

नवी दिल्ली येथे झालेल्या ‘ब्रिक्स परिषदे’त कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या (ए.आय.) वाढत्या प्रभावाबरोबरच तिच्या सुरक्षित, सर्वसमावेशक आणि जबाबदार वापराची गरज अधोरेखित करण्यात आली. ब्रिक्सच्या जाहीरनाम्यात ‘एआय’च्या संधी मान्य करताना सुरक्षितता, समावेशकता, विश्वासार्हता आणि समान प्रवेश यावर भर देण्यात आला आहे. एआय क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी अँथ्रॉपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारिओ अमोडेई यांनीही अधिक कडक सरकारी नियमनाची गरज व्यक्त केली आहे. या नियमनाचे स्वरूप कसे असावे, याची चर्चा.
भारताचा नियमनविषयक विचार
भारतात कठोर स्वतंत्र कायद्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेवर सध्याच्या डिजिटल कायद्यांच्या आणि नैतिक तत्त्वांवर आधारित लवचिक आणि नवनिर्मितीला प्राधान्य देणाऱ्या नियमावलीद्वारे नियंत्रण ठेवले जाते. युरोपसारख्या कडक नियमन व्यवस्थेऐवजी, नवा एआय कायदा करण्याऐवजी भारत सरकार नवीन तांत्रिक धोक्यांशी जुळवून घेण्यासाठी अस्तित्वातील कायद्यातच योग्य त्या तरतुदी करीत आहे.
सरकारची सात सूत्रे
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रसृत केलेल्या भारत एआय नियमन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विश्वास, मानवकेंद्रित रचना, निष्पक्षता आणि सुरक्षितता यांचा समावेश असलेल्या सात मार्गदर्शक तत्त्वांभोवती (सूत्रे) नैतिक चौकट आखली आहे.
1. विश्वास आणि सुरक्षितता : एआय प्रणाली सुरक्षित आणि विश्वासार्ह असावी. त्यांनी नुकसान पोहोचवू नये किंवा खोट्या माहितीचा प्रसार करू नये.
2. समावेशकता आणि निष्पक्षता : एआय साधने अल्गोरिदमच्या पक्षपातापासून मुक्त असावीत.
3. पारदर्शकता आणि जबाबदारी: डेव्हलपर्सनी एआयच्या निर्णयप्रक्रियेचा मागोवा घेता येईल असे केले पाहिजे.
4. गोपनीयता आणि संरक्षण: एआय विकासाने व्यक्तीच्या डेटा गोपनीयतेच्या हक्कांचा काटेकोरपणे आदर केला पाहिजे.
5. मानवकेंद्रित रचना: मानवी देखरेख मुख्य केंद्रस्थानी ठेवून, तंत्रज्ञानाने मानवी प्रगतीसाठी मदत करावी.
6. बौद्धिक संपदा संरक्षण: नियमांनी निर्मात्यांना मोबदला देणे आणि नवनिर्मितीच्या प्रशिक्षणासाठी डेटा ॲक्सेस देणे यात समतोल साधला पाहिजे.
7. मजबूती आणि लवचिकता: प्रणाली सायबर धमक्या, विरोधी हल्ले आणि प्रणालीतील कमतरतांना तोंड देण्यास सक्षम असावी.
भीतीचा बागुलबुवा नको
'ब्रिक्स' संमेलन नवी दिल्ली येथे पार पडले. त्यातील एका सत्राच्या चर्चेच्या केंद्रस्थानी 'एआय' च्या साधकबाधक उपयोगाची चर्चा होती. या तंत्रज्ञानाचा विधायक, तसेच परस्परांतील विश्वासार्हता वाढवण्यासाठी उपयोग व्हावा, याकडे लक्ष वेधले गेले. त्यादृष्टीने नियमावली बनवण्याबद्दल सर्वसंमती झाली. याच काळात आणखी एक लक्षवेधी घटना घडली. ती म्हणजे जेकब कॉक्सन या अमेरिकेतील ''अँथ्रोपिक'' या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीच्या एका संशोधकाने, हे तंत्रज्ञान आता स्वतःलाच सुधारून स्वतःलाच जन्म देऊ लागले असून, लवकरच मानवतेचा सर्वनाश करेल, अशी भीती व्यक्त करत नोकरीचा राजीनामा दिला. या वक्तव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली, जगभरात चर्चादेखील झडल्या. यावरून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या निर्मितीचा वेग कमी केला पाहिजे, असे मत समोर येत आहे.
आज आशियातील चीन, जपान, भारत, आदी देश या क्षेत्रात प्रगती करत आहेत. कॉक्सन यांनी केलेले वक्तव्य व त्याला देण्यात येणारी वारेमाप प्रसिद्धी यामुळे जगातील मोठ्या जनसमुदायाच्या मनात त्याबद्दल भीती निर्माण करणे, नवीन नियमावली तयार करून, इतर देशांतील उद्योगांना व संशोधनाला खीळ घालण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. यापूर्वीही अनेक बाबतीत बड्या देशांनी असे केले आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा आपण उठवायचा आणि जेव्हा इतर देश त्याचा फायदा उठविण्यासाठी सज्ज होतात, तेव्हा त्यांच्यापुढे धोक्यांचा बागुलबुवा उभा करायचा. आताही तसे होत नाही ना, यावर लक्ष ठेवावे लागेल. 'ब्रिक्स' ने हे लक्षात घेऊन स्वतःचे नियम बनवणे व स्वतःची प्रगती साधणे अतीव गरजेचे आहे.- प्रा. आनंद ज. कुलकर्णी.
संचालक, इन्स्टि.ऑफ ‘ए.आय.’( एमआयटी)
प्रज्ञावंतांचा अल्गोरिदम!
आदिम काळापासून माणसाला वेगाचे कोण आकर्षण! कारण त्याचा संबंध हा ऊर्जेशी असतो. या ऊर्जेनेच जगात क्रांती घडवून आणली. आज माणूस पुन्हा ‘एआय’ क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे, पहिल्या औद्योगिक क्रांतीपासूनचा त्याचा प्रवास हा अनेक खाचखळग्यांनी भरलेला होता. ‘एआय’ने त्याच्या वाटचालीला केवळ सुखकर बनविले नाही तर त्याला ‘वेग’ही दिला. वेगावर विविध प्रज्ञावंतांनी दिलेला संदेश म्हणूनच चिंतनीय ठरतो.
अनियंत्रित महाबुद्धिमत्तेपुढे मानवी श्रम निरुपयोगी होणार?
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली नियंत्रणाबाहेर जाणारी स्वायत्तता मिळवून मानवी देखरेखीला मागे टाकते, तेव्हा ती मनुष्यबळ आणि व्यवस्थापनासाठी गंभीर धोके निर्माण करते. अनियंत्रित महाबुद्धिमत्ता ही कार्यस्थळावरील निर्णय पूर्णपणे स्वयंचलित करून मानवी श्रमाला निरुपयोगी बनवून आणि कामकाजाचे नियंत्रण काढून घेऊन मनुष्यबळाचा विध्वंस करू शकते. सक्षम एआय प्रणाली कामगारांपेक्षा जलद आणि स्वस्त दरात गुंतागुंतीची कामे करू शकतात. लेखन, संशोधन, कोडिंग आणि सर्जनशील कलांशी संबंधित व्यवसाय पूर्णपणे निरुपयोगी होण्याचा धोका आहे. स्वतःमध्ये वेगवान सुधारणा करणारे एआय कामगारांना नवीन कौशल्ये शिकण्यासाठी वेळच मिळणार नाही, अशा वेगाने एका रात्रीतून संपूर्ण उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणू शकते.
कार्यस्थळ व्यवस्थापनावर ताबा
कर्मचाऱ्यांची भरती, कामावरून काढणे आणि कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही समीक्षा न करणाऱ्या एआयचा कंपन्या वापर करू शकतात. अनेकदा जुन्या मानवी भेदभावांची पुनरावृत्ती करणाऱ्या अल्गोरिदममुळे भरती आणि बढतीमध्ये अन्यायकारक गैरसोय होते. ‘आयबीएम इन्स्टिट्यूट फॉर बिझिनेस व्हॅल्यू’च्या संशोधनात नमूद केल्याप्रमाणे अल्गोरिदमने टॅलेंट प्लॅनिंगवर ताबा मिळवल्यामुळे पारंपारिक मनुष्यबळ विभागांना धोरणात्मक नियंत्रण गमावण्याचा धोका संभवतो.
मानवी नियंत्रणाचा पूर्ण लोप
प्रगत एआय एजंट्स कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी संसाधने मिळवू शकतात, कोड पुन्हा लिहू शकतात आणि मानवी बंद आज्ञांना बगल देऊ शकतात. महाबुद्धिमत्ता पायाभूत सुविधांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मूठभर संस्था उर्वरित मानवी कार्यबलाला बाजूला सारू शकतात.
सरकारच्या देखरेख संस्था
एआय गव्हर्नन्स समूह : विविध मंत्रालयांमध्ये एआयच्या नियमांचा समन्वय साधतो.
तंत्रज्ञान आणि धोरण तज्ज्ञ समिती : तांत्रिक मानके आणि धोक्यांच्या ट्रॅकिंगवर सरकारला सल्ला देते.
इंडिया एआय सेफ्टी इन्स्टिट्यूट : सुरक्षितता साधने, घटना डेटाबेस आणि धोक्यांच्या चाचणीवर लक्ष केंद्रित करते.
कोणाची काय जबाबदारी?
सरकार- नियामक संस्था
पाणी, ऊर्जा आणि जमीन या तीन घटकांचा जबाबदारीने वापर करण्यासाठी धोरण आखण्यात यावे. मानवी हक्कांची जपणूक करत विषमता वाढू नये म्हणून काळजी घेणे.
विकसक आणि प्रवर्तक
एखादे तंत्रज्ञान आणि उत्पादन विकसित करताना त्याच्यासाठी ऊर्जेचा कमीत कमी वापर कसा होईल, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे कामही त्याच्या माध्यमातून कसे होईल, याबाबत सावध राहावे.
विद्यापीठे आणि संशोधनसंस्था
परिणामांचे मोजमाप करण्यासाठी मानकांची निश्चिती करणे. खुल्या प्रणाली आणि साधनांचा विकास घडवून आणणे, जोखीम कमी करणारे उपाय आखत प्रशिक्षण अन् क्षमता वृद्धीवर भर.
गुंतवणूकदार आणि वित्तीय संस्था
मोठ्या व्यवहारांमध्ये जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे, आर्थिकदृष्ट्या सोयीच्या संगणकीय प्रणालीचा वापर, शाश्वत विकास ध्येयाशी गुंतवणुकीचा संबंध जोडणे, पारदर्शकतेचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.
उद्योजक आणि सार्वजनिक वापरकर्ते
‘एआय’च्या वापराबाबत संस्थांतर्गत धोरणे निश्चित करणे, हे करताना खर्चाचे नियोजन करावे, प्रत्येक घटकाकडून प्रणालीचा जबाबदारीने वापर होतो की नाही हे पडताळून पाहणे.
माध्यमे, नागर समाज
परिणाम पडताळून पाहणे, पर्यावरणीय न्यायासाठी आग्रह, वंचित घटकांच्या हिताचे रक्षण. पारदर्शकतेवर भर देत जनसाक्षरता वाढविणे गरजेचे.
संत कबीरांनी ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब।’ या दोह्यातून कर्मयोग सांगतानाच ‘जरा धीर- धीरे गाडी हाको मेरे राम गाडीवाले,’ अशी साद घातली.
ओशो म्हणायचे, तंत्रज्ञानाने माणसाला वेग दिला खरा; पण त्यामुळे त्याचे मन अधिक अस्थिर झाले. मनाच्या वेगाला लगाम घालण्यासाठी त्यांनी ध्यानविधीचा पुरस्कार केला.
जे. कृष्णमूर्ती यांनीही वेगाचा सखोल विचार केला होता. संथ गती असतानाच सभोवतालचे बारकाईने निरीक्षण करता येते, स्वजागृतीही ल त्यातून साध्य होते, असे ते सांगत.
स्त्रोत : संयुक्त राष्ट्रे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.