Goa Opinion: 31 डिसेंबरला गोव्याचे लोक काय करत होते; पार्टी की बीचवर दंगा? महेश काळेंच्या मैफिलीने दिलं उत्तर

Mahesh Kale Concert Sankhalim: आज नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा दुपारी १२ नंतर होईल तिथे, असा ढोबळ विचार येतो. हो ना?
Mahesh Kale 31 December Concert Goa
Goa OpinionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Opinion on 31 December Celebration

साखळी: गोवा म्हटलं की फक्त पार्टी संगीत, मोठ्मोठला आवाज, नाचगाणी, दारू एवढंच आहे. अनेकवेळा हेच ऐकलं असेल. त्यात काल होता ३१ डिसेंबरचा दिवस म्हणजे गोव्यातली मंडळी पूर्णपणे दारूच्या नशेत बुडून गेलेली असतील. आज नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा दुपारी १२ नंतर होईल तिथे. असा ढोबळ विचार येतो, हो ना? असं का होतं यावर आज बोलायचं नाहीये पण गोवेकर म्हणून त्यादृष्टीने ३१ डिसेंबर किंवा १ जानेवारी आमच्यासाठी काय आहे हे थोडक्यात मांडायचं आहे.

मी स्वतः काही सध्या गोव्यात नाही, मात्र मंगळवारी साखळीत झालेल्या महेश काळे यांच्या संगीत कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घरून मिळाली, अर्थात माध्यमांमध्ये काम करत असताना आज (बुधवारी) सकाळी माझ्यापर्यंत व्हिडीओसकट माहिती आलीच होती. ३१ तारखेला संध्याकाळी साखळीत महेश काळे यांची संगीत मैफिल रंगेल अशी मीच बातमी केली, ती म्हणावी तशी चालली नाही आणि या कार्यक्रमाला खरंच कोणी येईल का असा प्रश्न निर्माण झाला मनात.

पण आज सकाळी आईसोबत झालेला फोन या किंतुचं उत्तर देऊन गेला. "काल साखळीत झालेल्या कार्यक्रमाला तुडुंब गर्दी जमली होती. रस्त्यावर भरपूर गाड्यांची गर्दी होती. अक्षरशः स्टेजच्या समोर लोकांची गर्दी होती" असं ती खूप आनंदाने सांगत होती. बोलताबोलता "आपला गोवा काही ३१च्या पार्टीमध्ये बुडून जाणारा नाही, आम्हाला हेच आवडतं किंवा तो धिंगाणा आम्ही करतच नाही" अशी तिची वाक्यं मला मात्र पूर्णपणे पटत गेली.

गोव्यात कोण येऊन काय करतं याबद्दल आज बोलायचं नाही पण ३१ तारखेच्या दिवशी सुद्धा एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला पाच हजारांच्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद देणारा माझा गोवा आहे हे आज मी ठणकावून सांगू शकेन.

Mahesh Kale 31 December Concert Goa
Mahesh Kale: 31 डिसेंबरला 'मैफिल रंगणार' पण 'सुरांची'; साखळीत महेश काळेंच्या संगीताचा कार्यक्रम

गोव्याला नेहमीच कलेची खाण म्हटलं आहे. गानकोकिळा लता मंगेशकर किंवा पंडित अभिषेकी जिथे जन्माला आले त्या गोव्यात एखादा शास्त्रीय संगीत महोत्सव पार्टीच्या मोहाने रिकामा राहील हे होणं शक्यच नाही याची खात्री होतीच.

गोव्याचं काय, कोण जातंय त्या कार्यक्रमाला अशा प्रश्नांना गोव्यातल्या लोकांनी दिलेलं ते थेट उत्तर होतं. गोवा कधीच दारूच्या नशेत बुडून जाणारा नाही किंवा गोव्यातील लोकांना पाण्याच्या जागी दारू पिण्याची सवय नाही. सध्या नवीन वर्ष, सनबर्न यांच्या बातम्यांमधून दारू, ड्रग्स यावर बोलणाऱ्या अनेक बातम्या फिरत असतील पण ही गोव्याची संस्कृती नाही किंवा गोमंतकीयांना यामध्ये काहीच स्वारस्य नाही हे कालच्या कार्यक्रमामुळे उदाहरणासह सिद्ध झालं.

अगदी सगळेच महेश काळेच्या कार्यक्रमाला जाऊन बसले का? तर मुळीच नाही. गोव्यात काही मंडळी अशीही आहेत ज्यांनी पार्टीला महत्व दिलं आणि तो वैयक्तिक आवडीचा भाग आहे, पण गोव्यात ३१ तारखेला दारू पिऊन पडणारी आम्ही लोकं नाही, किंवा गोव्यातल्या लोकांना पार्टीसमोर कसलं आलंय शास्त्रीय संगीताचं प्रेम याला पक्कं उत्तर देऊन गेला गोवा.

महत्वाचं म्हणजे स्वतः महेश काळे यांनी गोव्याच्या लोकांचं काल कौतुक केलं. "रवींद्र भवनाची एवढी मोठी जागा असून सुद्धा ती अपूरी पाडावी यापेक्षा मोठा प्रतिसाद असूच शकत नाही. सध्याच्या काळात शास्त्रीय संगीताचं काय होईल अशी भीती वाटते मात्र असे रसिक पहिले म्हणेज भिवपाची गरज ना" असं म्हणत त्यांनी स्थानिकांच्या भाषेत धन्यवाद दिला.

३१ डिसेंबर असताना देखील एवढी गर्दी कशी? असा प्रश्नच पडत नाही कारण गोव्यातील लोकांसाठी गोवा त्यांचं घर आहे, त्यामुळे तिथले समुद्र किनारे असो किंवा आणखीन काही याची नवलाई आम्हाला वाटत नाही. आम्ही गोव्यात खूप साधं आणि सुशेगाद आयुष्य जगतो. बाहेर पार्टीचा धिंगाणा असल्यास आम्ही घरात बसून राहणं सोयीस्कर समजतो आणि म्हणून महेश काळेच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला ३१ तारीख असून सुद्धा मनापासून प्रतिसाद देतो.

(लेखातील मते वैयक्तिक आहेत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com