

ऑफ सिझनमध्ये कमी दरात मिळणारे चिकन विकत घेऊन सहा-सहा महिने ते साठवून ठेवून पर्यटन मोसम सुरू झाला की, तो माल बाहेर काढून चढ्या भावात विकणारे एक रॅकेट गोव्यात कार्यरत आहे, याची माहिती ‘एफडीए’ने वेर्णा येथे पकडलेल्या चिकन साठ्यामुळे उघड झाली आहे. पर्यटन मोसम तेजीत असताना गोव्यात दररोज १.६० लाख किलो ते २ लाख किलो चिकनची गरज भासते आणि गोव्यात होणारे उत्पादन दहा हजार किलोही नसते.
त्यामुळे प्रचंड प्रमाणात बाहेरच्या राज्यातून गोव्यात चिकनची आयात केली जाते. मात्र, या चिकनची वाहतूक व्यवस्थितपणे केली जाते का? गोव्यात येणारे चिकन खाण्यासाठी खरेच सुरक्षित असते का? हे चिकन सुरक्षित आहे की नाही हे तपासण्याची राज्यात सक्षम यंत्रणा आहे का? आणि या सर्व त्रुटींचा फायदा उठवित असुरक्षित चिकन ग्राहकांच्या गळ्यात बांधण्याचे रॅकेट चालविणाऱ्यांवर याेग्य ती कारवाई होते का? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले असून या सर्व प्रश्नांची उत्तरे शाेधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.
९० टक्के चिकन बाहेरच्या राज्यातील
गोव्यात दर दिवशी ८० हजार कोंबड्यांची मागणी असते. प्रत्येक कोंबडी दीड किलोची पकडल्यास दर दिवसाची एकूण मागणी १.६० लाख किलो एवढी होते. पर्यटन मोसमात ही मागणी दोन लाख किलोपर्यंत जाते. यातील दोन ते तीन टक्के उत्पादन गोव्यात होते. त्यामुळे गोवा संपूर्णत: बाहेरून येणाऱ्या चिकनवर अवलंबून असताे.
गोव्यात उपलब्ध होणारे चिकन आणि बाहेरून येणारे चिकन यांच्या दरात मोठा फरक असतो. गोव्याच्या पोल्ट्री उत्पादकांकडून मिळणाऱ्या चिकनची किंमत किलोमागे ३४० रुपयांच्या आसपास असते. मात्र, बाहेरील राज्यातून येणारे चिकन २५० ते २७० रुपये किलो या दराने उपलब्ध असते. त्यामुळे व्यावसायिक या बाहेरच्या चिकनला जास्त पसंती देतात.
गोवा पोल्ट्री उत्पादन व विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रिस्को सिक्वेरा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ९० च्या दशकात गोव्यात बर्यापैकी पोल्ट्री उत्पादन केले जायचे. ९० च्या आसपास गोव्यात ८०० च्या संख्येत पोल्ट्री फार्मस् होती. मात्र बाहेरून येणाऱ्या चिकनच्या दराशी गोव्याचे उत्पादक मेळ घालू शकत नसल्यामुळे हे फार्मस् हळू हळू बंद होऊ लागले. सध्या गोव्यात सात ते आठ पोल्ट्री फार्म उपलब्ध आहेत.
दिल्ली टू गोवा...
गोव्यात बाहेरच्या राज्यातून दोनप्रकारे चिकनची वाहतूक केली जाते. त्यातला एक प्रकार जीवंत कोंबड्या आणण्याचा असून या कोंबड्या शेजारच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून गोव्यात येत असतात. या कोंबड्या पिंजरा असलेल्या गाडीतून आणल्या जातात.
दुसरा प्रकार फ्रोजन चिकन आणि फ्रेश चिल्ड (फ्रोजन प्रक्रिया न करता) चिकनचा असतो. यात काेंबड्या न आणता फक्त कोंबड्याचे मास आणले जाते. वास्तविक असे चिकन आणायचे असल्यास ते फ्रिजर असलेल्या गाडीतून उणे १६ या तापमानातून आणावे लागते. मात्र ही कुठलीही प्रक्रिया न करता हे मांस एक तर थर्मोकोल बॉक्समध्ये पॅक करून रेल्वेतून वा प्लास्टिक पिशव्यांतून कर्नाटक व महाराष्ट्रातून आणले जाते. दिल्लीतून येणारे चिकन गोव्यात पोहचण्यास ३६ ते ४० तास लागतात तर महाराष्ट्र व कर्नाटकातून चिकन ७ ते १० तासांत पोचते.
दिल्ली हा चिकनचा मोठा बाजार असून उत्तर भारतातील सर्व राज्यातील कोंबड्या दिल्लीला लिलावात विकण्यासाठी आणतात. यातील चांगल्या कोंबड्या चढ्या भावात विकल्यानंतर वाहतुकीदरम्यान मेेलेल्या व पाय आणि पंख मोडलेल्या कोंबड्यांचा पुन्हा लिलाव केला जातो. या कोंबड्या एक चतुर्थांश भावाने विकल्या जातात. दिल्लीतील काही व्यावसायिक त्या साफ करून गोवा व अन्य राज्यात पाठवितात त्याची किंमत अगदीच कमी असते.
चिकन वाहतुकी चे नियम
चिकन किंवा तत्सम पदार्थांची वाहतूक स्वच्छ आणि बंदिस्त प्रकारे करणे आवश्यक असून यासाठी सोयीस्कर असलेल्या वाहनांचा (फ्रिजिंग यंत्रणा असलेल्या) वापर करणे आवश्यक असते.
संपूर्ण वाहतुकीच्या दरम्यान तापमान सांभाळणे गरजेचे.
वाहतूक करणारी प्रत्येक बॅग ही फूड ग्रेड पॅकेजिंगची असणे आवश्यक आहे.
वाहतूक केलेल्या मालाची उत्पादक आणि वितरक यांची सर्व माहिती लिखीत स्वरुपात असणे आवश्यक असून या मालावर व्यवस्थित पॅकेज माहिती असणे आवश्यक आहे.
ई कोलाय आणि साल्मोनेला बॅक्टेरिया
१ गोवा सरकारच्या पोल्ट्री उत्पादन महामंडळाचे मुख्याधिकारी असलेले डॉ. राजेश केणी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, व्यवस्थितरीत्या प्रक्रिया न करता आणलेल्या चिकनमध्ये पुरेशी स्वच्छता न बाळगल्यामुळे ‘ई कोलाय’ आणि ‘साल्मोनेला टायफी’ सारखे घातक बॅक्टेरिया तयार होतात.
२ ई कोलाय बॅक्टेरिया : घाण पाणी व गलिच्छपणे चिकन हाताळल्यामुळे त्यावर ‘ई काेलाय’ बॅक्टेरिया तयार होतात, ती जनावरांच्या पोटात घर करतात. ही बॅक्टेरिया मानवी शरीरात गेली तर हगवण वा जुलाब होऊ शकतो.
३ ‘साल्मोनेला टायफी’ बॅक्टेरिया जेवण व दूषित पाण्यातून पसरते. परराज्यातून येणारे चिकन घाण पाण्यात धुतल्याने त्यावर अशी बॅक्टेरिया तयार होते. दिल्ली मंडीतून गाेव्यात येणारे चिकन अशा घाण पाण्याने धुतले जाते.
कसे ओळखाल चांगले आणि वाईट चिकन?
चांगले आणि वाईट चिकन सहसा ओळखता येणे कठीण असले तरी ताज्या कापलेल्या कोंबड्यांचे मांस फिकट गुलाबी रंगाचे असते तर मेलेल्या कोंबडीचे मांस अधिक लाल भडक असते
चांगले चिकन विकत घ्यायचे असेल आपल्या खात्रीच्या विक्रेत्यांकडूनच ते घ्यावे. हे विक्रेते ते चिकन कुठून आणतात त्याची चौकशी करावी. शक्यतो कोंबड्या स्वतःच्या नजरेसमोर कापून त्या विकत घ्याव्यात.
शोरमा खाता? मग जरा जपून...
दिल्ली आणि अन्य राज्यातून येणारे हे निकृष्ट दर्जाचे चिकन कुठे वापरले जाते अशी माहिती विचारली असता, काही व्यावसायिकांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर दिलेली माहिती धक्कादायक आहे. रस्त्याच्या बाजूला ठेले मांडून शोरमा आणि अन्य चिकनचे पदार्थ विकणार्या ठेल्यावर हे चिकन विकले जाते. त्यामुळेच अशा ठेल्यावर अत्यंत कमी दरात शोरमा आणि चिकन लेगपिस उपलब्ध असते.
एफडीएच्या एका अधिकार्याने दिलेल्या माहितीप्रमाणे हे असले निकृष्ट दर्जाचे चिकन फक्त रस्त्यावरील ठेल्यावरच नव्हे तर कित्येक रेस्टाॅरंटमध्येही पुरविले जाते. यात काही तारांकित हॉटेल्सचाही समावेश आहे. या व्यवसायात पुरवठादार, वाहतूकदार, वितरक आणि हॉटेल व्यावसायिक अशी ही साखळी असते.
राज्यात अवैध आणि अस्वच्छ चिकन वाहतुकीविराेधात आरोग्य आणि औषध प्रशासन खात्याला अत्यंत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. परवाना किंवा कोणतीही वैध कागदपत्रे नसताना राज्यात मास आणणार्यांवर पोलिसांच्या मदतीने थेट गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. अशा व्यावसायिकांना अटक करण्यासारखी कठोर कारवाई केली जाणार आहे. अशाप्रकारचे निकृष्ट दर्जाचे चिकन खरेदी करणार्या हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टचे अन्नपरवाने तत्काळ रद्द केले जातील. लोकांच्या आरोग्याशी केले जाणारे खेळ यापुढे चालवून घेतले जाणार नाहीत.
- विश्वजीत राणे, एफडीए खात्याचे मंत्री.
अवैध व अस्वच्छ प्रकारे वाहतूक करून आणल्या जाणाऱ्या चिकन विराेधात एफडीएने कठोर कारवाई सुरू केली असून गेल्या दोन महिन्यांत सुमारे ६ हजार किलो निकृष्ट दर्जाचे चिकन जप्त करुन आम्ही नष्ट केले आहे. अशा वाहतुकीवर आणि विक्रीवर निर्बंध यावेत यासाठी एफडीएचे अधिकारी सतर्क रहाणार आहेत. आम्हाला जर अशा व्यवहाराची माहिती मिळाली तर बिगर कार्यालयीन वेळेतही आमचे अधिकारी घटनास्थळावर जाऊन कारवाई करतील.
- श्वेता देसाई, एफडीएच्या संचालक.
गोवा हे पर्यटन राज्य असून निकृष्ट दर्जाचे चिकन राज्यात आणून पर्यटकांच्या तसेच स्थानिकांच्या जीवाशी खेळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे अशा व्यवहारावर नियंत्रण यावे यासाठी सरकारला आम्ही कित्येक सूचना केल्या आहेत. त्यातील महत्वाची सूचना म्हणजे, राज्यात येणाऱ्या चिकनचा दर्जा तपासण्यासाठी राज्याच्या दोन्ही सीमांवर तत्काळ तपासणी प्रयोग शाळा सुरू कराव्यात आणि चिकन विक्रीचा अवैध व्यवसाय नियंत्रणात आणण्यासाठी हा सर्व व्यवसाय गोवा पोल्ट्री महामंडळाच्या अखत्यारित आणावा अशी सूचना आम्ही केली आहे.
- प्रिस्काे सिक्वेरा, गोवा पोल्ट्री उत्पादन विक्री संघटनेचे अध्यक्ष.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.