Goa Politics: खरी कुजबुज; मायकल नव्या भूमिकेत

Khari Kujbuj Political Satire: म्हापशात दरोडा पडला आणि चोरटे पसार झाले. पोलिसांनी शेजारी राज्यात तसेच अन्य राज्यातून पाचजणांना जेरबंद केले असले तरी मुख्य संशयित म्हणजेच या प्रकरणातील मास्टरमाईंड अजून हाती लागलेला नाही.
Goa Latest Political News
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

मायकल नव्या भूमिकेत

कळंगुटचे आमदार मायकल लोबो स्वतःहून अनेक प्रश्न हातात घेतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी संघर्ष करतात. सत्ताधारी आमदार असल्याचे विसरायला लावणारा अभिनिवेश धारण करत वक्तव्येही करतात. टॅक्सीवाल्यांचे तारणहार अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली होती. मोपा विमानतळावरील वाद मिटवताना मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला चाणाक्षपणा लोबो यांना चकीत करून गेला आहे. यामुळे त्यांनी आता खासगी बसवाल्यांचा प्रश्न हाती घेतला आहे. त्यांचे थकीत अनुदान लवकर द्यावे, व्याजरहित कर्ज द्यावे अशा मागण्या लोबो यांनी पुढे आणल्या आहेत. याच आठवड्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरून प्रशासनावर तोंडसुख घेणाऱ्या लोबो यांनी शनिवारी आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे. यामुळे मायकल नव्या भूमिकेत दिसतील अशी चर्चा आहे. ∙∙∙

‘त्या’ गाडीवर खरेच कारवाई होणार?

म्हापशात दरोडा पडला आणि चोरटे पसार झाले. पोलिसांनी शेजारी राज्यात तसेच अन्य राज्यातून पाचजणांना जेरबंद केले असले तरी मुख्य संशयित म्हणजेच या प्रकरणातील मास्टरमाईंड अजून हाती लागलेला नाही. जे सापडले आहेत, ते त्याचे म्हणे साहाय्यक आहेत. दरोड्यातील संशयितांना गोव्याबाहेर सटकण्यास मदतरूप ठरलेल्या गाड्या म्हणे पोलिसांना सापडल्या आहेत. त्यातील एक गाडी त्यांनी म्हणे भाड्याने नेली होती. कायद्यानुसार तो गुन्हा असून त्यानुसार लगेच परवाना रद्द होतो, पण अजून तशी कारवाई झालेली दिसत नाही की एरवी आवाज उठविण्यास, तत्पर असलेल्या टॅक्सीवाल्यांनीही या प्रकरणी आवाज उठविलेला नाही, त्या मागील कारण काय असावे बरे. ∙∙∙

चर्चिल पुन्‍हा सज्‍ज!

राजकारणी हा संपतो, पण निवृत्त होत नाही, असे म्‍हणतात. बाणावलीचे इर्मांव चर्चिल आलेमाव यांना पाहिल्‍यास ही म्‍हण तंतोतंत खरी वाटते. चर्चिल यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली असून ते शेवटची निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. त्यासाठी ते बाणावलीतील मतदारांना आवाहन करीत ते पुन्‍हा एकदा रिंगणात उतरू पहात आहेत. त्‍यांचा दावा असा की, मागच्‍या चार वर्षात वेंझी व्‍हिएगस यांनी बाणावलीत काहीच न केल्‍याने बाणावलीचा विकास खुंटला आहे. बाणावलीचा विकास साधण्‍यासाठी म्‍हणे ते आता रिंगणात उतरत आहेत. ∙∙∙

दक्षिण गोव्‍यात ‘आप’ बॅकफूटवर

काँग्रेसबरोबर आम्हाला युती करायची नाही, अशी घोषणा केल्‍यानंतर गोव्‍यातील लोक खूष होतील, अशी कदाचित आम आदमीचे राष्‍ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांची कल्‍पना असावी. मात्र त्‍यांनी ही घोषणा केल्‍यानंतर लोकांमध्‍ये उलटी प्रतिक्रिया निर्माण झाली. सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजपला हरवावे, या संकल्‍पनेलाच केजरीवाल यांनी तडा दिला, अशा तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्‍या असून यात ख्रिस्‍तीबहुल मतदारसंघ आघाडीवर असल्‍याने सध्‍या दक्षिण गोव्‍यात ‘आप’चीच गोची झाली आहे. आता यातून बाहेर कसे पडावे? ही चिंता ‘आप’च्‍या नेत्‍यांना सतावू लागली आहे. अशातच राधाराव ग्रासियस यांनी ‘आप’वर भाजपधार्जिणा पक्ष असा शिक्‍का मारल्‍याने ‘आप’ची अगदीच पंचाईत झाली आहे. ∙∙∙

हा विजय कोणाचा?

‘फॉर्म्युला -४ रेस’च्या निमित्ताने मुरगावचे आमदार संकल्‍प आमोणकर व माजी आमदार मिलिंद नाईक यांच्यात विरोधी सुराचे मतैक्य झाले होते. अखेर सरकारने ती स्पर्धा दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. हा विजय कोणाचा? यावरून वास्कोत वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ही स्पर्धा बोगदा येथे आणण्यात तिसऱ्याचाच हात होता. त्याने सारी तयारी केली होती. त्याने हे करताना अनेकांना गृहीत धरले. त्यामुळे सारे चिडले. त्याची आमच्या मतदारसंघात दादागिरी खपवून घेऊ नये, असे वाटल्याने विरोधाचा एकत्रित सूर उमटला आणि सरकारला तूर्त एक पाऊल मागे टाकावे लागले आहे, असा त्या चर्चेचा सूर आहे. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; गोंयकारपणाची ऐशी-तैशी

हेलपाट्यांचे कारण!

सरकारने जनतेची कामे वेळेवर व्हावीत, यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब दैनंदिन प्रशासनात केला. विविध खात्यांनी ऑनलाइन पद्धती अंगवळणी पाडून घेतली. उपनिबंधक कार्यालय हे दररोज जनतेच्या संपर्कात असणारे कार्यालय. दस्तवेजांची नोंदणीसह विवाह नोंदणीपर्यंत सारे काही याच कार्यालयाच्या छताखाली चालते. तेथे अंगीकारण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीमुळे दस्तावेज नामंजूर होण्याचे प्रकार वाढल्याने जनतेला फेऱ्या मारण्याची वेळ आल्याची तक्रार आहे. विशेषतः पणजी उपनिबंधक कार्यालयात असा प्रकार घडतो, असे सांगण्यात येते. त्यामुळे संगणकीकरण हेही हेलपाट्यांचे कारण असू शकते अशी चर्चा आहे. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

पेडण्यातील राजकारणात तरंग

पेडणे मतदारसंघातून सत्ताधारी वर्तुळाला निकटवर्तीय असलेला एक अधिकारी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचा भांडाफोड खरी कुजबूजच्या माध्यमातून झाल्यावर तो अधिकारी कोण हे शोधणे अनेकांनी सुरू केले आहे. नावाशी पेडण्यातील गावांशी साधर्म्य असलेल्यांवर आधी संशय घेतला गेला आहे. त्यानंतर पेडण्यात काम करून नंतर बढतीवर इतरत्र गेलेल्या अधिकाऱ्यांची नावेही या निमित्ताने चर्चेत आहेत. त्‍यातच एका नगरसेवकाला पुढील निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी काहींचे प्रयत्न होते. त्यासाठी चाचपणीही सुरू केली होती. त्यातच या आर्थिक ताकद असलेल्या अधिकाऱ्याचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांचे तरंग पेडण्यातील राजकारणात उठू लागले आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com