

डॉ. ऑस्कर रिबेलो
आपल्या गोव्यातही २०२७ च्या सुरुवातीला एक ‘फुटबॉल कप’ खेळवला जाणार आहे... अर्थात ‘काँग्रेस विरुद्ध भाजप’! काही छोटे संघही मैदानात आहेत. मुख्य सामना काँग्रेस वि.भाजप हाच रंगणार आहे. पण एकच अपेक्षा आहे की, काँग्रेसचे मुख्य प्रशिक्षक गिरीश जे मैदानावर दिदिएर देशॉम्प्ससारखा बावरलेला चेहरा घेऊन उभे असतात. त्यांनी असा संघ उतरवू नये, जो स्वतःच्याच गोलपोस्टमध्ये सटासट ‘सेल्फ गोल’ करेल.
दर चार वर्षांनी अख्खी दुनिया एका अजब वेडाच्या विळख्यात अडकते. हा एक असा काळ असतो, जेव्हा फुटबॉल आणि राजकारणाची अशी काही जोरदार टक्कर होते की त्याचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटतात. दारूचे गुत्ते, गावचे पार, हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर्स, ऑफिसेस... अगदी चर्च, मंदिर आणि मशिदींमध्येही लोक डोळ्यांवरची झापडं आणि थकलेला मेंदू बाजूला सारून एकाच गोष्टीची कुजबूज करत असतात;
‘कालची मॅच बघितलीस का रे? ‘आणि जर चुकून तुम्ही म्हणालात, ‘नाही रे बाबा!’... तर तुमची अवस्था तेल अवीवमधील एखाद्या असहाय्य पॅलेस्टिनी नागरिकासारखी होते. ज्यांना खेळातील प्रत्येक बारकावा ठाऊक आहे, ते वर्षभर सगळंच बघत असतात. इंग्लिश प्रीमियर लीग, स्पॅनिश ला लीगा, ...सगळं काही! ते २४ तास सोफ्याला चिकटलेले असतात.
आपल्याला कधी आनंद शिखरावर तर कधी डिप्रेशनच्या गर्तेत फेकत राहते, तो निव्वळ फुटबॉलचा खेळ नसतो; तर त्या खेळाच्या मागे असणारे ‘पॉलिटिक्स’ (राजकारण) असते! हे दर चार वर्षांनी भरणारे ‘तिसरे महायुद्ध’ आहे, जिथे आपल्या आवडीची बाजू निवडण्याचे स्वातंत्र्य असते.(जरा विचार करा, गत शतकाच्या सुरुवातीला जर राणी व्हिक्टोरिया, कैसर विल्हेम, किंग जॉर्ज व झार निकोलस यांसारख्या अडाणी राजपुत्रांनी युद्धाऐवजी मैदानावर फुटबॉल खेळला असता, तर पहिल्या महायुद्धातील तो निरर्थक, अमानुष रक्तपात किती सहज टाळता आला असता!) तर, आपल्यासारख्या सामान्यांसाठी फुटबॉलचे हे राजकारण कसे उलगडत जाते, ते बघा:
पोर्तुगाल : खेळाच्या तांत्रिक गोष्टींशी गोव्यातील लोकांना काही देणेघेणे नसते. त्यांच्यासाठी हा खेळ म्हणजे ‘साउदाद’ आहे. रोनाल्डो हा करोडो दिलांची धडकन असला, तरी तो फुटबॉलपटू कमी आणि ‘पोस्टर बॉय’ जास्त आहे. पण एक फायदा आहे, त्याच्या नावावर तुम्ही गर्लफ्रेंडला मॅच बघायला तयार करू शकता!
अर्जेन्टिना : सध्या हा संघ जगाच्या डोळ्यात खुपतोय. एका अजब तर्कशास्त्रानुसार, मेस्सीला एका मोठ्या उजव्या विचारसरणीच्या जागतिक षडयंत्राचा भाग मानले जातेय. डोनाल्ड ट्रम्प, जॉर्जिया मेलोनी ते फिफा प्रमुख ‘इन्फँटिलो’ (हा स्पेलिंगचा घोळ नाही, उपरोध आहे!) हे सगळे जण मिळून इतरांना फसवताहेत, जेणेकरून मेस्सी हा ‘गोरा माणूस’ जिंकावा! याला तुम्ही दक्षिण गोलार्धातील ‘मागा’ (मेक अर्जेंटीना ग्रेट अगेन) ची आवृत्ती म्हणू शकता.
इजिप्त ः अनेकांच्या मते इजिप्तला लुटले गेले, फसवले गेले आणि हे कृत्य कोणी केले? तर अर्जेन्टिना अन् त्या ‘गोऱ्यापान’ रेफ्रीने! अरब जगाच्या विनाशासाठी व पिरॅमिड्सच्या देशावर वर्चस्वासाठी साम्राज्यवादी शक्तींनी रचलेले हे एक कारस्थान होते, असा कांगावा केला गेला. अति-डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या सुपीक मेंदूत इजिप्त हा गाझाचाच एक अवतार वाटू लागतो, जो नेहमी फक्त ‘बळी’ ठरतो.
फ्रान्स : हा संघ सर्वात तगडा वाटत होता. एमबाप्पे सर्वकाळ ‘मॅग्निफिसेंट’ (लाजवाब) च राहील. पण काल रात्री जेव्हा त्यांनी अतिशय सुमार खेळ केला, तेव्हा स्पॅनिश वीरांनी त्यांचा खेळ खल्लास केला. कारण हा संघ त्यांच्यासाठी ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ च्या विचारसरणीचे प्रतीक होता. त्यामुळे हा संघ हरल्यावर अशा चाहत्यांचा जीव थोडा ‘ले ब्ल्यू’ (उदास) झाला, तर नवल नाही.
इंग्लंड : हा तर जगाचा ‘कायमचा भावी विजेता’! पण, त्यांना १९६६ नंतर एकही मोठी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. पण कदाचित ‘हे जुड’ (जुड बेलिंगहॅम) त्यांना या वेळी तरी पार नेईल, अशी आशा आहे. कदाचित इंग्रजांचा नवा ‘रिचर्ड द लायनहार्ट’ बनण्याचा मान आयरीश-जमैकन वंशाच्या कृष्णवर्णीयाला मिळेल!
ब्राझील : जर तुम्हाला जत्रेतली मजा आवडते, सांबा डान्स अन् आक्रमक फुटबॉल आवडतो, तर पैज लावून सांगतो; तुम्ही ब्राझीलच्याच प्रेमात पडणार! थोडक्यात काय तर, दर चार वर्षांनी हीच कहाणी असणार, तेच राजकारण, तोच ड्रामा, तीच कारस्थाने आणि तेच नेते. दर चार वर्षांनी लोकांना मनातील राजकीय भडास बाहेर काढण्याची एक उत्तम संधी मिळते, जी प्रत्येकाच्या राजकीय आरोग्यासाठी लाभदायी असते.
ताजा कलम : आता गोव्यातही २०२७ च्या सुरुवातीला एक ‘फुटबॉल कप’ खेळवला जाणार आहे... म्हणजेच ‘काँग्रेस विरुद्ध भाजप’! काही छोटे संघही मैदानात आहेत. उदा., ‘आरजी’ हा माझ्या आवडत्या केप व्हर्डे संघासारखा आहे, ज्यांनी सुरुवातीला ऐतिहासिक लढत दिली, पण दुर्दैवाने नंतर ते आतूनच विखुरले गेले. त्यामुळे मुख्य सामना काँग्रेस विरुद्ध भाजप असाच रंगणार आहे.
पण एकच अपेक्षा आहे की, काँग्रेसचे मुख्य प्रशिक्षक गिरीश (चोडणकर) जे मैदानावर दिदिएरसारखा कायम बावरलेला चेहरा घेऊन उभे असतात. त्यांनी असा संघ उतरवू नये, जो स्वतःच्याच गोलपोस्टमध्ये सटासट ‘सेल्फ गोल’ करेल आणि भाजपला ४०-० ने सहज मॅच जिंकून देईल! पण जसे फुटबॉलमध्ये, तसेच गोव्याच्या राजकारणात– नक्की काय होईल, हे कोणीच सांगू शकत नाही.
इथे एकच गोष्ट शाश्वत आहे... तुम्ही दर ४-५ वर्षांनी त्याच मैदानात परत येता, त्याच जुन्या नाटकाचे पुन्हा फाडफाड विश्लेषण करता, ज्या नाटकामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तीळमात्रही फरक पडत नसतो.
विश्वचषकाप्रमाणेच गोव्याचे राजकारण म्हणजे केवळ एक तमाशा आहे, एक चमत्कार, प्रचंड गोंधळ, ओरडणारे फॅन्स, दारूच्या नद्या, न संपणारे वाद, हाणामाऱ्या आणि झगमगाट! पण या दोन्हीत एकच मोठा फरक आहे... फुटबॉल खेळ दर चार वर्षांनी जिवंत होतो, सुधारतो. तर आपला गोवा मात्र अधिक खात्रीने, दर पाच वर्षांनी स्वतःच्या विनाशाकडे आणि अधोगतीकडे वेगाने चालला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.