
पणजी: राज्य सरकारने २०१६ मध्ये धारगळ येथे दिलेल्या २३५ एकर जमिनीचा आयआयटी व्यवस्थापनाने विचार केला असता, तर हा प्रकल्प राज्यात याआधीच उभा राहिला असता. व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणामुळेच हा प्रकल्प अद्याप रेंगाळल्याची माहिती सरकारी सूत्रांनी सोमवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
नियोजित आयआयटी प्रकल्पाचा वाद राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. धारगळनंतर सरकारने या प्रकल्पासाठी प्रथम काणकोणची निवड केली होती. परंतु, स्थानिकांनी दर्शवलेल्या विरोधामुळे हा प्रकल्प तेथून सांगेत वळवण्यात आला. सांगेतील विरोधानंतर आयआयटी सत्तरी तालुक्यातील शेळ–मेळावलीत उभारण्याचे नियोजन करण्यात आले.
तेथेही स्थानिकांनी प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलन छेडल्यानंतर हा प्रकल्प पुन्हा रिवण–सांगे येथे उभारण्याचे निश्चित करण्यात आले. तेथे प्रक्रिया सुरू असताना आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादनाची अधिसूचना जारी केलेली असताना, या प्रकल्पासाठी कोडार येथे जागा निश्चित केली गेली. त्यावरून स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हा प्रकल्प कोडारमध्येही न उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला.
या पार्श्वभूमीवर, आयआयटी प्रकल्प रेंगाळण्यास राज्य सरकार नाही, तर आयआयटी व्यवस्थापन जबाबदार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या धारगळमधील ज्या जागेत आयुर्वेद इस्पितळ उभे आहे, तीच २३५ एकर जागा २०१६ मध्ये सरकारने आयआयटीसाठी दिलेली होती. परंतु, आयआयटी प्रशासनाने तिथे प्रकल्प उभारण्यास नकार दिला.
कोडारमधून आयआयटी प्रकल्प हलवल्यानंतर सरकारने आता फर्मागुढीतील जागेचा विचार सुरू केला असल्याचेही सूत्रांनी सांगितले. मंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्यासह फोंडा तालुक्यातील अनेक नेत्यांनी ‘आयआयटी’ कॅम्पस फर्मागुढीत उभारावा, अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेतली जाणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.