
सर्वेश बोरकर
गोव्यावर राज्य करणारे पोर्तुगीज, राजापूर आणि कारवार येथील इंग्रज आणि मलबार किनाऱ्यावरील डचांनी मसाले आणि तांदळाच्या व्यापारात मक्तेदारी व संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आपले नियंत्रण बसवलं होतं. युरोपियन लोकांची वाढती आक्रमकता आणि किनारपट्टीवरील त्यांचे नियंत्रण पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी मसाले, सुपारी, तांदूळ व इतर पिके भरपूर असलेल्या कोकण किनारपट्टीवर आपलं नियंत्रण मिळवण्याची योजना आखली.
आपल्या ताब्यात असलेले राज्य समुद्रावर आणि पुढे त्याद्वारे व्यापारी मार्गांवर राज्य करेल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मजबूत नौदलाची आवश्यकता भासू लागली होती. कोकण किनारपट्टी सुरक्षित करण्याच्या उद्देशाने, छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर १६५७ रोजी कल्याण-भिवंडी प्रदेश जिंकल्यानंतर राज्याची स्वायत्त शाखा म्हणून नौदलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांची जहाजबांधणी ही मराठ्यांसाठी नवीन संकल्पना होती आणि म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रयत्नात पोर्तुगीज अभियंत्याची मदत घेतली. त्यांनी आपल्या विश्वासू साहाय्यकांना गुप्तपणे हे तंत्र शिकण्यासाठी पाठवले जेणेकरून ते आपल्या नवीन ताफ्याची जहाज बांधणी भारतीय किनारपट्टी आणि इथल्या पाण्याला अनुरूप बनवू शकतील.
मराठ्यांच्या १८-२० छोट्या जहाजांचा ताफा कल्याणहून वसईकडे जाताना पाहून इंग्रजांना खूप आश्चर्य वाटले. हाच जहाजांचा छोटा पण अत्यंत कार्यक्षम आणि प्रगत ताफा पुढे १६६४पर्यंत पूर्ण नौदलात वाढला.
युरोपीय लोक मराठा नौदलाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून होते, परंतु त्यांची जहाजे आकाराने खूपच लहान दिसत असल्याने आणि मोठ्या युरोपीय जहाजांना मारक शक्ती जास्त असल्यामुळे ते बेफिकीर होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७पर्यंत उत्तर कोकण यशस्वीपणे ताब्यात घेतले आणि सिद्दींकडून तळ, घोसाळे, दांडा आणि राजापुरी ही गावे काबीज करून दक्षिण कोकणात सातत्याने प्रगती केली. कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग येथील भक्कम तटबंदी असलेल्या समुद्री किल्ल्यांसह कुलाबा ते मालवणपर्यंतचा पश्चिम किनारा आधीच आपल्या ताब्यात आल्याने, शिवाजी महाराजांनी सिद्दींचा तळ असलेल्या जंजिरा किल्ल्याकडे आपली नजर वळवली.
गोव्यातील पोर्तुगीज आणि विजापूरच्या अंतर्गत असलेल्या फोंडा आणि कारवारच्या दोन मोक्याच्या चौक्या शिवाजी महाराजांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून होत्या.
याच दरम्यान मसाले, तांदूळ आणि वनउत्पादनांमध्ये पाश्चिमात्य देशांशी मोठे व्यवहार करणारे मिरज, होन्नावर, भटकळ, बैंदूर, कुंदापूर, बसरूर आणि मंगळुरू यासारखी महत्त्वाची बंदरे असलेल्या किनारपट्टीवरील कर्नाटकात शिवाजी महाराजांनी आपला प्रदेश वाढवण्याचा व याही प्रदेशांवर नियंत्रण मिळवण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची इतक्या झपाट्याने विस्ताराच्या परिणामांची इंग्रजांना व युरोपीय लोकांना खरी भीती वाटू लागली होती.
बेदनूरच्या राज्य दरबारात अंतर्गत कलह उडाला तेव्हा पोर्तुगीजांनी बसरूर आणि मंगळुरू काबीज करण्याची संधी साधली, तर शिवाजी महाराजांनी भटकळ बंदरात चार छोटी जहाजे पाठवली आणि समुद्रमार्गे बारकुरवर छापा टाकला.
या मोहिमेवर शिवाजी महाराज कारवारमध्ये आपला अधिकार प्रस्थापित करू शकले नाहीत कारण त्यांना खवासखानामुळे विजापूरच्या सैन्याने रोखले होते, परंतु डचांना लवकरच मराठ्यांच्या आणखी एका हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी किल्ला बांधण्याची गरज भासू लागली.
फेब्रुवारी १६६५च्या सुरुवातीस, छत्रपती शिवाजीने आपल्या बलाढ्य सैन्यासह विजापूरच्या अंतर्गत अनेक शहरांवर हल्ला केला आणि त्याच्या सैन्याच्या जवळिकीने बेदनूरच्या केलाडी घराण्यातील सोमशेखर नायकला घाबरवले ज्याने वार्षिक खंडणी भरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडून संरक्षण मागितले.
त्यांनी शिवाजी महाराजांना बसरूर आणि गंगोली ही समृद्ध व्यापारी बंदरे पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्याची विनंती केली. बेदनुरच्या राजाच्या आमंत्रणावरून, छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ फेब्रुवारी १६६५ रोजी ८५ लहान गलबते ,३ छोटी जहाजे आणि ४,००० सैनिकांसह लहान नौदल रवाना केले. हल्ल्याची वेळ अमावास्येच्या पहिल्या आठवड्यात ठरलेली होती.
दर्यासारंग मयंक भंडारी, वेंताजी सारंगी आणि दौलत खान यांच्यासमवेत मालवणच्या खाडीतून त्यांनी आपल्या पहिल्या नौसैनिकांना मोहिमेला रवाना केले.
मुंबई बंदरावरील कारवायांवर हेरगिरी करण्यात व्यग्र असलेल्या पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्याच्या किनाऱ्यावरून मराठा नौदलाने शांतपणे पार केले, वेंगुर्ला येथे डचांना पळवून लावले गेले तसेच पोर्तुगीजांना पुन्हा वेठीस धरण्यात यश आले. नौदलाने उत्तर कर्नाटक किनाऱ्यावरून अरबी समुद्राच्या पाण्यावर सतत वेग घेतला आणि ४-५ दिवसांत २०० मैलांचे अंतर कापून कुंदापूरला पोहोचले.
बसरूर हे कुंदापूर खाडीच्या दक्षिणेकडील ५ मैल अंतरावर वसलेले आहे आणि शहरात प्रवेश करणे अत्यंत आव्हानात्मक होते. कारण समुद्राकडे जाणारा एकमेव रस्ता वाळूच्या मोठ्या ढिगाऱ्यांमुळे अडथळा आणत होता. युरोपीय दडपशाहीतून सुटका करून घेण्यासाठी आतुर असलेल्या कोकणी लोकांची शिवाजी महाराजांनी मदत घेतली, ते शक्य तितक्या कमी वेळेत शहरात घुसले आणि युरोपीय लोकांवर हल्ला न करता समुद्रात परतले.
१३ फेब्रुवारी १६६५च्या पहाटे पोर्तुगीजांना ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी’ च्या जयघोषाने जाग आली आणि मराठे तलवारी घेऊन जहाजातून उडी मारताना पाहून आश्चर्यचकित झाले. ५,०००-६,००० सैनिकांच्या पोर्तुगीज चौकीचा निर्णायक पराभव झाला आणि बसरूर येथे व्यापाऱ्यांना पोर्तुगीजांच्या गुदमरणाऱ्या तावडीतून मुक्त केले गेले.
लुटीत फक्त रोखच नाही तर कापड, धान्य, मसाले आणि घोडे यांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थानिक व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बेदनूरच्या राज्याच्या विनंतीला मान्यता देण्याचा मोठेपणा दाखवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखालील एकमेव नौदल मोहीम जी स्थानिक व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारी बसरूर मोहीम म्हणून प्रसिद्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.