

सुलक्षा गावस
सणांची परंपरा टिकून राहण्यामागे भक्तिभाव आणि माणसांना एकत्र आणणारी ही भावनिक गरजही आहे.‘गावी गेल्यावर सगळे भेटणार ही नुसती चाहूलही खूप काही देऊन जाते’. कुटुंब, नाती आणि समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी अशा सामूहिक अनुभवांचे महत्त्व मोठे आहे.
सणासुदीच्या दिवसात वातावरणात एक वेगळा उत्साह संचारतो. देवाच्या सान्निध्यात भजन-पूजनात रममाण झालेली लहान-थोर मंडळी, उत्साहाला आलेले उधाण आणि पाहुण्यांची वर्दळ, कामाची लगबग, जेवणाच्या पंगती या सगळ्यात रोजच्या धावपळीचा शीण कुठेतरी मागे पडतो. सण म्हणजे भक्तिभाव, परंपरा याचबरोबर तो नाती जोडणारा,टिकविणारा एक हळवा दुवाही असतो. पूजा अर्चा, जेवणावळी आटोपल्यावर ओसरीवर, घरातल्या एखाद्या कोपऱ्यात गप्पा रंगतात. अशा निवांत क्षणी जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. ‘तुला हे आठवतंय का?’, ‘अरे, गेल्यावर्षी भजनाला जातानाचा तो किस्सा आठवतो का ?’ आणि मग सगळ्यांचा एकच पिकलेला हशा! एखादी जुनी आठवण निघते आणि तिच्याशी जोडलेली दुसरी, तिसरी आठवण अशी आपोआप एक भावनिक शृंखला गुंफली जाते..
या जुन्या आठवणीत रममाण होण्याला स्मरणरंजन किंवा ‘नॉस्टॅल्जिया’ हा शब्द आहे. भूतकाळातील एखादा किस्सा पुन्हा आठवताना मनात केवळ भूतकाळाची हुरहूर निर्माण होत नाही, तर त्या काळाशी जोडलेली माणसं, नाती आणि भावनाही पुन्हा जाग्या होतात. म्हणूनच एखादा जुना फोटो, घरातील एखादा कोपरा, जुन्या वस्तू किंवा एखादा परिचित वास आपल्याला जणू क्षणभर ‘टाइम मशीन’मध्ये बसवून भूतकाळात घेऊन जातो. आठवणी नेहमीच सुखद असतात असे नाही. काही आठवणी कटू असतात; पण काळ जसजसा पुढे सरकत जातो, तसतशी काही अंशी त्या प्रसंगामागची कटुता कमी होते. एखादं दुरावलेले नातंही अशा प्रसंगी पुन्हा सावरतं. मानसशास्त्रीयदृष्ट्या पाहता, आठवणी म्हणजे केवळ घटनांची नोंद नसते; त्या भावनांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे एखादा जुना प्रसंग आठवताना त्या काळातील भावना थोड्याफार प्रमाणात आपण अलगद पुन्हा अनुभवतो.
अशीच एक लहानग्या बरोबरची आठवण गप्पांच्या ओघात आली. घरातले एक मूल फटाक्यांवरून दंगा करत होते. रागाच्या भरात त्याच्या वडिलांनी ते दूर भिरकावले आणि त्यामुळे ते बाळ आणखीनच कावले. चतुर्थीच्या दिवशी त्याच घरातील त्या कोपऱ्याकडे पाहताना बाप-लेकाला तो प्रसंग पुन्हा आठवला. विशेष म्हणजे त्या मुलाची छोटी चुलत बहीण आपल्या भावाला वाईट वाटले आहे हे जाणून फटाके गोळा करण्यासाठी धावली होती. वर्षानुवर्षांनंतर हा प्रसंग आठवताना त्या छोट्याशा कृतीत दडलेल्या भावंडांच्या प्रेमालाही दुजोरा लाभत असे. यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते जुन्या आठवणी फक्त किस्से ताजे करत नाहीत; त्या आपल्या नात्यांची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत, याचीही साक्ष देतात. ‘आपल्या दये मायेचं कुणीतरी आहे’ ही भावना, मानवी भावविश्वातील अत्यंत महत्त्वाची गरज मानली जाते. मास्लोव यांच्या मानवी गरजांच्या शिडीत या भावनेला विशेष महत्व आहे. कुटुंबासोबतच्या आठवणी ही भावना अधिक दृढ करतात.
रोज न भेटणारी माणसं सणाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यांच्या ऋणानुबंधांवर जणू ओलाव्याचे शिंपण होते. एकत्र जेवणे, गप्पा मारणे, जुन्या आठवणी काढणे, हसणे,या साध्या गोष्टी मनाला भावनिक आधार देतात.यातून थोडी नात्यांची डागडुजीही होते. शिक्षण, नोकरीसाठी दूरदेशी गेलेली मंडळी अशा वेळी काही काळ आठवणींनी हळवी झाली तरी या आठवणींचाच फार आधार वाटतो. गेल्या वर्षी आपण एकत्र कशी मजा केली होती, कोण काय बोलले होते, कोणत्या गोष्टीवर सगळे हसले होते हे आठवून मनाला समाधान मिळते. प्रत्यक्ष सणाला घरी येता आले नाही तरी आठवणींच्या माध्यमातून माणूस त्या वातावरणाशी जोडलेला राहतो. आजच्या मोबाईल आणि व्हिडिओ कॉलच्या युगात सण प्रसंग कॉल वरून थोडाफार अनुभवता येतो.
नॉस्टॅल्जियाचे हेच एक सुंदर वैशिष्ट्य आहे.ते भूतकाळात घेऊन जाते, पण वर्तमानाला आधार देते. संशोधनानुसार सकारात्मक नॉस्टॅल्जिया माणसाला सामाजिक जोडलेपणाची भावना देऊ शकते, एकटेपणा कमी जाणवण्यास मदत करू शकते आणि भविष्यातील आशावादालाही चालना देऊ शकते. भूतकाळातील ‘आपली माणसं’ आठवली की वर्तमानातही आपण एकटे नाही, ही जाणीव मनाला उभारी देते. म्हणूनच एखाद्या जुन्या आठवणीवर हसताना आपल्या मेंदूत केवळ भूतकाळाची चित्रफीत चालू नसते; त्या आठवणीशी जोडलेल्या भावनाही पुन्हा सक्रिय होत असतात. आनंद, आपलेपणा, सुरक्षितता यांचा अनुभव पुन्हा जागा होतो. म्हणूनच काही आठवणी कित्येक वर्षांनीही मनाला ताजेतवाने करून जातात.
सणांची परंपरा टिकून राहण्यामागे भक्तिभाव आणि माणसांना एकत्र आणणारी ही भावनिक गरजही आहे. ‘गावी गेल्यावर सगळे भेटणार ही नुसती चाहूलही खूप काही देऊन जाते’. कुटुंब, नाती आणि समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी अशा सामूहिक अनुभवांचे महत्त्व मोठे आहे. उदरनिर्वाह, पैसा आणि प्रतिष्ठा यांच्या पलीकडेही एक जग असते, माणसांचे, भावनांचे,आठवणींचे आणि हे जगच आपल्याला आंतरिक समाधान देत असते. ‘या चतुर्थीची आठवण कायम राहील!’ अशी थट्टा-मस्करी करत, प्रत्येक जण त्या दिवसाच्या आठवणींचे एक गाठोडे मनात घेऊन पुन्हा आपल्या रोजच्या जगण्यात रमून जातो. पण त्या गाठोड्यात केवळ भूतकाळ नसतो; त्यात पुढच्या भेटीची आस, नात्यांची ऊब आणि पुन्हा एकदा सगळे मिळून सण साजरा करण्याची आशाही दडलेली असते. सण आणि क्षण सरतात, माणसं आपापल्या वाटेने निघून जातात; पण सणासुदीतले स्मरणरंजन मात्र पुन्हा भेटीगाठी होईपर्यंत ऊर्जा देत राहते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.