रॉड्रीक्स यांच्या प्रयत्नाने मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली, 20 हजार गोवावासीय उपस्थित होते; ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला

Goa Liberation Day: प्रा. रॉड्रीक्स यांच्या प्रयत्नाने २ ऑक्टोबर १९५५ रोजी मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली. सुमारे वीस हजार गोमंतकीय उपस्थित होते. सभेत ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला.
Goa Liberation Day
Goa Liberation DayDainik Gomantak
Published on
Updated on

नॅशनल काँग्रेस गोवा’मध्ये जहाल होते ते ‘गोवा लिबरेशन आर्मी’ मध्ये शिरले. परंतु हातात बंदूक घेणे, हातबाॅम्ब फेकणे असली कामे जे करू शकत नव्हते त्यांची कुचंबणा झाली. असे किती तरी कार्यकर्ते होते. पंतप्रधान गोव्यासंबंधीच्या धोरणामुळे सत्याग्रह मोहिमेतील हवा निघून गेली.

आणि ते कार्यकर्ते वैफल्यग्रस्त झाले, प्राध्यापक सुसियो रॉड्रीक्स हे त्यांपैकी एक. प्रा. रॉड्रीक्स बार्देश तालुक्यातील हणजुणे गावचे. मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. एक उत्तम प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती.

वयाच्या सुमारे चाळीसाव्या वर्षी त्यांनी प्राध्यापकपदाच्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला व गोवा मुक्तीच्या कार्यास १९५४पासून स्वतःस वाहून घेतले. श्रीमती लावरा डिसोझा, अ‍ॅडव्हॉकेट एस. बी. डिसिल्व्हा, अ‍ॅडव्हॉकेट लुईश मेंडिस वृत्तपत्रकार लँबर्ट मास्कारेन्हस हे त्यांचे सहकारी होते.

मुंबईत गोमंतकीय ख्रिश्चन लोकांचे कितीतरी लहान-मोठे क्लब आहेत. त्यांच्याशी संबंध असलेल्या लोकांना राजकीय दृष्टिकोन प्राप्त झाला नव्हता. बहुतेकांना उच्च शिक्षण नव्हते. पोर्तुगीज सरकारवर त्यांची श्रद्धा होती.

अशा लोकांमध्ये राजकीय जागृती करण्याची जरुरी होती. ते काम प्राध्यापक रॉड्रीक्स यांनी केले. त्यांच्या क्लबला भेटी देऊन, लोकांच्या सभा भरवून त्यांच्यामध्ये जागृती आणली. दिनांक २ ऑक्टोबर १९५५ रोजी त्यांच्या प्रयत्नाने मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली.

सुमारे वीस हजार गोमंतकीय उपस्थित होते. सभेत ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला. त्या ठरावाला जरी विशेष अर्थ नसला, (कारण ठराव पास झाला म्हणून का पोर्तुगीज गोवा सोडून जाणार होते?) तरी स्वतंत्र व्हायला आपण उत्सुक आहोत हे पुन्हा एकदा गोवेकरांनी जगाला दाखवून दिले.

प्रा. रॉड्रीक्सनी दोडामार्ग येथे ‘गोवा आश्रम’ स्थापन केला. गोव्यात सामाजिक व राजकीय कार्य करण्यासाठी कार्यकर्त्यांना योग्य असे प्रशिक्षण त्या आश्रमात देण्यात येत असे.

गोवा लिबरेशन आर्मी

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या सरकारच्या धोरणाविषयी जे निवेदन केले त्या निवेदनाने ‘गोवा विमोचना’साठी केलेल्या सत्याग्रहरूपी यज्ञाची सांगता झाली. सत्याग्रहाच्या महान नाट्यावर अखेरचा निवेदनाने पडदा पडला आणि १९४६साली सुरू झालेल्या सत्याग्रहाच्या आंदोलनाने गोवा-दमण-दीवचा प्रश्न सुटणार नाही, हे निश्चित झाले.

ती समस्या सोडवायला भारत सरकारकडे योजनाबद्ध कार्यक्रम नव्हता. गोव्याची आर्थिक नाकेबंदी, कॉन्सुलेट बंद करणे यांसारख्या कृती करणे म्हणजे कागदी घोडे नाचवण्यासारखे होते.

’नॅशनल काँग्रेस गोवा’च्या कार्यकर्त्यांमध्ये वैफल्याची भावना निर्माण झाली. सत्याग्रहावर पूर्ण निष्ठा नसलेले त्या पक्षाचे कार्यकर्ते दिनांक ३० सप्टेंबर १९५५ रोजी बेळगाव येथील ’नॅशनल काँग्रेस गोवा’च्या कचेरीत एकत्र आले आणि त्यांनी ’गोवा लिबरेशन आर्मी’ नावाची संघटना स्थापन केली. संघटनेचे अत्युच्च अधिकार पाचजणांच्या मंडळाकडे केंद्रित करण्यात आले. त्या मंडळाच्या सभासदांची नावे येणेप्रमाणे होतीः

१)उर्सेलिनु आल्मेद, २)शिवाजी देसाई, ३)माधवराव राणे, ४)ऑगस्टस आल्वारिस आणि, ५)जयसिंगराव व्यं. राणे.

Goa Liberation Day
Goa Liberation Day: नेहरूंनी दिलेला 'तो' एक आदेश अन् गोवा झाला मुक्त; वाचा 36 तासांच्या धडाकेबाज मोहिमेचा थरार

वरील पाचांपैकी उर्सेलिनु आल्मेद हे एक चांगल्यापैकी भूमिगत संघटक होते. ऑगस्टस आल्वारिस हे ’नॅशनल काँग्रेस गोवा’चे माजी अध्यक्ष पीटर आल्वारिस यांचे भाऊ. ते पदार्थविज्ञान व रसायनशास्त्राचे पदवीधर. सर्व तर्‍हेची स्फोटक द्रव्ये हाताळण्यात त्यांचा हातखंडा होता.

इतर तिघाजाणांना सैनिकी जीवनाचा अनुभव होता. बाळकृष्ण भोसले पुढे काही काळाने ‘आझाद गोमंतक दला’तून निघून या संघटनेत शिरले. गोवा लिबरेशन आर्मीचे सदस्यत्व मिळण्यास कोणत्याही सशस्त्र हल्ल्याच्या कामगिरीवर जाण्याची तयारी असणे ही अट होती. कोणाहीकडून पैसे उकळणार नाही ही दुसरी अट होती. केवळ देणग्या मिळवून त्यावर आर्मीचा खर्च भागविण्याची त्या संघटनेची तयारी होती.

Goa Liberation Day
Goa Liberation Day 2025: गोवा मुक्तीचा 'तो' ऐतिहासिक लढा...! संयुक्त राष्ट्रात भारतासाठी रशियाने घेतला संपूर्ण जगाशी पंगा; फेल झाली अमेरिका-ब्रिटनची चाल

गोवा लिबरेशन आर्मीने मोठ्या धडाडीची काही कृत्ये केली व पोर्तुगीज सरकारला त्रास दिला. त्या संघटनेच्या पराक्रमाचे प्रसंग पुढे वर्णिले जाणार आहेत. त्या संघटनेच्या सात सदस्यांना गोवा विमोचनाच्या लढ्यात हौतात्म्य मिळाले. यात १)बाळकृष्ण भोसले, २)कामिलु पैरैरा, ३)सुरेश केरकर, ४)विनायक सप्ते, ५)रघुनाथ शिरोडकर, ६)सोमा मळीक, आणि, ७)अमृत चोडणकर यांच्या बलिदानामुळे गोवा मुक्तीच्या लढ्याला बळ मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com