France Riots: अराजकाच्या आगीतले फ्रेंच-फ्राईज! फ्रान्समधील हिंसाचार, सामाजिक अस्वस्थता आणि नेतृत्वाच्या संकटाचा वेध

France Political Crisis: रोजच्या जगण्याचा वाढता खर्च, रखडलेले पगार, सार्वजनिक सेवांचा घसरणारा दर्जा आणि सरकारी खर्चात कपात ही कारणे फ्रान्सधील लोकक्षोभाच्या मुळाशी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
France Political Crisis
France RiotsDainik Gomntak
Published on: 
Updated on: 

विनय सहस्रबुद्धे

रोजच्या जगण्याचा वाढता खर्च, रखडलेले पगार, सार्वजनिक सेवांचा घसरणारा दर्जा आणि सरकारी खर्चात कपात ही कारणे फ्रान्सधील लोकक्षोभाच्या मुळाशी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. या उद्रेकाचा फायदा उठवून गुन्हेगारी प्रवृत्तींनीही लुटालूट केली. अराजकाच्या आगीत होरपळणाऱ्या त्या देशाला खरी गरज आहे, ती खंबीर नेतृत्वाची.

अनेकविध कारणांमुळे फ्रान्समध्ये लोकक्षोभ उसळून आला असून पॅरिससह अनेक छोट्या-मोठ्या शहरांच्या रस्त्यांवर उघडउघड हिंसा आणि दिवसाढवळ्या सुरू असलेली लूटमार यामुळे सर्वसामान्य फ्रेंच नागरिकच नव्हे, तर राजकीय- सामाजिक विश्लेषकही बावचळून गेले आहेत. या दंगलींना म्हणावे तरी काय, या मूलभूत प्रश्नाचा अनेकांच्या मनात फणा काढून बसलेला नाग सध्यातरी हटण्याची चिन्हे नाहीत. हे स्थलांतरितांचे बंड आहे की अस्वस्थ युवकांचा संताप? हा वंचित आणि उपेक्षित वर्गाचा उठाव आहे, की युरोपमध्ये आलेल्या मुसलमानांचा जिहाद?

France Political Crisis
Goa Ring Road Plan: गोव्यात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 'रिंग रोड'चा विचार! CM सावंत यांचे मोठे संकेत

या दंगलींची सुरुवात झाली, ती वाढत्या विद्यार्थीसंख्येमुळे शाळांमधील वर्गवर्गातून होत असलेल्या कोंबाकोंबीविरुद्धच्या संतापातून. बहुसंख्य सरकारी शाळांमधून पुरेशी शिक्षकसंख्या नाही, या वास्तवाने या संतापाच्या आगीत तेल ओतले. हायस्कूलची मुले रस्त्यांवर उतरून नाकेबंदी करु लागली आणि पुढे त्याचे रूपांतर झुंडीच्या हिंसाचारात झाले. अशा नेतृत्वहीन आणि बेबंद आंदोलनात नेहमी जे होते, तेच इथेही झाले. ज्यांच्या-ज्यांच्याकडे सरकारविरोधात काही ना काही गाऱ्हाणे होते ते सर्व हौशे-नवशे एकत्र आले आणि या अराजकाच्या वडवानलात अनेक ठिकाणी ‘फ्रेंच-फ्राईज’चा जळून कोळसा झाला.

रोजच्या जगण्याचा वाढता खर्च, रखडलेले पगार, सार्वजनिक सेवांचा घसरणारा दर्जा आणि सरकारी खर्चात कपात ही कारणे या लोकक्षोभाच्या मुळाशी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यातच वेतनवाढ रोखणाऱ्या ५४ अब्ज युरोच्या सरकारी अर्थसंकल्पाला असलेल्या विरोधाने असंतोषाला आणखी धार आली हेही खरेच. अनेक निरीक्षकांच्या मतानुसार या जवळजवळ देशव्यापी हिंसाचाराचे स्वरूप संमिश्र होते. एकीकडे शांततापूर्ण मोर्चे निघत होते, तर दुसरीकडे पोलिस आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांना जाळून खाक करण्यासाठी तत्पर असे अतिडावे गट (जसे की ‘ब्लॅक ब्लॉक्स’) देखील रस्त्यांवर उतरले होते. या स्थितीत अनेक संधीसाधू सडकछाप गुन्हेगारांनी अराजकतेचा फायदा घेतला. आणखी उल्लेखनीय म्हणजे फ्रान्समधील सांप्रतची अस्वस्थता केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही.

लोकशाही राष्ट्रांमध्ये असंतोषाला अराजकाचे वळण तेव्हाच लागते, जेव्हा प्रस्थापित राजकीय पक्ष सपशेल निष्प्रभ ठरतात. विविध सर्वेक्षणांमधून फ्रेंच लोकांमध्ये प्रस्थापित व्यवस्थेबद्दल तीव्र निराशेची भावना (जवळपास ७० टक्के ) असल्याचे दिसून आले आहे. आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष या जनक्षोभाला योग्य दिशा देण्यास अपयशी ठरत असून, यामुळे निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा अतिउजव्या आणि अतिडाव्या राजकीय शक्तींना होत असल्याचे अनेक तटस्थ निरीक्षकांचे म्हणणे आहे. यातूनच समाजशास्त्रज्ञ ज्याला ‘फ्लॅशपॉइंट्स मॉडेल ऑफ पब्लिक डिसऑर्डर’ असे म्हणतात तसे, वास्तविक अथवा घडवून आणलेल्या जनक्षोभाचे अवचित आविष्कार आज फ्रान्समध्ये बघायला मिळतायत.

या सामाजिक अस्वस्थतेमागे ढासळलेली कुटुंबव्यवस्था आणि भांबावलेल्या तरुणाईला मार्गदर्शन करू शकतील, अशा मार्गदर्शकांची (मेंटर्स) उणीव ही कारणेदेखील आहेत. अनेक घराघरांमधून आई-वडिलांचे नियंत्रण सुटले आहे, याचे कारण त्यांच्यातील वरिष्ठ मंडळी घरातल्या तरुणांपेक्षा कमी पैसे कमावतात. याउलट वैध-अवैध मार्गांनी पैसे मिळवणाऱ्या तरुण मुलांपैकी अनेकांकडे महागडे कपडे, आयपॉड आणि कधीकधी नवीन गाड्यादेखील आल्या आहेत. या सर्व वातावरणात सततच्या स्पर्धेमुळे संपन्न वर्गातील तरुण मनातून असुरक्षित आणि वंचित वर्ग आणखी अस्वस्थ होतोय, असे अनेक समाजचिंतकांचे निरीक्षण आहे. यात भर पडते आहे ती कल्याणकारी राज्य संकल्पनेतून पुढे येत असलेल्या ‘डोल’ संस्कृतीची!

France Political Crisis
Goa Politics: 'वाद नको, गोवा रक्षणाचा विचार करा'; तृप्ती बकाल यांचा मनोज परब, अजय खोलकरांना टोला

वास्तवाकडे डोळेझाक

दंगलखोरांपैकी बहुसंख्य लोकांची मुस्लिम पार्श्वभूमी आहे, हे नाकारता येणार नाही. या मुस्लिम तरुणांमध्ये बाहेरून आलेल्या स्थलांतरितांची संख्या अधिक आहे. पण हे सर्व असूनसुद्धा बहुदा ‘वोक’ विचारप्रवृत्तीच्या प्रभावामुळे निरीक्षक किंवा राजकीय नेते या वास्तवाकडे डोळेझाक करणेच पसंत करतात. या दंगलींकडे फ्रेंच राजकारणी आणि समाज-अभ्यासक कसे पाहतात ते समजून घेणे उद्‍बोधक आहे. अध्यक्ष मॅक्रॉन यांनी स्पष्टच सांगितले आहे की, गेल्या शनिवारी (१७ ऑक्टोबर) अतिडाव्या गटांकडून जी राजकीय आणि प्रक्षोभक कृत्ये घडली, त्यांच्या उद्देश सरळसरळ हे प्रजासत्ताक उलथून टाकणे हाच होता. 'फ्रेंच अभिमताच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट फ्रँकाइझ डी ओपिनियन प्युब्लिझम’चे पोलिंग संचालक जेरोम फोरके (Jérôme Fourquet) यांनी या हिंसक आंदोलनामागे दोन विशिष्ट प्रवृत्ती असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

“यातील एक प्रवृत्ती ही पारंपरिक सामाजिक आणि श्रमिक संघटनांच्या आंदोलनांशी निगडित होती, तर दुसरी ब्लॅक ब्लॉक किंवा अतिडाव्या विचारांशी संबंधित! या अतिडाव्या गटामुळे शासनसंस्था आणि भांडवलदार मानल्या जाणाऱ्या व्यापारी आणि उद्योगसंस्थांवर योजनाबद्ध आक्रमण केले गेले. त्यांनीच पोलिसांवरही हल्ले केले,” असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यांच्या पाहणीतून पुढे येणारी सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या अतिडाव्या गटातील लोकांची प्रचंड संख्या, त्यांचे तरुण वय आणि हिंसाचार किंवा लूटमार करताना स्वतःचे चित्रीकरण करण्याची त्यांची प्रवृत्ती. ही प्रवृत्ती एक प्रकारच्या आत्ममग्नतेचे (narcissism) उदाहरण असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

पॉलिटिकल करेक्टनेस’चा मोह

अतिउजव्या गटाच्या नेत्या मरीन ले पेन यांनी राष्ट्राला उद्देशून संदेश देण्याच्या थाटात भाषणे करून या हिंसाचारामुळे फ्रान्सच्या लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचा इशारा दिला आहे. या अस्वस्थतेचा राजकीय लाभ आपल्या(च) पदरात पडेल, या आशेने त्यांनी एक विधान केले आहे की, येत्या ‘‘सहा महिन्यांत, फ्रेंच जनता एक वेगळा मार्ग निवडण्यास उत्सुक असेल. आपल्या अधिकारांचे रक्षण आणि पुनर्स्थापित सुरक्षिततेचाच तो मार्ग असेल.’’ अर्थात या बाईसुद्धा ‘पॉलिटिकल करेक्टनेस’च्या मोहातून बाहेर आलेल्या नाहीत.

स्थलांतरितांची ‘व्होट बँक’ तिथेही आहेच, त्यामुळे सांप्रतच्या हिंसाचाराचे खापर थेट स्थलांतरितांवर न फोडता मॅक्रॉन यांच्या सरकारवरच ते फुटेल, याची पूर्ण खबरदारी त्यांनी घेतली आहे. गंमत म्हणजे त्यांचे उपनेते जॉर्डन बार्डेला यांच्या मतानुसार, ‘‘बहुतांश लुटारू’ हे स्थलांतरित पार्श्वभूमीचे लोक आहेत, ज्यांना आपण फ्रान्सचे घटक असल्यासारखे वाटत नाही. त्यांच्या मनात फ्रान्सबद्दलचा पराकोटीचा द्वेष आहे आणि तो व्यक्त करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अराजकाच्या आगीत होरपळणाऱ्या फ्रान्सला खरी गरज आहे, ती खंबीर नेतृत्वाची! दुबळी निर्णयक्षमता, ‘वोक’ मानसिकतेची मगरमिठी आणि आणि हिशेबी पक्षीय राजकारणापलीकडे बघण्याची क्षमता नसलेले विरोधक अशा स्थितीतला हा देश आगीतून फुफाट्यात जाऊ नये, एवढेच !

France Political Crisis
Goa Cyber Fraud: 28 हजार कोटींच्या सायबर घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील वकिलाला ईडी कोठडी VIDEO

‘हिपहॉप’ आणि ‘रॅप’

फ्रान्समध्ये ‘डोल’ संस्कृती वाढते आहे. सरकारच्या बेरोजगारी,अनुदानामुळे विनासायास पुरेसे पैसे हाती खुळखुळत असतील तर नोकरी शोधायचे कष्ट तरी का घ्यायचे? अशीही मानसिकता दिसून येते. यातून हाडीमाशी खिळून राहतोय, तो एक प्रकारचा आळस आणि वाढतेय ‘जैसे थे’वादी प्रवृत्ती! यातून होणाऱ्या मानसिक कोंडीचे बळी ठरलेले फ्रेंच तरुण अनेकदा मिळविलेले पैसे खर्च करतात, ते केवळ आणि केवळ आपण संपन्न आणि स्मार्ट दिसावे यांसाठी ! त्यांची धडपड असते ती महागडे स्नीकर आणि डिझायनर लोगो असलेले ट्रॅकसूट वापरण्यासाठी! स्ट्रीट वेअर आणि हुड्स ही संपूर्ण पश्चिमेकडील वंचित तरुणांची सामान्य फॅशनच झाल्यासारखी आहे. हे तरुण ‘हिपहॉप’ आणि ‘रॅप’ ऐकतात, फास्ट-फूड खातात, कारण ते आपणही एंजॉय करू शकतो, उपभोग घेऊ शकतो हे या ना त्याप्रकारे दाखवू इच्छितात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com