते. निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी शेवटी पक्षांतर किंवा सत्तेच्या राजकारणात अडकतात. त्यामुळे जनतेचा विश्वास कमी होत चालला आहे. आज गोव्यापुढे आणखी एक गंभीर संकट उभे राहत आहे - अमली पदार्थांचे वाढते जाळे, वेश्याव्यवसाय, बलात्कार, महिलांवरील अत्याचार आणि वाढती गुन्हेगारी.

काही भागांमध्ये ड्रग्स माफिया आणि बेकायदेशीर रॅकेट इतक्या उघडपणे कार्यरत असल्याचे आरोप वारंवार होत आहेत की सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम गोव्याच्या प्रतिमेवर होत आहे. एकेकाळी शांत, सुरक्षित आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाणारा गोवा आज अनेकदा चुकीच्या कारणांसाठी चर्चेत येतो. जगभरातील माध्यमांमध्ये ड्रग्स, रेव्ह पार्टी, गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न अधोरेखित होऊ लागले आहेत. परिणामी कुटुंबासोबत येणारे, संस्कृती अनुभवण्यासाठी येणारे आणि उच्च दर्जाचे पर्यटक हळूहळू इतर राज्यांकडे वळत आहेत.

पर्यटनाचे प्रमाण वाढत असले तरी पर्यटनाची गुणवत्ता घसरत असल्याची भावना अनेक स्थानिक, पर्यटक व्यक्त करत आहेत. गोव्याला असा पर्यटन विकास नको जो स्थानिक संस्कृती नष्ट करेल आणि गुन्हेगारी वाढवेल. गोव्याला असे प्रशासन हवे जे कठोर कायदा अंमलबजावणी करेल, अमली पदार्थ माफियांवर कारवाई करेल, महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देईल आणि गोव्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमा पुन्हा स्वच्छ व सन्माननीय बनवेल.

गोव्याला असा प्रादेशिक पर्याय हवा जो कोणत्याही दिल्ली हायकमांडसमोर झुकणार नाही, तर गोव्याच्या लोकांशी त्याचे उत्तरदायित्व राहील. असा पक्ष हवा जो धर्म, जात किंवा द्वेषाच्या राजकारणावर नव्हे तर विकास, पारदर्शकता आणि स्थानिक स्वाभिमानावर उभा राहील. गोव्यात हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम आणि इतर सर्व समाज शेकडो वर्षे एकत्र राहिले आहेत. गोव्याची खरी ओळख म्हणजे सामाजिक सलोखा. त्यामुळे धर्माच्या नावावर मते मागणारे राजकारण गोव्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही.

आज सामान्य गोमंतकीय माणसाला हवा आहे :

  • आपल्या मुलांसाठी रोजगार

  • स्थानिकांना न्याय

  • भ्रष्टाचारमुक्त प्रशासन

  • पर्यावरणाचे संरक्षण

  • जमिनींचे रक्षण

  • सुरक्षित समाजव्यवस्था

  • महिलांसाठी सुरक्षित वातावरण

  • पर्यटनासोबत स्थानिक हितसंबंधांचे जतन

  • आणि सर्व समाजांना समान वागणूक

हे सर्व साध्य करण्यासाठी गोव्यातील लोकांनी स्वतःच्या भूमीशी निष्ठा असलेल्या नेतृत्वामागे उभे राहणे गरजेचे आहे. दक्षिण भारतातील राज्यांनी दाखवून दिले आहे की प्रादेशिक स्वाभिमान आणि विकास एकत्र शक्य आहे. गोव्यानेही आता दिल्ली काय म्हणेल? यापेक्षा गोव्याच्या लोकांना काय हवे आहे? हा प्रश्न विचारण्याची वेळ आलीआहे.राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर समाजाच्या भविष्यासाठी असते.

गोव्याच्या तरुणांनी, बुद्धिजीवींनी, शेतकऱ्यांनी, कामगारांनी आणि सामान्य नागरिकांनी आता विचार करणे आवश्यक आहे की पुढील पिढीसाठी आपण कोणता गोवा निर्माण करणार आहोत, बाहेरून नियंत्रित होणारा गोवा की स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा स्वाभिमानी, सुरक्षित आणि सुसंस्कृत गोवा? गोव्याचा विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा गोव्याचे राजकारण गोव्याच्याच हातात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com