

मिलिंद म्हाडगुत
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडे जरी मुख्यमंत्री म्हणून भंडारी समाज बघत असला तरी ते आधी निवडून यायला पाहिजेत, हे विसरता कामा नये आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप श्रेष्ठींच्या दरबारात आपले ‘गुड बुक्स’ तयार केल्यामुळे दामू निवडून आले तरी त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल का, याची शंकाच वाटते.
भंडारी समाजाच्या राजकीय अस्तित्वावर भाष्य करणारे दै. ‘गोमन्तक’मधील दोन भागांत प्रसिद्ध झालेले वृत्त खरोखर अंतर्मुख करायला लावणारे आहे. भंडारी समाज हा गोव्यातील सर्वात मोठा समाज. पण असे असूनही आतापर्यंत झालेल्या तेरा मुख्यमंत्र्यांत या समाजाच्या रवी नाईक या एकाच नेत्याचा समावेश असावा याचा काय अर्थ लावावा तेच कळत नाही. तसे पाहायला गेल्यास भंडारी समाजात रवी सारखेच सुभाष शिरोडकर, श्रीपाद नाईक यांच्यासारखे प्रदीर्घ राजकीय इनिंग खेळलेले व खेळत असलेले ‘टॉवरिंग इमेज’चे नेते आहेत. सुभाष शिरोडकर तर आठ वेळा निवडून आलेले आमदार. याबाबतीत माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंनंतर सुभाषभाऊंचा नंबर लागतो.
पण असे असूनही सुभाषभाऊ मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिले. माझ्या ‘गोमंतकीय राजकारणातले बदलते प्रवाह’ या पुस्तकात मी या गोष्टीचा आढावा घेतला आहे. जेव्हा मी या पुस्तकाची प्रत सुभाषभाऊंना द्यायला गेलो तेव्हा ते प्रकरण चाळल्यावर सुभाषभाऊंनी मला मुख्यमंत्री होण्याची इच्छाच नव्हती, अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर मी तुम्हाला नसेल पण हजारोंना तुम्हाला मुख्यमंत्री झालेले बघण्याची इच्छा होती त्याचे काय, असा प्रश्न विचारल्यावर ते गप्प बसले. वास्तविक सुभाष आणि रवी दोघांनी आपली आमदारपदाची कारकीर्द बरोबर म्हणजे १९८४ सालीच सुरू केली.
पण अवघ्या सात वर्षांतच रवी गोव्याचे मुख्यमंत्री बनले. सुभाष मात्र आमदार-मंत्रिपदाभोवतीच फिरत राहिले. आता ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांना इच्छा नव्हती म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीत, का त्यांना तशी संधी मिळाली नाही याचे नेमके उत्तर मिळणे कठीणच. दुसरे आमचे श्रीपाद नाईक. श्रीपाद भाऊ हे भाजपचे अगदी जुने कार्यकर्ते. जेव्हा राज्यात भाजप कोठेच नव्हता, तेव्हा दुर्भाटचे सरपंच असलेल्या श्रीपाद भाऊंना भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरताना मी बघितले आहे. पण तरीही मनोहर पर्रीकरांनी त्यांना ‘ओव्हरटेक’ केले. १९९४ साली भाजपच्या ज्या चार आमदारांचा विधानसभेत प्रथमच प्रवेश झाला, त्यात पर्रीकरही होते आणि श्रीपादभाऊ ही होते.
मात्र १९९९ साली श्रीपादभाऊंचा पराभव झाला आणि दहा आमदारांचे नेतृत्व करणारे पर्रीकर काँग्रेसच्या रवी नाईकांना हाताशी धरून मुख्यमंत्रीपद मिळवून मोकळे झाले. ही पर्रीकर हयात असतानाची गोष्ट. पण पर्रीकरांच्या निधनानंतरही श्रीपाद भाऊंना मुख्यमंत्रीपद का मिळू नये याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. याबाबतीत श्रीपाद भाऊंना विचारल्यावर त्यांनी पुढे पुढे करण्याचा माझा स्वभावच नाही असे मोघम उत्तर दिले होते. पण खरे तर भाजपचा सर्वात ज्येष्ठ नेता म्हणून श्रीपादभाऊंचा तो हक्कच होता, असे मला वाटते. आता या दोघा दिग्गज भंडारी नेत्यांची आत्मसंतुष्ट वृत्ती त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आड आली असाच निष्कर्ष यातून काढला जाऊ शकतो. रवी नाईकांची कथा जरा वेगळी होती.
रवीनी ‘मगो’ मधून काँग्रेसमध्ये उडी घेऊन मुख्यमंत्रिपद पटकावले होते. म्हणजे अक्षरशः झाड हलवून फळ मिळवले होते. पण त्यांच्यातली ही ‘धडाकेबाज’ वृत्ती २००० साली मात्र दिसली नाही. म्हणूनच तर अकरा आमदार घेऊन काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या रवीनी केवळ १० आमदार बरोबर असलेल्या व मंत्रिपदाचासुद्धा अनुभव नसलेल्या पर्रीकरांना मुख्यमंत्री होऊ दिले. यालाही आत्मसंतुष्टवृत्ती असेच म्हणावे लागेल. नंतर २००७ साली मात्र प्रदेशाध्यक्ष म्हणून लक्षणीय कामगिरी केलेल्या रवींना डावलून दिगंबर कामतांना मुख्यमंत्री करून काँग्रेस पक्षाने रवींवर पर्यायाने भंडारी समाजावर अन्याय केला आणि स्वतःच्या पायावरही कुऱ्हाड मारून घेतली.
म्हणूनच तर त्यानंतर ते आजपर्यंत काँग्रेस सत्तेवर येऊ शकलेली नाही. म्हणजे रवी जरी एकदा मुख्यमंत्री झाले असले तरी दोन वेळा त्यांचे मुख्यमंत्रिपद हुकले हेही तेवढेच खरे आहे. म्हणूनच तर भंडारी समाजाने शेवटपर्यंत रवींनाच आपला नेता मानला. त्यांच्या कार्यालयात होणारी राज्यातल्या भंडारी समाज बांधवांची गर्दी ही बाब अधोरेखित करायची. ही सर्व स्थिती पाहता २०२७ सालीही भंडारी समाजाचा नेता मुख्यमंत्री होईल, असे सध्या तरी वाटत नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडे जरी मुख्यमंत्री म्हणून भंडारी समाज बघत असला तरी ते आधी निवडून यायला पाहिजेत, हे विसरता कामा नये आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप श्रेष्ठींच्या दरबारात आपले ‘गुड बुक्स’ तयार केल्यामुळे दामू निवडून आले तरी त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल का, याची शंकाच वाटते. गेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ॲड. अमित पालेकर या भंडारी नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते. पण त्यांचा पराभव झाल्यामुळे ही घोषणा अधुरीच राहिली. हे पाहता भंडारी समाजाच्या नेत्यांची आत्मसंतुष्ट वृत्ती आणि आत्मसमर्पण करण्याची प्रवृत्ती यामुळे सर्वात मोठा समाज असूनही आतापर्यंत त्यांचा एकच मुख्यमंत्री होऊ शकला हीच वस्तुस्थिती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.