
किशोर पेटकर
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) यावेळच्या निवडणुकीवर लक्ष टाकता, मतदार असलेल्या १०७ क्लबांनी शहाणपण शिकवले असेच म्हणता येईल. मतदारांना गृहीत धरणे, सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसांचा धाक, सूडभावना, स्टेडियमबाबत पोकळ घोषणा, अनुभवी नेतृत्वाची वानवा या बाबी क्लबांना आवडल्या नाहीत, त्यांनी संबंधित गोष्टी खूपच गांभीर्याने घेतल्याचे जाणवले.
परिणामी तीन-साडेतीन दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चेतन देसाई-विनोद (बाळू) फडके या माजी अध्यक्षांच्या गटाला क्लबांनी भरभरून यश मिळवून दिले. ६-० असा एकतर्फी निकाल अपेक्षित नव्हता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संयुक्त सचिव रोहन गावस देसाई यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याचे संकेत आहेत, पण त्यांचे समर्थन असलेला ‘जीसीए परिवर्तन’ गट चमत्कार घडवू शकला नाही.
क्रिकेट प्रशासनात रोहन यांच्यापाशी तीन वर्षांचाच अनुभव आहे, राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या रोहन यांना भविष्यात भरपूर काम करावे लागेल हे निकालाने स्पष्ट झाले. या गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार महेश कांदोळकर यांना शेवटपर्यंत आपण बुद्धिबळ संघटनेत राहावे की क्रिकेटसाठी वाहून घ्यावे याचे उत्तर देता आले नाही, त्यातच त्यांची जीभ घसरली.
आपला गट निवडणून आल्यानंतर एकत्र राहणार का याची शाश्वती नसल्याचे ते म्हणाले. क्लबांनी त्यांचे हे वक्तव्य खूपच गांभीर्याने घेतले आणि पुन्हा एकत्र आलेल्या चेतन-बाळू यांना झुकते माप दिले, त्यामुळे राजेश पाटणेकर यांना माजी सभापती असूनही उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकता आली नाही.
परिवर्तन गटाचे सचिवपदाचे उमेदवार दया पागी व खजिनदारपदाचे उमेदवार रुपेश नाईक यांच्याकडे एकही क्लब नव्हता, तरीही ते क्लबांकडे मत मागण्यास गेले. त्याऐवजी क्लबांचे पाठबळ असलेल्या उमेदवारास घेतले असते, तर निश्चितच पश्चाताप करण्याची वेळ आली नसती. केवळ आश्वासने नकोत, प्रत्यक्ष कृती हवी हे सुद्धा क्लबांनी दाखवून दिले.
वेगवेगळी वाट चोखळल्यास पराभव निश्चित आहे हे जाणून चेतन देसाई यांनी साधारणतः सहा महिन्यांपूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. २०२२ मध्ये चेतन व बाळू यांच्या दिशा भिन्न होत्या. तेव्हा त्यांच्या गटात अतिशय चुरशीची लढत झाली होती. यावेळेस त्यांनी बाळू यांच्याशी हातमिळवणी केली. त्यांच्यापाशी क्लबांचे चांगले सामर्थ्य आहे. सहा वर्षांत सचिव व अध्यक्ष म्हणून बाळू यांचे पूत्र विपुल फडके यांची कारकीर्द अतिशय स्वच्छ कारभार केला.
चेतन यांनी बंधू महेश यांना अध्यक्षपदासाठी पुढे केले. बाळू यांनी आपल्या कुटुंबातील कोणाला न घेता समर्थक तुळशीदास शेट्ये यांना सचिवपदासाठी पसंती दिली. त्याचवेळी अकबर मुल्ला व माजी अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी केलेली पाठराखणही चेतन-बाळू गटासाठी निर्णायक ठरली. सूरज यांनी धारगळ येथे स्टेडियमसाठी आपल्या अध्यक्षपदात बहुतांश कागदोपत्री कामे पूर्ण केलेली आहेत, हे क्लब जाणून आहेत. त्यामुळे वन-म्हावळिंगे येथे स्टेडियम नेण्याचे परिवर्तन गटाचे ठाम धोरण क्लबांना पचनी पडले नाही.
चेतन यांचा जनसंपर्क, तसेच त्यांनी जीसीए निवडणूक तोंडावर असताना काणकोणमधील कार्यक्रमासाठी ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरला निमंत्रित करणे मास्टस्ट्रोक ठरल्याचे मानता येते. खरं म्हणजे ही निवडणूक २४ ऑगस्टला होणार होती, पण दुसऱ्या गटाने न्यायायलीन लढाईनंतर १६ सप्टेंबरपर्यंत वाढविली, परंतु त्याने परिवर्तन गटाचेच नुकसान झाले. उलट चेतन-बाळू यांना क्लबसंपर्क वाढविण्यात आणखी वेळ मिळाला हे दुसऱ्या गटाच्या लक्षात आले नाही. चेतन-बाळू गटाने जीसीए निवडणूक ६-० फरकाने एकतर्फी जिंकली आणि त्यानंतर पर्वरी येथील जीसीएच्या कर्मचाऱ्यांनी केलेला एकच जल्लोष खूपच बोलका ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.