पूर्वजांचा इवलासा गोवा म्हणजे कोकणपट्टीच्या गळ्यातला रत्नांचा हार होता; तळावलीची शेती, बागायती फुलवणारा ओहळ

Talawali Agriculture: तळावली गावच्या महालक्ष्मी देवीला तिथल्या पूर्वजांनी ओहोळाच्या काठावर स्थापन करून त्या ओहोळाचे पाणी स्वच्छ ठेवले होते.
पूर्वजांचा इवलासा गोवा म्हणजे कोकणपट्टीच्या गळ्यातला रत्नांचा हार होता; तळावलीची शेती, बागायती फुलवणारा ओहळ
Goa RiverDainik Gomantak
Published on
Updated on

मधू य. ना. गावकर

आज तळावली गावच्या ओहोळाच्या काठाने प्रवास करीत शेताच्या बांधावरून त्याच्या मुखाकडे जाताना प्लास्टिक कचरा, मातीचा भराव दिसतो आणि ओहोळात कुजलेल्या चिखलमातीचा वास आसमंत भरून राहतो. हे सगळे पाहून स्वत:स सुशिक्षित म्हणवून आपण, आपल्या अशिक्षित पूर्वजांपेक्षाही जास्त अडाणी झालो आहोत, असे म्हणावेसे वाटते.

आगापूर गावच्या ओहोळांचा निरोप घेऊन मी चिकली, आडपई, दुर्भाटमार्गे तळावली गावच्या ओहोळाच्या काठाकडे पोहोचलो. या ओहोळांचा उगम झाल्यानंतर त्याचा एक फाटा कवळे पठाराच्या दक्षिण बाजूने खाली येतो आणि दुसरा फाटा तळावली माडेल भागातील ढवळी डोंगरावरून पूर्व बाजूने झऱ्याच्या रूपाने वाहत खाली येतो. या सुंदर तळावली गावचा आकार मोठ्या मैदानी रूपात आहे. त्याला कवळे पठार आणि ढवळी डोंगराने त्रिकोणी खिंडीची घळी निर्माण केली आहे. त्या घळीच्या कुशीत जन्मलेल्या दोन ओहोळांच्या पाण्यावर बागायती आणि विशाल शेती पोसली आहे.

पूर्वजांचा इवलासा गोवा म्हणजे कोकणपट्टीच्या गळ्यातला रत्नांचा हार होता; तळावलीची शेती, बागायती फुलवणारा ओहळ
Goa Opinion: निर्बुद्ध प्रशासन

कवळे पठाराच्या उंचावर उगम पावलेला तळसर तळेकडून वाहत वाडे कुळागरात येऊन त्या कुळागराचे सिंचन करतो. त्यानंतर वळणाने खाली येत महालक्ष्मी देवळाकडून नवेबानी कुटुंबण ठिकाणी त्याचा प्रवाह येतो. दुसऱ्या ओहोळाचा उगम माडेल तळावली डोंगर भागात होऊन तो खाली माडेल रस्त्याकडून आणखी खालच्या भागात पाणी पुरवतो.

पुढे सरकारी शाळेकडून महालक्ष्मी देऊळ आणि नवेबानी कुटुंबण परिसरात तळसर तळेच्या ओहोळास मिळतो. त्या परिसरात त्याचा प्रवाह मोठा होऊन तो कोण परिसरातील भागाला पाणी पुरवून पुढे जातो. मुसाभाट शेतीला पाणी पुरवून पुढे वडे रस्त्याकडून जुवेआडो शेतीला पाणी देतो. पुढे जाऊन खाजन बांधाकडे पोहोचतो, खाजन बांधाकडील वरच्या भागातील शेतीला गोडे पाणी पुरवतो. तो पुढच्या खाजन मानशीतून जुवारीच्या पात्रात खाऱ्या पाण्यात विलीन होऊन मत्स्यसंपदेला जन्म देण्यास मदत करतो.

पूर्वजांचा इवलासा गोवा म्हणजे कोकणपट्टीच्या गळ्यातला रत्नांचा हार होता; तळावलीची शेती, बागायती फुलवणारा ओहळ
Goa Opinion: 'सामान्य गोवेकर जेव्हा बिल भरायला बाहेर पडतो तेव्हा..'; फाइल’विरहित प्रणालीची आवश्यकता आणि अवस्था

तळावली गावच्या महालक्ष्मी देवीला तिथल्या पूर्वजांनी ओहोळाच्या काठावर स्थापन करून त्या ओहोळाचे पाणी स्वच्छ ठेवले होते. एखाद्या देवालयातील चोवीस तासांच्या भजनी सप्ताहात ज्याप्रमाणे हार्मोनियम, पखवाज, तबला, टाळ यांच्या साहाय्याने स्वरसाज चढवत भक्तीचा मार्ग दाखवतात त्याचप्रमाणे तळावली गावाला पाणी देत वाहणारा ओहळ खळाळत स्वरसाज चढवतो. जुवारी नदीच्या पात्राने स्वत:ला गाडून घेऊन बाकी जैवविविधतेला पोसण्यासाठी आपला काही भाग बुजवून त्या जाग्यावर भातधान्याचे कोठार भरून टाकणारी भली मोठी शेतजमीन निसर्गाने सुपीक बनवली आहे. त्या शेतात पिकणाऱ्या धान्यांच्या पोत्यांचे ढीग प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात पाहावयास मिळत होते.

ओहोळाचे पाणी वळवून आमच्या पूर्वजांनी दुबार शेती केली होती. ‘कुसाळको’, ‘करंगूट’, ‘तामडी’, ‘आजगो’, ‘शिट्टो’, ‘धवी करड’, अशा बियाण्याच्या पेरणीने शेत लागवड होत असे. आज शेतीचे काम मशीन करते त्यामुळे तितके कष्ट पडत नाहीत, तरी शेतकरी शेतात उतरण्यास तयार नाही. आज शेतातील कसल्याही कामाला दर दिवशी हजार रुपये देऊन मजूर आणतात आणि त्याच्याकडून काम करून घेतात. खर्च झालेल्या रकमेइतके त्याला धान्य मिळत नाही.

पूर्वजांचा इवलासा गोवा म्हणजे कोकणपट्टीच्या गळ्यातला रत्नांचा हार होता; तळावलीची शेती, बागायती फुलवणारा ओहळ
Goa Opinion: 31 डिसेंबरला गोव्याचे लोक काय करत होते; पार्टी की बीचवर दंगा? महेश काळेंच्या मैफिलीने दिलं उत्तर

आज गोव्यातील युवा पिढी शेतात उतरण्यास अगर बागायतीत काम करण्यास राजी होत नाही. निसर्गाकडे पाहण्याचे अगर जाण्याचे तो टाळतो. पूर्वी झर, तळी, ओहळ, खाडीत पोहण्यास शिकणारा व पोहणारा युवक महागड्या कृत्रिम तलावात पोहण्यास शिकतो. विहिरीच्या पाण्याऐवजी घरातील नळाच्या पाण्याचा कारंजा चार भिंतीच्या आड अंगावर घेतो. असा प्रकार का घडला हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आपणच आपल्या घराच्या विहिरीशेजारी सांडपाण्याची टाकी मारून विहिरीचे पाणी दूषित केले, घरातील सांडपाण्याचे पाईप ओहळ, खाडीत सोडले आणि आपल्यावर संकट ओढवून घेतलेले आहे. आमच्या दुर्गतीला आम्हीच जबाबदार आहोत.

तळावली गावच्या विस्तीर्ण शेतीला अनेक नावे आहेत. आपल्या पूर्वजांनी मशीनरि पाहिली नव्हती. पर्यावरण टिकवणारी बुद्धी वापरून शेती करीत होते. दोन बैल, गोठा, सुक्या चाऱ्याचा ढीग, गोठ्याजवळ शेणाचा खड्डा, नांगर, जू, गुठादाता, निवळा, घुडा, लाठ आणि कुदळीने काम करीत हातांच्या ताकदीने त्याने मशिनाप्रमाणे काम करून गावच्या पर्यावरणाचा समतोल राखून धान्य पिकवले होते. त्याच ओहोळाच्या पाण्यावर पिकलेले धान्य जेवून पुढचे भविष्य सांभाळण्यास आयुष्य खर्ची घातले होते.

पूर्वजांचा इवलासा गोवा म्हणजे कोकणपट्टीच्या गळ्यातला रत्नांचा हार होता; तळावलीची शेती, बागायती फुलवणारा ओहळ
Goa Opinion: मडगाव बगल रस्त्याला अपशकुन करणारे यापुढे तरी आपले प्रयत्न सोडून देतील का?

नांगरणीत मिळणारा ‘कोंगा’, खळीत मिळणारी ‘शेवटा’, ‘खरचाणी’, ‘काळुंद्र’, ‘चोणकूल’, खेकडा, ‘वागी’, झिंगे ओहोळात मिळणारी गोडी मासळी हा त्याचा अन्नाचा घटक होता. मात्र आज तळावली गावच्या ओहोळाच्या काठाने प्रवास करीत शेताच्या बांधावरून त्याच्या मुखाकडे जाताना प्लास्टिक कचरा, मातीचा भराव दिसतो आणि ओहोळात कुजलेल्या चिखलमातीचा वास आसमंत भरून राहतो. हे सगळे पाहून स्वत:स सुशिक्षित म्हणवून आपण, आपल्या अशिक्षित पूर्वजांपेक्षाही जास्त अडाणी झालो आहोत, असे म्हणावेसे वाटते.

पन्नास, साठ वर्षांपूर्वी फोंडा शहराकडून दुर्भाटला जाताना तांबडा मातीचा रस्ता लागायचा. शहराची सीमा संपली की कपिलेश्वरी देऊळ परिसरातील हिरव्या शेतात आपल्या शेतीला पाणी देणारा शेतकरी, खुरपण काढणारी बाईमाणसे, आपले अन्न मिळवण्यासाठी वावरणारे सफेद बगळे पाहावयास मिळत होते. पुढे दोन खांबाकडून उतार लागायचा. त्या परिसरात ढवळी डोंगराचे हिरवे जंगल आणि कवळे पठाराचा उंच हिरवागार भाग दिसायचा. तिथल्या हिरव्यागार वनराईच्या महालात प्रवेश झाल्यावर शरीराला ओलाव्याचा स्पर्श जाणवायचा. उतार संपला की खळखळाट करत वाहणाऱ्या ओहोळाचे दर्शन व्हायचे. फेसाळणाऱ्या पाण्याच्या बाजूला तपकिरी रंगाचा गोल गोट्यांचा लांबच लांब गालीच्याप्रमाणे असलेला पट्टा पात्रात पाहावयास मिळायचा. पुढे दोन ओहोळांच्या मीलनाने हिरव्या शेतीच्या अंतरंगात सामील होत गायब होणारा ओहळ नदीच्या पात्रात विलीन होताना मुखाकडे मानसरुपाने दर्शन द्यायचा.

पूर्वजांचा इवलासा गोवा म्हणजे कोकणपट्टीच्या गळ्यातला रत्नांचा हार होता; तळावलीची शेती, बागायती फुलवणारा ओहळ
Goa Opinion: गोव्यात सुशासनासाठी तीन गोष्टींची गरज; राज्य निवडणूक आयुक्त नेमके काय म्हणाले, वाचा

महालक्ष्मी देवळाकडून पुढे चालताना उजव्या बाजूस कवळे पठाराचे जंगल आणि डाव्या बाजूस भलीमोठी हिरव्यागार शेतीचे चित्र डोळ्यांना भुरळ घालायचे. रस्त्याकडेला कल्पवृक्षांनी आच्छादलेल्या माडांची उभी रांग शेतीच्या रक्षणासाठी उभे राहून प्रत्येकाला सावली देत होती. भल्यामोठ्या हिरव्या शेतीच्या विस्ताराने तळावली आणि वाडी गाव एकेकाळी ‘सुजलाम् सुफलाम्’ होते. म्हणूनच चालण्याबोलण्यात, वागण्यात, भजनात, निसर्गात, वाहणाऱ्या ओहोळात, शेतीबागायतीत, गावात राम होता.

गेल्या आठवड्यात माझे मित्र गुरुदास कोरगावकर आणि संजु वेलिंकर यांच्यासोबत मी वेंगुर्ला, मालवण, देवगड, राजापूर आणि रत्नागिरी भागात कोकणातील गावांचे ओहळ, नद्या, खाडी, तलाव, झरी आणि शेती पाहिली. तिथल्या शेतकरी (Farmer) लोकांनी आपले पाणी, शेती, बागायती आणि वनराई देवासमान सांभाळली आहे. पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी ओहळ, झर, खाडी, नदी काठी कैक ठिकाणी महादेव, दत्तात्रय, कृष्ण, गणपती, सातेरी,वेताळ देवांची देवळे उभारून पाणी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केलेला पाहावयास मिळतो.

पूर्वजांचा इवलासा गोवा म्हणजे कोकणपट्टीच्या गळ्यातला रत्नांचा हार होता; तळावलीची शेती, बागायती फुलवणारा ओहळ
Goa Opinion: "सोसायटी शोधायची तर चिटणीस वा अध्यक्ष शोधावा लागतो", गोव्यात सहकार क्षेत्र बळकट करणं का गरजेच?

डोंगरावरील आंबा, काजू, फणस, नारळ, कोकम आणि भाजीपाला शेतीने आपली अर्थव्यवस्था वाढवली आहे. प्लास्टिक, सांडपाणी, डोंगर खनन यांचा वावर कमी प्रमाणात दिसतो. गावची घरे पाहून पूर्वजांची संस्कृती आठवते. समुद्रकिनाऱ्यावर झगमगाट किंवा लोकांचा गलबला नाही. गावात फिरताना काँक्रीटची जंगले दिसत नाहीत. जशीच्या तशी कौलारू घरे सर्वत्र दिसतात. ‘रामराम’ म्हणत आगतस्वागत करणाऱ्या इथल्या माणसाच्या केवळ गावातच नव्हे तर जगण्यातही राम आहे.

भगवान रामाने हनुमंताला रत्नहार बक्षीस दिला होता, त्याने हारातील रत्ने फोडून त्यात राम शोधला, राम नाही म्हणून हार फेकला. आपल्या पूर्वजांचा इवलासा गोवा म्हणजे कोकणपट्टीच्या गळ्यातला रत्नांचा हार होता. आमच्या पूर्वजांनी ओहोळातील पाण्यावर शेती (Agriculture) बागायती करून या रत्नहारात राम वसवला. या हारातील ओहोळांची, झऱ्यांची, नदीनाल्यांची निसर्गरत्ने आपण एकेक करत नष्ट करत चाललो आहोत. म्हणून आज गोमंतकीयांच्या जगण्यात आणि गावांत सगळे आहे, फक्त राम नाही!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com