Marathi Konkani Language Debate: मराठी आणि कोंकणीच्या संघर्षातून भाजपचा राजकीय उदय

Goa Language Politics: एप्रिल १९८० मध्ये स्थापन झालेला भाजप नवीन मुद्यांच्या शोधात होता.
Goa Language Politics
Marathi Konkani Language DebateDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. नाऊ वरक

एप्रिल १९८० मध्ये स्थापन झालेला भाजप नवीन मुद्यांच्या शोधात होता. जनसंघाच्या कालखंडातील राष्ट्रीय पातळीवरील राजकारण असफल झाल्यानंतर भाजप प्रादेशिकतेकडे वळू लागला. भाजपच्या वैचारिकतेला मराठीची पार्श्वभूमी असली तरी राजकीय यशासाठी कोकणीचे पाठबळ महत्वाचे आहे, हे मनोहर पर्रीकरांनी हेरले.

राज्यांची भाषावार पुनर्रचना व्हावी यासाठी ५० ते ६० च्या दशकांत भाषिक चळवळी झाल्या. गोवा मुक्तीनंतर राष्ट्रवाद, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो) आणि मराठी असे समीकरण उदयास आले. बहुजन समाज ही अस्मिता या काळात उदयास आली तरी मराठीमुळे तिला व्यापक विचारसरणीचे स्वरूप मिळाले नाही. मराठी भाषा सामाजिक चिकित्सेत मागे पडली. समाजात चिकित्सक विमर्श (क्रिटिकल डिस्कोर्स) निर्माण करण्यासाठी भाषा महत्वाची असते.

Goa Language Politics
Goa Opinion: निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी 'आश्वासने' दिली जातात, नंतर त्या आश्वासनांची 'पूर्तता' कितपत होते?

गोव्यात भाषांचा उपयोग सरकारे स्थापन करण्यासाठी झाल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षात भाजपने कोंकणी भाषा समर्थकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. पोर्तुगीज गोव्यात मराठी ही सुधारणावाद तसेच राष्ट्रवादाची भाषा होती. मुक्तीनंतर राजकीय कारणांमुळे मराठी राष्ट्रवादाचे माध्यम झाले. ज्यावेळी भाषाच विचारसरणीचे रूप धारण करते, तेव्हा भाषिक चिकित्सकतेचा विकास खुंटतो. कोंकणी हि मराठीची बोली नसून ती स्वतंत्र भाषा आहे, हि मागणी गोव्यातील भाषिक चिकित्सकतेचा महत्वाचा टप्पा होता.

भाषा आणि बोली यांना चिकटलेली उच्च-नीचता म्हणजेच डीग्लोसियामुळे मराठी व कोंकणीमध्ये चढाओढ निर्माण झाली. यातूनच मराठी व कोकणीला विचारसरणी मानणारे कंपू तयार झाले. राजकीय नेते पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाषावादाचा आधार घेऊ लागले. १९७५ मध्ये साहित्य अकादमीने कोकणीला अधिकृत मान्यता दिली. मराठीला विचारसरणी मानणाऱ्या मुख्यमंत्री शशिकला काकोडकरही १९७५ नंतर अधूनमधून कोकणीची बाजू घेऊ लागल्या.

Goa Language Politics
Goa Opinion: ‘प्रभु व्हायोलेटा’ प्रकरणातून निर्माण झालेले नवे प्रश्न

१९८० च्या निवडणुकीपासून भाषा हे मतदार संघटित करण्याचे प्रमुख माध्यम झाले. मराठीचे समर्थक प्रतापसिंग राणेही कोकणीच्या विकासावर भाष्य करू लागले. १९८६च्या हिंसक भाषा आंदोलनानंतर सरकारवरील वाढता दबाव लक्षात घेऊन सभापती दयानंद नार्वेकर यांनी तातडीने विधानसभा अधिवेशन बोलावले. दोन दिवशीय अधिवेशनानंतर ४ फेब्रुवारी १९८७ रोजी कोकणीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. मुख्यमंत्री राणे यांनी सुवर्णमध्य साधत मराठी व इंग्रजीचाही गोवा, दमण आणि दीव भाषा अधिनियम, १९८७ मध्ये समावेश करून घेतला.

एप्रिल १९८० मध्ये स्थापन झालेला भाजप नवीन मुद्यांच्या शोधात होता. जनसंघाच्या कालखंडातील राष्ट्रीय पातळीवरील राजकारण असफल झाल्यानंतर भाजप प्रादेशिकतेकडे वळू लागला. भाजपच्या वैचारिकतेला मराठीची पार्श्वभूमी असली तरी राजकीय यशासाठी कोकणीचे पाठबळ महत्वाचे आहे, हे मनोहर पर्रीकरांनी हेरले. १९८६ च्या आंदोलनावेळी जरी भाजप मोठा पक्ष नसला तरी पर्रीकरांनी कोकणी राजभाषा व्हावी या मागणीला दुजोरा दिला होता. १९९० च्या विधानसभा निवडणुकीतनंतर भाजप मराठीवरची पकड मजबूत ठेवून कोकणीकडे झुकू लागला. १९९४ मध्ये मगो व भाजप यांची युती झाली.

Goa Language Politics
Opinion: 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मात्र चपखल नियोजन केल्याचे दिसते; राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मडकई, पणजी, मडगाव व वाळपई या चार महत्वाच्या जागा भाजपने जिंकल्या. मडकई मतदारसंघातून भाऊसाहेब बांदोडकरांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती, असा मतदारसंघ भाजपच्या श्रीपाद नाईक यांनी जिंकला. मराठी मतदार आपल्या पाठीशी उभा राहणार, अशी भाजपला खात्री झाली. तसेच कोकणी राजभाषा आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेला मडगाव मतदारसंघ भाजपच्या दिगंबर कामत यांनी जिंकला. या दोन मतदारसंघातील यशामुळे भाजपला राजकीय यशाची चाहूल लागली.

१९९९ मध्ये भाजपने १० मतदारसंघ जिंकले. सत्ता स्थापन करायची असेल तर कोकणी समर्थकांचे प्राबल्य असलेले मतदारसंघ काबीज केल्याशिवाय गत्यंतर नाही हे पर्रीकर यांनी जाणले. २००२ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर पर्रीकर यांनी कोंकणीची अस्मिता जागे करणारे वामन रघुनाथ शेणॉय वर्दे वालावलीकर यांची १२५वी जयंती साजरी केली. २००२ वर्ष ‘अस्मिताय वर्स’ म्हणून घोषित केले. २००५ मध्ये सत्ता हातून निसटल्यानंतर पर्रीकर यांनी गोव्याच्या अस्मितेचे मुद्दे लावून धरले.

Goa Language Politics
अग्रलेख: एका दिवसात 5 ठिकाणी आंदोलने होणे हा योगायोग नाही! उभयतांनी संवादच टाळला तर प्रश्‍न सुटायचे कसे?

पर्रीकर भाजपच्या राष्ट्रीयतेपेक्षा प्रादेशिकतेचेच नायक झाले होते. ख्रिस्ती मतदारांनाही रोमी कोंकणीच्या विकासाची मागणी करण्यास प्रवृत्त केले. याच दबावातून २००९ मध्ये मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मडगाव येथे तियात्र कलाकारांसाठी तियात्र अकादमी सुरु केली. अशाप्रकारे पर्रीकरांनी कोंकणीलाही मराठीच्या रांगेत आणून बसवले. मराठी व कोकणीच्या तात्विक जाणिवा एकसंध केल्या.

प्रमोद सावंत यांनीही पर्रीकरांच्या पावलावर पाऊल टाकत आपला रोख कोकणीकडे वळविला. ‘मराठा’ ही अस्मिता कोकणी भाषेत लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला. सर्व तालुक्यांत शिवराज्याभिषेक साजरा करण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनपीठ स्थापन केले. शिवाजी महाराजांवर कोकणी भाषेतील चित्रपटाची निर्मिती केली. ठिकठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्यात आले.

Goa Language Politics
Opinion: 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मात्र चपखल नियोजन केल्याचे दिसते; राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

शिवाजी महाराजांविषयीच्या कार्यक्रमात मराठीत न बोलता कोकणीत भाषण देणे पत्करले. शिवाजी महाराजांचे कोकणीतील प्रस्तुतीकरण सावंत यांना राजकीयदृष्ट्या फायद्याचे ठरले. तसेच गोवा विद्यापीठातील भाषांच्या अध्यापन केंद्रांना शणै गोंयबाब हे नाव दिले. कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांसाठी कोकणी सक्तीची केली. मराठीप्रमाणे कोकणीही आता राजकीय छत्रछायेखाली आली आहे. भाषेला पंख असतात. तिला राजकीय विचारसरणीच्या नैतिकतेत बंदिस्त केल्यास तिच्या पंखातील बळ नाहीसे होईल. शब्दांना मनसोक्त उडू द्या. बागडू द्या. भाषा ही राजकीय विचारधारेशी बांधील नसते. भाषा मुक्त असेल तरच क्रिटिकल डिस्कोर्स निर्माण होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com