

फोंडा: डॉ. प्रकाश वझरीकर यांच्या लेखणीतून साकार झालेल्या ‘होमखंड’ या स्वातंत्र्यसंग्रामावर आधारित असलेल्या नाटकाचा प्रयोग सादर झाला. तसे हे नाटक पंधरा वर्षांपूर्वीचे. या नाटकाचे पुस्तकही प्रदर्शित झाले आहे; तरीही या नाटकाचा ‘फ्लेवर’ अजूनही कायम आहे.
स्वातंत्र्यसैनिक बाळा राया मापारी यांच्यावर आधारित हे नाटक स्वातंत्र्यसैनिकांनी भोगलेले त्रास अधोरेखित करते. हे नाटक स्वातंत्र्यसैनिक बाळा मापारी यांच्यावर आधारित आहे. या नाटकाची सुरुवात होते ती पोर्तुगिजांचा चमचा असलेल्या नागू भाटकारापासून. त्याच्या घरात पोर्तुगीज अधिकारी मिरांदा परत परत येत असतो.
त्याची नजर भाटकाराच्या बायकोवर असते. पण तरीही भाटकार आपल्या स्वार्थाकरता पोर्तुगिजांची हांजी हांजी करतच असतो. भाटकाराची चमचेगिरी दाखवीत हे नाटक राम मनोहर लोहियांना स्पर्श करीत स्वातंत्र्यसैनिक बाळा मापारींवर येऊन धडकते. आणि त्यांच्या हुतात्मा होण्याच्या प्रसंगाने नाटकाचा शेवट होतो.
या संहितेला विनय गावस यांनी चांगला न्याय दिला असला तरी काही प्रसंग रेंगाळल्यासारखे वाटतात. दुसऱ्या अंकाच्या सुरुवातीला भाटकाराच्या घरातला प्रसंग ‘नमनाला तेल घडीभर’ या प्रकारातला वाटतो.
स्वातंत्र्यसंग्रामावर आधारित असलेल्या नाटकाला एक लय असावी लागते. पण प्रसंग जर रेंगाळले तर नाटकाची लय बिघडायला लागते. याचा अनुभव या नाटकात काही ठिकाणी येतो. काही प्रसंग तर ठिगळे लावल्यासारखे वाटतात.
नागू भाटकार मिरांदाची भेट बाळा मापारींशी घालून देतो असे सांगतो आणि लगेच पोलिस मापारींना पकडून आणतात, हा प्रसंग थोडा उपरा वाटतो. मात्र, नंतर मापारींची प्रातिनिधिक तिरडी तसेच पार्श्वभूमीवर दिवंगत मापारींचे जोशपूर्ण भाषण दाखवून दिग्दर्शकांनी याची भरपाई केली आहे.
त्यामुळे हा प्रसंग मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे राम मनोहर लोहिया यांची बैठक व ती बैठक उधळून लावण्याकरता पोर्तुगीज पोलिसांनी केलेला अत्याचार प्रेक्षकांना अंतर्मुख करून जातो.
दिग्दर्शकाने सांघिक प्रसंगही प्रभावीरीत्या टिपले आहेत. त्यामुळे काही प्रसंग बाधक वाटत असले तरी नाटक पकड घेते. कलाकारात नागू भाटकार झालेले भालचंद्र गावस, मिरांदा झालेले रामा गावस, बाळा मापारी झालेले संतोष गावस, राम मनोहर लोहिया झालेले शिवाजी देसाई यांनी आपल्या भूमिका समजून साकारल्या.
मात्र, त्यामानाने तुळशी झालेल्या आकांक्षा नाईक, इंद्रावती झालेल्या नेहा गावस बऱ्याच कमी पडल्या. सांघिक प्रसंगातील कलाकारांनी चांगली साथ दिल्यामुळे हे प्रसंग परिणाम साधू शकले. मात्र, तरीही कालच्या नाटकात अभिनयाचे जे प्रत्ययकारी दर्शन घडले होते तसे दर्शन या नाटकात घडू शकले नाही, हेही तेवढेच खरे.
सुजन सावंत यांचे संगीत आणि दीपक गावस यांचे पार्श्वसंगीत परिणामकारक ठरले. ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना जोर कितना बाजूए कातिल में है’ सारख्या गझला तर नाटकाच्या मूडला शोभेल अशा असल्यामुळे समर्पक वाटल्या. कुंदन चारी यांचे नेपथ्यही नाटकाच्या धाटणीला पूरक असे होते.
दिग्दर्शकाने या नेपथ्याचा प्रभावीपणे वापर केल्याचे जाणवले. गौतम गावडे यांची प्रकाश योजनाही वेधक होती. एकंदरीत काही त्रुटी वगळल्यास स्वातंत्र्यसंग्रामावर आधारित असलेल्या ‘होमखंड’ नाटकाच्या प्रयोगाने प्रेक्षकांवर आपला प्रभाव टाकण्याबरोबर स्पर्धेतील रंगतही कायम ठेवण्यात यश मिळवले एवढे निश्चित.
‘होम खंड’ या नाटकाच्या प्रयोगाला मंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते. नाटकाच्या सुरुवातीपासून उपस्थित असलेले शिरोडकर नाटक संपल्यानंतर कलाकारांना भेटूनच नाट्यगृहाबाहेर पडले. मंत्री असूनही अडीच तास कला मंदिरात बसून नाटकाचा आस्वाद घेणारे सुभाष भाऊ ‘सेंटर ऑफ ॲट्रॅक्शन’ ठरले एवढे मात्र खरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.