

राजू नायक
दिल्ली किंवा गोव्यात युवक - विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आले आहेत. ही एक जागतिक प्रतिक्रिया आहे. तरुणांना नेत्यांनी खिजगणतीतही घेतले नाही, त्यांंच्या प्रतिक्रियांची निर्भत्सना केली, प्रसंगी त्यांच्या आंदोलनांना चिरडण्याचा प्रयत्न केला. गोव्यात तर साध्या समाजमाध्यमावरील आवाहनातून हजारभर तरुण रस्त्यावर आले. हा राग, हा असंतोष काय दिशा घेऊ शकतो? काय धमक आहे, या पिढीत?
मरिन शेखचे मला कौतुक वाटले.ती कॅमेऱ्याच्या डोळ्यात पाहून आपले बोट उंचावून पोलिसांना इशारा देत होती. तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही शांततापूर्ण निदर्शने करीत आहोत. आमचा अधिकार डावलू नका. अमरिन २१ वर्षांची आहे. नुकतीच कॉलेजमधून बाहेर पडलेली. तिच्या सहकाऱ्यांबरोबर तिने ‘उजवाड’ ही संस्था स्थापन केली आहे. मुख्यतः कार्य आत्महत्येच्या मार्गाने जाणाऱ्या तरुणांना, विद्यार्थ्यांना रोखण्याचे.
‘नीट’ परीक्षेत गैरव्यवहार झाला. विद्यार्थी आत्महत्या करू लागले. त्यामुळे या संस्थेला काहीतरी करावे, युवकांना जागृत करावेसे वाटू लागले. अमरिन म्हणाली ः मी आजारी होते, डोळ्यांवर इलाज चालू होता. त्यामुळे घरीच होते. डोळे उघडणे शक्य झाल्यावर मी मोबाईल सुरू केला तेव्हा मात्र दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आक्रंदन समजून घेता आले. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. एका गरोदर बाईला पोलिसांनी बदडले. विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केला. तरुणांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली.
भाडोत्री गुंडाला आणून अत्याचार पद्धतशीरपणे करण्यात आला. आंदोलकांना धाक दाखवण्याचा तो प्रयत्न होता. माझे रक्त खवळले, मी घरी बसून माझ्या प्राध्यापकांना फोन केले. विद्यार्थी, मित्र-मैत्रिणींशी बोलले. ‘उजवाड’च्या सदस्यांशी संवाद साधला. सर्वजण अस्वस्थ होतेच. दिल्लीत आंदोलन सुरू आहे. तीन आठवडे युवक रस्त्यावर आहेत. जंतर-मंतर धुमसते आहे. त्याचे लोण देशभर पसरत आहे. अमरिनच्या मनात प्रश्न आला ः देश असंतोष व्यक्त करतो आहे आणि आम्ही गोव्यात कसे स्वस्थ बसून आहोत?
‘‘मग मीच समाजमाध्यमांवर हा प्रश्न टाकला, सगळीकडून प्रतिसाद मिळू लागला, मग ठरवले आपण ‘मेणबत्ती मोर्चा’ काढायचा.’’ अमरिनची शिक्षिका सँड्रा परेरा - ज्या स्वतः ‘उजवाड’च्या प्रमुख आहेत, ज्यांनी वर्गात अमरिनची ही ऊर्जा हेरली होती, त्या सांगत होत्या, ‘‘अमरिननेच समाजमाध्यमांवर जनजागृती केली आणि दोन दिवसांत त्यांना मिळत असलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. शेकडो युवक आक्रंदत होते.
अमरिन म्हणाली, म्हापशातील सभेसाठी आम्ही पोलिसांकडे मान्यता मागायला गेलो, तर तेथे पोलिस म्हणाले, तुम्ही १००-२०० तरुण येणार म्हणत होता, परंतु तुमच्या मेणबत्ती मोर्चासाठी हजारो युवक आले. एवढ्या मोर्चाला मान्यता देता येणार नाही. म्हापसा सभेला त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली. तरी तरुण जमले. हजारो युवक! पोलिसांनाही हे आंदोलन नवीन होते. हल्लीच्या दिवसांत युवकांनी स्वयंस्फूर्तीने असे आंदोलन केले नव्हते. ८०च्या दशकात युवक सतत आक्रंदत.
सरकारला त्यांनी नाकीनऊ आणले होते. सामाजिक-राजकीय विषयही त्यांना वर्ज्य नव्हता. तेही कोणत्या पक्षाशी संबंधित नव्हते. गोव्यात तसे पाहिले, तर अभाविप सोडली तर सुसंघटित असा विद्यार्थ्यांचा गटही नाही. अभाविपही भाजपाशी, बऱ्याच प्रमाणात रा. स्व. संघाशी बांधील आहे. राजकीय विचारधारा ठरलेली आहे. ते विरोधी अवकाश व्यापण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांचे संबंध आणि मार्गदर्शक सत्ताधारी पक्षाशी बांधील आहेत, हे लपून राहिलेले नाही.
त्यामुळे गोवा विद्यापीठात कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांत अळ्या सापडल्या तेव्हा भाजपा युवा मोर्चाने आंदोलनाचा मार्ग पत्करला. वास्तविक या संघटनेला आंदोलनाचा मार्ग न पत्करताही कॅन्टीन कंत्राटदार बदलता आला असता. त्यांना राज्याच्या शिक्षणमंत्र्यांशी थेट ‘एक्सेस’ आहे. परंतु दुसऱ्या संघटना कुठे आहेत? अभाविप का गप्प आहे कळत नाही. त्यांना डावलून युवा मोर्चाला या विषयात स्वारस्य का? विद्यापीठात ‘टुगेदर फॉर’ नावाची एक संघटना आहे.
त्यांनाही भूमिका घ्यावीशी वाटली नाही. त्यामुळे विद्यार्थी चळवळीशी संबंध असलेला विद्यापीठातील शिक्षक म्हणाला, भाजपा युवा मोर्चा केवळ ‘शो’ करून गेला. या संघटनेला विद्यार्थी चळवळीशी सोयरसुतक नाही, त्यांना राजकीय नौटंकी करण्यात रस आहे. त्यातून एक प्रश्न प्रकर्षाने सामोरे आला. गोव्यात विद्यार्थी चळवळ नाही. भाजपाने ‘आदेश’ दिला तर अभाविप विषय घेईल. परंतु विद्यार्थी चळवळ नाही म्हणून कोणीच राजकीय नरेटिव्ह मांडणार नाही, सरकारविरोधात एक प्रखर दृष्टिकोन विद्यार्थी-युवकांमधून येणार नाही, असे घडत नाही. संवेदना असते. राखेतूनही अंगार फुलून येऊ शकतो.
गेल्या आठवड्यात आझाद मैदानावर युवकांच्या शक्तीचे जे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन घडले ते उत्स्फूर्त होते. कोणी त्यांची संघटना बांधली नव्हती. कोणी राजकीय, हितसंबंधी शक्ती त्यांच्यामागे नव्हती. वेळ येते तेव्हा हे मूकनायक बोलू शकतात, हे या युवकांनी दाखवून दिले. कोणी म्हणाले, ते गोव्याचे नव्हते. युवक हिंदीतून बोलत होते. कुणी म्हणाले, युवकांनी आंदोलन झाल्यानंतर आझाद मैदानावरच सिगारेटी शिलगावल्या. त्यांना जागेचे पावित्र्य माहीत नव्हते. ते बेफिकीर होते वगैरे वगैरे...
अरे बाबांनो, ही जेन-झी पिढी आहे. ते समाजमान्य पद्धतीबाबत बेफिकीर असतील, परंतु निष्काळजी नाहीत. बेजबाबदार तर नाहीच नाहीत. कारण दिल्लीपासून गोव्यापर्यंत त्यांनी शांततापूर्ण आंदोलन केले. गांधीजींनी पहिल्यांदा लोकांना शांततापूर्ण आंदोलन करायला शिकवले तेव्हा प्रत्येक निदर्शक पुढे जाऊन शिपायांकडून स्वतःचे डोके फोडून घेत होता. कोसळून पडत होता. कार्यकर्ते त्यांना स्ट्रेचरवर घालून उचलून घेऊन येत होते. मागचे पुढे जात होते, परंतु कोणी हात उगारत नव्हते.
कोणी शिपायांवर पलटवार करीत नव्हते... गांधीजींच्या शांततापूर्ण सत्याग्रहाची ती ताकद होती. अशाप्रकारच्या सत्याग्रहातून केवळ राजकीय नेत्यांवर दबाव येत नाही, तर सत्याग्रहीही स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणत असतो. हे विद्यार्थी स्वतः दिल्लीत कचरा साफ करीत होते, अन्न देत होते. जेन-झींनी देशभर जी चळवळ चालविली - गेला महिनाभर देशभर जो ‘आगडोंब’ उसळला आहे तो केवळ वैचारिक आहे. त्यात हिंसा नाही. किंबहुना त्यांना हिंसा करण्यास, पलटवार करण्यास भडकवले जात आहे.
भाजपाचा एक नेता सांगत होता, अनेक पोलिस दिल्लीत जखमी झाले. त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, त्याचे समर्थन कसे कराल? ही हिंसा आहे! ज्यांनी कोणी दिल्लीतले आंदोलन पाहिले ते तटस्थ अवलोकन करू लागले, तर त्यांना आढळून येईल की, पोलिसांनी हिंसा भाग पाडली. दिल्लीतला पोलिस प्रमुख ऐनवेळी बदलण्यात आला. पोलिस आयुक्त सरील गोलचा यांना ‘बदलण्याचे’ कारणच पोलिस धाक-दपटशा निर्माण करू शकत नाहीत - म्हणून आंदोलन २२ दिवस चालले होते.
त्यांना बदलताच पोलिसांनी कायदा हातात घेतला. त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते. तरीही दिल्लीपासून गोव्यापर्यंत जे आंदोलन होत आहे, ते शांततापूर्ण आहे. त्याला गालबोट लागलेले नाही. अमरिन शेख मला पुनः पुनः सांगत होती, मला सरकार, पोलिसांचे सहकार्य हवे आहे. आम्हाला आंदोलनातून केवळ व्यवस्था बदलायची आहे. तरीही त्यांच्या सभांना परवानगी नाकारण्यात आली. पोलिस घरी पाठवण्यात आले. धमक्या आल्या. दिल्लीत युवती अत्यंत उद्वेगाने बोलत होत्या. मुंबईत मुली पोलिस व्हॅन अडवत होत्या...
कदाचित जेन-झींची हीच भाषा आहे. त्यांच्या आंदोलनाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न चालला आहे. त्यांच्यावर दोषारोप केले जाताहेत. राजकीय हेत्वारोप केले जात आहेत. परंतु आधी त्यांची मागणी साधी होती. ‘नीट’ परिक्षेतील घोळासाठी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा. भाजपा विरोधात असती तर त्यांनी हीच मागणी लावून धरली असती. परंतु भाजपाने विद्यार्थ्यांची सहनशीलता ताणली आणि त्यांच्या आंदोलनाला संघटनात्मक स्वरूप येत गेले.
जेन-झींचे स्वरूप बरेच गुंतागुंतीचे आहे हे मान्य करायला हवे. कोविडमुळे ते तावून सुलाखून बाहेर पडले. बऱ्याच मानसिक दडपणाखाली ते वावरले. काहीजण शाळेतून अचानक कॉलेजात आले. काही कॉलेजात न जाताही उत्तीर्ण झाले. अनेकांनी कॉलेज जीवनच पाहिले नाही. त्यातील बराच मोठा वर्ग बेरोजगार आहे. ही पिढी अस्वस्थ आहे. या पिढीला राजकीय संघर्ष करायला लागला, तर ते मागे हटणाऱ्यांपैकी नाहीत. अमरिन शेख जी राजकारण नको म्हणत होती, माझ्या एका प्रश्नावर निखळपणे बोललीही, बुढ्ढाचार्यांनो आता बाजूला व्हा.
तरुणांसाठी जागा खाली करा. अनेक देशात तरुणांनी हाच पुकारा केला! दिल्लीतील आंदोलनाची चेष्टा करणाऱ्यांची ते गय करणार नाहीत. गोव्यात त्यांच्यावर बाहेरचे म्हणून शिक्का मारण्यात आला. ‘वाळवी’ असे संबोधणाऱ्यांची, त्यांची कुचेष्टा करणाऱ्यांना ते धडा शिकवू शकतात. गोव्यात केवळ दोन दिवसांच्या आवाहनानंतर एक हजारावर तरुण शिस्तबद्धरीत्या एकत्र येणे - त्यांनी शांततेने मेणबत्त्या पेटविणे, एका सुरात घोषणा देणे, संघटना नसताना लयबद्धरीत्या चालणे, बोलणे, वागणे हा निश्चितच विनोद नाही!
विनोदाचा विषय तर नाहीच! म्हणूनच तर भाजपाला मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागला. सर्वांसाठी हा धडा आहे! राजकारण्यांनो वेळीच जागे व्हा, जेन-झी जागी होतेय हा तो संदेश. त्यांची कुचेष्टा कराल, तर ते तुम्हाला पायाखाली चिरडून पुढे जाणार आहेत, हाच तो संदेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.