
गोवा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या इवलासा. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छाच; कारण भारताच्या इतर कोणत्याही प्रांतात सापडणार नाही एवढी सांस्कृतिक विविधता फक्त या छोट्याशा भूभागात आढळते.
येथील अनेकविध मानव वंशीयांची जीवनप्रणाली, साडेचारशे वर्षांचा काल परधर्मात काढल्यानंतरही जाती, आडनावासह पूर्वाश्रमींचे संस्कृतीघटक जोपासणारी. मूळ कुलदेवतेला अमृतपड देणारी म्हणून अभ्यासायची. कोणाला खरे वाटणार नाही, पण सांस्कृतिकदृष्ट्या गोवा चार भागांत विभागलेला आहे.
मांडवी व जुवारी या दोन नद्यांच्या मधला, उत्तर व दक्षिण हे तीन. यातील सत्तरी व काणकोण असे चार. सांगे तालुक्याचा काही भाग सत्तरीचा तर काही काणकोणात. तद्वत केपे तालुका साधारण अर्धा मध्य गोमंतकात तर उरलेला काणकोणात.
आतापर्यंत काणकोण दक्षिण गोव्यात हे मीच मानत होतो. परंतु अगदी अलीकडील ‘निवेल दिवजां’ हा प्रकार बघितल्यानंतरचे विचार मंथन; अलग मुद्रा लाभलेल्या बाळ्ळीतील ‘शिडियो’, रस्त्यालगतचा ‘घोड्या पायक’, बेंदुर्डे, गोकुळडे, मोरपिर्ला अशा गावातील लोकांचे जीवन व्यवहार, त्यांची विधी-विधाने यांचे पुनरावलोकन, पुनःशोधन, पुनश्चिंतन, पुनर्विचारानंतर ‘चार’ निष्कर्षापर्यंत यावे लागले.
शासकीय वा राजकीय सीमारेषा कधीही सांस्कृतिक-सीमारेषा ठरू शकत नाहीत. म्हणून संस्कृती समृद्ध. म्हणूनच येथील विविध नाममुद्रा धारण करणाऱ्या संस्कृतीतील गती-विधी, त्यातील प्रदूषण, पर्यावरण अभ्यासाचा अट्टहास.
अभ्यास दोन स्तरावरचा. पुस्तकी व बुद्धिप्रामाण्यता. विद्यमानकाली विशेषतः विद्यापीठ स्तरावर ग्रांथिक हाच खरा मानला जातो. दुर्दैवी सत्य आहे. पुस्तकात जे मिळते ते त्याचा संदर्भ म्हणून आहे तसा वापर; मतांतरे असली तर त्या सर्वांचा निर्देश करून ‘विषयाला सोयीस्कर’ , खरा वैयक्तिक स्तरावर हवा तो निष्कर्ष काढायचा.
वास्तविक अभ्यास चिंतन-मनन प्रक्रियेतून होणारा. ‘परिस्थितिजन्य पुरावा’ या न्यायसंस्थेने मान्य केलेल्या सूत्रानुसार. पुनः तो प्रांत-धर्म-जाती अभिनिवेशरहित आणि तर्कशुद्ध विचारसरणीतून गाळून घेतलेला असा नसेल तर ते सांस्कृतिक प्रदूषणाला निमंत्रण ठरावे. कैकपैकी एक उदाहरण, गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सदैव संदर्भग्रंथ म्हणून घेतला जातो तो, स्कंद पुराणांतर्गत ‘सह्याद्रिखंड’ हा पं. गायतोंडे शास्त्री यांनी संपादित केलेला ग्रंथ.
आनीता भार्गवेणैते शांतादुर्गा च म्हाळसा| परशुरामाने ‘शांतादुर्गा’ हे दैवत गोव्यात आणले हे सांगणारे एकच उदाहरण पुरेसे आहे. वस्तुतः पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेले केळशीचे मंदिर सातेरीचे. मंदिरे-दैवते यावर संशोधन करणाऱ्यांनी कवळ्याची शांतादुर्गा; इ.स. १८६५पर्यंत सांतेर होती ‘पुण्यभूमी गोमंतक’ या पुस्तकात असे नमूद आहे.
‘सह्याद्रीखंड हा ग्रंथ ऐतिहासिक पुराव्यांसाठी विश्वासार्ह संदर्भ ग्रंथ, पुरावा म्हणून यासाठी वापरता येईल का?’ विद्यापीठातील नामवंत प्राध्यापक, संशोधकांनी माझ्या वरील प्रश्नाला त्वरित दिलेले उत्तर ‘नाही’ असे आहे. दुसरीकडे ‘गोमंतक प्रकृती व संस्कृती’ हे बा. द. सातोस्कर यांचे खंड. पुणे विद्यापीठाच्या एका चर्चासत्रात सातोस्कर यांचे मी संदर्भ म्हणून वापरले. यावर डॉ. ग. ह. खरे या नामवंत इतिहास संशोधकांनी तत्काल केलेला प्रश्न ‘कोण हे बा. द. सातोस्कर? इतिहास संशोधनात त्यांचे स्थान काय?’
हे कोणत्याही भाष्याविना. पीएच्डी प्रबंध नसल्याने स्थल, काल, साल नोंदी नाहीत. कृपया नोंद घ्यावी. या त्या विषयाचे जाणकार वा तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्यांची विधाने प्रदूषण फैलावणारी ठरतात. कारण विद्यार्थी संशोधक, अभ्यासक अशी विधाने खरी मानून संदर्भासाठी त्यांचा वापर करतात.
अशी काही विधाने:
१. गोव्यात कामत आडनावाचे फक्त सारस्वतात आहेत.
वस्तुस्थिती: कामत आडनावाचे वैश्य-वाणी वळवईत, देवळी पेडण्यात, गावडा कुंभारजुवेत, नवहिंदू व ख्रिस्ती गावड्यात कामत नावाची कुटुंबे मानकरी म्हणून कार्यरत आहेत. अवास्तव माहिती.
२. तिसवाडीतील ‘गवळी-मौळा’ने ओळखला जाणारा भाग; येथे गवळी जमात दुधा-तुपटाची विक्री करण्यासाठी बसत म्हणून हे नाव.
वस्तुस्थिती: वस्तुतः या भागात व आसपाची प्रमुख वस्ती गावडा समाज. काल-परवापर्यंत जमातीत ‘खुंटी चाय’ दुधाचा वापर नव्हता. तूप-लोणी, दही हे शब्दही विसाव्या शतकातसुद्धा त्यांना माहीत नव्हते. गावडे वांशिकदृष्ट्या पशुपालक नाहीत. हा वस्तुस्थितीचा विपर्यास, याला प्रदूषण म्हणावयाचे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.