Goa Politics: गोव्यात विरोधकांच्या युतीला 'लुईझिन इफेक्ट'चा धोका? 2027 ची पुनरावृत्ती टाळण्याचे काँग्रेससमोर आव्हान

Goa Assembly Elections 2027: सिल्वा आणि नोरोन्हा यांना आदिवासी नेतृत्व घोषित करून भाजपने त्यांचे पक्षात स्वागत केले. सिल्वा यांच्या पावलावर पाऊल ठेवत लुईझिन फालेरो यांनीही काँग्रेस सोडला.
Goa Assembly Elections 2027
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डॉ. नाऊ वरक

सिल्वा आणि नोरोन्हा यांना आदिवासी नेतृत्व घोषित करून भाजपने त्यांचे पक्षात स्वागत केले. सिल्वा यांच्या पावलावर पाऊल ठेवत लुईझिन फालेरो यांनीही काँग्रेस सोडला. विधानसभा निवडणूक २०१७ मधील अपयशानंतर पायउतार झालेल्या फालेरो यांना पुन्हा एकदा गोवा काँग्रेसचे अध्यक्ष व्हायचे होते. गिरीश चोडणकर यांचे नेतृत्व त्यांना मान्य नव्हते.

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व रिव्हॉलुशनरी गोवन्स पक्षामधील युतीस अखेर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल असे दिसते. विजय सरदेसाई युतीसाठी उत्सुक आहेत. ऑगस्ट महिन्यापासून सुरू असलेली युतीची बोलणी डिसेंबर महिना आला तरी पूर्णत्वास आली नाही. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जसा काँग्रेस व गोवा फॉरवर्ड मध्ये युतीचा लपंडाव सुरू होता, तशीच काहीशी परिस्थिती २०२६ मध्येही दिसत आहे.

Goa Assembly Elections 2027
Goa Politics: बहुजन मतांचे राजकीय गणित, पण सत्तेतील वाटा किती? गोव्यातील पंधरा वर्षांचा आढावा

सरदेसाई २०१७ मध्येही काँग्रेसबरोबर युतीसाठी तयार होते. गोवा काँग्रेसचे तत्कालीन प्रभारी दिग्विजय सिंग यांनीही सुरुवातीस या संभाव्य युतीचे स्वागत केले. मात्र निवडणुकीस १३ दिवस शिल्लक असताना दोन्ही पक्षांमधील जागावाटपावर तोडगा निघाला नाही. काँग्रेसने ३७ जागा लढण्याचे जाहीर केले व उरलेल्या तीन जागांवर इतर उमेदवारांना पाठिंबा देण्याचे ठरविले. फातोर्ड्याच्या तिकिटाबद्दल गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष लुईझिन फालेरो आणि दिग्विजय सिंग यांच्यामध्ये मतभेद होते. दिग्विजय हे सरदेसाई यांच्याबाजूने असल्याचे जाणवत होते तर फालेरो यांना फातोर्डा काँग्रेसचे अध्यक्ष जोसेफ सिल्वा यांना तिकिट द्यायचे होते. काँग्रेस पक्षात शेवटच्या क्षणी झालेल्या खलबतांतून अखेर फातोर्ड्यातून सिल्वा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. सिल्वा यांनी गोवा विकास पक्षाचे सदस्यत्व घेऊन फातोर्डा मतदारसंघ लढण्याच्या हेतूने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सिल्वा यांना तातडीने काँग्रेसचे सदस्य करण्यात आले व उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला.

४ फेब्रुवारी, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत सरदेसाई यांना १०५१६ मते मिळाली. सिल्वा यांना भाजप व आप नंतर चौथ्या स्थानावर १४१४ मते मिळाली. २०१२ मध्ये फातोर्डा मतदारसंघातून सरदेसाई यांना काँग्रेसने तिकीट न दिल्याने सिल्वा यांनी काँग्रेसच्या या निर्णयाला विरोध दर्शविला होता. सुमारे २४०० सदस्यांनी काँग्रेसच्या या निर्णयाविरोधात सदस्यत्वाचा त्याग केला होता. २०१६ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष फालेरो यांनी फातोर्डा काँग्रेस समितीची पुनर्बांधणी हाती घेतली. जोसेफ सिल्वा यांना या पुनर्गठीत समितीचे अध्यक्ष करण्यात आले. सिल्वा व सरदेसाईंमध्ये तेढ निर्माण झाले. तेव्हापासून सरदेसाई आणि गोवा काँग्रेसमधील वितृष्ट वाढल्याचे दिसून येते.

एप्रिल २०२१ मध्ये मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांची युती झाली. २५ पैकी १७ जागा जिंकून भाजपचा पराभव केला. फॉरवर्ड आणि काँग्रेसच्या युतीमुळे संतंप्त झालेल्या सिल्वा आणि तत्कालीन फातोर्डा काँग्रेसचे अध्यक्ष पियादाद नोरोन्हा यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपची वाट धरली. सिल्वा आणि नोरोन्हा यांना आदिवासी नेतृत्व घोषित करून भाजपने त्यांचे पक्षात स्वागत केले. सिल्वा यांच्या पावलावर पाऊल ठेवत लुईझिन फालेरो यांनीही काँग्रेस सोडला. विधानसभा निवडणूक २०१७ मधील अपयशानंतर पायउतार झालेल्या फालेरो यांना पुन्हा एकदा गोवा काँग्रेसचे अध्यक्ष व्हायचे होते. गिरीश चोडणकर यांचे नेतृत्व त्यांना मान्य नव्हते.

देशभरातील काँग्रेसमधील फूट अधोरेखित करून ममता बॅनर्जींचेच नेतृत्व नरेंद्र मोदींशी लढू शकते, अशी हमी ठोकत त्यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पश्चिम बंगालवरून तृणमूलच्या उमेदवारीवरून फालेरो राज्यसभेत पोहोचले. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसच्या एकत्रीकरणाची मागणी करणाऱ्या फालेरोंमुळे गोवा काँग्रेस विखुरत होता. २०२२ मध्ये सरदेसाई यांच्या विरोधात फातोर्डा येथून लढण्यास फालेरो इच्छुक होते, मात्र काही कारणास्तव पक्षाने त्यांची उमेदवारी मागे घेतली.

Goa Assembly Elections 2027
Goa Ujjwala Scheme: जनतेच्या सूचनांवर काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा; 'गोवा उज्ज्वला'च्या 70 कोटींवर सवाल

२०२२ मधील काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमधील युतीचा घटनाक्रम पाहिल्यास २०२६ मध्ये वेगळी परिस्थिती नाही. ज्या युतीच्या बोलणीला जुलै २०२१ मध्ये सुरुवात झालेली त्या युतीची सार्वजनिक घोषणा व्हायला १८ डिसेंबर, २०२१चा दिवस उजाडला. २०२७ विधानसभा निवडणुकीच्या युतीची प्रक्रिया संथपणे सुरु आहे. २०१७ मध्ये युतीमध्ये फालेरो अडसर ठरत होते. जानेवारी २०२७ मध्येही तशीच परिस्थिती उद्भवू शकते का? हा प्रश्न आहे. यावेळी गोवा फॉरवर्डसह रिव्हॉलुशनरी गोवन्स पक्षाच्या सहभागामुळे युतीची प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची होत आहे. आरजीतील फुटीमुळे जागावाटपाचा तिढा सहजासहजी सुटेल, याची शक्यता कमी आहे. आरजीचे पक्षचिन्ह विरेश गट की मनोज गटाला मिळेल? यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.

भाजपने २०१९ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे चाळीशीच्या पूर्वार्धातील युरी आलेमाव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा होण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. येथेच युतीचे बंध कमकुवत होऊ शकतात. दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींना यावर आधीच विचार करावा लागेल. भाजपमध्येही २०२२ मध्ये सावंत आणि विश्वजित राणे यांच्यामध्ये चढाओढ पाहायला मिळाली. सत्तासंघर्षामध्ये राजकीय नेतृत्वाचा ‘करिष्मा’ महत्वाचा ठरतो. नेतृत्वाच्या प्रभावाची चाचणी केली जाते. या चाचणीत सावंत अव्वल ठरले. आत्ताही भाजप पक्षातील नेत्यांच्या करिष्म्याची धार तपासत आहे. काँग्रेसलाही युतीतील नेत्यांची अशीच चाचणी करून एक प्रभावी नेतृत्व लोकांसमोर आणावे लागेल. म्हणून युरींनी ''लुईझिन’ यांच्या भूमिकेत सरदेसाईंसमोर उभे ठाकणे काँग्रेसच्या हिताचे नाही. काँग्रेसला ‘लुईझिन इफेक्ट’ मधून बाहेर पडावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.