
मोणे-पैंगीण येथील एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले रमेश तवडकर यांनी स्वतःच्या ताकदीवर आजचे उच्च स्थान प्राप्त केले आहे. लहानपणापासून अत्यंत कष्टाचे काम करत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात ते यशस्वी ठरले. आज तवडकर हे अनेकांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत.
२७ जुलै १९६८ रोजी आमोणे येथील शेतकरी बोंबो आणि लक्ष्मी तवडकर यांच्या पोटी रमेश यांचा जन्म झाला. त्यांचे ते कनिष्ठ पुत्र होय.
आमोणे येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात प्राथमिक तर सुमारे ८ कि.मी. चालत जाऊन त्यांनी पैंगीण येथील श्रद्धानंद विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. काणकोण येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात १२ वीपर्यंत व त्यानंतर कुंकळ्ळी येथील एका महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण प्राप्त करून गोव्याबाहेर मिरज येथील अंबाबाई तालीम शाळेत शारीरिक शिक्षक पदाचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर काही वर्षे पैंगीण येथील एका माध्यमिक शाळेत शारीरिक शिक्षक म्हणून काम केले. त्याच काळात आदर्श युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी युवकांसाठी भरपूर योगदान दिले. गावडोंगरी, खोतिगाव या भागांत अनेक कार्यक्रम राबविले.
नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्ग प्रशिक्षणातून त्यांनी व्यक्तिमत्त्व विकास साध्य केला. २००२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरले. मात्र, ते त्यात यशस्वी झाले नाहीत. मात्र, २००५ साली झालेल्या पोटनिवडणुकीत पैंगीण मतदारसंघातून प्रथमच आमदार बनले. नंतर २००७ साली विधानसभा निवडणुकीत ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
२०११ साली बाळ्ळी येथे झालेल्या ‘उटा’ आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. मात्र, त्यानंतर या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्यात मंगेश आणि दिलीप या दोघा आदिवासी तरुणांनी बलिदान दिले. मात्र, त्यानंतर आदिवासी समाजाला खरा न्याय मिळाला. त्यानंतर २०१२ साली ते पुन्हा आमदार बनले.
दूरदृष्टी असलेले तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी आमदार तवडकर यांना आपल्या मंत्रिमंडळात कृषी, पशुसंवर्धन, क्रीडा व आदिवासी कल्याण ही महत्त्वाची दिली. या कार्यकाळात कृषी क्षेत्रात चांगले काम करत असल्याबद्दल केंद्र सरकारचा ‘कर्मण्ये पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
त्यांना प्राप्त झाला. क्रीडा मंत्री असताना त्यांनी लुसोफोनिया कॉमन वेल्थ गेम्सचे यशस्वी आयोजन करून अमीट छाप सोडली. आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री म्हणून काम करताना आदिवासींकरिता जन्मापासून मृत्यूपर्यंत आर्थिक बळकटी देणाऱ्या तब्बल २५ योजना राबवून या समाजाला गौरविले. दुग्धजन्य पदार्थ वाढविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या.
लोकोत्सवसारखा सांस्कृतिक कार्यक्रम राज्यातच नव्हे, तर देशभरात नाव मिळवून गेला. त्यानंतर काही कारणांमुळे त्यांना २०१७ साली अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवावी लागली; परंतु ते अयशस्वी ठरले. तरीही जिद्द व चिकाटीने कामे करून लोकसंपर्क व लोकोपयोगी कामे सुरूच ठेवली. भाजप प्रदेश नेतृत्वाकडून त्यांना सन्मानाने पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद प्राप्त झाले. बलराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व सुविधांनी युक्त निवासी शाळा सुरू तर केलीच, शिवाय मोखर्ड येथे बलराम डे केअर माध्यमिक शाळा, अर्धफोंड-पैंगीण येथे उच्च माध्यमिक विद्यालय, तसेच अन्य अवें, तळें याठिकाणी प्राथमिक विद्यालये सुरू केली.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत तवडकर पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. सरकारी योजनेअंतर्गत निराधार गरिबांना घरे बांधून देण्यात कागदोपत्री अडचणी येत असल्यामुळे बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘श्रमधाम संकल्पना’ कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून राबविण्याचे ठरविले.
निवडणूक प्रचारावेळी बड्डे येथील कमलाकर गावकर या निराधार व्यक्तीचे मोडकळीस आलेले घर कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे मदतीने श्रमदान करून अवघ्या २९ दिवसांत उभे केले. त्यानंतर श्रमधाम चॅरिटेबल ट्रस्टकरिता एक दिवस काम व एक रुपया देऊन समाजातील निराश, हताश व दु:खी लोकांकरिता मदत करण्याचे आवाहन केले.
ही श्रमधाम संकल्पना लोकांनी उचलून धरली. अर्धफोंड-पैंगीण येथील हरिश्चंद्र नाईक या कुटुंबीयांना दिलासा देत दुसरे घरसुद्धा विक्रमी वेळेत पूर्ण केले. पहिल्या टप्प्यात एकूण २० घरांच्या चाव्या प्रदान करण्यासाठी खुद्द लोकसभेचे सभापती उपस्थित राहिले. त्यांच्याकडून कौतुक व शाबासकीची थाप मिळवली.
त्यानंतर काणकोण, प्रियोळ, सांगे, धारबांदोडा येथील निराधारांसाठी दुसऱ्या टप्प्यात आणखी २० घरे बांधून प्रियोळ येथील एका सभागृहात आयोजित कार्यक्रमात चाव्या वितरीत केल्या. येथील कष्टकरी समाजातील लोकांना रोजगार मिळावा व पावसाळ्यातील रानभाज्यांचे महत्त्व पटवून देण्याकरता गेल्या दोन वर्षांपासून राज्यपातळीवर रान भाजी महोत्सव यशस्वीरित्या आयोजित केला जात आहे.
ग्रामीण संस्कृती, पारंपरिक खेळ, शेती-अवजारे, ग्रामीण अन्न संस्कृतीचे संवर्धन याकरता गेल्या २५ वर्षांपासून लोकोत्सव आयोजित केला जात आहे. याची व्याप्ती देश पातळीवर पोहोचली आहे.या त्यांच्या कार्यामुळेच अमेरिकास्थित एका विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी सन्मानाने बहाल केली.
‘श्रमधाम’ची व्याप्ती वाढत गोव्याबाहेर गेली. महाराष्ट्रातील सांगली व केरळ राज्यातही घरे उभारण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा सभापती ओम बिर्ला, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच अन्य महनीय व्यक्तींनी या योजनेचे वेळोवेळी कौतुक केले आहे. देश विदेशातून शाबासकी देणारे संदेश सतत येत आहेत.
या उपक्रमाला राज्यातील स्वयंपूर्ण मित्र, नोडल अधिकारी तसेच सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांकडून भरघोस पाठिंबा लाभत आहे.
काणकोण तालुक्यात डोंगराळ भाग व समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. मासेमारी उद्योगावर काही लोक अवलंबून आहेत. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हा येथील अर्थार्जनाचा मुख्य स्त्रोत आहे. पर्यटन उद्योग हा ही आता महत्त्वपूर्ण आधार बनत आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर लोकांची उपजीविका चालत आहे. काही निराधार लोकांना घर बांधणे किंवा दुरुस्त करणे शक्य होणार नाही, अशांना पक्के घर बांधून देण्याचा हा उपक्रम यशस्वी ठरत आहे.
‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ याच भावनेने श्रमदान करून घरे उभारणीला सुरुवात करून आतापर्यंत ७० निराधार लोकांना चाव्या वितरीत केल्या आहेत. जानेवारी २०२६ मध्ये एकाच दिवशी, एकाचवेळी, एका घरासाठी १०० श्रमधाम योद्धे याप्रमाणे १०० घरांना एकूण १० हजार श्रमधाम योद्धे सहभाग घेऊन काम करणार आहेत.
पणजी कला अकादमीमध्ये ३० निराधार लोकांना घराच्या चाव्या वितरण कार्यक्रमात चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक रमेश तवडकर यांनी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री दुर्गादास ऊईके यांच्या उपस्थितीत श्रमधाम योद्ध्यांचा गौरव केला. एकूणच श्रमधाम उपक्रमाची व्याप्ती वाढते आहे.
गोवा राज्यात कोणीही दु:खी, हताश, वंचित राहू नये. अन्न, वस्त्र व निवारा या त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या जाव्यात, हा उदात्त विचार मनात ठेवून श्रमधाम योजनेची मुहूर्तमेढ काणकोण मतदारसंघात रोवली गेली. कार्यकर्त्यांच्या कार्याला तोड नाही. त्यांच्याच बळावर आज बघता बघता ही योजना काणकोण मतदारसंघाची सीमा ओलांडून सांगे, केपे, धारबांदोडा, फोंडा, इतकेच नव्हे, तर महाराष्ट्र राज्यातील सांगली, केरळ राज्यातील वायनाडपर्यंत पोहोचली.
याचे श्रेय कार्यकर्त्यांसोबत, हितचिंतक, दानशूर व्यक्ती, स्नेही, श्रमधाम योद्धे या सर्वांना असल्याचे कला व संस्कृती, तसेच आदिवासी कल्याण, क्रीडा व युवा व्यवहार मंत्री रमेश तवडकर यांनी वेळोवेळी सांगितले आहे.
प्रत्येक व्यक्तीने आपणास शक्य होईल ती मदत करावी. काहीच जमत नसेल तर एक रुपया आणि एक दिवसाचे श्रम द्यावेत. या किमान अपेक्षेने सुरू झालेल्या श्रमधाम संकल्पनेला वेगवेगळ्या भागांमधील दात्यांकडून सढळ हस्ते मदत व सहकार्य मिळत आहे.
त्यामुळे पहिल्याच टप्प्यात २० घरांच्या चाव्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते काणकोण येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात प्रदान केल्या. त्यानंतर प्रियोळ येथील एका कार्यक्रमात २० गरजूंना चाव्या वितरीत केल्या. पणजी कला अकादमी येथे आयोजित एका कार्यक्रमात तिसऱ्या टप्प्यातील एकूण ३० निराधार व्यक्तींना घरे केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री दुर्गादास ऊईके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री दुर्गदास ऊईके म्हणाले, की लोक भौतिक सुखाकरता गोव्यात येतात. त्याच गोव्यात दुसऱ्यांसाठी त्याग भावनेने काम करणारे मंत्री रमेश तवडकर यांच्यासारखी माणसेसुद्धा आहेत, हे पाहून मन सुखावले. संघटनेत शक्ती असते; पण ती अशी विधायक कामासाठी वापरली पाहिजे. केवळ भोग, भौतिक सुख, उदरभरण, प्रजनन यासाठी जीवन नाही तर जीवनाचा उद्देश त्यापलीकडचा आहे. रमेश तवडकर मला माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत. माझा पूर्ण आशीर्वाद आणि संपूर्ण सहकार्य त्यांना असणार आहे.
‘श्रमधाम’च्या प्रवासासंदर्भात मंत्री रमेश तवडकर म्हणाले, की ४० ते ५० वर्षांपूर्वी गावात कुणी आजारी असला तर पावसाळ्यातील त्याच्या शेतीचे राहिलेले काम गावचेच लोक पूर्ण करायचे. कधी कुणी गावाबाहेरील व्यक्ती किंवा पाहुणा आला तर त्याचा पाहुणचार गावातील जवळपासचे लोक करायचे. घराच्याच मागील दारातून आवश्यक सामग्री आणून गरज भागविली जायची. असा एकोपा असायचा; परंतु कालांतराने हा एकोपा राहिला नाही. यामध्ये दरी निर्माण झाली. ही दरी नाहीशी करणे अत्यावश्यक बनले आहे. दुसऱ्याला मदत करणे, या उदात्त हेतूने श्रमधाम उपक्रमांतर्गत काम करण्यात येत आहे.
वरचावाडा-भोम-प्रियोळ येथील शशिकला आनंद गावडे यांना पतीच्या निधनानंतर हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठावे लागले. एका वर्षांपूर्वीच आनंद गावडे यांचे निधन झाले. पतीच्या निधनाचे दुःख पचवून शशिकला यांनी कुंडई औद्योगिक वसाहतीत कामगार म्हणून नोकरी पत्करली. त्यापूर्वीही त्यांचे कुटुंब एका झोपडीवजा घरात राहत होते. प्रियोळ येथील रमेश तवडकर यांच्या हितचिंतकांनी शशिकला यांची ही असाहाय्य परिस्थिती पाहिली.
आणि काही मोजक्या कार्यकर्त्यांनी तवडकरांच्या कानावर ही गोष्ट घातली. सवड मिळताच तवडकर यांनी झोपडीवजा घराला भेट दिली. त्यावेळी शशिकला यांची व घराची हलाखीची परिस्थिती बघून लोकसहभागातून महिलेला आधार देण्याचा निर्णय घेतला.
सध्या दोन खोल्या, एक हॉल, एक स्वयंपाक घर, टॉयलेट, बाथरुम असे टुमदार घर पाच-सहा महिन्यांत बांधून पूर्ण झाले. या कामात काणकोण तसेच प्रियोळ श्रम-धाम वॉरियर्सनी अथक परिश्रम घेतले. त्याशिवाय शेजारीपाजारी व पुतण्या उल्हास गावडे यांनीही मोलाचा वाटा उचलला. आज या घरकुलात मी सुखी आहे. मात्र, आज हे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झालेले बघायला पती असायला हवे होते, अशी खंत त्यांना आहे.
आपण सभापतीपदाचा राजीनामा देऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. या टप्प्यावर मन एकदम भावनांनी भारावून गेले आहे. कारण आपण सभापतीपदाला जेवढा न्याय दिला, तेवढा कधीच कुणी दिला नाही आणि पुन्हा देईल, असे वाटत नाही.
सभापतीपद हे केवळ संविधानिक सर्वोच्च पद आहे, त्यात काम करण्याच्या मर्यादा आहेत, अशी धारणा सर्वत्र होती. पण आपण त्या सर्व धारणा मोडून काढल्या आणि सिद्ध केले की सभापती पद हेही लोकसेवेचे सर्वोत्तम व्यासपीठ होऊ शकते. विधानसभा अधिवेशन सुरू असतानाही, त्या कठीण क्षणी, कामाचा प्रचंड ताण असतानाही, आपण आपल्या स्पीकर फोयरमध्ये किंवा केबिनमध्ये सामान्य माणसांना वेळ दिला.
अधिवेशन चालू असताना लोक दारात थांबत आणि आपण कुठल्याही ताणाविना, हसतमुखाने त्यांना भेटायचे. आपल्या चेहऱ्यावर कधीच थकवा किंवा दडपण नसायचे. उलट, सर्वसामान्य माता-भगिनींना वाटायचे की ‘हा आपलाच माणूस आहे!’ आपण त्या पदाचा कधीही गर्व केला नाही. पाय नेहमी जमिनीवर ठेवले आणि मन नेहमी सामान्य माणसासाठी उघडं ठेवलं.
आपलं दालन प्रत्येकासाठी खुलं होतं, ज्यामुळे गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा सभापती लोकांना अनुभवायला मिळाला. याचबरोबर ‘श्रमधाम’ या संकल्पनेने आपण संपुर्ण भारतात गोव्याला वेगळी ओळख दिली. घरं उभी राहिली, पण त्यासोबत हजारो चेहऱ्यावर हास्य फुलले. सभापतीपदाचा कसा सदुपयोग होऊ शकतो, हे आपण आपल्या कृतीतून दाखवून दिले. आता आपण ज्या खात्याचे नेतृत्व करणार आहात, तिथेही एक नवा इतिहास रचाल, अमूलाग्र बदल घडवाल. संपूर्ण गोवा आपल्या पाठीशी उभा आहे.
सभापती म्हणून आपण घडवलेला सुवर्णकाळ कधीही विसरला जाणार नाही. आणि मनोमन एकच वाक्य उमटतं —
“असा सभापती पुन्हा होणे नाही…”
आपल्या नव्या मंत्रिपदाच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
काणकोण तालुक्याला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. या तालुक्याला डोंगराळ भू-भाग विस्तीर्ण वनराई, नद्या-नाले तसेच जगप्रसिद्ध समुद्र किनारे लाभलेले आहेत. तालुक्यातील आगोंद हा गाव शेतीप्रधान होता. आज पर्यटनामुळे शेती व्यवसाय मागे पडला आहे व प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या लोक पर्यटन व्यवसायाकडे वळलेले आहेत.
मात्र, ५० वर्षांपूर्वी बहुतेकजण शेतीच करायचे. मच्छीमार बांधव मासेमारी करून व शेतीत मजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचे. शेती व्यवसायाकरता देसाईवाडा येथील एक समाजबंधू येथून ५ कि.मी. दूरवर असलेल्या ‘बांगड्या मरड’ या ठिकाणी आपली पत्नी, ५ मुलगे व एका मुलीसह तेथेच रहात. अधूनमधून देसाईवाडा येथील आपल्या मूळ घरी येत असत. त्यांचे नाव चंद्रकांत नाईक गावकर होय. नवनाथ नाईक गावकर हे त्यांचे ५ वे अपत्य.
नवनाथ व त्यांच्या तीन भावांनी आगोंद काराशीरमळ येथील सरकारी माध्यमिक शाळेत दहावीपर्यंत शिक्षण अतिशय मेहनत घेऊन घेतले. सकाळी ५ कि.मी. पर्यंत लहानशा जंगलातून वाट काढीत ओढे-नाले ओलांडून त्यांना पायी चालत यावे लागत असे. पावसाळ्यात शाळेत जाण्यास खूप अडचणींना सामोरे जावे लागत होते. या सर्व अडचणींवर मात करून नवनाथ यांनी चौगुले महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. आज त्यांचे चारही भाऊ सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले आहेत व ते मडगाव व इतर ठिकाणी राहतात. बहिणही चांगल्या ठिकाणी विवाहबद्ध झालेली आहे.
नवनाथ अतिशय सुसंस्कारी आहेत. मात्र, आपल्याला नशिबाची साथ मिळाली नसल्याचे ते सांगतात. त्यामुळे पदवीपर्यंत शिक्षण असूनही लग्नानंतर २० वर्षे विविध ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नोकरी करावी लागली. शेती-बागायत व जमीन मालक असूनही आपल्याच कुटुंबीयांमुळे वडिलोपार्जित जमिनीचा लाभ मिळाला नसल्याचे दुःखी मनाने ते सांगतात.
आमदार रमेश तवडकर यांना गरिबांचे दुःख काय असते याची कल्पना आहे, त्यांनी स्वतः ते दुःख अनुभवलेले आहे. त्यामुळे ते आपल्या हाती शक्ती आल्यानंतर गरीब बांधवांचा उद्धार करण्याचे, त्यांच्या ओठावर हसू आणण्यासाठी त्यांनी विविध पावले उचलली. बलराम चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून त्यामार्फत अडीअडचणीमुळे घर बांधता येत नाही, सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही, घरात कोणताही कर्ता पुरुष नाही अशांना मोफत घर लोकांच्या सहकार्याने बांधून देण्याचा उपक्रम त्यांनी राबविला.
आमचे मित्र रमेश तवडकर म्हणतात की, यशस्वी कथा वाचल्यामुळे केवळ संदेश मिळतो. मात्र, अपयशाच्या कथा वाचल्यामुळे यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. त्यांच्या कार्याने भारावून गेलेल्या एका मोठ्या विद्यापीठाने त्यांना या त्यांच्या कामामुळे डॉक्टरेट बहाल केली आहे.
आज रमेश तवडकर हे डॉ. रमेश तवडकर झाले आहेत. पण म्हणतात ना, कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलेच आहे, ‘उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त होत नाही, तोपर्यंत थांबू नका’ याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच आमचे लाडके आमदार व सभापती रमेश तवडकर आहेत.
ते आमचे प्रेरणास्थान आहेत. २०१७ ते २०२२ पर्यंत त्यांनी सर्व अडथळ्यांवर मात करून आज ते गरिबांचे अश्रू पुसत आहेत. घराचे छप्पर नसलेल्यांना ते छप्पर देत आहेत. जरी माझ्याच कुटुंबीयांमुळे मला माझ्या पत्नी व मुलांसह एका पडक्या घरात रहावे लागत आहे. मला गंभीर आजारानंतर नोकरी सोडावी लागली.
माझ्या परिवाराची कुचंबणा होऊ लागली. ही बाब सामाजिक कार्यकर्ते शरद नाईक गावकर, हर्षा नाईक गावकर, शाबा नाईक गावकर व सभापतींचे जवळचे मित्र व ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण देसाई यांनी आमदार सभापती तवडकर यांच्या निदर्शनास आणून दिली. लगेच तवडकर यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सदर घराला भेट देऊन पाहणी केली व नवनाथ यांना धीर दिला,
२१ एप्रिल २०२५ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. यावेळी आगोंद पंचायतीचे सरपंच नीलेश पागी, पंच रामनाथ वेळीप व स्टीवी रॉड्रीगीस यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह भरीव मदत केली. या कामात नीलेश, स्टीवी, रामनाथ, राजेश, संतोष, काशीनाथ, शरद, शाबा, हर्षा, सुषमा, अंजेलिस्टा, दीपस्वी, रुपा, राखी यांची मदत लाभली.
आज या घराचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना नवनाथ ना. गावकर म्हणाले की, आमच्या सरांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी जे काम हाती घेतले आहे, त्याला तोड नाही. सरांमुळेच माझ्यासारख्या अन्य ४०-४५ लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. मी उभ्या आयुष्यात हे घर उभे करू शकलो नसतो. सरांना चांगले निरामय आरोग्य लाभू दे, अशी मी प्रार्थना करतो, असे ते प्रांजळपणे सांगतात.
- नारायण देसाई, आगोंद
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.