
अॅड. सूरज मळीक
गोमंतकात निसर्गाच्या बदलत्या स्वरूपाचा आधार घेत विविधांगी उत्सव साजरे केले जातात हे कुठल्याही ऋतूंमध्ये डोळसपणे अनुभवता येते. निसर्ग आपल्याला जे काही उपलब्ध करून देईल त्याची पूजाअर्चा करण्याच्या विधी परंपरा गोमंतकात आणि कोकणातील काही भागात अनुभवायला मिळतात. येथील लोकमानसाला आपल्या दैवतांची पूजा करण्यासाठी प्रतीकात्मक गोष्टी निसर्गात आढळल्या.
केरळमध्ये ज्याप्रमाणे उन्हाळ्यातील फुलांचा बहर शिगेला पोहोचतो तेव्हा फुलांची रांगोळी बनवण्याची परंपरा आहे; त्याचप्रमाणे गोमंतकात उन्हाळ्याला सुगिम म्हणून त्यात बहरणाऱ्या उक्शी नामक झुडुपाचा विशेष उपयोग करून शिगमो उत्सव साजरा केला जातो.
तळपणारा सूर्य उन्हाळ्यातसुद्धा फुलांच्या बहरातून घडवणारा हा चमत्कारच माणसाला खुणावत आलेला आहे. मान्सूनच्या पावसात सूर्याला पाहून आपल्या पतीला त्याच्यासारखे तेज आणि चैतन्य लाभावे म्हणून आयतार पूजन करण्याची परंपरा गोव्यात आहे.
’वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ संत तुकाराम महाराजांनी निसर्गाची महती सांगणारे कित्येक अभंग लिहिले. आपल्या जीवनातील क्षण प्रसंगी उपयुक्त पडणाऱ्या वृक्षवेलींची त्यांना जाण होती. निसर्ग हा आपला जीवन आधार असतो हे त्यांना परस्पर जाणवत होते.
इथल्या लोकमानसाने पिढ्यान्पिढ्या निसर्गरम्य गावात बालपण व्यतीत केले. त्यामुळे आपल्या वृक्षवल्लीविषयी त्यांच्यात कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना निर्माण झाली असावी. संत तुकाराम महाराजांची ही धारणा त्यांच्यात सनातन काळापासून निर्माण झाली होती.
गोव्यामध्ये गणेशचतुर्थी साजरी करण्याच्या वैविध्यपूर्ण परंपरा पाहायला मिळतात. विविध जातीजमातींमध्ये गणपती पूजनात भिन्नता पाहायला मिळते. त्याची पूजा जशी मृण्मयी मातीच्या मूर्तीत केली जाते, त्याचप्रमाणे काही ठिकाणी लाकडी, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या तर काही ठिकाणी कागदावर गणपतीचे चित्र रेखाटून पूजा आजही केली जाते.
याचबरोबर त्याला पानांफुलांच्या रूपात पुजण्याची परंपरा काणकोण तालुक्यातील पैंगीणीतील महालवाड्यावर पाहायला मिळते. गणेशचतुर्थी दिवशी येथे ’पत्री गणपती’ची पूजा केली जाते. पानांमध्ये गणपतीचे रूप अनुभवणाऱ्या लोकमानसाची ही परंपरा पर्यावरणीय लोकधर्माशी नाते सांगणारी आहे.
पैंगीण या गावामध्ये प्रचलित असलेली पत्री गणपतीची ही परंपरा प्रभुगावकर कुटुंबीयांशी निगडित आहेत. आज येथील तेरा कुटुंबीयांनी श्रद्धेने आणि आत्मीयतेने या गणपती पूजन परंपरेचे जतन केले आहे.
त्यामुळे आजही दर वर्षी गणेशचतुर्थी दिवशीच्या कालखंडात पत्री गणपतीचे दर्शन घेता येते. या पत्रीच्या रूपातील गणपती पूजण्यामागे काय कारण असावे याचा शोध घेणे कठीण. परंतु पूर्वी पैंगीण येथील परशुराम नृसिंहाच्या मंदिरात सर्व मंडळी एकत्र येऊन सामूहिकरीत्या या पत्री गणपतीची पूजा केली जायची. आणि त्यानिमित्ताने प्रभुगावकर कुटुंबीय मंदिरात एकत्रित यायचे. काही कालखंडानंतर देवाची अनुमती घेऊन हा उत्सव घरात साजरा करण्यास प्रारंभ केला.
आज या घरांमध्ये कुठल्याही मातीच्या किंवा धातूच्या मूर्तीची पूजा न करता गणेशचतुर्थीच्या सणात तृणपाती वनस्पती गोळा करून त्याची गणेशाच्या रूपात पूजा केली जाते. या कुटुंबातील वयोवृद्ध माणसे माळरानात जाऊन रंगीबेरंगी फुले, पाने, तृणपाती गोळा करून घरी आणतात.
यामध्ये एकवीस प्रकारच्या वनस्पतींमधून मिळवलेल्या तुळस, चाफा, मोगरा, वड, पिंपळ, केतकी, शमी अशा पत्री एकत्र करून त्यांना अर्जुनाच्या पानात गुंडाळून बांधले जाते. आणि त्यालाच गणपतीच्या स्वरूपात बसवून त्यावर माटोळी सजवून त्याची पूजा केली जाते.
गोव्यात निसर्ग अभ्यासक येथील माळराने आणि पठाराचा आस्वाद घेण्यासाठी श्रावण-भाद्रपद या दोन महिन्यात येतात. या कालावधीत तृणपाती, रानफुले, फळे भरपूर प्रमाणात बहरलेली असतात. कुठे पिवळी, कुठे जांभळी, पांढरी, तांबडी, अशा विविध रंगांची रानफुले लोकमनाला विलक्षण मोहिनी घालतात आणि त्यामुळे या कालखंडात येणाऱ्या व्रतवैकल्यात आणि सण उत्सवात मौसमी फळे, फुले पूजेसाठी वापरण्याची कल्पना आपल्या पूर्वजांना सुचली.
श्रावणात ज्यावेळी गोमंतकात आणि कोकण भागात आयतार पूजन केले जाते तेव्हा काही ब्राह्मण सौभाग्यवती स्त्रिया मंगळागौरीचे पूजन करतात. परंतु यामध्येही निसर्गात उपलब्ध असलेल्या वृक्षवेलींच्या पानाफुलांचा उपयोग केला जातो. बेल, आघाडा, दूर्वा, कण्हेर, डाळिंब, धोतरा, जाई जुई, मरुबक, बकुळ, अशोक या वनस्पतींच्या पत्रीचा उपयोग केला जातो.
गोव्यात गणेशचतुर्थीच्या कालखंडात गणपतीच्या पूजेसोबतच गौरीपूजन करण्याची परंपरा आहे. त्याच्याबद्दलच्या कथादेखील आहेत. तिला गवर असे म्हणूनही संबोधले जाते. कधीकाळी ती या धरतीवर प्रसन्न झाली तोणियाची भाजी खाऊन.
धारबांदोड्यातील उदळशे या गावात अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे आजही गौरी पूजनात ही भाजी अत्यावश्यक ठरलेली आहे. ही भाजी तशी सहज आढळत नाही. त्यामुळे गोव्यात ठरावीक भागातच उपलब्ध असलेल्या या भाजीची लागवड ग्रामस्थांनी आपल्या बागेत करून त्याचे जतन केलेले आहे.
दक्ष राजाच्या यज्ञावेळी अपमानीत झालेल्या पार्वतीने धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेतली होती. आपला देह त्याग केल्यानंतर तिने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला असे सांगितले जाते. आणि त्यानंतर भगवान शंकरासारखा पतीला लाभावा म्हणून तिने रानातली कंदमुळे आणि नंतर केवळ पाने खाऊ उपवास केला. तिच्या याच भक्तीमुळे भगवान शंकर तिला पती म्हणून लाभले आणि याच कारणामुळे गणेशचतुर्थी दरम्यान गौरीपूजनात प्रामुख्याने रानातली पत्री, फुले वापरण्याची परंपरा आहे. तिच्या पूजेसाठी फोटोबरोबर हळदीचे रोप ठेवले जाते.
एकवीस ही संख्या गणपतीला विशेष प्रिय मानली जाते. यामध्ये एकवीस प्रकारच्या वृक्ष, वनस्पती आणि वेलींपासून गोळा केली जाणारी पत्री पूजनात वापरली जाते, जी विशेषत: औषधी गुणधर्मांनी युक्त असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.