59 वर्षांपूर्वीचा तो 'जनमत कौल': जेव्हा गोमंतकीयांनी इतिहास घडवला आणि 'गोवेपण' वाचवलं!

Significance Of Goa’s Opinion Poll: आजचा, १६ जानेवारी हा दिवस ‘जनमत कौल’ दिन म्हणून ओळखला जातो. याच दिवशी १९६७साली झालेला ‘जनमत कौल’ ही गोव्याच्या इतिहासातील एक क्रांतिकारक घटना.
Goa Opinion Poll Day 2025
Goa Opinion Poll Day 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

आजचा, १६ जानेवारी हा दिवस ‘जनमत कौल’ दिन म्हणून ओळखला जातो. याच दिवशी १९६७साली झालेला ‘जनमत कौल’ ही गोव्याच्या इतिहासातील एक क्रांतिकारक घटना. याच प्रक्रियेतून गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखले गेले. आज जो काही गोव्याने विकास केला आहे त्याचे संपूर्ण श्रेय या कौलाला जाते.

गोवा मुक्त झाल्यानंतर काही घटकांचा कल स्पष्टपणे महाराष्ट्राकडे दिसत होता. खास करून १९६३साली, म्हणजे पहिल्या निवडणुकीपासून सत्तेवर असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा सूर तर तसाच होता. वास्तविक गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा या दृष्टीने मगो पक्षाचे तसेच तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी प्रयत्नही सुरू केले होते.

पण तेव्हा विरोधी पक्ष असलेल्या ‘युनायटेड गोवन्स’चे नेते जॅक सिक्वेरा यांनी हरकत घेतल्यामुळे या त्यांच्या प्रयत्नांना खीळ बसली. यातूनच मग ’जनमत कौला’ची कल्पना उदयाला आली. पण त्याकरता केंद्राची परवानगी आवश्यक होती. सुरुवातीला ही कल्पना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे नेण्यात आली.

पण १९६४साली त्यांचे निधन झाल्यामुळे या कल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त होऊ शकले नाही. नंतरचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही कारकीर्द अल्पजीवी ठरल्यामुळे तेव्हाही या कल्पनेला हवा मिळू शकली नाही. पण शास्त्रींच्या निधनानंतर पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी ‘जनमत कौला’ला हिरवा कंदील दाखवला आणि गोव्याच्या हिताचा हा महत्त्वाचा विषय जनतेच्या दरबारात पोहोचला.

या विषयाला अनेक कंगोरे होते. आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा कंगोरा होता तो गोमंतकीयांच्या अस्तित्वाचा. सत्तेवर असलेला मगो पक्ष हा संपूर्णपणे विलीनीकरणाच्या बाजूने असल्यामुळे विलीनीकरणवाद्यांची बाजू भक्कम वाटत होती. पण स्वतःचे अस्तित्व राखू पाहणारे काही ’धुरंधर’ गोवा घटक राज्यच राहावे म्हणून धडपडत होते. अशा प्रकारचा कौल हा देशातला पहिलाच कौल असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष या कौलावर लागून राहिले होते.

विलीनीकरणवाद्यांकरता ‘फूल’ तर ‘संघ प्रदेशा’च्या बाजूने ‘दोन पाने’ अशी चिन्हे देण्यात आली होती. आणि जनमत कौलाच्या नावाखाली झालेली ही निवडणूक अक्षरशः युद्धपातळीवर लढवली गेली. रिंगणात एकही उमेदवार नसूनसुद्धा निवडणूक अतिशय चुरशीची झाली. महाराष्ट्रातील शाहीर साबळेसारखे अनेक कलाकार प्रचाराकरता गोव्यात आले होते.

दुसऱ्या बाजूला उल्हास बुयांवसारख्या कलाकारांनी आपल्या कलेद्वारा गोवेपणाच्या रक्षणासाठी कंबर कसली होती. उदय भेंब्रे, चंद्रकांत केणी, पुरुषोत्तम काकोडकर, शाबू देसाई, व्हिक्टोरिया फर्नांडिस सारख्या अनेकांनी गोव्याचे अस्तित्व राखण्याकरता संपूर्ण गोव्यात प्रचाराचे रान उठविले.

Goa Opinion Poll Day 2025
Goa Restaurants Sealed: चार विनापरवाना रेस्टॉरंटना टाळे, जिल्हा प्रशासनाची कारवाई; हरमलात एका आस्थापनावर बडगा

या मुद्द्यावर त्या काळात गोवा विभागला गेला होता. फोंड्यापर्यंत विलीनीकरणवादी तर बोरी पूल ओलांडल्यानंतर विलीनीकरणविरोधी अशी परिस्थिती दिसत होती. मात्र माजी मुख्यमंत्री रवि नाईक हे फोंड्यात असूनसुद्धा विलीनीकरणाविरोधात वावरताना दिसत होते. आपल्याला याकरता किती त्रास सहन करावे लागले, प्रसंगी मारसुद्धा कसा खावा लागला, याचे किस्से रवि रंगवून सांगायचे.

त्यावेळी संपूर्ण फोंडा तालुका विलीनीकरणाच्या बाजूने असल्यामुळे त्याच्याविरोधात बोलणेसुद्धा गुन्हा समजला जायचा. पण तरीही रवि तसेच शिवनाथ नागेशकर, राम कुंकळकर, फेर्नांदो फर्नांडिस, एन. शिवदास यांसारख्या फोंड्यातल्या काही युवकांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन आपली अस्मिता जोपासण्याचा प्रयत्न केला हेही तेवढेच खरे. ‘झालाच पाहिजे’ हा विलीनीकरणवाद्यांचा नारा तर ‘आमचे गोंय आमका जाय’ हा विलीनीकरणविरोधकांचा नारा होता.

जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा ‘फूल’ आघाडीवर होते. पहिल्या दिवशी जेव्हा फोंड्यापर्यंतची मतमोजणी संपली तेव्हा जनतेचा कौल विलीनीकरणाच्या बाजूने असल्यासारखा वाटत होता. त्यामुळे विलीनीकरणवाद्यांच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले होते. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा मडगावपासून मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा चित्र बदलले आणि ‘दोन पाने’ विजयी झाली. आज या जनमत कौलाला ५९ वर्षे होत आहेत.

पण आजही त्या लढ्याच्या आठवणी तेवढ्याच ताज्या आहेत. मुख्य म्हणजे गोमंतकीयांनी त्या काळात दाखविलेले ’फायटिंग स्पिरिट’ वाखाणण्यासारखेच. सरकारविरुद्ध, प्रवाहाविरुद्ध लढा देऊन ’निज गोयकारांनी’ जे आपले अस्तित्व राखले त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच! गोवा जर महाराष्ट्रात विलीन झाला असता तर त्याचे स्थान एखाद्या तालुक्यापेक्षा मोठे नसते यात शंकाच नाही.

पण या मुद्याकडे आज बघताना गोव्याचे शिल्पकार म्हणून ओळखले जात असलेल्या भाऊसाहेब बांदोडकर आणि अर्थातच त्यावेळी सत्तेवर असलेला मगो पक्ष यांनी विलीनीकरणाच्या समर्थनार्थ भूमिका का घेतली होती हा प्रश्न उपस्थित होतोच. या बाबतीत फोंड्याचे माजी आमदार तसेच या चळवळीत भाग घेतलेले मगो पक्षाचे एक नेते रोहिदास नाईक यांना विचारल्यावर ‘त्यावेळी आम्हांला तशी गरज भासली म्हणून आम्ही हा निर्णय घेतला’ असे सांगितले.

‘गोवा हा छोटा प्रदेश असल्यामुळे त्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण झाल्यास त्याचा गोव्याला फायदा होऊ शकेल’, असे आमच्या पक्षातील अनेकांना वाटले म्हणून आम्हांला तो निर्णय घ्यावा लागला असे नाईक म्हणाले. त्यावेळी विलीनीकरण झाल्यास महाराष्ट्रातील लोकांचा गोव्यावर प्रभाव पडेल आणि ‘गोंयकारा’चे अस्तित्व कमी होईल असा प्रचार आमच्या विरोधात झाला म्हणून विलीनीकरणवाद्यांचा पराभव झाला असेही त्यांनी सांगितले.

पण आज महाराष्ट्राचे सोडा दिल्लीवाले गोव्यावर ज्याप्रकारे आक्रमण करत आहेत, आमच्या जमिनी त्यांच्या घशात जात आहेत, त्याचे काय? असा प्रश्नही त्यांनी विचारला. आज गोव्यात गोमंतकीयांचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होत चालले असून गोवा म्हणजे दिल्ली, उत्तर प्रदेशाचा एक भाग वाटायला लागला आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यांची खंत चुकीची आहे असे कोणच म्हणणार नाही. आणि यामुळेच ‘जनमत कौला’चा संदेश आपण पाळतो की काय अशी शंका निर्माण व्हायला लागली आहे.

Goa Opinion Poll Day 2025
Goa News: पाणीपुरवठ्यावर आता 'स्मार्ट' नजर! गळती रोखण्यासाठी रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टीम; मंत्री फळदेसाई यांची माहिती

त्यावेळी लोकांनी आपले सर्वस्व पणाला लावून ‘जनमत कौला’द्वारा गोयकारांचे अस्तित्व अबाधित ठेवले होते. पण आज त्याच अस्तित्वावर घाला घातला जात आहे. आरजीसारखे काही पक्ष हे अस्तित्व राखण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांचे प्रयत्न म्हणजे तुफानाला तोंड देण्यासारखे वाटत आहे.

म्हणूनच ‘गोंयकार’ म्हणून स्वतःला मिरवणाऱ्या प्रत्येकाने आपली अस्मिता राखण्यासाठी आता एकत्र येण्याची गरज आहे. यावर्षी जनमत कौल साठाव्या वर्षात पदार्पण करत असताना ’आता नाही तर कधीच नाही’ असा नारा देत या बाहेरच्या आक्रमणाला तोंड देण्याची तयारी करण्याची आवश्यकता आहे. तसे न झाल्यास ‘जनमत कौला’ने आपल्याला जो संदेश दिला आहे तो वाया जात आहे असेच म्हणावे लागेल, एवढे निश्चित.

- मिलिंद म्हाडगुत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com