

सर्वेश बोरकर
छत्रपती संभाजी महाराजांना पोर्तुगिजांच्या दुटप्पी धोरणाचा पहिल्यापासून अनुभव होता. मुघलांशी संधान बांधून कोकण काबीज करण्याचा त्यांचा बेत राजांनी आपल्या युद्धकौशल्याने हाणून पाडला होता. मुघल व मराठे यांच्या लढाईत छत्रपती संभाजी महाराजांचा, खात्रीने पराजय होईल असे पोर्तुगीज गव्हर्नर काउंट द आल्व्होरला वाटत होते.
पोर्तुगीज व मुघल यांच्यातील तहामुळे संभाजी राजांनीही आपले सामोपचाराचे धोरण बदलून चढाईचे धोरण स्वीकारले. फोंड्याचा वेढा उठविल्यानंतर संभाजी राजे पन्हाळ्यास जातील अशी पोर्तुगीज गव्हर्नर काउंट द आल्व्होरची अटकळ होती.
पण २४ नोव्हेंबर १६८३ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोवे शहराच्या(सध्याचे ओल्ड गोवा) बाहेरील वरच्या सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला आणि बेसावध पोर्तुगिजांना काही समजायच्या आतच जुवे किल्ला ताब्यात घेतला.
यामुळे मध्ये फक्त मांडवी नदी आणि पलीकडच्या तीरावर राजधानी गोवे शहर अशी आणीबाणीची परिस्थिती पोर्तुगिजांवर आली. दुसऱ्या दिवशी २५ नोव्हेंबर १६८३ रोजी सकाळी पोर्तुगीज प्रतिकारासाठी जुवे किल्ल्यापाशी आले, पण नेहमीच्या गनिमी काव्याने मराठ्यांनी त्यांना चकवून कचाट्यात पकडले.
पोर्तुगीज गव्हर्नर आधीच गोवे शहर सोडून गेला होता, त्याला भीती होती की शंभूराजे एक न एक दिवस पूर्ण गोवा जिंकून घेतील. म्हणूनच त्याने ठरवले की संभाजी राजांच्या बरोबर तह करून आपला जीव वाचवायचा. ७ जानेवारी १६८४ रोजी शाह आलम रामघाटावरून आला आणि कोकणात तळ ठोकला.
जेधे शकावली या पुस्तकात तो गोव्यातील डिचोलीला पोहोचल्याचा उल्लेख आहे. १३ जानेवारी रोजी, शाह आलम रामघाटावरून खाली येताच, संभाजीराजांना गोव्याचा वेढा उठवावा लागला. रामघाट गोव्यापासून फक्त ३० मैलांवर आहे. १५ जानेवारी १६८४ रोजी त्याच तारखेच्या पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या पत्रात असे नमूद केले आहे की मुघल सैन्य डिचोलीपासून फक्त सहा मैल अंतरावर होते.
औरंगजेबाचे चरित्रकार ईश्वरदास यांच्या मते, डिचोली एक मोठे शहर होते आणि डिचोलीच्या सुभेदाराच्या अधीन असलेला प्रदेश म्हणजे भटग्राम, साखळी (सत्तरी), पेडणे, मणेरी आणि बांदा. डिचोली शहर पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यानंतर, मुघल सैन्याने भटग्राममधील नार्वेजवळ नदीच्या काठावर तळ ठोकला.
औरंगजेबाच्या मुघल सैन्याने पिळगाव येथील रामाचे मंदिर पाडले आणि मूर्ती नष्ट केल्या. मुघलांनी भटग्राम परिसरातील सप्तकोटेश्वर मंदिरासह इतर मंदिरांचेही नुकसान केले असण्याची शक्यता वर्तवली जाते.
या मोहिमेत, पुढे मुघलांनी कुडाळ आणि बांदा (सावंतवाडी) जाळले आणि वेंगुर्ला लुटले. शाह आलमने पोर्तुगीज व्हाइसरॉयकडे गोव्याला एक दूत आणि एक पत्र पाठवले आणि सुरतहून आलेल्या जहाजांना मांडवीवरून नार्व्याला जाण्यासाठी परवानगी मागितली.
मुघलांचा ताफा मांडवीतून गेला तर गोवे शहराला धोका आहे असे त्यांना वाटले म्हणून व्हाइसरॉयने कायसुव नदीच्या काठावरील चोडण किल्ल्यावरून तोफा दुसऱ्या ठिकाणी नेल्या व त्यांना मांडवी नदीऐवजी कायसुव नदीतून जाण्याची परवानगी दिली.
सुरतहून आलेल्या जहाजांनी अन्नधान्यासह काही माल कायसुव बंदरात आणि उर्वरित वेंगुर्ला बंदरात उतरवला. औरंगजेबाचे चरित्रकार भीमसेन म्हणतात की या जहाजांनी शाह आलमच्या सैन्याला दोनदा धान्य पुरवले होते. मोगल राजदूत शेख महंमद पुन्हा एकदा गोव्यात आला आणि पोर्तुगीज व्हाइसरॉयला भेटला.
तो या मोगल आरमारासह आला होता. पुढे व्हाइसरॉयने २३ जानेवारी १६८४ रोजी आपला दूत जोआओ अँटोनियो शाह आलमकडे पाठवला. दोन दिवसांपूर्वी, शाह आलमचे सैन्य डिचोलीहून निघाले होते.
मोगल छावणीत जाण्यापूर्वी व्हाइसरॉयने राजदूताला लेखी सूचना दिल्या होत्या. २० मार्च १६८४ रोजी मोगल बादशहाला लिहिलेल्या गोव्यातील पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या पत्रात प्रमुख मुद्द्यांची माहिती उपलब्ध आहे. पोर्तुगीज व्हाइसरॉयने शाह आलमला कळवले होते की तो ‘संभाजीविरुद्ध युद्ध सुरू ठेवण्यास तयार आहे आणि पावसाळा संपण्यापूर्वी कोकण सोडू नये’ अशी विनंती केली.
पुढे व्हाइसरॉयने अशीही विनंती केली की मुघलांनी त्याला ही रक्कम भरपाई म्हणून द्यावी आणि सहाशे घोडेही पाठवावेत.
२० मार्च १६८४ रोजी मोगल बादशहाला लिहिलेल्या गोव्यातील व्हाइसरॉयच्या पत्रात राजदूताने शाह आलमशी इतर किरकोळ बाबींवरही चर्चा केल्याचा उल्लेख आणि पोर्तुगीज व्हाइसरॉयने बांदा ते मिर्जण कर्नाटकपर्यंतचा प्रदेश मागितल्याचा उल्लेखही केला आहे. १६८४मध्ये संभाजी राजांनी पोर्तुगिजांबरोबर तह केला.
त्याअनुसार मराठ्यांनी पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले गोव्याचे ३ तालुके त्यांना सोडून दिले. तर पोर्तुगिजांनी चौल इथे कर देण्याचं मान्य केलं. पण या तहाची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही. बार्देशमधले किल्ले मराठ्यांनी परत केले नाहीत.
औरंगजेबाची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली. मराठा सैन्य आणि पोर्तुगीज यांच्या चकमकी सुरूच राहिल्या. पण संभाजी राजे पोर्तुगिजांना हाकलून लावण्यासाठी परत गोव्यात येऊ शकले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोवा मोहिमेत इथल्या स्थानिक मंडळींनी त्यांना विरोधच केला होता. पण संभाजी राजे मात्र त्यांची मदत मिळवण्यात यशस्वी ठरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.