विकासाच्या हव्यासात निसर्गाचा श्वास गुदमरतोय!

Environment Protection: मानवाच्या विकासाचा प्रवास हा निसर्गाच्या संपत्तीवरच उभा आहे; मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि अमर्याद उपभोगामुळे त्याच निसर्गचक्रावर घाला घातला जात आहे.
Environment Protection
Environment ProtectionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मधू य. ना. गावकर

मानवाच्या विकासाचा प्रवास हा निसर्गाच्या संपत्तीवरच उभा आहे; मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि अमर्याद उपभोगामुळे त्याच निसर्गचक्रावर घाला घातला जात आहे. पर्यावरणाचे संतुलन ढासळले, तर त्याची किंमत केवळ माणसालाच नव्हे, तर पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला मोजावी लागणार आहे.

अनेक शास्त्रज्ञांनी जगातील मानवप्रजातीचे वर्गीकरण केले आहे. त्यात सुशिक्षित समाज अनेक व्यवसायांत गुंतलेला आढळतो. विविध क्षेत्रांत संशोधन करून त्याने स्वास्थ्य, शांतता आणि समृद्ध विकास साधलेला पाहावयास मिळतो. जगात सुशिक्षित समाजाप्रमाणे अशिक्षित, मागासलेला, रानटी अवस्थेतील समाजही आज पाहावयास मिळतो. अजूनही मानवी गटांच्या रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, धर्मभोळेपणा आणि विविध संकल्पनांवर तो जीवन कंठीत आहे.

हा समाज दाट जंगले, उष्ण वाळवंटे, अतिओसाड प्रदेश आणि डोंगराळ भागांत वावरताना पाहावयास मिळतो. माणसाला आपल्या गरजा सहज आणि सुलभपणे निसर्गात ज्या ठिकाणी भागविता येतात, तिथे तो समृद्ध विकासाच्या दिशेने वाटचाल करतो. मागासलेला समाज एकाच प्रकारचा व्यवसाय करून आपल्या दैनंदिन गरजा भागवतो.

Environment Protection
Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

आपल्या उदरनिर्वाहासाठी तो शेती व्यवसायात उतरून काम करतो आणि आधुनिक शास्त्रीय पद्धतीने शेतीतून मुबलक प्रमाणात उत्पादन घेतो. त्याचबरोबर शिकार करणे, फळे-फुले गोळा करणे, मासेमारी आणि पशुपालन हे जोडव्यवसायही अविकसित माणसांकडून केले जातात. त्यातून तो आपली श्रीमंती वाढवतो.

मानव जन्मास आल्यानंतर हळूहळू आपला विकास साधत सहा भागांत विभागला गेला. नेग्रीटो, प्रोटो-ऑस्ट्रोलॉईड, भूमध्यसागरीय, अल्पाईन, नार्डिक आणि मंगोलॉईड अशा गुणधर्मांनी तो पृथ्वीवर विविधांगी बनला आहे. सुधारलेला समाज आणि मागासवर्गीय समाज यांच्यात जरी दरी असली, तरी गरज आहे ती विकसित समाजाने अविकसित समाजाला कष्टाच्या खाईतून वर काढण्याची. त्यासाठी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि विज्ञाननिष्ठता या गोष्टींवर भर दिला पाहिजे.

आज चहूबाजूंनी वणवा पेटला आहे. तो चार थेंबांनी विझणार नाही; त्यासाठी झरी आणि तलावांची गरज आहे. हे काम केले नाही, तर कालांतराने सारेच जळून खाक होईल. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. त्यात माणूस विविधांगी बुद्धी आणि शक्तीवान असल्याने पृथ्वीवरील सारेच आपले, असे म्हणत जमा करण्याच्या आवेशाने वावरत आहे. त्याला पृथ्वीची वसुंधरा तरी काय करणार? पर्यावरणातील प्रत्येक घटक पृथ्वीने नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे, न थांबता करीत असतो आणि माणूस त्यांच्या कामावर घाव घालतो.

झाडांची हिरवी पाने सूर्यकिरणांच्या साहाय्याने कार्बनवायू शोषून घेतात आणि माणसासाठी प्राणवायू सोडतात. ही निसर्गाच्या कामाची किमया आहे. आदिमकाळी माणसाची लोकसंख्या कमी होती आणि इतर प्राण्यांची संख्या जास्त होती. तेव्हा माणूस जळणासाठी झाडांच्या वाळलेल्या फांद्या आणि अन्न शिजवण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करीत होता.

हल्लीच्या दोन शतकांत माणसांची संख्या समुद्री माशांप्रमाणे वाढत जाऊन, इतर प्राण्यांवर विविध बंधने लादत त्या मूक प्रजातींची संख्या कमी केली. ज्ञानी माणूस आपल्या अन्नासाठी सागरी मासळी, वन्य पशू-पक्षी आणि पाळीव जनावरांचे मुडदे पाहून जिभेचे चोचले पुरवीत आपली भूक भागवतो.

लोकसंख्या वाढीने निवाऱ्यासाठी वृक्षवल्लीवर घाव घालून आपल्यासाठी मिळणारे पाणी आणि प्राणवायू नष्ट करतो. नरसिंहाने हिरण्यकशपूचे पोट फाडल्याप्रमाणे पृथ्वीच्या अंगावरील आभूषणे खनन करून लोखंड, अग्निधातू, लाल माती यांचे उत्खनन करीत हिरवी वसुंधरा नष्ट करत तिच्या अंतरातील द्रव लुटतो. अशाने स्वतःभोवती फिरताना तिचा तोल ढासळून ती सुनामी, वादळे, महापूर, हिमवादळे, उष्णतावाढ अशा संकटांना सामोरी जात प्रवास करते.

Environment Protection
Goa Politics: युतीच्या गोष्टी केवळ वाऱ्यावर, वेणुगोपाल यांच्या बैठकीत 'गोवा राखण यात्रे'वरच चर्चा

अशी संकटे आल्यावर माणूस त्यात होरपळतो; पण पृथ्वीचे तापमान सांभाळण्याचे काम करणाऱ्या इतर प्राण्यांचा नाहक बळी जातो. पृथ्वीच्या ज्या भागात सजीव राहतात, त्याला ‘जीवमंडल’ हे नाव माणसानेच दिले. त्या परिसरात प्रकाश, हवा, प्राणी आणि वनस्पती यांचे उत्पत्तिसंबंध पूर्वकाळापासून चालत आले आहेत. अशा घटकांच्या भू-जैविक दृश्याला पर्यावरण म्हणतात. सजीव आणि निर्जीव यांच्या संबंधातून जे दृश्य निर्माण होते, ते निसर्गनियमाने चक्रीयपणे चालते. त्याला परिसंस्था म्हणतात. त्याच्या मुळाशी निसर्गचक्राचे तत्त्व आहे. त्या तत्त्वात वनस्पतीचे स्थान मोठे आहे. त्या अस्तित्वावर माणसासह इतर सजीवांचे जन्म-मरण अवलंबून असते.

पृथ्वीच्या अंगावर गेल्या शतकापासून आजपर्यंत अनेक देशांत युद्धे झाली. त्यात जे मेले ते बिचारे सुटले; जे जिवंत राहिले, ते मरणप्राय यातनांना तोंड देत जगत आहेत. अशाने पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून सर्व सजीवांना त्याची किंमत मोजावी लागते. याचा विचार फक्त माणूसच करू शकतो.

कारण त्यानेच पर्यावरणाच्या नियमांचा आणि शास्त्राचा मार्ग शोधण्यास सुरुवात केली. १९६० साली त्याचे डोळे उघडले आणि पर्यावरणशास्त्राचा विषय प्रचलित झाला. या पर्यावरण शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. वनस्पतिशास्त्राबरोबर भौतिक, रासायनिक, भूगर्भ, भूगोल, हवा, पाणी, जैविक संपत्ती अशा सर्व विषयांचा अभ्यास करून प्रगतीचा विकास साधला पाहिजे.

पूर्वकाळी जमीन वापराचे नियोजन शाश्वत विकासाच्या तत्त्वाने केले जात होते. नंतरच्या काळात लोकसंख्या वाढीने अशा विकासाला फाटा देण्यास सुरुवात झाली. यंत्रसामग्री निर्माण करून भूगर्भातील रसायनांचा उपसा, कारखान्यांना वीजपुरवठा करण्यासाठी नद्यांवर धरणे, त्या धरणांच्या पाण्यावर कालवे निर्माण करणे, वाहत्या नद्यांचे प्रवाह बंद करून त्यातील पाणी खेचणे अशा लालची वृत्तीने निसर्गचक्रातील आभूषणे बाहेर फेकल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे.

तापमानवाढ हा पृथ्वीचा भावस्पर्शी विषय आहे. त्यात क्षेपणास्त्र निर्मिती आणि चाचण्यांमुळे ओझोन वायूच्या क्षयाची समस्या निर्माण होते. अशाने जमीन, हवा आणि पाणी यांत मोठे बदल घडतात. हे सांगण्याचे काम शास्त्रज्ञ करीत आहेत. पृथ्वीच्या भूमीपासून सुमारे १,६०० किलोमीटरपर्यंत तिचे रक्षण करणारे वातावरणाचे विविध थर कल्पिले असून ते तपांबर, स्थितांबर, मध्यगोलाकार, दलांबर आणि बाह्यावरण या नावांनी ओळखले जातात. त्यांच्या कप्प्यांत नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, आरगॉन, बाष्प आणि धुळीचे कण आढळतात.

तिच्या साधनसंपदेचे दोन प्रकार मानले आहेत, पुनर्नवीकरणीय आणि अपुनर्नवीकरणीय. त्यातून तिच्या चक्रामुळे पाण्याची निर्मिती आणि वनस्पतींच्या सृजनातून प्राणवायूची निर्मिती होते. म्हणूनच आजपर्यंत माणूस जगला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com