अग्रलेख: सर्व संकल्पांची सुरुवात नारळ वाढवून होते, मात्र 'नारळाचे आरोग्य' वाढवायची गरज सुशेगाद गोव्‍यात कुणाला वाटलेली नाही..

Goa Coconut Conclave: परिषद घडवण्‍याचे दायित्‍व आम्‍ही बजावले आहे. तेथे सरकारचे कृषिदूत चिंतेतून चिंतन करतील, अशी आशा आहे. कार्यवाहीतला विलंब हा घात वा अपघात घडवू शकतो.
Coconut Day
coconut treeDainik Gomantak
Published on
Updated on

सत्त्वगुणी मोदकात, रजोगुणी पोह्यांवर आणि तमोगुणी कांदा-लसणासोबत तन्मयतेने वावरणारा नारळ माशाच्‍या कढीतही मनसोक्‍त डुंबतो अन् जिभेचे यथेच्‍छ चोचले पुरवतो. गोंयकार आणि नारळाचे बंध निराळेपणाने सांगण्‍याची आवश्‍‍यकता नाही. परंतु एप्रिल-मे मध्‍ये खिसा गरम करणाऱ्या आंब्याच्या तब्येतीची चर्चा होते, तशी नारळावर संकट असून त्याची मात्र फार गांभीर्याने चर्चा होत नाही.

गरजेचा विचार केला तर आंबा थोडे चैनीकडे झुकलेले तर नारळ मूलभूत गरजेकडे झुकलेले फळ आहे. देवाच्या भक्तीपासून खाण्याच्या आसक्तीपर्यंत समांतर असणारे हे नुसते फळ नाही, तर श्रीफळ आहे. सर्व संकल्पांची सुरुवात नारळ वाढवूनच होते. मात्र, नारळाच्या आरोग्याला वाढवायची गरज सुशोगाद गोव्‍यात कुणाला वाटलेली नाही, हे दुर्दैव. नवनवीन रोग आणि उपभोगातून वा उपयोगातून जमिनीतली पोषणमूल्य कमी झाल्याने नारळाचे जीवनही धोक्यात आहे.

दखल आणि बेदखल ही मानवी चूक आहे. ज्याचे कोवळेपण आजारात देहाचे निर्जलीकरण थांबवते आणि ज्याचे वठलेपण तेल होऊन शांती देते, त्याची प्रचंड उपेक्षाच होतेय, असे जाणवते. गत दहा वर्षांत राज्‍यातील नारळाचे उत्‍पादन कमालीचे घटले आहे. केवळ गोवाच नाही तर लगतच्‍या कर्नाटक, महाराष्‍ट्र, तामिळनाडूमध्‍येही फारशी निराळी स्‍थिती नाही. उपरोक्‍त राज्यांच्या खाद्यसंस्कृतीचा पायाच तर नारळ आहे.

या पायाकडे लक्ष देणे वर्तमानातली गरज आहे. जी गोष्ट चुकून भूतकाळात गेलीय म्हणून भविष्याला धोका आहे. त्‍यासाठीच तातडीने वर्तमानात चळवळ होणे आवश्यक होते. त्‍याची सुरवात ‘गोमन्‍तक’ने केली आहे. राज्‍य सरकारच्‍या साह्याने आज दोनापावल येथे होणाऱ्या ‘गोमन्‍तक-ॲग्रोवन’ आयोजित राष्‍ट्रीय नारळ परिषदेत कृषितज्‍ज्ञ, शेतकरी एकत्र येतील. अनुभव, ज्ञान, निरीक्षणाची देवाणघेवाण होईल. नारळ उत्‍पादन वृद्धीचा उपाय त्‍याद्वारे दृष्टिपथात येईल, असा आम्‍हास विश्‍‍वास आहे.

बदलाच्‍या कृतीत प्रारंभ महत्त्वाचा. नारळाबाबतही व्‍यापक जागरूकता निर्माण झाल्‍यास ते एक उत्तम परिवर्तन ठरेल. राज्‍यात २०१९-२० मध्‍ये प्रतिहेक्‍टर सरासरी ६,२९३ नग नारळ उत्‍पादन होते; जे २०२४-२५मध्‍ये ५,६२५वर येऊन ठेपले, ही झाली सरकारी आकडेवारी! साधारणत: सात टक्‍के उत्‍पादन घटले, अशीही आकडेमोड अधिकारी करतात. परंतु शेतकरी, बागायतदारांचे निरीक्षण निराळे आहे. अलीकडे उत्‍पादनात जवळपास निम्‍म्‍याने घट झाल्‍याचा त्‍यांचा सूर कृषी खाते आणि शेतकऱ्यांतील ‘दरी’ दर्शवते. हे अंतर आजच्‍या परिषदेत दूर करण्‍याचा प्रामुख्‍याने प्रयत्‍न असेल.

सद्यःस्थितीत राज्‍यात दररोज किमान ६० हजार नारळ आयात करावे लागतात. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्‍यानेच ‘स्‍वयंपूर्ण’ मोहीम यशोशिखरावर असूनही नारळासंदर्भात परावलंबी बनावे लागत आहे. जंगली अधिवास दुर्मीळ झाल्‍याने खेती, माकडांचा वाढता उपद्रव नारळाच्‍या मुळावर आला आहे. सत्तरी तालुक्‍यातून तशी सातत्‍याने ओरड ऐकू येते. भूतदया जपताना होणाऱ्या नुकसानीचाही सरकारला विचार करावा लागेल.

‘रेड माईट’ ह्या कीड रोगाने माडांना प्रचंड कमकुवत बनवलेय. सुईच्‍या टोकावर राहील इतक्‍या लहान आकाराचे लाल कोळी दिवसात ४०० पिल्‍ले जन्‍माला घालतात. अणुप्रमाणे त्‍यांची संख्‍यात्‍मक व्‍याप्‍ती झपाट्याने वाढते, झाडांचा रस शोषणे हे त्‍याचे उपद्रवी कार्य. ज्‍यामुळे नारळ आकसतात, त्‍यांचा आकार लहान होतो. समस्‍येवर ठोस उपाय अमलात आलेला नाही.

राज्‍यात जमिनीतील ‘सेंद्रीय कर्ब’चे प्रमाणदेखील खालावले आहे, त्‍याचा परिणाम नारळ उत्‍पादनावर बराच झालाय. ‘सेंद्रीय कर्ब’ हा जमिनीचा सुपिकता निर्देशांक मानला जातो. देशात साधारणतः ६७ टक्के जमिनीत सेंद्रीय कर्ब कमी आहे. गोव्‍यात ह्यात एकसमानता नक्‍कीच नाही; पण कर्ब (कार्बन) कमी होण्‍याचे प्रमाण वाढत आहे, ज्‍यावर कृषी खात्‍याने प्रकाश टाकण्‍याची गरज आहे. भूजल पातळीशीदेखील त्‍याचा संबंध जोडला जातोय. जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरेसा पुरवठा करणे हा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा प्रभावी उपाय आहे.

Coconut Day
National Coconut Conclave: नारळ उत्‍पादनवाढीचा ‘रोडमॅप’! दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषद; तज्‍ज्ञ, शेतकऱ्यांच्‍या अनुभवांची देवाणघेवाण

अमेरिका सेंद्रिय अनुकरण करू लागली आणि आम्‍ही ‘रासायनिक’ बनलोत. भविष्‍यात सेंद्रिय कर्ब पातळी आणखी खालावल्‍यास केवळ माडच नाही तर पोषक अन्‍नद्रव्‍यांअभावी माती नावालाच (नापीक) उरेल. नारळ उत्‍पादन का घटले याचा आढावा घेताना कृषी खाते, अधिकारी आणि शेतकरी यांच्‍यात संवादी सेतू निर्माण होण्‍यासोबत संशोधनाला नॅनो तंत्रज्ञानाची जोड गरजेची आहे.

Coconut Day
Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

श्रीफळ उत्‍पादन घटण्‍यास पूरक अनेक कारणे आढळतील, त्‍यावर सामूहिक प्रयत्‍नांतून मार्ग निघू शकतो. परिषद घडवण्‍याचे दायित्‍व आम्‍ही बजावले आहे. तेथे सरकारचे कृषिदूत चिंतेतून चिंतन करतील, अशी आशा आहे. कार्यवाहीतला विलंब हा घात वा अपघात घडवू शकतो. एक टाका उसवताच शिवले तर उसवणारे अनेक टाके थांबवता येतात. लगेचच तरीही उपयोगी अंमलबजावणी ही काळाची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com