Goa Opinion: पदोन्नतीचा पूर आणि कार्यक्षमतेचा दुष्काळ?

Goa Police: जिथे गुणवत्तेची व कार्यक्षमतेची कदर होत नाही, तिथे त्या पदाला आदर उरत नाही; उरतो तो फक्त दर! तब्बल एकोणीस अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक (SP) पदावर पदोन्नती.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

बॉस्को जॉर्ज

अलीकडेच एका प्रशासकीय आदेशाने एकाच वेळी तब्बल एकोणीस अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक (SP) पदावर पदोन्नती देण्यात आली आणि त्यामुळे संपूर्ण खात्यात अस्वस्थतेची लाट पसरली आहे. जे करिअरमधील प्रगतीचे व वैयक्तिक गुणवत्तेचे प्रतीक असायला हवे होते, तेच आता अनेकांच्या मते केवळ तमाशा ठरत आहे.

पदाचे पावित्र्य राखण्याऐवजी, केवळ प्रशासकीय सोयीसाठी निर्णय घेतला जातो. अशा सामूहिक पदोन्नतीमुळे या पदाचे मोल कमी होण्याचा धोका आहे आणि रणनीती आखण्याच्या दृष्टीने नेतृत्वाचे प्रतीक असलेले पद केवळ प्रशासकीय शोभेची वस्तू बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या ‘ब्लँकेट प्रमोशन’ पद्धतीमुळे गुणवत्तेचा सूक्ष्म विचार केला जात नाही. केवळ नगास नग मोजले जातात. व्यवस्था जेव्हा गाढव आणि घोडा यातील फरकच ओळखत नाही, तेव्हा खरी गुणवत्ताधिष्ठित प्रणाली गुदमरते.

जर पदोन्नतीच्या निकषांची फारकत वैयक्तिक कर्तृत्व किंवा उत्कृष्ट कार्यनोंदींपासून केली गेली, तर उत्कृष्ट होण्याची प्रेरणाच संपते. निकषांचा हा र्‍हास केवळ मनोबलावर आघात करणारा नाही, तर पोलिस दलाच्या सर्वोच्च स्तरातील नेतृत्वाच्या दर्जालाच थेट घसरवणारा आहे.

यातील पहिली मूलभूत चूक म्हणजे काही आंतरिक हेतूंनी IRBnचे गोवा पोलिसांमध्ये विलीनीकरण करणे. या निर्णयामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

या निर्णयाचा सर्वात गंभीर परिणाम म्हणजे इंडियन रिझर्व्ह बटालियन (IRBn) अधिकाऱ्यांवर झालेला अन्याय. नागरी शाखेतील मोठ्या गटाने एसपीची पदे भरल्याने IRBn अधिकाऱ्यांच्या करिअरच्या वाटा अक्षरशः अडवल्या गेल्या आहेत आणि त्यांची हक्काची पदोन्नतीची संधी डावलली गेल्याची भावना निर्माण झाली आहे.

कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांना आता सामूहिक पदोन्नतीसाठी बाजूला सारले जात आहे. ही विषमता दलाच्या विविध शाखांमध्ये कायमस्वरूपी दरी निर्माण करेल. हे धोकादायक आहे.

याचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे स्वायत्त कार्यक्षमतेऐवजी लाचारी व बूट चाटणाऱ्यांची दखल घेणे सुरू होईल. जेव्हा पदोन्नती खिरापतीसारखी वाटली जाते, तेव्हा अधिकाऱ्यांना असे वाटू लागते की त्यांची प्रगती ही प्रामाणिक नेतृत्वावर नव्हे तर वरिष्ठांची खुशामत करण्यावर अवलंबून आहे.

कार्यक्षमतेसाठी धैर्य व कौशल्याला प्रोत्साहन देणारी व्यवस्था आवश्यक असते; पण पदोन्नतीच्या सामूहिक वाटपामुळे संस्था कायद्याचे रक्षण करण्यापेक्षा वरिष्ठांना खूश ठेवण्यातच गुंतून राहते.

शेवटी, हा प्रकार गणवेशधारी सेवांच्या पारंपरिक मूल्यांपासून दूर जाण्याचे लक्षण आहे. एसपी हे पद काटेकोर तपासणी व निर्विवाद गुणवत्तेवर मिळालेले, अनुभवी नेतृत्वाचे सर्वोच्च प्रतीक असायला हवे. पदोन्नतीची प्रक्रिया जर कारखान्यातील उत्पादन पट्ट्यासारखी केली, तर प्रशासन केवळ रिक्त जागा भरत नाही, तर संस्थात्मक शिस्तीच्या पायाच उद्ध्वस्त करते.

Goa Police
Goa Opinion: शिरगाव चेंगराचेंगरी, हडफडे, चिंबल आंदोलन; प्रत्येक प्रकरणात सरकार बॅकफूटवर जातेय

दुर्लक्षित व निराश अधिकाऱ्यांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण करते. पदोन्नतीचा पूर येतो आणि कार्यक्षमतेचा दुष्काळ. या सगळ्याचा परिणाम केवळ कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांवरच होतो, असे नाही तर संपूर्ण पोलिस प्रशासनावर व अंतिमत: समाजावर होत असतो.

पदोन्नत्ती ही खिरापतीसारखी वाटण्याची व मर्जीतल्यांची वर्णी लावण्याची सोय नाही. पोलिसदलाला कार्यक्षम अधिकारी देण्याचा, गुणवत्ता व कार्यक्षमता यांची दखल घेण्याचा व उत्तमोत्तम, गुणवान, सक्रिय अधिकारी निर्माण करण्याचा तो पाया आहे.

Goa Police
Goa Opinion: पंचायती राज! राजकीय सत्तेचे केंद्रीकरण की विकेंद्रीकरण?

तो व्यवस्थित, सचोटीने घातला गेला नाही तर प्रशासनाचा डोलारा कधीही कोसळू शकतो. जिथे गुणवत्तेची व कार्यक्षमतेची कदर होत नाही, तिथे त्या पदाला आदर उरत नाही; उरतो तो फक्त दर. बहुत काय लिहिणे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com