Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

अग्रलेख: गोव्याच्या किनाऱ्यांवर वरवर 'निळा समुद्र' दिसतो; परंतु त्याखाली 'नशेचे काळे पाणी' खदखदत आहे..

Drug Crime In Goa: गोमंतभूमीवरील समुद्रकिनाऱ्यांची वाळू सोनेरी आहे. समुद्र निळा आहे; मात्र या सौंदर्याच्या आड एक भयावह अंधार वेगाने पसरत आहे.
Published on

गोमंतभूमीवरील समुद्रकिनाऱ्यांची वाळू सोनेरी आहे. समुद्र निळा आहे; मात्र या सौंदर्याच्या आड एक भयावह अंधार वेगाने पसरत आहे. गोवा आज निसर्गसौंदर्यामुळे नव्हे तर सडलेल्या व्यवस्थेमुळे चर्चेत आहे.

सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) होणाऱ्या जप्त्या, गूढरीत्या झालेले परदेशी युवतींचे मृत्यू आणि बिनधास्तपणे फोफावलेल्या रेव्ह पार्ट्या या काही तुरळक घटना नाहीत.

हे अपघात नाहीत; हा उघड गुन्हेगारीचा तमाशा आहे, जो गोव्यात निर्लज्जपणे सुरू आहे. गोव्याच्या किनाऱ्यांवर वरवर निळा समुद्र दिसतो; परंतु त्याखाली नशेचे काळे पाणी खदखदत आहे. ‘रेव्ह पार्ट्या’ नावाच्या बेकायदेशीर धंद्याने तरुणाईला विळखा घातला आहे.

या पार्ट्या लपूनछपून होत नाहीत; त्या उघडपणे आयोजित केल्या जातात. हा केवळ कायद्याचा अवमान नाही; तो गोव्याच्या अस्तित्वावरचा थेट हल्ला आहे. मोरजी व हरमल येथे दोन रशियन महिलांचा निर्दयीपणे गळा चिरून खून करणारा रशियन संशयित आलेक्सेई याने आपण आणखी पंधरा खून केल्याचा दावा केला आहे,

ज्यामुळे गोवा हादरला आहे. जबानीप्रमाणे इतर खून कोठे व कधी केले, याची माहिती संशयिताला नेमकेपणाने पोलिसांना देता आलेली नाही. तो मनोरुग्ण असावा, असा कयास व्‍यक्‍त होत आहे; मात्र ते काहीही असले तरी पोलिसांना वास्तव समोर आणावेच लागेल.

अन्यथा गोव्याची प्रतिमा अधिकच डागाळेल. ज्याने दोन युवतींना यमसदनी धाडले, तो ‘ड्रग्ज ऍडिक्ट’ होता, अशी माहितीही समोर येत आहे. गुन्ह्याचे मूळ येथेच असेल!

योगायोग असा की, ही घटना उत्तर गोव्‍यातील किनाऱ्यावर उघड होत असतानाच बार्देश तालुक्यात ईडी व एनसीबीने छापे टाकून कोट्यवधी रुपये जप्त केले. त्याचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही; मात्र कारवाईत एनसीबी सहभागी असल्याने अमली पदार्थ व्यवहारातून ही माया जमली असावी, हे ओघाने आलेच.

आमच्या गोव्याला ड्रग्जने पोखरले आहे, कारण विद्यमान सरकारी यंत्रणेचा छुपा वरदहस्त दिसतो. शालेय शिक्षक, मनोविकार तज्ज्ञ, बांबोळीतील मानसोपचार व मानवी वर्तन संस्थेतील तज्ज्ञांचे अनुभव ऐकले, तर अमली पदार्थांचा विळखा ग्रामीण भागातही किती घट्ट झाला आहे, याची कल्पना येईल.

२०२५मध्ये राज्यात अमली पदार्थ प्रकरणांत सरासरी दर दुसऱ्या दिवशी एक व्यक्ती अटक करण्यात आली; त्यात परदेशी लोकांची संख्या लक्षणीय होतीच; स्थानिकही होते. कमी वेळेत प्रचंड पैसा मिळत असल्याने ती साखळी फोफावते. दुसरे एक असे- परदेशी नागरिक गोव्यात येताना कायदेशीर प्रक्रिया पाळतात का?

त्यांची उपजीविका कशी चालते? त्यांचे आचरण कसे असते, याचा यंत्रणांना मागमूसही नसतो. किनारपट्टी भागांत वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांच्‍या सखोल चौकशीसह अमली पदार्थ प्रकरणी कठोर कारवाईबरोबरच समुपदेशन, पुनर्वसन केंद्रे उभारणेही गरजेचे आहे.

अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचा मुद्दा सत्तरीतील होंडा ग्रामसभेत गांभीर्याने मांडण्यात आला. यावरूनच परिस्थितीची तीव्रता स्पष्ट होते. शितावरून भाताची परीक्षा करावी. गोवा ड्रग्स माफियांचे खेळाचे मैदान बनता नये. गोवा आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे कचराकुंडे नाही; तसेच ही अशी भूमीही नाही, जिथे मृतदेह ‘अपघात’ म्हणून झटकून टाकले जातील.

दुर्दैवाने आज जे सुरू आहे, ते नेमके हेच आहे. याला ‘पर्यटन’ म्हणणे म्हणजे गुन्ह्याला सुगंध लावण्यासारखे आहे. हे पर्यटन नाही; ही उघड कायदेहीनता आहे. ‘नाईटलाइफ’च्या चमकदार दिव्यांआड लपलेली गुंडगिरी आहे.

संस्कृतीच्या नावाखाली सुरू असलेली नैतिक लूट आहे. अजून किती तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होईपर्यंत आपण गप्प बसणार? किती जप्त्यांनंतर या रॅकेटचा मुळापासून नायनाट होणार? आता सौम्य भूमिका पुरे. दिखाऊ कारवाया नव्हे तर कठोर आणि निर्णायक कारवाई हवी.

Goa Crime News
Russian Killer Goa: 'तो' रशियन किलर राहिला होता गुहेत! अनेक राज्यात होते वास्तव्य; नेमके किती खून केले याचा तपास सुरु

राजकीय संरक्षणाखाली चालणारे ड्रग नेटवर्क उखडून फेकले पाहिजे. रेव्ह पार्ट्यांचे अड्डे सील केले पाहिजेत. आयोजक, पुरवठादार आणि संरक्षक तिघांनाही तुरुंगाची हवा दाखवली पाहिजे. वेळ आली आहे कठोर होण्याची, सत्य बोलण्याची, तडक कारवाईची.

राष्ट्रीय तपास यंत्रणांना जे यश गोव्यात मिळते, ते स्थानिक यंत्रणांना मिळत नाही, हा मुद्दाही फार महत्त्वाचा आहे. त्यामागची कारणे बाहेर येणेही गरजेचे आहे. गोव्याला पोखरणारी या वाळवीचा समूळ नाश करायचा असेल तर त्या पद्धतीची यंत्रणा उभारावी लागेल.

Goa Crime News
Arambol Crime: हरमल हादरले! हात बांधले, धारदार शस्त्राने केला मानेवर वार; खूनप्रकरणी संशयित रशियन आरोपीला अटक

एकाच वेळी अनेक स्तरांवर काम करावे लागेल. त्यासाठी लागणारी क्षमता गोव्यात नाही, असे अजिबात नाही. शक्ती आहे, पण इच्छा नाही. अनेकांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी ड्रग्जचा व्यापार फोफावू दिला जातोय. तो थांबवावाच लागेल. अन्यथा गोमंतकीयांची पुढची पिढीच बरबाद होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com