
किशोर पेटकर
भारतीय फुटबॉलचा प्रशासकीय कारभार ढेपाळल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आय-लीग फुटबॉल स्पर्धा विजेतेपद प्रकरणी अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरच (एआयएफएफ) स्वयंगोल झाला. विजेत्या घोषित संघाला प्रदान केलेला करंडक परत मागण्याची पाळी आली आहे. सारासार विचार करता, हा सारा गोंधळ आणि ही नामुष्की टाळता आली असती, फक्त परिपक्व नेतृत्वाची आणि संयमाची आवश्यकता होती.
फुटबॉल मैदानावर एकाग्रता, समयसूचकता महत्त्वाची ठरते. त्यात कमी पडल्याने आय-लीग विजेतेपदाबाबत महासंघाच्या कारभाराचे वाभाडे निघाले. न्यायिक आदेशाकडे दुर्लक्ष करण्याइतपत गंभीर चूक महासंघाने केली. मैदानावर शिस्तभंग, खिलाडूवृत्ती नसण्याबद्दल यलो किंवा रेड कार्ड दाखविले जाते, तसेच आदेश उल्लंघनप्रकरणी महासंघालाही कारवाईस सामोरे जावे लागू शकते.
स्वित्झर्लंडस्थित कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (सीएएस) या क्रीडा लवादाच्या करंडक व पदक प्रदान कार्यक्रमास स्थगिती आदेशाची पायमल्ली करून रविवारी गोव्यात चर्चिल ब्रदर्स संघाला आय-लीग विजेतेपदाचा करंडक देण्यात आला, शिवाय बाळबोध कारणे देत महासंघाचे उपसचिव करंडक प्रदान सोहळ्याचे समर्थनही करून मोकळे झाले. प्रकरण चांगलेच शेकणार हे लक्षात आल्यानंतर आता धावाधाव सुरू आहे.
सीएएसच्या अपिल लवाद विभागाच्या उपाध्यक्षाकडून देण्यात आलेल्या आदेशाची माहिती महासंघाच्या प्रधान कार्यालयास रविवारीय सुट्टी असल्यामुळे वेळीच मिळाली नाही व समारंभ संपल्यानंतर मिळाल्याचा दावा फुटबॉल महासंघ करत असून त्याचवेळी न्याय प्रक्रियेचा आदर राखण्याचीही भाषा ते करत आहेत. आजच्या आधुनिक, प्रगत युगात आदेशाची कल्पना नव्हती हे कारणच हास्यास्पद आहे.
चर्चिल ब्रदर्सचे सर्वेसर्वा चर्चिल आलेमाव बारा वर्षांनंतर पुन्हा आय-लीग करंडक हातात घेण्यासाठी उतावीळ होते. त्यांचे वाढते वय आणि फुटबॉलवरील अतिप्रेम लक्षात घेता, त्यांनी करंडक मिळविण्यासाठी धडपडणे समजण्यासारखे आहे. मात्र अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा धरसोड कारभार अनाकलनीय आहे. चर्चिल यांची कन्या वालंका या चर्चिल ब्रदर्स संघाच्या सीईओ असून महासंघाच्या सदस्यही आहेत.
त्यांना कायद्याचे चांगले ज्ञान आहे. तरीही, आय-लीग करंडक कुठे तरी पळून जाणार या भीतीने घाईगडबडीत विजेतेपदाचा सोहळा उरकून टाकला. त्यासाठी महासंघाचे उपसचिव एम. सत्यनारायण खास गोव्यात आले. सोहळ्यात गोवा फुटबॉल असोसिएशनलाही (जीएफए) सामावून घेतले नाही. जीएफए ही राज्यातील फुटबॉल प्रशासन हाकणारी प्रमुख संघटना. चर्चिल ब्रदर्स संघ या संघटनेशी संलग्न आहे. संघाच्या चाहत्यांनाही अंधारात ठेवत चर्चिल ब्रदर्सने करंडक मिळविल्याचा (अल्पकालीन) जल्लोष केला.
गोमंतकीय फुटबॉल प्रशासनात चर्चिल आलेमाव व सध्याचे जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस हे कट्टर वैरी. चर्चिल हे माजी जीएफए अध्यक्ष. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाला पराभूत करून कायतान जीएफए अध्यक्ष बनले, त्याचा राग अजूनही गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना आहे. खेळाद्वारे खिलाडूवृत्ती वृद्धिंगत होते, उलट चर्चिल ब्रदर्स आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा दृष्टिकोन या सुंदर खेळास अशोभनीय ठरत आहे.
घाईगडबडीत घेतलेल्या आय-लीग करंडक सोहळा प्रदान घटनेवरून एक गोष्ट साफ झाली, ती म्हणजे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ सध्या दिशाहीन आहे. नामधारी एफसी व इंटर काशी यांच्यात गेल्या १३ जानेवारी रोजी झालेल्या सामन्यात अपात्र खेळाडू खेळविल्याने वाद सुरू आहे. महासंघाच्या शिस्तपालन समितीने इंटर काशीच्या बाजूने निर्णय देत पराभूत सामन्यात विजयाचे पूर्ण तीन गुण बहाल केले. नंतर नामधारी एफसीने महासंघाच्या अपिल्स कमिटीचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी तांत्रिक मुद्द्यावर बोट ठेवत अपिल्स कमिटीने नामधारी संघाचे विजयी तीन गुण कायम ठेवले.
या निर्णयामुळे ४० गुणांसह चर्चिल ब्रदर्सचे अग्रस्थान अबाधित राहिले व इंटर काशी संघ ३९ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. आय-लीग स्पर्धेतील अखेरचा सामना सहा एप्रिल रोजी झाला, त्यानंतर दोन आठवड्यांनी १९ एप्रिल रोजी अपिल्स कमिटीच्या आदेशानुसार महासंघाने चर्चिल ब्रदर्सला आय-लीग विजेते घोषित केले. त्याचदिवशी जाहीर पत्रकाद्वारे आपण सीएएस या क्रीडा लवादाकडे दाद मागणार हे इंटर काशी संघाने जाहीर केले.
क्रीडा लवादाने सुनावणीनंतर इंटर काशीला पुन्हा तीन गुण बहाल केल्यास ते ४२ गुणांसह आय-लीग विजेते बनतील. प्रकरण क्रीडा लवादाकडे वर्ग झाल्याने तात्पुरता आदेश अपेक्षित असल्याचे ज्ञात असूनही चर्चिल यांच्यासमोर नमून महासंघाने नाक कापून घेतले. कदाचित क्रीडा लवादाकडे आपली बाजू लंगडी पडेल असे वाटून चर्चिल ब्रदर्स संघ व्यवस्थापनाने करंडक प्राप्त करण्यासाठी तगादा लावला असावा. मात्र भारतीय फुटबॉलमध्ये सर्वोच्च असलेल्या महासंघाला नक्कीच संयम दाखविता आला असता. देशांतर्गत फुटबॉलमधील २०२४-२५ सालचा मोसम अजून संपलेला नाही. थोडी कळ सोसली असती, तर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे आय-लीग करंडक प्रकरणी हसे झाले नसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.