
‘भिवपाची गरज ना’, असे आपले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत नेहमी सांगतात. त्यांचा हा ‘डायलॉग’ सध्या लोकप्रियही ठरत आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे तो आपल्या ठिकाणी उचितही ठरतो. ‘जो डर गया समझो मर गया’ हा शोले चित्रपटातील संवाद असो वा ‘जीवन मे तू डरना नही’ हे ‘खोटे सिक्के’ चित्रपटामधले गाणे असो, हाच संदेश देतात. पण राज्यातील सध्याची स्थिती मात्र ‘भिण्याची गरज आहे’ असे सांगत आहे.
राज्यात एका मागोमाग एक गुन्हे घडायला लागल्यामुळे लोकांची पाचावर धारणा बसणे साहजिकच आहे. गेल्या आठवड्यात म्हापसा येथील दरोडा तर कोणालाही हादरवून टाकणारा असाच होता.
मध्यरात्री तीन ते पाच वाजेपर्यंत हे दरोडेखोर त्या डॉक्टरांच्या घरात मुक्काम ठोकतात, चहासुद्धा पितात आणि पोलिस मात्र याबाबत अनभिज्ञ असतात या सगळ्या घटना मेंदू कुरतडून टाकणाऱ्याच. यातून दरोडेखोरांना पोलिसांचे, कायद्याचे भय राहिलेले नाही हेही सुचित होते. गुन्हा झाल्यानंतर गुन्हेगारांना पकडण्यापेक्षा गुन्हा होऊ नये याची दक्षता घेणे महत्त्वाचे असते.
पण आज गुन्हा झाल्यानंतर पोलीस जागे व्हायला लागले आहेत. पूर्वी शहरातील रस्त्यातून रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असायची. कोणीही संशयास्पद रीतीने फिरताना दिसला, की त्याला अटक केली जायची.
त्यामुळे गुन्हेगारांवर वचक असायचा. पण आता ‘रात्रीची गस्त’ हा शब्द इतिहासजमा व्हायला लागला आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांपेक्षा गुन्हेगारच अधिक संख्येने फिरताना दिसायला लागले आहेत. त्यांना विचारणारा कोणी आहे, असे दिसतही नाही.
पूर्वी याच गोव्यात आम्ही उन्हाळ्यात उष्णता वाढू लागली की दरवाजे सताड उघडे करून झोपायचो. ही गोष्ट आज अनेकांना दंतकथेसारखी वाटू लागली आहे. पण ती गोष्ट आम्ही आमच्या बालपणात अनुभवली होती हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
आज खिडक्यांना, दरवाजांना मजबूत ग्रील्स असूनसुद्धा चोरटे घरात ‘एन्ट्री’ मारताना दिसायला लागले आहेत. याला ‘कालाय तस्मै नमः’ म्हणावे, की कायदा सुव्यवस्थेचे सुरू असलेले धिंडवडे म्हणावे हेच कळेनासे झाले आहे.
रामा काणकोणकर मारहाण प्रकरणाबाबतही हेच म्हणावे लागेल. त्यांच्या मारहाण प्रकरणामागे कोण आहे यापेक्षा त्याला मारहाण झाली हे महत्त्वाचे. गुंडांच्या ठायी त्यांना मारण्याइतपत धैर्य निर्माण होऊ शकले हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे.
याचा अर्थ आज कोणीही कोणाला मारू शकतो, कोणीही कोणाला लुटू शकतो असाच होतो. मुलींचे अपहरण, त्यांचा विनयभंग, लहानसहान चोऱ्यामाऱ्या, धमक्या, ज्येष्ठ नागरिकांची सतावणूक यांसारखे प्रकार तर ‘नेमीचि येतो मग पावसाळा’ या प्रकारातले झाले आहेत.
विशेष म्हणजे अशा प्रकरणात पीडित पोलिसांची मदत घ्यायला ‘कां’, ‘कूं’ करताना दिसत आहे. यातून जनतेचा कायद्यावरचा उडत चाललेला विश्वास प्रतीत होत आहे. हीच तर मोठी शोकांतिका आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हांला ‘भिवपाची गरज ना!’
असा जो संदेश दिला आहे त्याचे स्वागत करत असताना या संदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होते का, याकडेही मुख्यमंत्र्यांनी बघायला हवे असे सुचवावेसे वाटते. आज राज्यातील नागरिक खास करून ज्येष्ठ नागरिक ज्या प्रकारे धास्तावले आहेत त्यांना दिलासा देण्याकरता प्रयत्न व्हायला हवेत असेही सांगावेसे वाटते.
‘जिसकी लाठी उसीकी भैंस’ अशी सध्या राज्यात जी स्थिती बनायला लागली आहे, तिच्यावरही नियंत्रण ठेवण्याचे बघितले पाहिजे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याकरता यंत्रणा कार्यक्षम करण्यावर कटाक्ष ठेवला पाहिजे.
रवि नाईकांचा मुख्यमंत्रिपदाचा ‘तो’ काळ आठवून आज काहीही साध्य होणे शक्य नाही. इतिहास हा शिकण्याकरता ठीक असतो, पण इतिहासावर राज्य चालू शकत नाही किंवा वस्तुस्थितीही बदलू शकत नाही हेही तेवढेच खरे आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांचा ‘भिवपाची गरज ना!’
हा संदेश अमलात आणण्याकरता शासनाने कायदा सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी जाग्यावर आणण्याचे प्रथम बघितले पाहिजे. अन्यथा राज्यातील नागरिक ‘सध्या भिण्याची गरज आहे’, असे जे म्हणतात ते मागच्या पानावरून पुढे चालूच राहील हे निश्चित!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.