

विकास कांदोळकर
मानवी संस्कृतीच्या अभिव्यक्तीचा सर्वांत सजीव आणि सामूहिक कलाप्रकार म्हणून नाट्यकलेला महत्त्व प्राप्त झालेले आहे. धार्मिक विधी, लोकपरंपरा, सामाजिक संघर्ष आणि मानवी भावभावनांच्या अविष्कारांतून नाटकाचा उगम झालेला दिसून येतो. आशय, रचना, अभिनय व रंगभाषा या माध्यमांच्या आधारावर पाश्चिमात्त्य आणि पौर्वात्य नाट्यपरंपरा सशक्तपणे उभ्या आहेत.
ग्रीक रंगभूमीपासून पाश्चिमात्त्य नाटकाची सुरुवात झाली. मुळात ग्रीक नाटकाचे स्वरूप धार्मिकतेवर आधारित होते. नियती, देव-मानव संघर्ष, नीतिमूल्ये आणि अपराधभावना, हे विषय केंद्रस्थानी असलेल्या ‘शोकांतिका’ या नाट्यप्रकाराला, एस्किलस, सोफोक्लिस आणि युरिपिडीस या थोर ग्रीक नाटककारांनी तत्त्वज्ञानात्मक उंची दिली. तसेच ऍरिस्टोफेन्सने विनोदी नाटकांच्या माध्यमांतून सामाजिक आणि राजकीय टीका केली.
ग्रीक नाट्यपरंपरेचे अनुकरण करूनही रोमन नाट्याचा करमणुकीवर अधिक भर दिसतो. महान नाटककार प्लॉटस व सेनेका यांचे नाट्यलेखन पुढील काळात युरोपियन नाट्याला स्फूर्तिदायक ठरले. पुनर्जागरण काळात इटलीत कोमेडिया ‘देल्लार्ते’ ही लोकनाट्यपरंपरा विकसित झाली. यातील विशिष्ट मुखवटे, विविध व्यक्तिरेखा आणि उत्स्फूर्त अभिनय यांमुळे नाटक अत्यंत लोकप्रिय झाले.
कोर्नेय, रासीन व मोलिअर यांनी फ्रेंच रंगभूमीवर अभिजात नाट्याची परंपरा निर्माण केली. नाटकात मानवी मनोव्यापारांचे सूक्ष्म दर्शन, भाषेची काव्यात्मक उंची आणि सार्वकालिक विषय ही वैशिष्ट्ये असणारा इंग्लिश नाटककार विल्यम शेक्सपिअर याला उत्कृष्ट नाटककार म्हणून मान लाभला. इंग्लिश रंगभूमीवर मार्लो, बर्नार्ड शॉ आणि आधुनिक काळात हॅरॉल्ड पिंटर यांना विशेष सन्मान प्राप्त झाला आहे.
भारत, चीन, जपान, इंडोनेशिया, इ. पौर्वात्य नाट्यपरंपरेत जपानी ‘काबुकी’ व ‘नोह’ यांसारख्या नाट्याविष्कारांना आणि भारतीय रंगभूमीला मानाचे स्थान आहे. भारतीय नाट्यकलेला धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा लाभली आहे.
समृद्ध असलेल्या अतिप्राचीन बौद्ध रंगभूमीद्वारे लोककथांच्या माध्यमातून नैतिकता व करुणा यांचा प्रसार करताना, ‘जातककथा’, त्रिपिटका’वर आधारित नाटके, बौद्ध विहारांमध्ये सादर होत. ‘थेरवाद’ परंपरेत ‘विदुरपंडित’ सारखी नाटके नैतिकतेचा उपदेश देतात. ही रंगभूमी सामूहिक, संगीतमय आणि शैक्षणिक होती.
संस्कृत नाटकाचे जनक मानले जाणारे अश्वघोष हे कालिदास यांच्या पूर्वकालीन महत्त्वाचे नाटककार होत. त्यांनी पाली व प्राकृतऐवजी संस्कृतमध्ये लेखन सुरू करून बौद्ध साहित्याला नवी दिशा दिली.
त्यांच्या ‘बुद्धचरित’ आणि ‘सारिपुत्रप्रकरण’ सारख्या रचनांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञान आणि महायान पंथाचे विचार आढळतात. संस्कृत रंगभूमीला भारतीय नाट्यपरंपरेच्या सर्वोच्च अभिव्यक्तीचे स्थान लाभले आहे.
भरतमुनींनी नाट्यशास्त्राचा अभ्यास मांडताना नाटकाचे तत्त्वज्ञान, रससिद्धांत, अभिनय व रंगरचना यांचे अत्यंत बारकाईने विवेचन केले. संस्कृत साहित्यातील महान नाटककार कालिदास यांची ‘अभिज्ञानशाकुंतलम्’, ‘मालविकाग्निमित्रम्’, ‘विक्रमोर्वशीय’, नाटककार भास यांच्या अनेक नाटकांपैकी, ‘स्वप्नवासवदत्तम्’, ‘उरुभंगम्’, ‘कर्णभारम्’ आणि शूद्रक यांच्या ‘मृच्छकटिकम्’ अशा नाटकांनी प्रेम, शौर्य, हास्य व करुणा यांचे संतुलित दर्शन घडविले.
भारतातील विविध प्रांतीय रंगभूमींनी आपल्या स्थानिक भाषांना आणि संस्कृतींना विशेष महत्त्व दिले. विष्णुदास भावे यांच्यापासून सुरू झालेली मराठी नाट्यपरंपरा खाडिलकर, कोल्हटकर, राम गणेश गडकरी तसेच आधुनिक काळात विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार इत्यादींपर्यंत पोहोचते.
सामाजिक वास्तव, राजकीय संघर्ष, मानसिक, वैज्ञानिक, आध्यात्मिक, नैसर्गिक, स्त्रीप्रश्न, मानवी हिंसा असे अनेक विषय मराठी नाटककारांनी निर्भीडपणे हाताळले. उत्तरोत्तर काळात रंगभूमीने दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा आणि वेशभूषा संदर्भात विशेष प्रगती साधली.
मूळ कल्पना, कथानक आणि संवाद यांच्याद्वारे समाजाचे प्रतिबिंब उभे करणारा ‘प्लेराईट’ म्हणजेच नाटककार हा रंगभूमीचा आत्मा असून, पाश्चिमात्त्य आणि पौर्वात्य परंपरांमध्ये नाटककारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच, एका संस्कृतीतील नाटके दुसऱ्या भाषेत आणून, भाषांतर-रूपांतर माध्यमांतून जागतिक साहित्याची दारे खुली करणाऱ्या लेखकांचे योगदानही मोलाचे आहे.
गोव्यातील उत्सव, मंदिरे, संगीत, नृत्य आणि स्थानिक लोककला यातून नाट्यपरंपरेचा पाया रचलेल्या, उत्सवी-स्पर्धात्मक-व्यावसायिक गोमंतकीय रंगभूमीवर, लोकनाट्य, संस्कृत आणि पाश्चिमात्त्य रंगभूमीचा प्रभाव आहे.
निरनिराळ्या उत्सवांतील लोकनाट्यांनी/नाटकांनी, कृष्णभट्ट बांदकरसारख्या लेखकांनी उत्सवी रंगभूमी, कला अकादमीसारख्या नाट्यस्पर्धांनी स्पर्धात्मक रंगभूमी, तर मराठी-कोकणीतील व्यावसायिक नाटकांनी व्यावसायिक रंगभूमीला विशेष योगदान दिले आहे. ‘तियात्र’ या कोकणी रंगभूमीवरील नाट्यप्रकाराने गोव्यातीलच नव्हे तर भारतातील व्यावसायिक रंगभूमीवर मानाचे स्थान पटकावले आहे.
समृद्ध परंपरा लाभूनही, गोमंतकीय रंगभूमीला वर्तमानकाळात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. रंगभूमीची घटती लोकप्रियता, चित्रपट-सोशल मिडिया यांच्याकडे वळणारी तरुणाई आणि नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेली स्पर्धात्मक परिस्थिती, यावर संबंधितांनी विचार-विमर्श करणे अत्यंत महत्त्वाचे वाटते. मनोरंजन हा नाटकाचा उद्देश असूनही, समाजप्रबोधन-विचारमंथनाचे हेतू मागे पडत चालले आहेत काय?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.